Dhanraj Gamare

Children Stories

3  

Dhanraj Gamare

Children Stories

माझी परग्रहावरील सहल

माझी परग्रहावरील सहल

3 mins
479


थंडीचा महिना होता . मी माझ्या कुटुंबासोबत माझ्या गावाला आलो होतो . माझे बाबा शास्त्रज्ञ असल्यामुळे परग्रहावर सुद्धा जीवन असू शकते याबाबत त्यांचे संशोधन सुरू होते . मी व माझ्या छोट्या भावाला फिरायला खूप आवडते . आम्ही आमच्या गावातील घरात रहात होतो . मी माझ्या आईला विचारून छोट्या भावासोबत गावातून रोज फेर फटका मारायला जात असू .

एके दिवशी रात्री माझ्या मनात परग्रहावरील जीवनाबद्दल उत्सुकता वाटू लागली होती . म्हणून मी माझ्या बाबांच्या खोलीत गेलो . बाबा त्यांच्या टेलिस्कोपमधून आकाशाकडे पाहत असताना मी त्यांच्या बाजूला जाऊन बेडवर बसलो .

बाबांना मी विचारले की , “ परग्रहावर पृथ्वी सारखे मानवी जीवन असू शकते का ? ” तर बाबा म्हणाले , “ का नाही कदाचित असू शकते , म्हणून तर मी सुद्धा या गोष्टींवर संशोधन करत आहे . या गोष्टींवर जगभरातील अनेक शास्त्रज्ञ वाद विवाद करत असतात . त्यांचे सुद्धा हेच म्हणणे असते की , पृथ्वी सारखे अनेक ग्रह असतील तिथे मानवी जीवन असू शकते , कदाचित परग्रहावरील जीवन पृथ्वी पेक्षा प्रगत असू शकते . ” मी या सर्व गोष्टी विचारपुर्वक ऐकत होतो .

रात्र झाली असल्यामुळे मी बाबांना शुभ रात्री म्हणून माझ्या झोपण्याच्या खोलीत जाऊन बेडवर झोपलो . झोपत असताना परग्रहावरील जीवनाबाबत अनेक कल्पना माझ्या मनात निर्माण होत होत्या . सकाळी लवकर उठायचे म्हणून मी अंगावर ब्लॅंकेट टाकून झोपी गेलो .

अचानक माझ्या खिडकीतून एक प्रकाश आला मी पटकन उठलो . खिडकीतून बाहेर बघत असताना मला एक स्पेसशिप दिसले . ते घराखाली अंगणात उतरले . त्यातून तीन परग्रही मानव बाहेर आले . बहुतेक त्या परग्रही लोकांनी मला खिडकीतून पाहिले असेल . ते पटापट आमच्या घरात शिरले आणि माझ्या खोलीजवळ आले . त्यांचा रंग हिरवा होता . त्यांचे शरीर ओबडधोबड होते . ते पाहून मी आरडाओरडा केला . पण आई आणि बाबांना माझा आवाज ऐकू गेला नाही . त्यांनी मला उचलून नेले त्यांच्या स्पेसशिपमध्ये आणि त्यांनी मला बांधून ठेवले . त्यांनी माझ्या डोक्यावरून एक यंत्र फिरवले . मला खूप भीती वाटत होती .

बहुतेक ते स्कॅन करून माझ्या मेंदूमधील माहिती जाणण्याचा प्रयत्न करत होते . ते ज्या प्रकारे एक दुसऱ्याशी बोलत होते . ती भाषा मला कळत नव्हती .

बघता बघता ते मला त्यांच्या ग्रहावर घेऊन गेले . तो ग्रह सुद्धा हिरव्या रंगाचा होता . त्यावर पृथ्वीपेक्षा अत्याधुनिक सुविधा होत्या . वाहतुकीसाठी तेथील लोक स्पेसशिपचा वापर करत होते . आमचं स्पेसशिप एका बिल्डींगच्या सर्वात वरच्या फ्लोवरवरती त्यांनी उतरवले . त्या तीन परग्रही लोकांनी मला त्यांच्या बॉसकडे नेले . त्या बॉसने त्यांना काहीतरी मोठ्याने ओरडून सांगितले त्याबरोबर त्यांनी मला एका लेझर तुरुंगात बंदिस्त केले . मला काहीच सुचत न्हवते . त्या तुरुंगामध्ये एका बाजूला एक लाल कलरचे बटण होते . त्यावर त्या लोकांच्या भाषेत काहीतरी लिहिले होते . मी पटकन ते बटन दाबले ते दाबल्या बरोबर माझ्या डोळ्यासमोर एक प्रकाश आला आणि त्यामुळे मी जोरात ओरडलो . त्यानंतर माझ्या डोक्यावरून कोणीतरी हात फिरवत होते . मी पटकन डोळे उघडले बघतो तर काय आई माझ्या डोक्यावरून हात फिरवत होती . आईने मला विचारले , “ तुला भयानक स्वप्न पडले होते काय ? ” मी म्हणालो , “ होय , मला एक भयानक स्वप्न पडले होते . ” ‘ परग्रहावरील सहलीचे . ’


Rate this content
Log in