Amruta Shukla-Dohole

Tragedy Classics Inspirational

3  

Amruta Shukla-Dohole

Tragedy Classics Inspirational

त्याग

त्याग

4 mins
204


श्रेयो हि ज्ञानमभ्यासाज्ज्ञानाद्ध्यानं विशिष्यते।

ध्यानात्कर्मफलत्यागस्त्यागाच्छान्तिरनन्तरम् 


गीतेमधील हा श्लोक मला नेहेमीच ह्या कथेची आठवण करून देतो,,


     साताऱ्याजवळ रंगनाथ स्वामींचे निगडी म्हणून एक गाव आहे. तेथील महान योगी श्री रंगनाथ स्वामी यांच्या जीवनातील एक प्रसंग.


     स्वामीजी समर्थ रामदास यांचे समकालीन. बहुतके सर्व साधु, संत, विरागी वृत्तीने राहतात हे आपणा सर्वांना माहीत आहे. त्यांच्या अंगावर जाडे भरडे भगवे कपडे असतात. जटा वाढलेल्या, अंगास भस्म लावलेले, पायात खडावा, हातात झोळी अथवा कमंडलू, गळ्यात रुद्राक्षाच्या माळा, मुद्रा प्रसन्न, डोळे पाणीदार आणि तेजस्वी नजरभेद करून पलिकडे जाणारी अशी व्यक्ती पाहिली की आपण मनोमन ओळखतो की हे कुणी तरी महान योगी किंवा संत असावेत. आपण नम्र होतो. आपले हात चटकन जोडले जातात.


     समर्थ रामदास यांचे वागणे असेच होते. फक्त श्री रंगनाथ स्वामी याला अपवाद होते. त्यांचे कपडे भगव्या रंगाचे जरुर असत. पण ते भरजरी असत. त्यांच्या पायात मखमली जोडे असत. ते अनवाणी किंवा खडावा घालून फिरत नसत. तर त्यांच्याजवळ उत्तमोत्तम घोडे असत. त्यावरुन ते रपेट करीत. सर्व तऱ्हेचे ऐश्वर्य त्यांचे जवळ होते. पण ते त्रिकालज्ञानी व निरीच्छ होते.


     एकदा काय झाले समर्थ रामदास यांच्याकडे श्री रंगनाथ स्वामी आले. ते आले लवाजमा बरोबर घेऊनच व आपले ऐश्वर्य बरोबर घेऊन. समर्थांनी अगत्याने त्यांची विचारपूस केली. त्यांना आपल्याजवळ बसविले. बराच वेळ त्यांचे बोलणे चालू होते. नंतर रंगनाथस्वामी समर्थांचा निरोप घेऊन निघून गेले.


     समर्थांच्या एका शिष्याला समर्थांनी रंगनाथ स्वामींना आपल्या बरोबरीने वागविले हे आवडले नाही. तो रंगनाथ स्वामींना दांभिक बुवा समजत असे, जो आपल्या गुरुप्रमाणे जाडेभरडे कपडे घालीत नाही. साधासुधा रहात नाही तो कसला संत! या माणसाचे पहावे तो सारे उलटेच. भरजरी कपडे काय, बरोबर लवाजमा काय? हा काय साधू म्हणायचा? हा तर ढोंगी बुवा. लुच्चा कुठला आणि समर्थांनी याला बरोबरीने वागवावे ? छे! छे! समर्थांच्या लक्षात कसे येत नाही हे ?


     अशा तऱ्हेचे विचार त्याच्या मनात येत होते. समर्थ रामदास अंतर्ज्ञानी होते. त्यांनी त्या शिष्याचे विचार ओळखले. पण ते त्याला काही बोलले नाहीत.


     असेच काही दिवस गेले. एक दिवस सकाळीच समर्थ त्या शिष्याला म्हणाले, " हे बघ, आज आपल्याला त्या रंगनाथस्वामींचेकडे जायचे आहे. तू चल माझ्याबरोबर ".


     ते दोघेजण चालत चालत निगडीला जाण्यास निघाले, सातारला येईपर्यंत दुपार होत आली. साताऱ्याहून थोडे पुढे गेले तो समोरून रंगनाथस्वामी घोड्यावरून एकटेच येतांना दिसले. आज त्यांचा लवाजमा बरोबर दिसत नव्हता, पण रुबाब मात्र कायम होता. समर्थांना पाहाताच ते घोड्यावरून खाली उतरले आणि त्यांनी समर्थांना नमस्कार केला. समर्थ जवळ गेले आणि त्यांनी त्यांच्या पाठीवरून हात फिरवला. शिष्याच्या कपाळावर सूक्ष्म आठी उमटली.


     समर्थ म्हणाले, “अरे आज आम्ही तुला भेटायला निघालो होतो आणि तू कुठे निघाला आहेस?"


     रंगनाथ स्वामी म्हणाले, "समर्थ, मी आपल्याच दर्शनासाठी निघालो होतो." त्यावर दोघेही खळाळून हसले. समर्थ म्हणाले, "माझी दुपारच्या भिक्षेची वेळ झाली. जवळच्या गावातून मी आणि माझा शिष्य भिक्षा मागून येतो आणि मग आपण सावकाश गप्पा मारू. तोवर तू या दगडावर बैस. आम्ही परत येईतो हलू नकोस." रंगनाथ स्वामी म्हणाले, "जशी आपली इच्छा". आणि रस्त्याच्या कडेला पडलेल्या एका शिळेवर ते बसले.


     आता सूर्य माथ्यावर आला होता. ऊन रणरणत होते. दगड खूप तापला होता. त्यावर रंगनाथ स्वामी विराजमान झाले होते. समर्थांचा शिष्य मनातून आनंदला होता. त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटले होते. तो मनात म्हणाला, 'छान झाले. आता निदान दोन तीन घटिका तरी या बुवाला उन्हात रखडावे लागेल. बरी खोड मोडली समर्थांनी!'


     त्या आनंदातच तो समर्थांबरोबर जवळच्या गावाच्या दिशेने चालू लागला.


     समर्थ आणि त्यांचा शिष्य थोडेसे अंतर चालून गेले असतील तेवढ्यात छत्रपती शिवाजी महाराज यांचा एक सैनिक घोड्यावरून रंगनाथ स्वामींच्या दिशेने येत होता. त्याने दुरूनच पाहिले की एक भरजरी पोषाख केलेली व्यक्ती रस्त्याच्या कडेला दगडावर बसली असून शेजारीच त्याचा घोडा उभा आहे. त्या सैनिकाने आपला घोडा सातारच्या दिशेने परत वळवला आणि ती बातमी आपल्या सेनापतीच्या कानावर घातली. लगेच दहा वीस घोडेस्वार घेऊन सेनापती गेले. तेथे त्यांनी रंगनाथस्वामींना चटकन ओळखले. त्यांना लवून मुजरा केला. रंगनाथस्वामी समर्थांची वाट पहात तेथेच थांबणार आहेत असे कळताच त्याने आपल्या शिपायांना हुकूम केला आणि थोड्याच वेळात रंगनाथ स्वामींच्या भोवती तंबू उभा राहिला. तहान भागवण्यासाठी थंडगार पाणी व फळे आणविली गेली.


     असाच काही वेळ गेला. समर्थ आणि त्यांचा शिष्य रंगनाथस्वामी जेथे बसले होते त्या जागेकडे हळूहळू चालत येत होते. उन्हात चालल्यामुळे ते दमले होते. आता थोडी विश्रांती आवश्यक होती. अन्न आणि थंडगार पाणी हवे होते. ते दोघे येऊन पहातात तो त्या ठिकाणी एक लहानसा तंबू उभा राहिला होता. काही शिपाई आत- बाहेर ये-जा करीत होते. दारावर पहारा होता. शिष्याच्या मनात आले, 'मघाशी आपण येथून गेलो त्यावेळी हा तंबू इथे नव्हता, ही माणसे नव्हती. आता घटका दोन घटकेत ही आली कोठून? आणि रंगनाथस्वामी गेले तरी कुठे? का उन्हाला त्रासून निघून गेले ?


     त्याच्या मनात विचारांनी गर्दी केली. तो गोंधळून गेला. समर्थांची चित्तवृत्ति शांत होती. ते दोघेही तंबूजवळ आले. शिपायांनी वाकून मुजरा केला आणि आदराने आत नेले. शिष्याचे मुद्रेवर आश्चर्य उमटले. आत रंगनाथस्वामी दगडावर बसलेले होते. त्याच स्थितीत शांत मुद्रेने प्रसन्नपणे बसून राहिले होते.


     समर्थ त्या शिष्याकडे वळून म्हणाले, "पाहिले याला प्रारब्ध म्हणतात. या रंगनाथस्वामीला हे ऐश्वर्य नको असले तरी ते त्याच्यामागे आपोआप येते. हा राजयोग आहे!"


     आपण जे जे पूर्वजन्मी केले असेल त्याचे बरे वाईट फळ आपल्याला भोगावे लागते, मग तुमची इच्छा असो वा नसो. ते चुकत नाही.


     सध्याची आपली स्थिती सुधारावी असे वाटत असेल, पुढच्या जन्मी सुखी व्हायचे असेल, या जन्मोजन्मीच्या फेऱ्यातून मुक्त व्हायचे असेल, तर चांगले वागा. दुसर्‍यांसाठी काहीतरी चांगले करा. थोडा तरी त्याग करा म्हणजे त्याचे पुण्य तुमच्या पदरात पडेल.

 

 जय श्री कृष्ण


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy