Vihang Mayekar

Abstract

4.0  

Vihang Mayekar

Abstract

शाकंभरी

शाकंभरी

1 min
141


   पौषपौर्णिमेची ती संध्याकाळ आजही जशीच्या तशी माझ्या डोळ्यांत तरळत आहे, कधीच जाग नसलेल्या दिवास्वप्ना प्रमाणे. त्याकातरवेळी, नदीकाठी, कापऱ्या थंडीतील तुझी उबदार मिठी....शेवटची.

  आयुष्याच्या सायंकाळी तुझ्या आठवणींची आभा माझ्या अंधाऱ्या स्मृती पटलास उजळवून टाकते आहे, हेच काय ते माझ्या शापित प्रेमाचे एकमेव फलित म्हणायचे. मदिरेने काठोकाठ भरल्याप्रमाणे तुझे नशिले डोळे, चाफेकळी नाक, वाऱ्यावर भुरभूर उडणारे मऊ केस आणि तुझ्या मखमली त्वचेचा मुलायम स्पर्श, हे सारं आजही मी माझ्या स्मरणांच्या कोंदणात जपून ठेवलं आहे, अर्थात, मी ते शेवटच्या श्वासापर्यंत जपणार, याची तुच तर ग्वाही द्यायचीस.!


   तुला अजिबात आवडलं नव्हतं, माझं तुझ्या बाह्य सौंदर्यावर भाळणं. वेळ निघून गेल्यावर आज मात्र प्रांजळ कबुली देतो. हो, तूच बरोबर होतीस. बाह्य सौंदर्य म्हणजे निव्वळ त्रिमितीचा खेळ. मेंदूला पडलेली भुल. दृष्टी आहे म्हणून त्या त्रिमितीय मापांना महत्व. आज या मिणमिणत्या दृष्टीला ना तुझे नशिले डोळे दिसणार, ना चाफेकळी नाक. सुरकुतलेल्या हातांनी तुझ्या मखमली त्वचेस स्पर्श तरीकसा करू ? जर काही शाश्वत असेल तर ते आहे, तुझ्यासाठी ‘मी‘ सर्वस्व असणं.. 


   दशकांमागून दशके लोटली. आता तू कशी आहेस, माहिती नाही. अजूनही माझ्यासोबत याच मर्त्य जगात बोलावणं येण्याची वाट पाहात थांबली आहेस, की माझ्या नंतर तुझं दुसरं प्रेम असलेल्या, चंद्राच्या सावलीत कायमची निघून गेली आहेस, हे ही माहिती नाही. आणि मला माहिती करूनही घ्यायचं नाही. तुझ्या नसण्याच्या आघाताने माझ्या स्वप्नील भावविश्वाच्या ठिकऱ्या उडण्यापेक्षा, तुझ्या असण्याच्या भ्रमातच माझा सूर्यास्त होवू दे. 


   त्या दिवसानंतर, जगणं हे माझ्यासाठी फक्त ‘न मरणं‘ इतकंच उरलंय. आजही पहाटे डोळे उघडल्यावर मी स्वतःला तिथेच अनुभवतो. नदीकाठी.. आपल्या नेहमीच्या ठिकाणी. तुझ्या उबदार मिठीत. पुर्वक्षितिजावरील चंद्र, त्या नंतर युगानुयुगे येणाऱ्या शाकंभरी पौर्णिमांची तुला गळ घालू पाहत होता. आणि पश्चिमेस क्षीण होत जाणारे सूर्यबिंब, अस्तित्वहीन होत चाललेल्या माझ्या लाचार सावलीवर शोक करत होते...


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract