Sheetal Ishi

Abstract Others Children

4.3  

Sheetal Ishi

Abstract Others Children

शालेय पराक्रम

शालेय पराक्रम

3 mins
171


     शाळा , आपल्या आयुष्याला वळण लावणारा महत्त्वाचा घटक. बालमनातील भीती अलगद बाजूला करून जगाशी हळुवार ओळख करणारा जादूगार. प्रत्येक मुलाचे गुण अवगुण ओळखून पैलू पाडणारा शिल्पकारच जणू. 

    माझ्या शैक्षणिक जीवनातील महत्त्वाचे तेरा वर्ष एकाच शाळेत गेले. ज्या महाजन हायस्कूल ने मला अक्षर ओळख केली त्याच शाळेतून बारावी पास झाली. 

     आजही आठवतोय शाळेचा पहिला दिवस. नवी कोरी दगडी पाटी आणि शाळेचा नवा गणवेश. नव्या कोऱ्या वस्तू पाहून माझे बालमन कोण आनंदित झाले होते. आईचा हात धरून उड्या मारत शाळेपर्यंत आले जणू आईसोबत बगीच्यामध्येच फिरायला आले होते असा आनंद माझ्या चेहऱ्यावर होता. शाळा म्हणजे नक्की काय असते याचा बाल मनाला गंधही नव्हता. 

     शाळा सुरू झाल्याची घंटा वाजली आणि बाई हात पकडून मुलांना वर्गात बसवू लागल्या. बाईंनी सर्व मुलांना वर्गात बसवले. सर्व पालक बाहेर उभे होते. रडणाऱ्या मुलांचा पालकांजवळ जाण्यासाठी गोंधळ सुरू होता. आता वर्गात जाण्याचा नंबर माझा होता पण आईचा हात मी सोडतच नव्हते. शेवटी सरळ बाईंनी कडेवरच घेतले आणि मी रडण्याचा जो सूर लावला तो शाळा सुटेपर्यंत लय बदलत चालूच होता. आनंदाची जागा आई आपल्यापासून दुरावतेय या भीतीने घेतली होती. 'आपल्याला कायमची शाळेतच ठेवून घेतात की काय ......?' या भीतीने जीव कावराबावरा झाला होता. वर्गातील कोलाहल शांत करण्याचा बाई आटोकॉट प्रयत्न करत होत्या. बिथरलेली मुले त्यांच्याकडे आशेने पाहत होते. बराच वेळानंतर बेल वाजली.वर्गाचे दार उघडताच आम्ही सर्व मुलांनी आपापल्या आई-वडिलांकडे धूम ठोकली. एकूणच शाळेचा पहिला दिवस रडण्यातच गेला. आजही आठवले तर हसायला येते.

   अशीच एक घटना मी बहुदा त्यावेळी सहावीच्या वर्गात असेल. 15 ऑगस्ट चा दिवस होता. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शाळेने प्रभात फेरी आयोजित केली होती. सकाळी साडेसहा वाजता शाळेत हजर राहायचे होते. देशभक्तीचे स्फुरण मनामनात चढले होते. घोषणा देत, फलक उंचावत, देशभक्तीपर गाणी गात आमची प्रभात फेरी गल्लीबोळातून फिरत होती. सारा आसमंत 'वंदे मातरम' च्या घोषणांनी दुमदुमला होता. खरोखर स्वातंत्र्यवीर असल्यासारखे आम्ही घोषणा देत होतो. फिरत फिरत प्रभात फेरी शाळेजवळ आली. त्यावेळी शाळेला तारेचे कंपाऊंड होते. पहिला ग्रुप शाळेच्या गेटपर्यंत पोहोचला होता. आम्ही दुसऱ्या ग्रुप मध्ये होतो. कंपाऊंडचे तार एका ठिकाणी तुटलेले होते. आम्ही मुले बहुदा तिथून ये जा करायचो. आजही बरेच जण तिथून आत गेले. त्यांच्या पाठोपाठ शॉर्टकट करत मी ही आत जाऊ लागले. पण आज माझा अंदाज चुकला होता आणि तारेतील एक हूक गळ्यात कंठापासून हनुवटीपर्यंत जोरात ओढला गेला. क्षणभर काय झाले ते मला कळलेच नाही. डोळ्यासमोर अंधारी आली. गळ्यातून घळाघळा रक्त येत होते. मैत्रिणींनी पकडले, पाणी प्यायला दिले. पटकन गळ्याला रुमाल लावला आणि ऑफिसमध्ये चालण्यासाठी विनवत होत्या पण मी काही ऐकले नाही. तिला सांगत होते "अगं...... कितीतरी लोकांनी देश स्वतंत्र होण्यासाठी रक्त सांडले, बलिदान दिले, मी एवढेही नाही सहन करू शकत..... घाबरू नकोस ...थांबेल रक्त... आपण आता झेंडावंदन करूया..... नको सांगू शिक्षकांना.

    झेंडावंदन झाल्यावर, खूप मोठा पराक्रम गाजवला अशा अविर्भावात घरी आले. जेव्हा आईला सर्व हकीकत सांगितली त्यावेळी आई खूप रागावली, "गेटमधून का नाही गेली...... समजा ती तार गळ्यात खोलवर गेली असती तर .....तुझी तिथेच समाधी बांधावी लागली असती....... नसते पराक्रम का सुचतात ग........" देशप्रेमाबद्दल आईकडून शाब्बासकी मिळेल असे वाटले होते. पण ओरडा चांगलाच बसला होता. आई डॉक्टर कडे घेऊन गेली व मलम पट्टी करवली. पुढचे आठ दिवस गळ्याची कातडी खूपच ओढली जात होती. पंधरा दिवस जखम सावळेपर्यंत खूपच त्रास झाला होता. 

     दुसऱ्या दिवशी आईने शाळेतील शिक्षकांना सर्व वृत्तांत सांगितला आणि कालचा ओरडा पुन्हा खाण्याची पुनरावृत्ती झाली. नको तिथे पराक्रम दाखवू नये याची शिकवण मिळाली. आज शाळेचे तारेचे कंपाऊंड जाऊन भिंतीचे कंपाऊंड झाले आहे. तरी ती जागा दिसली की केलेला पराक्रम आठवून जातो. नको तेव्हा... नको तिथे.... केलेले धाडस आठवते. त्यावेळी थोडी जरी तार आत गेली असती तर कथा लिहायला आज मी जिवंत नसते. 

     आजही ती घटना आठवली की स्वतःच्या विचारांची कीव येते. कुठे स्वातंत्र्यवीरांनी केलेले बलिदान..... आणि कुठे माझ्य खोडकरपणामुळे सांडलेले रक्त..... याची तुलनाच तरी कशी होईल बरं? एक देश प्रेमाने ओतप्रोत पावित्र्याची मूर्ती आणि मी खट्याळपणाने भरलेली बालमूर्ती.

   असे अनेक पराक्रम गाजवत लहानाचे मोठे झालो. आजही शाळेजवळून जाताना मन हळवे होते. आठवणी उजळतात आणि मनाचा गाभारा पुन्हा एकदा ते क्षण जगून जातात........


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract