डॉ. मुक्ता बोरकर - आगाशे

Inspirational

4.5  

डॉ. मुक्ता बोरकर - आगाशे

Inspirational

# स्वराज्य प्रेमी शिवराय

# स्वराज्य प्रेमी शिवराय

4 mins
239


छत्रपती शिवाजीराजे भोसले नाव ऐकलं की च अंगात एक वीरश्री ची भावना निर्माण होते अन् मन नव्या चैतन्याने उसळून येते. हो प्रत्येकालाच भारून टाकले आहे राजांच्या व्यक्तिमत्त्वाने अगदी! म्हणूनच राजे अगदी एकमेवाद्वितीय आहेत.


राजे काय कितीतरी झालेत हो !पण जनतेच्या मनावर अन् इतिहासाच्या पानांवर अगदी अजरामर असलेले आमचे राजे शिवाजी अनोखेच!!!!!


असा राजा जन्माला यायचा असेल तर त्याआधी जन्म घ्यावा लागतो तो जिजाऊ नेच!!!

कारण योग्य भूमितच योग्य निर्मिती होऊ शकते. एखाद्या महापराक्रमी व्यक्तिमत्वाला जन्माला घालणारी कूसही तेवढीच श्रेष्ठ असावी लागते. विचारांचे लेणे लाभलेली, धैर्यशील, करारी, बाणेदार, कोणत्याही प्रसंगाला तोंड देण्याचं सामर्थ्य असलेली अन् राजघराण्यात जन्माला न येताही स्वराज्याचं स्वप्न पाहणारी जिजाऊ च शिवबा सारखा छत्रपती जन्माला घालू शकते.


शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी हे कुणी सार्थ जर ठरवलं असेल तर ते आमच्या शिवबा अन् जिजाऊने!!!


एका सरदाराच्या मुलीने एक स्वप्न बघावे. आपल्या बाबांना त्यासाठी राजी करायचा प्रयत्न करावा पण तिच्या बाबांनी सुद्धा बालिका समजून तिचे ते स्वप्न तसेच सोडून द्यावे. पण जिद्द न सोडता त्या स्वप्नाळू मुलीने ते स्वप्न तसेच उरी बाळगून ठेवावे. पुढे लग्नानंतर तिने त्या स्वप्नाचे साकडे पतीला घालावे. त्यानेही स्वप्न तर सुंदर आहे पण आवाक्याबाहेरचे आहे असे सांगताच खरं तर ते तिथेच सोडून द्यायला हवे होते तिने!!!

पण तीही तेवढीच जिद्दी होती तिने त्या स्वप्नाला तसेच कवटाळून ठेवले घट्ट उराशी. कारण तिला जाणीव होती हे साकारणारा सध्या अस्तित्वात नाही आणि हे स्वप्न सत्यात आणायचं असेल तर असं व्यक्तिमत्व घडवावं लागेल. ...!



एक स्त्री असल्याने तिला कल्पना होती तिच्या सृजन शक्तीची! ती शक्तिस्वरुपा असल्याची. मग तेच आपलं बलस्थान समजत तिची सुरू झाली त्या सुंदर जगावेगळ्या स्वप्नाच्या दिशेने वाटचाल. जीव जन्मा घालण्या आधीच मनोभूमीची योग्य मशागत झाली होती. एका शुभ समई बीजाचे रोपण झाले अन् मग अगदी निगुतीने वेळच्या वेळी कधी विचार रूपांनी तर कधी डोहाळ्याच्या रुपात त्या बीजाचे सुंदरसे सिंचन केले गेले. वेळचे वेळी मनोभूमीची योग्य मशागत होतच राहिली. त्यामुळे ते शुद्ध बीज रुजले,गर्भातच रुजले ,बहरले अन् फोफावले.....!


आता ते पूर्णत्वाला जाऊन प्रगट होण्यास अगदी सिद्ध झालेले...!


एवढी जेव्हा इच्छाशक्ती प्रबळ असते तेव्हा परिस्थिती सुद्धा आपसूकच साथ देत असते. नेमकी अशावेळी शहाजी राजेंच्या स्वारी ची वेळ यावी अन् कौटुंबिक सौहार्द अन् सुरक्षेच्या कारणाने आपले बिऱ्हाड शिवनेरी किल्ल्यावर हलविण्याची वेळ यावी हा एक दैवी योगायोगच होता!

शिवनेरी गडाची माती अन् देवी शिवाई आतुर झाले होते एका युग पुरुषाला सामावून घ्यायला. तो गड अन् तेथील अधिष्ठात्री देवी शिवाई आज कृतार्थ झाले होते कारण एका युगपुरुषाने आज तिथे जन्म घेतला होता. त्याच्या अस्तित्वात येण्याने त्या भूमीचा कण अन् कण पावन झाला होता...!

शिवनेरीवर शिवबा जन्माला आला होता.


सगळी कडे आनंदी आनंदी झाला होता. शहाजी राजे अन् जिजाऊ या दाम्पत्याला एका अलौकिक पुत्र रत्नाचा लाभ झाला होता...!

जिजाऊच्या उरीच्या स्वप्नांना मूर्त रुपात आणण्याची वेळ आता आली होती अन् तिच्या स्वप्नांना साकार करणारा आता या पृथ्वीतलावर अवतरला होता!!!!


सततच्या स्वाऱ्या यामुळे पिता असूनही पितृ छत्र मात्र राजेंना फारसे लाभलेच नाही. पण जिजाऊ समर्थ माता होत्या. शिवबा ची जडण घडण करण्यास स्वतः समर्थ असल्याचं त्यांनी सगळ्यांना दाखवून दिलं. दादोजी कोंडदव यांच्यासारखा कुशल शिक्षक त्यांनी राजेंसाठी नेमला. त्यांच्या तालमीत राजे निपुण अन् युद्धकुशल होत होते. मनाची मशागत करायला त्यांच्या इतके समर्थ होते कोण????

शिवबा घडत होते त्यांच्या देखरेखीत ,त्यांच्या तालमीत. अन् बरेचसे बाळकडू तर मिळत असतात मुलांना पालकांच्या आचरणा मधून!!!!


जिजाऊंची माणसं जोडायची कला,त्यांचं योग्य माणसं जोडणे, त्यांच्या ठायी विश्वास निर्माण करत जीवाला जीव देणारी माणसं जोडणं ,कर्तव्य कठोर असणं,समर्पक योग्य न्याय निवाडा करणं आदिंचं बाळकडू मासाहेबांकडून च तर मिळालं होतं राजेंना!!!!


राजेंना जीवापाड जपणारी अन् त्यांच्यासाठी जीवाला जीव देणारी सवंगडी असलेले चपळ मावळे त्यांची अगदी बालवयातच सेना बनली होती. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांत वावरत हे सगळे मोठे होत होते.


शिवबा त्यांना प्राणाहून प्रिय होता. अशाच या जिवाभावाच्या सवंगड्यांना सोबतीला घेऊन शिवबाने वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी स्वराज्याची शपथ घेतली.


एका राजाचा मुलगा राजा होणे ही सहज गोष्ट आहे पण ज्याच्या जवळ त्याचे सवंगडी अन् मातेच्या स्वप्नांचे बाळकडू सोडता अगदीच काही नाही अशा एका कुमाराने स्वराज्याची केलेली घोषणा,घेतलेली शपथ.....!

हे दर्शवत होतं एक दुर्दम्य इच्छाशक्ती अन् प्रखर आत्मविश्वास!!!



याच दोन्हींच्या बळावर शक्ती अन् युक्ती या दोन्हींचे अद्भुत प्रदर्शन करत अन् गनिमी कावा या अद्भुत तंत्राचा अवलंब करत राजांनी तोरणा गड जिंकत स्वराज्याचे तोरण बांधले.



शिवाजी म्हणजे चमत्कार किंवा भुताटकी चा तर प्रकार नाही ना! अशी समज तेव्हा कित्येकांची झालेली कारण राजांचा पराक्रम होताच तसा अद्भुत ,होताच तसा अद्भुत....!


आज आम्ही हा इतिहास बालपणापासून शिकत आलोय म्हणून हे खरं आहे याची सगळ्यांना खात्री आहे कारण की राजांचे चरित्रच अशा अद्भूत अन् भारून टाकणाऱ्या घटनांनी भरलेले आहे.


म्हणूनच मी म्हणते असा राजा युगे युगे होणे नाही,युगे युगे होणे नाही....!


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational