Prashant Bhawsar

Tragedy

4  

Prashant Bhawsar

Tragedy

पावसातली ती

पावसातली ती

5 mins
641


पावसाळा आला की तिची आठवण बळावते. तसे ती बाराही महिने रोजच सतावत असते पण पावसाळ्यात तिच्या आठवणीची काही औरच नशा असते. ती अगदी क्षणोक्षणी माझ्या आसपास भासत असते. असाच पावसाळ्यात एके दिवशी मी घरी एकटाच असताना पाऊस येतो. रेडिओवर सुगम संगीत चालू असते. छान वातावरण झाल्याने चहाची तलफ होऊन मी चहा बनवतो आणि हातात चहाचा कप घेऊन पित पित ओल्या ओल्या थंडगार खिडकीतून मुसळधार पाऊस पाहताना दूरवर तिची आकृती दिसते. दूर रस्त्यावर भरपावसात ती भिजत असते. पावसाच्या आगमनाने आनंदित होऊन मुक्तपणे नाचत असते. डबक्यातील पाणी पायाने उडवून पाण्याने आधीच भरलेला रस्ता आणखी ओला करत असते (वेडी कुठली!). नाचत नाचत मध्येच ती गाणे म्हणू लागते, आकाशाकडे पाहत पावसाच्या सरी चेहऱ्यावर झेलते. चेहऱ्यावर सरींचा मारा होता डोळे मिटून घेते. मग तोंडाचा आ करते आणि गारा खाऊ लागते, पाच सहा गारा तिच्या तोंडात पडतात ती त्यांना खाऊ लागते तशी तिच्या दातांना ठणक बसून ती विव्हळते. मग पुन्हा नाचू लागते, गाणे गाऊ लागते, डबक्यातले पाणी पुन्हा रस्त्यावर उडवू लागते.

      अशी बराच वेळ पावसात असल्याने ती चिंब भिजलेली असते. वर नभाकडे पाहत दोन्ही बाजूला लांब हात पसरवून अंगात घातलेल्या घागऱ्यासह गिरकी मारते तेव्हा ती मला अलबेली मस्तानीच भासते. जणू सरीचा उगम असलेल्या नभलाच मिठी मारायला खाली बोलावते. मग माझ्या मनातही एक शंका डोकावते की हिच्या बोलावण्याने तर आज पाऊस आला नसेल ना? या विचाराने माझा इकडे जळफळाट होतो. मी त्या नभासोबत उगाच शत्रुत्व ओढावून घेतो. आकार नसलेला आणि पत्ता माहीत नसून सुद्धा वाऱ्याच्या गाडीवर बसून कुठेतरी बळचं फिरत असलेल्या नभाला मी दोन चार शिव्या उगाच हासडतो. यावर तो काहीच प्रत्युत्तर देत नाही हे पाहून मी त्याचा विचार सोडून देतो आणि पुन्हा तिच्याकडे लक्ष केंद्रित करतो. तिचे आपले इकडे चालूच असते भिजणे, नाचणे, गाणे, डबक्यातले पाणी पायाने रस्त्यावर उडवणे (खरंच खुळी कुठली).

    आता ती रस्त्यावरून निघून सरळ माझ्या घराकडे येताना दिसते. पाहता पाहता खरंच ती माझ्या घराच्या अंगणात येऊन स्थिरावते. फार फार तर माझ्यापासून पंधरा वीस फूट लांब एवढ्या अंतरावर माझ्या घराच्या अंगणात तिची आकृती आता स्पष्ट दिसू लागते. गाण्याच्या तालावर मान डोलवताना तिच्या भिजलेल्या लांब केसांतून निघणारे पाण्याचे तुषार उडत उडत माझ्या अंगावर येऊन आदळतात तसे माझे अंग अंग रोमांचित होते. तिचा सावळा रंग आणि त्यावरून निथळून वाहणारे पाण्याचे थेंब माझी तहान जागवतात. मोठा घेर असलेला निळ्या रंगाचा घागरा तिच्या प्रत्येक गिरकीसह माझ्या मनाचा पिसारा फुलवू लागतो. कानातले झुमके तिच्या प्रत्येक हलचालीमध्ये तिला न थकता साथ देत असतात. तिच्या पैंजनांचा छुमछुम आवाज माझ्या मनात मृदंग वाजवू लागतो (इट्स लाईक अ... देखा जो तुझे यार दिल मे बजी गिटार). तिच्या कमनीय ओल्या देहाकडे पाहून माझ्या मनात भावनांची गर्दी होऊ लागते. ती आता माझ्या नजरेच्या टप्प्यात आल्याने आणि आमच्या दोघांची नजरानजर झाल्याने लाजेने तीचा आवेग जरी थोडा शमलेला असला तरी पावसाची धुंद तिच्या देही अजूनही तशीच कायम असते (पावसाचीच धुंद हो... माझी नाही, पावसापुढे आमचं काय म्हणा). आता तिचा प्रत्येक ठेका माझ्यासाठी आहे की काय अश्या आविर्भावात मी तिच्याकडे एकटक पाहू लागतो. ती तिच्याच जगात पावसाचा भरभरून आनंद घेण्यात मग्न असते... चिंब भिजत असते, गिरकी घेत नाचत असते, नाचता नाचता लाजऱ्या नजरेने हळूच माझ्याकडे पाहत असते.

      पावसाच्या सरींसोबत तिची जमलेली गट्टी पाहून मीदेखील तिच्यासोबत गट्टी करण्याचा विचार करू लागतो. तेवढ्यात रेडिओवर देखील पावसाचे रोमँटिक गाणं वाजू लागते. बहुतेक ते गाणं तिच्या आवडीचे असावे कारण ते ऐकून ती आनंदाने पुन्हा एक गिरकी मारते आणि लागलेल्या गाण्याच्या तालावर मनमुराद नाचू लागते. तोपर्यंत माझा चहा पिऊन झालेला असतो. मी कप बाजूच्या टेबलावर ठेऊन रेडिओचा आवाज फूल वाढवतो. तशी ती माझ्याकडे पाहून हसते. तिला समजून जाते की मलाही तिचे नृत्य पहायचे आहे. ती त्या गाण्यावर ताल धरून नृत्य करू लागते. अशी पावसात नाचत असलेली भूतलावरील नर्तिका मी आज पहिल्यांदाच पाहिलेली असते, जणू अप्सराच. तिच्या तालावर मी पण जाऊन ताल धरून नाचावे असे माझ्या मनात येऊन जाते पण तसे काही करण्याची हिम्मत माझ्यात होत नाही. मग मी आपला तसाच प्रेक्षक होऊन खिडकीच्या थंडगार गजांना कुरवाळत तिचे नृत्य पाहत थांबतो.

      तेवढयात अचानक डोईवर साचलेले काळे ढग ब्रम्हनाद करू लागतात, तेजस्वी विजा त्यांची चकाकी दाखवू लागते, चोहोकडे अंधार दाटू लागतो. नाचत असलेली ती नाजूक कळी पावसाचे अचानक झालेले रौद्र रूप पाहून जरा घाबरते, इकडे तिकडे पाहत पावसात थरथरू लागते. तिच्या चेहऱ्यावरचे खुशीचे हावभाव जाऊन त्याजागी भीतीचे सावट उमटतात. ओल्या थंडगार खिडकीतून पावसाला (तिला) पाहत असलेला मी वातावरणाच्या अश्या बदलाने बैचेन होतो. ती बावरलेल्या नजरेने माझ्याकडे अर्जव करू लागते, तिचे बागडणे थांबवून स्तब्ध होते. तिला असे बावरलेले पाहून माझे मन देखील अस्वस्थ होते तसा मी पुढच्या क्षणी तिला सावरायला घराबाहेर पळतच निघतो. तसे जाता जाता टेबलाला माझा जोराचा धक्का लागून टेबलावर ठेवलेला चहाचा रिकामा केलेला कप खाली पडून फुटतो. त्याकडे फार लक्ष न देता मी तिच्या दिशेने पळत बाहेर येऊन तिच्यासमोर थांबतो.

   ,   मी समोर दिसताच तिच्यात जरा धीर येतो ते तिच्या नजरेने जाणवते. तिच्या तोंडातून अजूनपर्यंत एकही शब्द निघालेला नसतो आणि अश्या अवस्थेत ती पुढे काही बोलू शकेल याचा भरवसाच नसतो. ती घाबरतच एक एक पाऊल पुढे टाकत माझ्या जवळ येते. इकडे पावसाचा जोर वाढलेला असतो हलक्या थेंबांचे रूपांतर टपोऱ्या थेंबांमध्ये होऊन त्यांचा आमच्या दोघांच्या शरीरावर जोरात मारा बसू लागतो. तिचा देह आता पावसाच्या माऱ्याने लालसर पडू लागतो. ती थंडी वाजून कुडकूडू लागते. तिचे दात एकमेकांवर आपटून त्यांच्या कडकडण्याचा आवाज येऊ लागतो. माझ्या जवळ येऊन थांबताच पुन्हा तिची नजर माझ्याकडे पाहून आर्जव करते. तिची झालेली अवस्था पाहून तडक मी तिला माझ्या बाहुपाशात ओढून घेतो. भर थंडगार पावसात भिजलेली असूनही तीचे शरीर मला गरम लागते. तिच्या कन्हण्याने माझ्या मनातील मृदुंगाचा आवाज आता शोककळेसम भासू लागतो. मी देखील झाल्या प्रकाराने गच्च डोळे मिटून घेतो. तिला मिठीत तसाच घट्ट आवळून धीर देऊ लागतो. मगाशी तिच्याविषयी माझ्या मनात उत्पन्न झालेल्या प्रेमभावांनी आता काळजीचा सूर पकडलेला असतो. एक जोरदार आवाज होऊन कानठळ्या बसतात. दूर कुठेतरी विज कोसळलेली असते.

      माझ्या मिठीत असलेली ती अचानक गायब होते. कुठेच दिसेनाशी होते. मी अंगणात आजूबाजूला पाहू लागतो, व्हरांड्यात शोधतो, बाहेर रस्त्यावरही जाऊन पाहतो पण तिच्या अस्तित्वाचा काहीच पुरावा सापडत नाही. फक्त विज कोसळलेले झाड पावसात जळत असलेले दिसते. आता मात्र मला भरपावसात घाम फुटतो. मेटाकुटीला आलेला माझा जीव घेऊन मी घरात तिला शोधायला जातो. इकडेतिकडे ती काही दिसत नाही. तेवढ्यात लाईट जाते. रेडिओवर लागलेले गाणे लाईट गेल्याने एकदम बंद पडते त्यामुळे झटक्यात भयाण शांतता पसरते. घरात सगळीकडे अंधार पसरलेला असल्याने तिला कुठे आणि कसे शोधावे असे विचार मनात कोलाहल माजवू लागतात. तितक्यात माझी नजर समोर असलेल्या देवघराकडे जाते. त्या खोलीतून मात्र थोडा अंधुक प्रकाश बाहेर डोकावत असतो. जणू मला तो जवळ बोलवत असतो. चाहूल लागल्यासारखा मी प्रकाशाच्या दिशेने देवघराकडे चालू लागतो तोच पायात मघाशी तुटलेल्या कपाचा तुकडा घुसतो. तसाच विव्हळत मी त्या खोलीत प्रवेश करतो. तिथे माघाशी पावसात नाचत असलेली ती समोर दिसते. देव्हाऱ्यात लावलेल्या समईचा प्रकाश तिच्या चंदनाचा हार घातलेल्या फोटोवर पडलेला असतो. 


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy