Vihang Mayekar

Others

3  

Vihang Mayekar

Others

स्थितप्रज्ञ

स्थितप्रज्ञ

1 min
223


 ज्याची प्रज्ञा / बुद्धी कोणत्याही प्रसंगी स्थीर असते तो स्थितप्रज्ञ. मनुष्याच्या आयुष्यात कित्येक कसोटीचे क्षण येऊन जातात.. जीवन जगताना येणाऱ्या चढ उतारात,  योग्य आणि अयोग्य याची सद्सदविवेक बुद्धीने निवड करताना स्थितप्रज्ञ माणसाचे निर्णय हे आदर्श असतात.

  महाभारतातील यक्षाच्या प्रश्नाच्या रुपकातून युधिष्ठीराचं स्थितप्रज्ञ असणं अधोरेखीत होतं. 'मेलेल्या ४ भावांपैकी एकाला जीवंत करायचं असेल तर तू कोणाची निवड करशील ?' या यक्षप्रश्नावर तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य व्यक्तींनी, अर्जुन किंवा भिमाला जीवंत  करण्याचा पर्याय निवडला असता. जेणे करून त्यांच्या पराक्रमाचा, एकमेवाद्वितिय कौशल्याचा पुढे युद्धात वापर करून घेता आला असता. आणि ते त्याचे सख्खे भाऊ देखिल हो. परंतु युधिष्ठीराने सावत्र भावाची, नकुलची केलेली निवड, त्याच्या स्थितप्रज्ञतेचीसाक्ष देते. -‘पंडू आणि कुंतीचा वंश टिकवण्यासाठी मी स्वत: (युधिष्ठिर) जीवंत आहे, परंतू नकुल आणि सहदेव यांचा मृत्यू झाल्यास, पंडू आणि माद्रीचा वंशनाश होईल. म्हणून त्यांचा वंश पुढे टिकून राहण्यासाठी त्यांचा ज्येष्ठ पुत्र नकुल याला पुनर्जीवित करावे’ असा युक्तीवाद युधिष्ठिर यक्षाकडे मांडतो.


   मनुष्याच्या जीवनातला सर्वात कठिण क्षण जर कोणता असेल तर तो मृत्यूचा असणार. ज्या गोष्टीला आयुष्यभर घाबरत राहीलो, ज्या पासून वाचायचा दूर जायचा आटोकाट प्रयत्न केला तो निर्वाणाचा क्षण जेव्हा समोर उभा ठाकेल त्या प्रसंगीही ज्याची बुद्धी साथ देईल तो खरा स्थितप्रज्ञ.

 देवद्रोहाच्या आरोपाखाली सॅाक्रेटीसला जेव्हा हेमलॅाक विष पाजून मृत्यूदंड देण्याची शिक्षा फर्मावण्यात आली,तेव्हा प्लेटो आणि आणखी काही शिष्य त्याला तुरुंगातून निसटून पळून जाण्याची विनवणी करू लागले. योजनाही तयार होती. परंतू ‘असं पळून गेलं तर कायद्याला महत्व राहणार नाही, कायद्याचं पालन करणं प्रत्येक नागरीकाचं कर्तव्य आहे’ असं म्हणून शांतपणे त्या तत्वनिष्ठ माणसाने विषाचा प्याला ओठी लावला. गांधीजींचं उदाहरणही येथे लक्षात घेण्या सारखं आहे. मारेकऱ्याने गोळ्या झाडल्यावर आपल्या सारख्या माणसाने प्रतिकार केला असता, आरडा ओरडा केला असता. अगदिचं नाही तर चार शेवटचे अपशब्द तरी नक्कीच बाहेर काढले असते. परंतु त्या ऋषीतुल्य माणसाचे शेवटचे शब्द परमेश्वराला साद घालणारे होते- ‘हे राम’.. ना मारेकऱ्या प्रति कोणता आकस, ना तळतळाट..


  अवतार समाप्तीच्या वेळी श्रीकृष्णाने, अहेतूक बाण मारणाऱ्या शिकाऱ्याचा केलेला गौरव असो, बुद्धाने महापरीनिर्वाणाच्या वेळी शिकवलेली शेवटची विपश्यना असो, किंवा सैनिकाने तलवार खुपसल्या नंतरही वाळूवरच शेवटचा प्रमेय सोडवायचा आर्किमिडीजने केलेला प्रयत्न असो, स्थितप्रज्ञांची अशी कित्येक उदाहरणं सांगता येतील. यातिल काही रचलेल्या कहाण्याही (apocrypha) असणार याची मला कल्पना आहे. परंतु त्यातलं 'सार' निश्चितच घेण्यासारखं आहे.


  १९४६ साली अमेरीकेतल्या एका प्रयोगशाळेत काही शास्त्रज्ञ प्लुटोनियम या किरणोत्त्सारी पदार्थावर काही प्रयोग करत होते. लुईस स्लॉटिन हा शास्त्रज्ञ प्लुटोनियम चे दोन अर्धगोल हाताळत होता, ज्यांच्या मध्ये अगदी कमी गॅप होता. अचानक अपघाताने ते स्फिअर चिकटले गेले. आणि फक्त अर्ध्या सेकंदासाठी किरणोत्साराचा मारा स्लॉटिनच्या शरीरावर झाला. याचा सरळ सरळ अर्थ होता-मृत्यू, अतिशय घाणेरडा मृत्यू. अशाप्रसंगी त्या शास्त्रज्ञाने काय केलं असेल असं तुम्हांला वाटतं? 

 त्याने पटापट सर्व जण उभ्या असलेल्या जागांवर खुणा केल्या. प्लुटोनियम स्फिअर पासूनचं प्रत्येकाचं अंतर, शरिराची दिशा इ. महत्वाच्या नोंदी टिपून घेतल्या. त्यानंतर अर्थात काही दिवसातच स्लॉटिनला अतिशय भयावह अंताला सामोरं जावं लागलं, ज्याची आपण कल्पनाही न केलेली बरी. परंतु मृत्यूच्या दिवसापर्यंत त्यांने शरीरातील बदलाच्या नोंदी ठेवणं चालू ठेवलं.जेणे करून भविष्यात, किरणोत्सर्गाचा मानवी देहावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करावयास मदत होईल. कारण अशी ‘संधी’ पुन्हा मिळणं फार कठीण होतं.


  मृत्यूसमयी सर्व पाशांतून मुक्त होताना ज्या धिरोदात्तपणे मनुष्य अनासक्त होऊन त्या क्षणाला सामोरा जातो त्यावर त्याच्या जीवनाचा सारांश ठरतो...


Rate this content
Log in