Shubhangee Dixit

Tragedy Inspirational

4.0  

Shubhangee Dixit

Tragedy Inspirational

निर्णय

निर्णय

6 mins
410


दिपने बेल वाजवली. मुग्धाने दार उघडलं.

"हाय!! मुग्धा डार्लिंग !! कसा गेला दिवस??" मुग्धा काही बोलली नाही. ती किचनमध्ये निघून गेली. मागोमाग दिपही किचनमध्ये आला. फ्रिझमधील पाण्याची बॉटल काढून त्याने पाणी पिलं. मुग्धा स्वयंपाकाची तयारी करत होती. कामात तिचं लक्ष नव्हतं. दिप फ्रेश होऊन कपडे बदलून पुन्हा किचनमध्ये आला. त्याने स्वतः चहा बनवला दोन कप. तरीही मुग्धा काही बोलली नाही. गप्प आपलं काम करीत होती. हे सारं आता नेहमीचंच झालं होतं. दिप चहाचा एक कप मुग्धासमोर ठेवला आणि एक कप स्वतःसाठी घेतला.

"मुग्धा, चहा घे. " दिपने सांगितलं. तरीही मुग्धाचं लक्ष नव्हतं.

"मुग्धा" दिप ने तिला जरा मोठ्याने हाक मारली. तेव्हा मुग्धा भानावर आली. रात्रीचं जेवण झालं. ते ही शांततेत पार पडलं. दोघेही काही बोलले नाहीत एकमेकांशी. बेडरूममध्ये दिप काम करत होता ऑफिसचं. कामात लक्ष लागत नव्हतं. मुग्धा बेडरूममध्ये आली. बेडवर दिपजवळ बसत म्हणाली,

"दिप, मला थोडं बोलायचं आहे तुझ्याशी."

"काय??" लॅपटॉपवरची नजर न हटवता दिपने विचारलं.

"थांब. एक मिनिटं." असं म्हणून तिने बेडजवळ असलेल्या टेबलचा ड्राॅवर उघडून एक लिफाफा दिपच्या हातात दिला. दिपने लिफाफा उघडून त्यातून पेपर बाहेर काढले. पहिला शब्द वाचताच त्याला धक्का बसला.

"डिवोर्स पेपर??"

"हो. मला डिवोर्स हवा आहे तुझ्याकडून." मुग्धा म्हणाली.

"मुग्धा पण.."

"नाही. मला डिवोर्स हवा आहे. पाच वर्ष झाली. मला सहन होत नाही आता."

"मला कळतंय मुग्धा तुला काय म्हणायचंय ते.."

"तुला काहीही कळत नाहीए. मला डिवोर्स हवाय. तुझं आयुष्य असं माझ्यासाठी वाया नाही घालवू देणार मी." मुग्धा म्हणाली.


"माझं आयुष्य. कसलं माझं आयुष्य?? ज्यात तू नाहीस अशा आयुष्याचा काय उपयोग मग??"

"मी फसवलंय तुला."

"यात तुझी काहीही चुक नाहीए मुग्धा. केले आहेत ना आपण प्रयत्न?? नाही होत काही तर त्यात आपली चूक आहे का?"

"म्हणूनच मी म्हणतेय. मला डिवोर्स हवाय. निदान तुझं तरी आयुष्य सुरू होईल नव्याने."

"तुला वेड लागलंय." दिप म्हणाला.

"नाही. मी अगदी व्यवस्थित आहे."

"मुग्धा, तसं दिसत नाहीए. तू आधी शांत हो. हे घे पाणी." जवळच असलेला पाण्याचा ग्लास मुग्धाला दिला. मुग्धाने थोडं पाणी पिलं आणि म्हणाली,

"दिप, तु माझे रिपोर्ट्स नाही वाचलेस का??"

"हो. वाचलेत. त्याचा आणि डिवोर्सचा काही संबंध असेल असं मला वाटत नाही." दिप ठामपणे म्हणाला.

"संबंध आहे."

"अच्छा?? ठीक आहे. मी देतो डिवोर्स तुला आणि पुन्हा मला कधी विचारायलाही यायचं नाही मुग्धा की, मी जिवंत आहे की नाही." दिपही चिडला होता.

"दिप, असं नको बोलूस. मी तुझ्यासाठी बोलतेय. तुझ्या नवीन आयुष्यासाठी." मुग्धा आता रडत होती. दिपने मुग्धाला जवळ घेतलं.

"मी आपल्यासाठी बोलतोय गं. माझं तुझ्यावर प्रेम आहे. आपलं लग्न झालंय मुग्धा. मी फक्त एका कारणासाठी डिवोर्स देऊ तुला?? होऊ दे जे व्हायचंय ते."


"तू रिपोर्ट वाचले आहेत ना?? मी कधीही आई होऊ शकणार नाहीए. हे तू का विसरतोयस??"

"मी काहीही विसरत नाही. माझ्या सारं लक्षात आहे आणि हे ही लक्षात आहे की सप्तपदीच्या वेळी तुला वचन दिलंय आयुष्यभर सोबत करण्याचं." दिप मुग्धाच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाला.

"आपल्याला कोणी साथ देणार नाही आता म्हणून मी डिवोर्सचा विचार करत होते. निदान तुला तरी तुझं आयुष्य सुखात जगता येईल आणि खरं सांगायचं तर आई होणं हे खुप महत्वाचं असतं एका स्त्रिच्या आयुष्यात. नाहीतर तिच्या जन्माला अर्थ नाही असं मानलं जातं. तसंच माझ्याही आयुष्याला अर्थ नाहीए आता."

"चूकीचा विचार करत आहेस तू आणि डिवोर्स झाला तरी फक्त कायद्याने, कागदोपत्री वेगवेगळे होऊ. मनाचं काय?? मनातून वेगळे होऊ का??"

"दिप, पण आपल्या कुटुंबातील सर्व आपल्यापासून दूर चालले आहेत. या फक्त एका गोष्टीसाठी. आपणच कोणाशी बोललं नाहीतर आपल्याशीही कोणी बोलणार नाही." मुग्धा म्हणाली.

"हो बरोबर आहे तुझं . बोलणं म्हणजे काय गं?? एकाच गोष्टीबद्दल सतत सतत विचारत रहाणं. नको असलेले प्रश्न मुद्दामहून विचारणं. हे तुला बोलणं वाटत असेल तर मुग्धा तू अशक्य आहेस."

"पण.."

"आणि एक.. माझी बदली इथे बंगळूरला अशीच नाही झाली. मी ती करून घेतली आहे बॉसला सांगून. सतत सतत तुला टोचणारी बोलणी ऐकून मलाही खुप त्रास व्हायचा गं. मी ऑफिसमध्ये तू घरी. चार वर्ष किती ऐकून घेतलं असशील तू?? याची कल्पनाही करवत नाहीए मला." दिप म्हणाला.

"म्हणजे तू तेव्हा सागितलंस ते खोटं होतं. हे बरोबर नाही दिप."

"मुग्धा, मला जे सुचलं ते मी केलं. आपल्यासाठी. बरोबर की चूक हे मला माहीत नव्हतं. मी प्रेम केलंय तुझ्यावर आणि लग्नाआधी तुझा मी आधी मित्र नंतर प्रियकर होतो. तू मला काही सांगितलं नाहीस पण मला समजायचं सगळं आणि समजलंच पाहिजे." दिप म्हणाला.

"मी आधीच सर्व चेक केलं पाहिजे होतं म्हणजे हे सगळं झालं नसतं. ही फसवणूक नाही का तुझी??" मुग्धा म्हणाली.

"अजून तिथेच आहेस ना तू??" दिप ने विचारलं "आण. आण इकडे ते पेपर्स. मी सही करतो म्हणजे तुला गिल्ट राहणार नाही कसलाच. तू मला फसवलंस असा."

"......." मुग्धा गप्प राहिली.


"मुग्धा, का असं करतेस?? मी तुझ्याशिवाय कसा विचार करेन आयुष्याचा??"

"दिप, कोणी नाही तू तरी माझ्यासोबत आहेस..खुप छान वाटतंय मला. लग्न झालेल्या मुलीला काय हवं असतं?? कोणी सोबत नसलं तरी तिच्या नवर्‍याने तिच्या सोबत उभं रहावं, तिला समजून घ्यावं. ते मला मिळालंय कधीचंच." मुग्धाने दिपच्या खांद्यावर मान टेकवून बोलत होती.

"तरी बिचाऱ्या नवर्‍याला डिवोर्सची नोटीस पाठवली जाते." दिप म्हणाला.

"असं काही नाहीए. ते असंच होतं नोटीसचं." मुग्धाने खांदे उडवले.

"मला ॲटॅक आला असता तर?? जाऊ दे. पुन्हा असा विचारही करू नकोस कधी. मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय."


कशीतरी दिपने समजूत काढली होती मुग्धाची. 'डिवोर्स' शब्द वाचूनच त्याला धक्का बसला होता. आतून हलला होता तो. यावेळी त्याने एक निर्णय घेतला होता. तो मुग्धाला सांगितला त्याने. ती तयार नाही झाली. पुन्हा नीट समजावलं आणि ती दिप बरोबर पुण्याला येण्यासाठी तयार झाली. दिपने पुण्यात राहण्यासाठी काही दिवसांची सुट्टी काढली होती. त्याची आत्या पुण्याला रहात असे. आत्याकडेच तो आणि मुग्धा थांबणार होते.


"काय रे आता आठवण आली आत्याची??" दिप आणि मुग्धा जेव्हा पाया पडले तेव्हा आत्या आशीर्वाद देत म्हणाली.

"तसं नाही आत्या. आम्ही पुण्याला एका कामासाठी आलो आहोत."

"कसलं काम??" आत्याने विचारलं तेव्हा दिप मुग्धाकडे पहात म्हणाला,

"एक बाळ दत्तक घेणार आहोत आम्ही."

"तुझं डोकं फिरलंय का??"

"नाही फिरलं." दिप म्हणला.

"मग, कोण कुठलीतरी ती मुलं रस्त्यावर सापडलेली. कशी झालीत कुणाला माहिती?? आईवडीलांनी टाकून दिलेली. त्यापेक्षा नसलेली बरी. अनाथ मुलांना कशाला आपल्या घरात आणायचं." आत्या चिडून बोलत होती.

"आत्या, असं का बोलतेयस?? तू नव्हतंस का मला आणलंस इथे मुंबईहून?? मी ही अनाथच आहे."

"दिपू, जास्त बोलतोय आता तू."

"नाही, ऐकून घे. आई बाबांचा जेव्हा घटस्फोट झाला. तेव्हा मी एकटा पडलो होतो. तेव्हा ना आईला मी हवा होतो ना बाबांना. बाबांनी माझी कस्टडी मागून घेतली आणि इथे ठेवलं. माझे आईवडील असूनही मला एकटं रहावं लागलं इथे. अनाथासारखं"

"मी कोणीच नाही का तुझ्यासाठी??"

"आहेस. खुप मोठी आहेस. आईपेक्षाही. आत्या, आता जी परिस्थिती आहे त्यावरून मी घेतलेला निर्णय योग्य आहे असं वाटतंय."

"मुग्धा काय म्हणतेय यावर??" आत्याने मुग्धाकडे पाहिलं.

"तिनेही मला डिवोर्स पेपर दिले होते काही दिवसांपूर्वी. का? तर माझं नवीन आयुष्य सुरू व्हावं म्हणून. मला तिला सोडायचं नाहीए. माझा निर्णय बरोबर की चूक हे मला माहीत नाही पण तो या परिस्थितीत बरोबर आहे. यावर मी विचार नाही करणार जास्त."

आत्या काही म्हणाली नाही. दिप तिथून निघून गेला. मुग्धा काही वेळ बसली आणि तिही आतल्या खोलीत निघून गेली. आत्या काही न बोलता विचार करत राहिली. रात्री जेवणही शांततेच झालं.


सकाळी अकरा वाजता आधार अनाथाश्रमात दिप आणि मुग्धा पोहोचले. कागदपत्रांची पूर्तता करून त्यांनी सात महिन्यांची मुलगी दत्तक घेतली. तिचं नाव सिद्वी होतं. तेच नाव कायम ठेवायचं असं दिप आणि मुग्धाने ठरवलं. कायद्यानुसार पूर्ण कागदपत्रे होण्यासाठी एक दोन दिवसांचा वेळ लागणार होता. दोघेही घरी आले तेव्हा घराचं दार बंद होतं. दिपने दार वाजवलं. आत्याने दार उघडलं आणि त्यांना तिथेच थांबायला सांगितलं बाजुच्याच टेबलवर ठेवलेला भाकरीचा तुकडा सिद्धीवरून ओवाळून दूर फेकला आणि पायांना पाणी लावून तिचं औक्षणही केलं. तिघेही आत आले. आत्याने बर्फी आणली. दिप आणि मुग्धाला दिली. दिपने आत्याला नमस्कार केला. मुग्धा सिद्धीला सोफ्यावर ठेवणार होती आत्याला नमस्कार करण्यासाठी आत्याने सिद्धीला स्वतःकडे घेतलं. दिप आणि मुग्धा दोघेही बघत राहिले.

"आत्या, सॉरी. मी खुप बोललो तुला काल."

"असू दे. त्यामुळे माझे डोळे तरी उघडले. बरोबर की चूक याचा विचार न करता निर्णय घेतलास तरी तो योग्यच आहे." सिद्धीकडे पाहून आत्या म्हणाली, "काय गं?? माझी शोनू, छान छान अंघोळ कलणाल ना आता तू??" आत्याने तिच्या गालावर बोट ठेवलं तेव्हा सिद्धी छान हसली. गोड खळी पडली होती तिच्या गालावर. छोटासा जीव पण त्यालाही किती आनंद झाला होता. दिपकडे बघून मुग्धाने एक छानसं स्माईल दिलं. दिपही मनातून सुखावला. त्याचा निर्णय चुकला नाही बरोबर होता.


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy