Pranjali Lele

Inspirational

3  

Pranjali Lele

Inspirational

मी माझी मला गवसले

मी माझी मला गवसले

7 mins
365


घड्याळात काटा सहावर आला तशी मानसी हातातल्या फाईल्स आवरू लागली. एकदा ऑफीस मध्ये शिरली की ती कामात इतकी बुडून जाई की तिला दिवस कसा सरला हे पण कळत नसे. पण संध्याकाळचे सहा वाजले की तिचे सगळे लक्ष घराकडे लागे. आजचे टार्गेट पूर्ण करून तिने आपले टेबल आवरले आणि ती ऑफिसमधून बाहेर पडली. 


समोरच नेहमीची ठरलेली ऑटोरिक्षा उभी होती. ती लगेच त्यात बसली आणि निघाली. तिला वाटेत भाजी आणि दूध घ्यायचे होते तसे तिने भाजी मार्केट दिसताच ऑटो रिक्षा थांबविली. पटकन खरेदी आटोपून ती घराकडे निघाली. तिला सोसायटीच्या गेटवर सोडून रिक्षा पुढे गेली.


आज भाजीपाला घेतल्याने घरी यायला सात वाजले होते. रोजच्या प्रमाणे आतल्या पार्क मध्ये लहान मुले खेळताना दिसली. त्यांच्या आया तिथेच बेंचवर निवांतपणे गप्पा मारत बसल्या होत्या. मानसी दिसताच त्यांनी तिला हाक मारली. अग हल्ली, तू भेटतच नाहीस..फक्त ऑफीसहून येताना दिसतेस तेवढीच आपली भेट..बस ना जरावेळ असे त्यानी म्हंटल्यावर मानसी पाच मिनटं थांबली. अग मी देखील हे निवांत क्षण खूप उपभोगले. तन्वी लहान असताना असेच तिच्याबरोबर लहान होऊन मनसोक्त खेळले. सरले ते दिवस आमचे..आता तुमचे हे दिवस सुरू असे म्हणत त्यांच्याशी बोलून ती तिच्या विंगकडे वळली.


मानसीने दारात पाऊल टाकले तशी तन्वी ने तिच्या हातातल्या भाजीच्या पिशव्या घेतल्या. मानसीने येऊन सोफ्यावर जरा पाठ टेकवली. सतत कॉम्प्युटर समोर काम असल्याने हे पाठीचे दुखणे अधून मधून डोके वर काढायचे. तिला वाटले, आता काय चाळिशी उलटली म्हंटल्यावर काही ना काही कुरबुर सुरू होणारच. तन्वी ने आईला थंडगार पाणी प्यायला दिले. आईला असे झोपलेले बघून परत पाठ दुखतेय का ग अशी तन्वी ने काळजीपोटी चौकशी केली आणि ती आईवर जरा चिडलीच.


तरी तुला बाबांनी सांगितले आहे ना की, ते घेतात तसा तू देखील कामातून जरा जरा वेळाने ब्रेक घेत जा..थोडे स्ट्रेचिंग करत जा..तू म्हणजे ना एकदा कामात बुडालीस की तुला दुसरी कसलीही आठवण राहत नाही. आपल्या लेकीचे हे रागवण्याचे सुर ऐकून मानसी म्हणाली,"हो ग माझी राणी, लक्षात ठेवीन मी तुमची ही सूचना", असे म्हणत मानसी फ्रेश व्हायला उठली.


तेवढ्यात रवी देखील ऑफिस मधून आला. मानसीने दोघांसाठी गरम चहा केला. तन्वी ने येऊन त्यांना आज क्लास मधील एक्झाम चे मार्क्स दाखवले. तिचे एव्हाना बारावीचे क्लासेस सुरू झाले होते आणि छानच परफॉर्म करत होती तन्वी. अशीच छान प्रगती करत रहा. महत्वाचे वर्ष आहे हे तुझे असे मानसी ने म्हणताच ती म्हणाली," अग आई, जस्ट चील, किती टेन्शन घेतेस माझे..मी करतेय ग सगळा अभ्यास नीट"..मानसीचे तर सारे लक्ष सध्या फक्त तन्वी आणि तिची बारावी यावरच होते. ऑफिस, घर आणि तन्वी याशिवाय तिला दुसरे काहीच सुचत नव्हते.


आधी आपले आयुष्य अगदी भरभरुन जगणारी मानसी जणू एखाद्या कोषात गेल्यासारखी राहत होती. फक्त लेकीचं भवितव्य याचीच तिला काळजी लागून होती. पूर्वीसारखे अगदी स्वच्छंदी राहणे जणू ती विसरलीच होती. कॉलेज मध्ये असताना नृत्य, नाटक गायन या सर्वांत अगदी हिरीरीने भाग घेणारी मानसी लग्नानंतर मात्र जबाबदारीच्या ओझ्याखाली ती तिच्यातली सगळी कलात्मकता हरवून बसली होती. त्याला खरतर तीच कारणीभूत होती.


आपल्याला आवडणारे तरुणपणी अगदी जीवापाड जपलेले आपले स्वतः चे असे काही आवडते छंद आहेत याचा तिलाच विसर पडला होता. कधीकाळी उत्साहाचा झरा असलेली मानसी आता अगदी यंत्रवत जीवन जगत होती. तिचं आयुष्य जणू तन्वी भोवतीच फिरत होतं. आपली माणसं आणि घर याहून आपलं काही वेगळं अस्तित्व आहे याचा तिला विसरच पडला होता. 


खरंतर तन्वी तशी मुळातच हुशार आणि समंजस मुलगी होती. तिची काळजी करण्याचे तसे काहीच कारण नव्हते पण एकुलती एक लाडकी लेक त्यामुळे तीच मानसी च्या जीवनाचा केंद्रबिंदू होती. आणि आता तन्वी बारावी ला आहे म्हंटल्यावर तर तिने फारच टेन्शन घेतले होते. जणु काही ही परीक्षा तन्वी ची नसून मानसी चीच होती.


इकडे तन्वी मात्र अगदी रिलॅक्स होती. स्वभावाच्या बाबतीत ती तिच्या बाबांनी वर गेली होती. कुठल्याही परिस्थितीत अगदी शांत राहणे तिला जमायचे. त्यामुळे अभ्यासाबरोबरच आपल्या एरोबिक्सच्या क्लासला नियमित जात होती आणि मग संध्याकाळी मैत्रिणी बरोबर खाली जरावेळ फेरफटका मारायची. मैत्रिणीच्या गप्पा व्ह्यायच्या त्यामुळे अभ्यासाचे कसले टेन्शन आले तरी ते शेअर केल्या जायचे आणि या ॲक्टिविटीज मुळे तिला फ्रेश पण वाटायचे. या उलट परिस्थिती मात्र मानसीची झाली होती.


कुठे जाणे येणे नाही की काही नाही. मुलगी बारावी ला आहे म्हणून ती ही कुठे जात नव्हती आणि कुणाला घरी देखील बोलावत नव्हती. काही महिन्यांपूर्वी लावलेला योगा क्लास पण तिने ह्या वर्षी बंद केला होता. तिच्या या असल्या वागण्याने मात्र तन्वी वर दडपण यायचं. त्यामुळे घरातील वातावरण पण स्ट्रेसफुल व्हायचे. रवी ला पण मानसी चे हे वागणे जरा अतीच वाटायचे. यातून आता काही तरी मार्ग काढायलाच हवा असे तन्वी आणि तिच्या बाबांना ही वाटत होते. आणि ते एका अश्याच संधीच्या शोधात होते. 


नुकताच श्रावण महिना सुरू झाला होता. एका पाठोपाठ एक अशी सणांची नुसती रेलचेल होती. मानसी आपले ऑफिस सांभाळून जमेल तसे व्रत वैकल्य करीत होती. तशी तिला या सर्वांची मुळातच आवड होती. लहानपणी तिने आपल्या माहेरी आईला हे सर्व करताना पाहिले होते. त्यामुळे साहजिकच तिच्या मनात याबद्दल आस्था होती.


गेल्याच वर्षी मानसीच्या भावाचे लग्न झाल्याने यावेळी माहेरी मंगळागौर आणि लागूनच असणाऱ्या गौरी गणपतीला येण्यासाठी माहेरी सर्वांनी तिला आग्रहाने बोलावणे आले होते. पण यावर्षी तन्वीच्या अभ्यासात व्यत्यय नको म्हणून कुठेही लांब प्रवासाला जायचे नाही असे मानसी ने आधीच ठरवले होते. आणि तिचे माहेर परगावी असल्याने लगेच जाऊन येणे शक्य नव्हते. त्यामुळे जरा जड मनानेच तिने आपले जमणार नाही असे आईला कळविले.


इकडे त्यांच्या सोसायटीत देखील श्रीगणेशाच्या आगमनाची तयारी सुरू झाली होती. दरवर्षी प्रमाणे यंदा ही विविध सांस्कृतिक कार्यक्रम करण्याचे नुकत्याच झालेल्या सोसायटी मीटिंग मध्ये ठरवण्यात आले. या सर्व कार्यक्रमात मुलांबरोबरच मोठ्यांचा देखील बरोबरीने सहभाग असायचा. पूर्वी मानसी सर्व कार्यक्रमात अगदी आवडीने भाग घ्यायची. एक दोनदा गणेशोत्सवात कार्यक्रमाचे सूत्र संचालन पण तिने केले होते. पण या काही वर्षांत मानसीने या ना त्या कारणाने कशातही भाग घेतला नव्हता.


आज ऑफिसहून येताना सोसायटीत तिला तिच्या सर्व सख्या एकत्र बसलेल्या दिसल्या. यंदाच्या कार्यक्रमाविषयी त्यांची चर्चा चालू होती. या वर्षी काहीतरी वेगळे करायचे असा त्यांचा प्लॅन होता. मानसी दिसताच त्यांनी तिला आवाज दिला. तिची प्रिय मैत्रीण वर्षाने तर मानसीला गळच घातली की तिनेच काहीतरी छान कार्यक्रम सुचवावा कारण मानसीच्या आयडियाज अगदी युनिक असायच्या. मानसीने मात्र तन्वी चे बारावी असल्याने यावेळी तिला जमेल असे वाटत नाही म्हणून स्पष्टच सांगितले. तरीही काही छान सुचले तर नक्की कळव आणि जमवण्याचा प्रयत्न कर असे तिला सगळ्यांनी तिला आवर्जून म्हंटले.


घरी येऊन तिने याबद्दल रवीला सांगितले. रवीसाठी तर ही छानच संधी चालून आली होती. तो तर अश्याच एका संधीच्या शोधत होता की जेणेकरून मानसीने उगाच ओढवून घेतलेला मानसिक ताण जरा कमी होईल. रवी अगदी खुशीत येऊन तिला म्हणाला, "अरे वा, किती वर्षात तू कसल्या कार्यक्रमात भाग घेतला नाहीस. एरवी तर मला सारखी सांगत असायची की शाळा कॉलेज मध्ये असताना तू वक्तृत्व, नाटक सगळ्यात भाग घ्यायचीस आणि तुला त्या सगळ्यांची किती आवड होती ते... मैत्रिणींनी एवढे आग्रहाने विचारलेच आहे तर भाग घे नक्की".


"बघते रे, मी त्यात बिझी झाले तर उगाच तन्वीच्या रूटीन मध्ये खंड पडायचा"..असे मानसी ने म्हणताच तन्वी लगेच बाहेर येऊन म्हणाली, "छे ग आई, मी काय लहान आहे आता..की माझे लहानसहान बाबतीत तुझ्या शिवाय अडेल..मला काही डिस्टर्ब होणार नाही..तू खुशाल भाग घे" तन्वी ने असे म्हणताच मानसी म्हणाली, बरं आता तुम्ही दोघेही म्हणताहेत तर बघते काय करायचे ते आणि ती एका नव्या उत्साहाने कामाला लागली.


कार्यक्रमासाठी नाटकाची एक छानशी स्क्रिप्ट लिहायची असा विचार तिच्या डोक्यात घोळत होता.कॉलेज मध्ये असताना किती लिखाण करायचो आपण..लग्नानंतर सगळंच सुटलं हळूहळू आणि मग जणू विसरच पडला आपल्याला या लिखाणाच्या छंदाचा..चला या निमित्ताने पुन्हा एकदा लेखनाचा श्रीगणेशा करूया असे ठरवत मानसी रात्रीची कामे आटोपून लिहावयास बसली.


तिला लिखाणास लागणारी नीरव शांतता केवळ रात्रीच्या वेळीच मिळत असे. त्यामुळे हे काम तिला रात्रीच करायला आवडे. ती हल्ली तिची रोजची कामे जरा लवकर आवरून रात्रीचा एक तास यासाठी शिल्लक ठेवीत होती. या शांत वेळी तिच्या मनाला साद घालणाऱ्या विविध कल्पनांना ती मूर्त रूप देण्याचा प्रयत्न करी. त्यात ती अगदी रमून जात होती.


आजवर आयुष्यात तिला मिळालेल्या अनुभवाच्या शिदोरीने तिची लेखणी अजून प्रगल्भ झाली होती. तिने जे हरवले होते असे तिला वाटले ते मुळात तिच्यातच एखाद्या कस्तुरी प्रमाणे दडलेले होते आणि आज कित्येक वर्षानी परत तिच्या लेखणीतून शब्दांच्या रूपात मोहक सुगंध पानांवर झिरपत होता.


कित्येक वर्षानी ती तिच्या मनाजोगं, तिला खूप आनंद देणारं असं स्वतः साठी काहीतरी करत होती. आणि त्या निस्तब्ध शांततेत आजवर जबाबदारीच्या आड तिचं हरवलेलं सुख तिला अचानक गवसलं होतं.


तिने सलग एक आठवडा रोज थोडं थोडं करत एका नाटकाची छान स्क्रिप्ट लिहून काढली. संध्याकाळी ऑफिस हून येऊन सगळ्या मैत्रीणीना तिने आपली स्क्रिप्ट वाचून दाखविली. सगळ्यांना मनापासून ते नाटक आवडले. कित्येक वर्षांनी नाटकाचा प्रयोग त्या या वर्षीच्या गणपती उत्सवात करणार होत्या. मानसीच्या प्रयत्नांमुळे हा छान योग जुळून आला होता. सगळ्या मोठ्या जोमाने नाटकाच्या प्रॅक्टिसला लागल्या. 


सगळ्यांच्या वेळेनुसार रात्री घरची कामे आटोपली की सगळ्या एकत्र येऊन नाटकाची तालीम करत. मानसी तर या वेळेची अगदी आतुरतेने वाट बघायला लागली. नाटकाची तालीम करता करता मैत्रिणींच्या हास्य कल्लोळात ती स्वतःच्या काळज्या, चिंता ही विसरून जात. तिचं हे आधीसारखं आनंदी राहणं रवी आणि तन्वी ला खूप सुखावत होतं. त्यांच्या पण मनाजोगे झाले होते आणि मानसीच्या आनंदी राहण्याने घरातील आधीचे तणावपूर्ण वातावरणही आपसूकच निवळले होते.


इकडे रोजच्या रियाजामुळे त्यांचे नाटकही मस्त बसले होते आणि त्यामुळेच गणेशोत्सवात त्यांनी नाटकाचे अप्रतिम सादरीकरण केले. या नाटकाच्या यशाचे सारे श्रेय मैत्रिणींनी मानसीला दिले तेव्हा मात्र तिने उलट मैत्रिणींनीच तिला पुन्हा लिखाणाची प्रेरणा देऊन तिचा हरवलेला छंद परत मिळवून दिल्याबद्दल त्या सर्वांचे मनापासून आभार मानले.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational