डॉ. मुक्ता बोरकर - आगाशे

Inspirational

4.6  

डॉ. मुक्ता बोरकर - आगाशे

Inspirational

#तुम्हीच शिल्पकार जीवनाचे

#तुम्हीच शिल्पकार जीवनाचे

4 mins
578


             " अरे आपले महाजन सर रिटायर होत आहेत ,येत्या एकतीस तारखेला. त्यांच्या नंतर शाळेला इतके सक्षम व्यक्तिमत्व भेटेल की नाही देवच जाणे रे. माझ्या सारख्याच या गावात असलेल्या विद्यार्थ्यांनी त्यांचा अगदी जाहीर नागरी सरकार करायचं ठरवलं आहे."

रमेश त्याचा मित्र राकेश ला सांगत होता.

" अरे वा! खूप चांगला निर्णय घेतलाय मित्रांनो तुम्ही." राकेश

" तुम्ही सगळे आले असते तर खूप मजा आली असती अन् कार्यक्रमाची शोभा वाढली असती.

पण कळते रे तुम्हा सगळ्यांना यायला जमणार नाही ते." रमेश.

त्यानंतर पुन्हा एकदा राकेश ने कार्यक्रमाची इत्यंभूत माहिती फोनवरून रमेश कडून घेतली. अन् कार्यक्रमाला भरभरून शुभेच्छा दिल्या.


महाजन सरांच्या सेवा निवृत्ती चा सोहळा सुरू होता. प्रत्येकच वक्ता सरांबद्दल भरभरून बोलत होता. संपूर्ण गावातर्फे अगदी जंगी सत्कार करण्यात आला होता सरांचा! तितक्यात एक चकचकीत पॉश गाडी येऊन तिथे थांबली.

कोण असेल बुवा आता? सगळ्यांच्या नजरेत प्रश्न तरळला.

अन् हे काय रमेशचे तीन जिवाभावाचे मित्र गाडीतून उतरले. त्यांना बघताच हर्षातिरेकाने रमेश सामोरा आला. खूप दिवसांनी भेटलेल्या मित्रांची गळाभेट घेतली अन् तिघेही नाही म्हणत असतांना सुद्धा त्यांना स्टेज वर घेऊन गेला.

वक्त्याचे भाषण संपले अन् तिघेही महाजन सरांच्या पाया पडले. रमेशने तिघांचीही ओळख सगळ्यांना करून दिली. विशेषत: आयएएस अधिकारी असलेल्या राकेशची उपस्थिती कौतुकाचा विषय वाटत होती सगळ्यांना.अन् मग काही वेळातच मनोगत व्यक्त करण्यासाठी राकेश चे नाव संचालन कर्त्यांनी पुकारले. भारदस्त व्यक्तिमत्व असलेला राकेश बोलायला उभा राहिला अन् सगळ्यांच्या नजरा त्याच्यावर खिळल्या.

"मी, माझे हे सोबत आलेले दोन मित्र आणि तुम्हाला परिचित असलेला रमेश अशी आम्हा चार जणांची चौकडी होती जी पूर्ण शाळेत चांडाळ चौकडी म्हणून ओळखली जायची.

मी राकेश उर्फ रॉकी दादा त्या चौकडी चा म्होरक्या.


आमच्या मुळे आमच्या ज्युनिअर कॉलेज मध्ये एकही चांगला शिक्षक शिकवायला तयार होईना.

आमची बॅच अगदी दहावी पर्यंत सुद्धा हुशार अन् टारगट मुलांची बॅच म्हणून ओळखली जायची. आता अकरावीत तर आमच्या बदमाशांना अजून उधाण आले होते. कोणतेच शिक्षक आमच्या बॅच चे वर्गशिक्षक व्हायला तयार नव्हते. तेव्हाच महाजन सर नव्याने शाळेत रुजू झाले आणि आमच्या वर्गाचे वर्गशिक्षक पद त्यांना अगदी जबरदस्तीने थोपवण्यात आले. आमच्या बदमाषांना कंटाळून हे सर सुद्धा जातील याची आम्हाला पूर्ण खात्री होती.


पण पहिल्या दिवशीच सरांनी वर्गाची प्रेझेंटी घेतली आणि नंतर ज्यांना शिकायचं आहे त्यांनी आत बसायचं अन् ज्यांना क्लास करायची इच्छा नाही त्यांना सरळ बाहेर जायची मुभा दिली. आम्ही चौघे बाहेर पडलो आणि सरांनी आरामात सगळ्यांचा क्लास घेतला. सगळी मुलं खूप खुश दिसली. आम्ही सुद्धा बाहेर उंडारून कंटाळलो. अन् मग वर्गातच बसून राहू लागलो. हळू हळू सरांची शिकवण्याची पद्धत आम्हाला पण आवडू लागली.कितीही किचकट टॉपिक सर सोपा करून शिकवायचे. कितीही वेळा सरांना डिफिकल्टी विचारली तरी न कंटाळता तत्परतेने उत्तर द्यायचे. वर्गात कितीही चेंगळ केली सरांना कितीही त्रास दिला तरी सरांनी त्यांच्या संयमाचा बांध कधीच ढळू दिला नाही.शेवटी शेवटी तर त्यांच्या संयमी वृत्तीपुढे आमचा टगेपणाच हरू लागला. पण आमची मुळचीच बंडखोर वृत्ती काही आम्हाला स्वस्थ बसू देत नव्हती. मग एक दिवस आम्ही एक गुलाबाचे फूल आणले आणि मुलींच्या लाईन मधल्या पहिल्या टेबल वर ठेवून दिले.


सर नेहमीप्रमाणेच वर्गात आले. सारा वर्ग स्तब्ध झाला. सरांनी घडलेला प्रकार पाहिला आणि मी तुम्हाला चांगले शिकवण्यास असमर्थ ठरलो म्हणत स्वत:च्याच हातावर सपासप आठ दहा छड्या मारल्या आणि वर्गातून निघून गेले. सरांच्या त्या अनपेक्षित कृतीने आम्हाला आता आमच्या वागण्याचा पश्चात्ताप होऊ लागला. दुसऱ्या दिवशी सर वर्गावर आलेच नाहीत. सर शाळा सोडून जाणार असल्याच्या उडत्या बातम्या कानावर येऊ लागल्या अन् आता मात्र आम्ही पश्चात्तापाच्या अग्नीत होरपळू लागलो.


तडक सरांच्या घरी गेलो. सरांचे पाय पकडले माफी मागितली आणि पुन्हा शाळेत असे काही घडणार नाही याची लेखी हमीच आम्ही दिली.पण सरांनी शाळा सोडून जाऊ नये अशी विनंती त्यांना केली.

तो प्रसंग आमच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट ठरला. त्या दिवशीपासून आमची पावलं खोडकरपणा सोडून अभ्यासाकडे वळली. मुळातच आमच्यातील तल्लख बुद्धिमत्तेला सरांनी दिशा दिली,सद्विचारांचे खतपाणी दिले  आणि आमचे भरकटलेले तारु अलगद मार्गाला लागले.

आमच्यातील टॅलेंट जे चुकीच्या दिशेने वापरले जात होते त्याला सरांनी योग्य गोष्टींसाठी कामात आणले. सरांची क्षमाशील वृत्ती,आधी केले मग सांगितले ही प्रवृत्ती मनावर कुठेतरी खोलवर परिणाम करून गेली.


बारावीत अतिशय चांगले मार्क्स मिळवत मी मेरिट मधे आलो. माझे मित्र सुद्धा उत्तम मार्कांनी पास झाले. सरांनी आमच्यावर घेतलेली जीवतोड मेहनत. विनामूल्य घेतलेल्या आमच्या शिकवण्या जीवनाला एका दिशेने घेऊन गेले. पुढेही सरांचे मार्गदर्शन वेळोवेळी घेत राहिलो. स्वतः तील क्षमतांना ओळखत सरांनी माझ्यात असलेला नेतृत्व गुण हेरत मला आयएएस करण्याचा सल्ला दिला अन् आज सरांमुळेच एक आयएएस ऑफिसर आज तुमच्यापुढे उभा आहे. सर नसते तर हा राकेश रॉकी दादा म्हणून कधीच वाया गेला असता पण सरांसारख्या हाडाच्या शिक्षकाने एका बेढब दगडातून हे शिल्प साकारले. सरांचे हे पांग तर मी कधीच फेडू शकणार नाही पण त्यांच्या ऋणाची उतराई होण्यासाठी सरांना आम्ही एक विशिष्ट रक्कम होतकरू मुलांच्या उत्थानासाठी वापरण्यासाठी सुपूर्द करीत आहोत. अजून पुढेही अशीच लागेल ती मदत आम्ही करत राहू.असे आश्वासन देत राकेश बोलायचा थांबला अन् पुन्हा एकदा सरांच्या पायाशी झुकला.


राकेशच्या डोळ्यातील कृतज्ञतेच्या अश्रूंची काही थेंब सरांच्या पाया वर ओघळली होती. असा हिरा आपल्या हातून घडला हा विचार करून आज महाजन सरही अगदी कृतकृत्य झाले होते,गहिवरले होते....!


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational