Amar Misal

Tragedy Thriller

3  

Amar Misal

Tragedy Thriller

काळरात्र

काळरात्र

8 mins
373


आज सायकल सवारी रद्द झाल्यामुळं प्रमोद, महेश आणि जगदीश गावातल्या शाळेच्या व्हरांड्यात निवांत गप्पा मारत लहानपणीच्या एकमेकांच्या गमतीजमती आठवून खदखदून हसत होते. अचानक कसलातरी आवाज महेशच्या कानावर आला आणि महेश दचकला. त्याला असं अचानक दचकलेलं पाहून जगदीश आणि प्रमोद हसतंच डरपोक म्हणून त्याला चिडवू लागले. पण महेश पुरता घाबरला होता. अचानक त्याच्या सर्वांगाला दरदरून घाम सुटला. काहीतरी सिरियस मॅटर आहे हे ओळखून जगदीश आणि प्रमोद ने त्याची टर उडवण बंद केलं आणि नेमकं काय झालं याबाबत विचारलं. महेशने कसलातरी आवाज आला एवढंच सांगून विषय टाळला. पण जगदीश आणि प्रमोद ने कसलाच आवाज न ऐकल्यानं त्याला भास झाल्याचं सांगून त्याची भीती थोडी कमी केली आणि ते प्रमोदच्या घरी गेले. 

प्रमोदची सायकल पंक्चर असल्यामुळं आजची सायकल सवारी रद्द झाली होती. पंक्चर काढणारा बाहेरगावी गेला होता. परतायला निदान चार दिवसतरी जाणार असल्याचं त्याच्या घरच्यांनी सांगितलं. मग प्रमोद च्या हट्टामुळे बाजूच्या गावातल्या पंक्चर काढणाऱ्याकडं आजच जायचं ठरलं.

संध्याकाळचे साधारण सहा वाजून गेले होते. जगदीश, प्रमोद आणि महेश सायकल घेऊन चालायला लागले. चालत साधारण अर्ध्या तासाचं अंतर. ओढ्यावरून जाणारा वळणावळणाचा दूरवर पसरलेला डांबरी सुनसान रस्ता. रस्त्याच्या दुतर्फा शेतवड असल्यानं मनुष्यवस्ती, घरं कुठेच नव्हती. शेवटी गम्मत जम्मत करत तिघे साधारण पावणे सात च्या दरम्यान बाजूच्या गावात असणाऱ्या पंक्चर वाल्याकडे दुकानावर पोहोचले. आधीच एका सायकलचं काम हाती घेतलेलं असल्यामुळं अर्धा एक तास थांबावं लागणार असल्याचं त्याने सांगितलं. सायकल आजच दुरुस्त करून आणायची अशा निर्धाराने अर्ध्यातासाची पायपीट करून आल्यानं थांबायचं ठरलं.

रात्रीचे आठ वाजले आणि सायकल दुरुस्तीला घेतली. बराच वेळ निरीक्षण केल्यावर सांगण्यात आले, बऱ्याच ठिकाणी पंक्चर असल्याने आज सायकल दुरुस्त करून मिळणे कठीण आहे. तुम्ही उद्या संध्याकाळी चार वाजता या. त्याचं ते बोलणं ऐकून तिघेही खुप निराश चेहऱ्यानी सायकल तिथेच ठेवून घरी निघण्याच्या तयारीला लागले. तेवढ्यात प्रमोद ने आपण याच गावात मामाचं घर असून मी आजची रात्र इथेच थांबून उद्या सायकल घेऊन येतो असं सांगून ती रात्र तिथेच मुक्काम केला. आता महेश आणि जगदीश यांनाच शेतवडीच्या मधोमध असलेल्या त्या सुनसान डांबरी रस्त्यावरून चालत प्रवास करत घर गाटायचं होतं. 

रात्रीचे नऊ वाजले होते. अंधाऱ्या काळोख्या रात्रीत पुसटसं चांदण पडल्यामुळं दोघांना थोडा दिलासा मिळाला. जगदीश आणि महेश गप्पा करत रस्ता पायाखाली घालत घराच्या दिशेनी भरभर चालत होते. सुरवातीच्या रस्त्याला काही कुटुंबे गावच्या बाहेर राहायला असल्यामुळं थोडा आधार वाटला पण दोघांच्याही मनात भीती होती ती ओढ्यावरून जाणाऱ्या त्या वळणावळणाच्या रस्त्यावरून पुढे जाण्याची. आजवर गावातील जुन्या जाणत्या लोकांकडून त्या जागेविषयी आणि तिथल्या भुताटकी विषयी अनेक गोष्टी जगदीश आणि महेश ने ऐकल्या होत्या. दोघांच्याही मनात एक वेगळीच हुरहुर लागून राहिली होती.

अखेर ओढा जवळ येऊ लागला. जगदीश आणि महेश हातातल्या मोबाईल टॉर्च च्या उजेडात दबक्या पाऊलांनी हळूहळू चालत होते. ओढा जसजसा जवळ येत होता तसं मनातली भीती वाढत होती. दोघंही घाबरले होते पण मनातली भीती त्यांनी एकमेकांना जाणवू दिली नव्हती. तसं करणंच त्यांच्या फायद्याचं होतं. दोघांमध्ये एकजरी घाबरला तरी त्याला पाहून दुसऱ्याचा संयम सुटणार होता. दोघंही मन divert करण्यासाठी काहीतरी विषय काढून बोलत होते. बोलता बोलता नजर रस्त्याच्या दुतर्फा भिरभिरवीत होते. सर्वत्र नीरव शांतता पसरली होती. रातकिडे अधूनमधून किरकिर आवाज करायचे मग मधेच आवाज बंद व्हायचा. अनं पुढच्याच क्षणी परत किरकिर चालू व्हायची. दुरदूरवर कोणाचीही चाहूल नव्हती. 

जगदीश आणि महेश आता ओढ्यावरून जाणाऱ्या रस्त्यावर चालायला लागले होते. दोघंही बोलण्यात गुंतले होते तोच अचानक कोणीतरी रडत असल्याचा आवाज येऊ लागला. आवाज ऐकताच भीतीची एक लहर दोघांच्याही तळपायापासून अगदी मस्तकापर्यंत एखाद्या विजेसारखी लखलखून गेली. दोघंही काहीक्षण जागच्या जागी स्तब्ध झाले. दूरदूर कोणीच असल्याचं जाणवत नव्हतं. मग हा आवाज कुठून आणि कोणाचा येत असेल...?? काही कळायला मार्ग नव्हता. ओढ्यावर आजवर घडलेल्या असंख्य भीतीदायक घटना क्षणार्धात दोघांच्याही मनात तरळून गेल्या. परत जावं तर निम्यापेक्षा जास्त अंतर मागे टाकलं होते. जगदीश ने हिम्मत दाखवत महेश ला न थांबता चालत राहण्याच्या सूचना केल्या आणि दोघे चालू लागले. पुढे जाईल तसा रडण्याचा आवाज खुपच जोरजोराने ऐकू येत होता. कधी उजव्या बाजूच्या एखाद्या झाडीतून, कधी अगदी त्यांच्या मागे कोणीतरी रडत त्यांच्या मागेमागे थप थप पावलांचा आवाज करत चालत असल्याचा, कधी रस्त्याला लागून असलेल्या उसात कोणीतरी कन्हत असल्याचा आवाज येई.

त्यातच शाळेच्या व्हरांड्यात आलेला आवाज आणि आता हा विचित्र प्रकार पाहून महेश पुरता घाबरून गेला होता. भीतीने त्याचे पाय लटपटू लागले. चारचं पावलं अंतर कापलं आणि महेशने गुढगे टेकले. महेश थरथर कापत होता. कोणीतरी त्याचे पाय मागे खेचत असल्यासारखं वाटून सर्वांगातून दरदरून घाम सुटला होता. तोंडातून नीट शब्दही न फुटल्याने महेश घाबरून जोरजोराने रडायला लागला. तोच आतापर्यंत येणारा रडण्याचा आवाज अचानक थांबला आणि कोणीतरी जोरजोराने हसत असल्याचा आवाज येऊ लागला. हा सर्व प्रकार आणि महेशची अशी अवस्था पाहून जगदीश पुरता कोलमडून गेला होता. पण जगदीश ने हिम्मत सोडली न्हवती. इथे जास्त वेळ असंच बसून राहणं जीवावर बेतणारं होतं हे जगदीश ने जाणलं आणि येणाऱ्या हसण्याच्या आवाजाला न जुमानता खाली बसलेल्या महेशला आपल्या पाठीवर घेऊन तो भर भर पावलं उचलू लागला. 

कासराभर अंतर चालून आल्यावर अचानक सर्वत्र शांतता पसरली. रडण्याचा, हसण्याचा, उसातील कन्हण्याचा आवाज पूर्णपणे थांबला होता. पण धोका अजून टळला नसल्याचं जगदीश ने जाणलं होतं. कदाचित पुढे येणाऱ्या वादळापूर्वीची ही शांतता असावी असं मनाशी पक्क करून कोणत्याही परिस्थितीत आपल्या गावच्या वेशीपर्यंत पोहोचण्याचा निर्धार जगदिशने केला. महेश घाबरून वेड्यासारखा बडबडत जगदीश च्या पाठीवर बसून होता. जगदीशने दाखवलेल्या धाडसामुळे पहिला बेत फसला होता पण दुसरं त्याहूनही मोठं संकट काही क्षणातच त्याच्या समोर उभं ठाकणार होतं. वेस साधारण दीड किलोमीटर दूर होती त्यामुळं जगदीश अगदी जिवाच्या आकांताने महेश ला घेऊन झपाझप पाऊलं टाकत होता. काही क्षणात समोरचं दृश्य पाहून जगदीश सुन्न झाला. महेशची भानावर आला आणि खाली उतरून एकटक पाहत उभा राहिला. 

काही अंतरावर कोणीतरी मुलगी पांढऱ्याशुभ्र कपड्यांमध्ये रस्त्याच्या कडेला असलेल्या दगडावर बसून होती. नीट पाहिल्यावर कळलं की ती मृदुला होती. (मृदुला आणि महेश यांचं एकमेकांवर खुप प्रेम होतं.) महेशला धक्काच बसला. लगबगीनं तो मृदुला जवळ गेला. जगदीश ही आश्चर्यचकीत होऊन मृदुलाकडे पाहत होता. तेवढ्यात मृदुलाने महेश अगदी समोर असूनही मान वळवत पहिलाच कटाक्ष जगदीश कडे टाकला. तिच्या नजरेत वेगळाच रोख होता , डोळे रागाने लालबुंद झाल्यासारखे जाणवत होते. तिच्या नजरेतला रोख आणि एकंदरीत तिचं असं या ठिकाणी, या वेळी असणं हा सगळा प्रकार खुपच विचित्र असल्याचं जगदीशने पटकन ओळखलं. महेशलाही मृदुलाचं असं जगदीशकडे रोखून एकटक पाहणं थोडं विचित्र वाटलं. त्याने मृदुलाला जोरातच हलवलं आणि मृदुला भानावर आली. तिने महेशला मीठी मारली. मृदुलाच अंग थंडगार पडलं होतं. कदाचित बऱ्याच वेळेपासून बसून असल्याने झालं असावं असा विचार येऊन महेशने तिला सावरत काही प्रश्न केले.....

महेश : मृदुला अगं तू इतक्या रात्री आणि इथे अशी एकटीच काय करतीयेस?? आणि हे काय असे पांढरे कपडे घातलीयेस??

मृदुला: मी तुझ्या घरी गेले तेव्हा कळलं की तू बाजूच्या गावात काहीतरी कामासाठी गेलास. तु परतताना तुला भेटता येईल म्हणून मीही गडबडीत ड्रेस घालून डॉगी ला घेऊन आले होते. पण चालता चालता डॉगी हातातली रस्सी खेचून या दिशेनी शेतवडीमध्ये पळत गेला. खुप उशीरापासून मी त्याला शोधतीये पण सापडंत नाहीये. मी तुझीच वाट पाहत होते. बरं झालं तू आलास.

महेश : ठिके तू नको काळजी करू आपण शोधू त्याला. इकडेच कुठेतरी असेल तो. असं म्हणून महेश शेतवडीकडे पाहून डॉगीला आवाज देत होता. तोच मृदुलाने आपली नजर पुन्हा जगदीशकडे वळवली आणि हसऱ्या चेहऱ्याने त्याच्याकडे पाहू लागली.

सर्व प्रकार विचित्र वाटून जगदीशने महेशला आवाज दिला. 

जगदीश : महेश, मला वाटतं आपण सर्वांनी घरी निघायला हवं. रात्रीचे साडेदहा वाजून गेलेत. आणि तसही डॉगीला घरचा रस्ता माहिती आहे. येईल तो सकाळपर्यंत. नाहीच आला तर आपण सकाळी लवकर येऊन शोधू त्याला.

जगदीशचं बोलणं ऐकून मृदुलाच्या चेहऱ्यावरचे रंग उडाले, काही क्षणापूर्वीचं हसू रागात बदललं. जगदीशने ते तिचं बदलणारं रूप नीट न्याहाळलं होतं.

महेश: हो अरे, बरोबर बोलतोयस तू....या अंधारात असं शोधणं खुप कठीण आहे. ( काही वेळापूर्वीचा ओढ्यावरचा प्रसंग आठवून महेश ) मृदुला चला ,निघुया घरी..... डॉगी येईल घरी.

मृदुला : नाही. आपण आताच शोधणार आहोत त्याला. मी त्याला घेतल्याशीवाय घरी जाणार नाही. त्याला जायचं असेल तर जायला सांग.

महेश: अगं पण.....ठिके कुणी कुठेही जायचं नाही. आपण शोधू डॉगीला. ( महेश नाईलाजाने जगदीशकडे पाहत......)

मृदुला : महेश चल तिकडे शेतवडीमध्ये पाहू..... 

असं म्हणत मृदुलाने महेश चा हात धरला आणि त्याला घेऊन जाऊ लागली. तेवढ्यात समोरून कोणीतरी त्यांच्या दिशेनी चालत येत असल्यासारखं जाणवलं. जगदीशने महेश आणि मृदुलाला आवाज दिला आणि कोणीतरी येत असल्याचं सांगितलं. एवढ्या रात्री कोण येत असावं पाहायला हवं असं म्हणत मृदुलाला थोडं थांबायला सांगून जगदीश आणि महेश काही पाऊलं पुढे गेले. चालत येणारी आकृती हळूहळू स्पष्ट जाणवायला लागली. महेशने नाथ बाबा असल्याचं ओळखलं. नाथबाबा कित्येक वर्षांपासून गावाच्या पूर्वेला असणाऱ्या शंकराच्या मंदिरात पुजारी होते. गावातले जुने जाणते लोक नेहमी सांगायचे की, नाथ बाबांना अलौकिक सिद्धी प्राप्त आहे. भुत पिशाचं बाधा झालेल्या अनेक लोकांना नाथ बाबांनी अगदी ठणठणीत बरं केलं होतं. नाथबाबांना पाहून दोघांनाही बरं वाटलं. कोण असेल या विचाराने मृदुला घाबरली असेल....तीला सांगायला हवं असं विचार करून महेशने मागे वळून पाहिलं तर मृदुला कुठेच न्हवती. कुठे गेली असेल....की मृदुलाला कोणी पळवून नेलं असेल या विचारांनी घाबरून महेश ने जगदीशला आवाज दिला. जगदीशने मागे वळून पाहिलं तर मृदुला दिसत न्हवती. दोघांनीही शोधण्याचा प्रयत्न केला पण मृदुला कुठेच दिसेना....दोघांनाही आश्चर्याचा धक्का बसला. थरथरत्या पायांनी दोघेही नाथ बाबांकडे धावत गेले. घडलेला सर्व प्रकार समजल्यावर नाथ बाबांनी जास्त काही न बोलता मृदुला घाबरून घरी धावत गेल्याचं सांगितलं. इथेही जास्त काळ थांबणं योग्य होणार नाही, निघायला हवं आणि लवकरात लवकर गावची वेस ओलांडायला हवी असं त्यांनी जगदीश आणि महेश ला सांगितलं. पण मृदुलाला शोधल्याशिवाय इथून कुठेही जाणार नसल्याचं महेश ने नाथ बाबांना सांगितलं. 

नाथबाबा : " मृदुला तीच्या घरी सुखरूप आहे. विश्वास ठेवा आणि इथून निघा पटकन नाहीतर जीवाला हकनाक मुकाल " 

बाबांचे शब्द कानावर पडतांच दोघंही बाबांसोबत चालायला लागले. महेश मृदुलाची काळजी वाटून आतल्या आत तुटत होता पण त्याच्याकडे दुसरा कोणताच मार्ग नव्हता. बघता बघता महेश आणि जगदीश नाथबाबांसोबत गावाच्या वेशीवर येऊन पोहोचले आणि सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. नाथबाबांनी दोघांना घरी जायला सांगून काहीचं न बोलता मंदिराच्या दिशेने निघून गेले. दोघे आता गावात पोहोचले होते. चालता चालता जगदीशने समोर बोट दाखवत महेशला इशारा केला. मृदुलाला समोर उभी पाहून दोघांनाही आश्चर्याचा धक्का बसला पण तितकाच आनंदही.

महेश : मृदुला....अगं तू आम्हाला न सांगता एकटीच तिथून का निघून आलीस...?? कीती घाबरलो होतो आम्ही...

मृदुला : मी....?? मी तर आत्ताच घरातून बाहेर आलीये.

जगदीश : अगं असं काय....तू तीथे मघाशी वेशीपल्ल्याड त्या ओढ्याच्या पुढे असलेल्या रस्त्यावर बसून होती. डॉगी हरवला म्हणून..

मृदुला : तुम्ही दोघे वेडे झालायेत बहुतेक....मी इतक्या रात्री आणि तेही ओढ्याच्या तिकडे...शक्यच नाही. विश्वास नाही बसत तर मीना ला विचारा....मीना इकडे ये गं...

मीना : काय गं मृदुला...??

मृदुला : आपण काय करत होतो आणि कुठे होतो सांग जरा यांना.

मीना : आपण तर घरीच होतो ना तुझ्या....सात वाजल्यापासून प्रोजेक्ट वर काम करत होतो. का काय झालं...??

मृदुला : काही नाही गं असंच....बरं तू जा पुढे मी येते मागून.

मीना : हो. बाय ( मीना निघून गेली )

मृदुला खरचं घरी होती मग तिथे भेटलेली आणि महेशला शेतवडीमध्ये घेऊन जाणारी " ती " कोण होती. या विचाराने दोघांचेही हातपाय कापायला लागले. तोच आवाज आला "आज त्या बाबामुळं वाचलातं.....पुन्हा सापडला तर सोडणार नाही मी तुम्हाला...." 

आता आलेला आवाज दोघांनाही ऐकायला आला होता. ते ऐकून दोघांच्याही सर्वांगाला दरदरून घाम सुटला. क्षणार्धात त्यांचं अगं तापाने फनफनायला लागलं. मग शुद्ध आली ती दोन दिवसानंतर. झालेला सर्व प्रकार दोघांनीही आपल्या घरी सांगितला. घराच्या मंडळींनी भविष्यात असा त्रास होऊ नये यासाठी बाबांच्या मदतीने आवश्यक उपाययोजना केल्या...


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy