Pratibha Tarabadkar

Crime

4.5  

Pratibha Tarabadkar

Crime

विश्वास भाग -१

विश्वास भाग -१

5 mins
267


आज इन्स्पेक्टर शिंदे थोड्या रिलॅक्स मूडमध्ये मोबाईल बघत बसले होते. इतके निवांत क्षण त्यांच्या वाट्याला क्वचितच येत असत.ते मोबाईलमध्ये अगदी गुंगून गेले होते.

  समोरच्या खुर्चीत बसण्याचा आवाज आला आणि त्यांची तंद्री भंगली.त्यांनी वर बघितले.एक मध्यमवयीन जोडपे समोर बसले होते.दोघांच्याही चेहऱ्यावर ताण दिसत होता.कदाचित पोलीस स्टेशनची पायरी चढण्याची त्यांची पहिलीच वेळ असावी.इ.शिंदे त्यांचे निरीक्षण करत होते.साधारण पन्नाशीचे, उच्च मध्यमवर्गीय, नोकरी करणारे ,सुशिक्षित दिसणाऱे ते जोडपे चोरट्या नजरेने आजूबाजूचे निरीक्षण करत होते.थोडे स्थिरस्थावर झालेले बघून इ.शिंदे म्हणाले,'बोला, काय 'प्रॉब्लेम आहे?'

 'सर,'त्या जोडप्यामधील पुरुष बोलू लागला,'मी राहुल देशकर आणि ही माझी पत्नी सोनाली देशकर.मी xxx कंपनीत मॅनेजर आहे तर सोनाली xxx बॅंकेत ऑफिसर आहे.पुढील सर्व तीच सांगेल.'

 सोनाली पुढे सरसावली.'माझी आई सुनंदा फुंडकर मागच्या आठवड्यात वारली.तिचं वय होतं पंच्याऐंशी.गावाच्या एका टोकाला आम्ही रहातो तर दुसऱ्या टोकाला ती रहात होती.वडील जाऊन वीस वर्षं झाली आणि तेव्हापासून ती एकटीच रहात होती.'

'एकटीच?'

'नाही. तिला एक केअरटेकर ठेवली होती देखभाल करण्यासाठी.'

'तुम्हाला भाऊ बहीण?'

'नाही.मी एकुलती एक आहे.'

'मग त्या तुमच्याबरोबर रहात नव्हत्या का?'

 'आमच्यावर विश्वास पाहिजे ना त्या म्हाता...'राहुलने पटकन जीभ चावली.

'का? असं काही घडलं होतं का विश्वास जाण्यासारखं?'इ.शिंदेंमधला पोलीस जागा झाला.

'छे हो, काय घडणार?'सोनालीने घाईघाईने खुलासा केला.'अहो आम्ही दोघेही भरपूर कमावतो.वडील गेल्यावर ती आमच्याकडे येईल असे गृहित धरून आम्ही तीन बेडरूमचा फ्लॅट घेतला.आम्ही दिवसभर बाहेर असतो म्हणून एक केअरटेकर बघितली पण आईने आमच्याकडे येण्यास साफ नकार दिला आणि एकटीच रहात होती.मध्यंतरी ती बाथरुममध्ये पाय घसरून पडली आणि मांडीचे हाड मोडले तेव्हा बेडरिडन झाली. मग मात्र आम्ही जबरदस्तीने एक केअरटेकर ठेवली,'आपलं माणूस 'या सेवा संस्थेतून.पण तिचं काम आईला पटेना! महिनाभरात तिला काढून टाकली.मग दुसरी बाई,तिसरी बाई अशा दहा महिन्यांत दहा बायका झाल्या.शेवटी त्या सेवासंस्थेने आम्ही केअरटेकर देऊ शकत नाही म्हणून हात वर केले.'

 'पण इतक्या बायका का बदलल्या?'इ.शिंद्यांनी आश्चर्याने विचारले.

 'जमवून घेण्याचा स्वभावच नव्हता ना आईचा!'सोनाली चिडून म्हणाली.'सतत कटकट,काम नीट करत नाही म्हणून बाईशी भांडण.... आणि पराकोटीचा संशय... कसं जमवून घेतील बायका तरी,'सोनाली त्रासिक सुरात म्हणाली.

'म्हणजे तुम्ही आईची समजूत काढण्यासाठी आमची मदत घेण्याच्या उद्देशाने आला आहात का? पण तुम्ही म्हणालात की ती मागच्या आठवड्यातच वारली म्हणून!'इ.शिंदे बुचकळ्यात पडले.

 'नाही नाही, आम्ही वेगळ्याच कारणासाठी आलो आहोत.'राहुल घाईघाईने म्हणाला.'सासूबाई वारल्यानंतर आम्ही घरातील लॉकर उघडला तेव्हा कळलं की त्यातील सगळे दागिने गायब आहेत.'

 'म्हणजे?सगळे दागिने घरात ठेवले होते? अहो आम्ही वारंवार सांगतो की दागिने घरात ठेवू नका म्हणून! तुम्ही तर सुशिक्षित माणसं, एका एकट्या राहणाऱ्या वृद्ध बाईच्या घरात सरळ दागिने ठेवता? किती हा बेजबाबदारपणा,'इ.शिंदेंचा आवाज चढला होता.

'अहो मी म्हटलं ना माझी आई अतिशय संशयी वृत्तीची होती.ते दागिने आम्ही घेऊन टाकले तर? या संशयाने तिला पछाडले होते. मी तिला म्हटलं होतं की सगळे दागिने माझ्या लॉकर मध्ये ठेव पण ती ऐकेल तर शपथ !'

'मी एकुलती एक असल्याने ती वर गेल्यावर सगळं मलाच मिळणार होतं पण हे ठाऊक असूनही ती अशी वागत होती. तिला खर्चासाठी दर महिन्याला मी ३०,००० रुपये देत होते.'

'एका बाईला इतके पैसे?'

'हो. अहो केअरटेकरलाच पंधरा हजार द्यावे लागत होते आणि वरकड लागले तर असावेत म्हणून तीस हजार रुपये.पण आम्ही पाहिलं तर एकही रुपया शिल्लक नव्हता ती गेल्यावर 'सध्या कोणी केअरटेकर होती का?'इ.शिंद्यांनी विचारले.

'हो.रुपा म्हणून मुलगी होती आईला सांभाळायला.आम्ही तिचीच तक्रार घेऊन आलोय.गेले तीन महिने ती आईकडे केअरटेकर म्हणून राहिली होती.आई कधी नव्हे ती खूष होती तिच्यावर म्हणून मी सुटकेचा निःश्वास टाकला. आई गेल्याचे तिनेच मला कळवले होते.मी, राहुल तातडीने आलो आणि डॉक्टरांना बोलावणे, नातेवाईकांना फोन करणे,अंत्यविधीची तयारी यात गुंतलो होतो त्या अवधीत रुपा कुठे पसार झाली कळलंच नाही.अंत्यसंस्कार झाल्यावर आवराआवर करत असताना आमच्या लक्षात आलं की दागिने गायब, घरातील रोकड गायब! आणि मग लक्षात आलं की रुपा ही गायब झाली होती.'

 'तिची काही ओळख? आधार कार्ड, फोटो वगैरे?'

राहुल आणि सोनालीने नकारार्थी मान हलवली.

इ.शिंदेंनी मनातल्या मनात कपाळावर हात मारला. जर त्या मुलीबद्दल काहीच पुरावा नसेल तर माणसांच्या महासागरात तिला कसं शोधून काढायचं?

'सर आम्ही आईसाठी केअरटेकर शोधून शोधून कंटाळलो होतो.आईला रुपाची काम पटलं होतं म्हणून सुटकेचा निःश्वास टाकला होता त्यामुळे तिच्याबद्दल काही माहिती घेतलीच नव्हती.'सोनाली दिलगिरीच्या स्वरात म्हणाली.

'आणि सर,' सोनाली चाचरत म्हणाली,'ही बाटली मला आईच्या घरात सापडली.आईची औषधं मला माहित होती त्यात हे औषध नव्हते म्हणून मला संशय आला आणि मी ही बाटली माझ्या ओळखीच्या डॉक्टरांना दाखवली तर ते म्हणाले की ही झोपेच्या गोळ्यांची बाटली आहे.'इ.शिंद्यांनी ती बाटली ताब्यात घेतली.

'ठीक आहे,'ते म्हणाले,'तुम्ही लेखी तक्रार दाखल करा.आम्ही तपास सुरू करतो.'

  मातृस्मृती या अतिशय जुनाट, रंग उडालेल्या बिल्डिंगच्या पायऱ्या चढताना इ.शिंद्यांच्या लक्षात आले की या बिल्डिंगची अनेक वर्षांपासून देखभालच केली गेली नाहीये.

 'मी मधुकर साने.या बिल्डिंगचा सेक्रेटरी.अहो काय सांगू साहेब, या बिल्डिंग मध्ये सारी वयस्कर मंडळीच रहातात.सगळ्यात लहान मी. माझं वय वर्षे पासष्ट. बिल्डिंगमध्ये बहुतेक सर्वांना तब्येतीचे प्रश्न! पण मुलं बोलावतात तरी त्यांच्याकडे जाण्याची तयारी नाही.जसे इतके वर्ष राहिले तसेच पुढेही रहाण्याचा अट्टाहास.कुठलीही सुधारणा नको मग सांगा बिल्डिंगची डागडुजी होणार कशी?'

  'इथे कोणी सुनंदा फुंडकर रहात होत्या का?'इ.शिंद्यांनी मूळ मुद्द्यावर येत विचारलं.

  'हो नुकत्याच वारल्या त्या!'मधुकरराव साने कपाळावर आठ्या पाडत म्हणाले.'अतिशय त्रासदायक बाई.संशयी, भांडखोर.कोणाशीच पटवून न घेणाऱ्या.बिचारी सोनाली, आईसाठी इतकी धडपडायची पण फुंडकरबाईंना पर्वाच नव्हती मुलीची.त्यांना वाटायचं आपल्या पैशावर डोळा ठेवून आपल्याला विचारतेय मुलगी !'

  'त्यांच्याकडे रुपा नावाची मुलगी होती का कामाला?'

  'असेल कदाचित,'मधुकरराव विचार करीत म्हणाले आणि त्यांनी आपल्या बायकोला हाक मारली.

  'अगं मंदा,हे इन्स्पेक्टर काय विचारताहेत बघ.'

मंदा साने दारात येऊन उभ्या राहिल्या.पोलीसांशी बोलायच्या कल्पनेने त्यांच्या चेहऱ्यावर आलेला ताण स्पष्ट दिसत होता ‌अर्थात इ.शिंद्यांना हा अनुभव नवा नव्हता.

  'फुंडकरबाईंकडे कोणी रुपा नावाची मुलगी केअरटेकर म्हणून काम करत होती का?'

  'कोणास ठाऊक हल्ली कोण केअरटेकर होती? त्यांच्याकडे ढीगभर बायका बदलल्या होत्या.'मंदा साने तोंड वाकडे करीत म्हणाल्या.'एक बाई टिकेल तर शपथ! कधी जुळवूनच घेतलं नाही कुणाशी!'

 'हां साहेब, एक मुलगी काम करत होती त्यांच्याकडे. तीन महिने टिकली होती.' त्यांचे बोलणे ऐकत उभी असलेली सरुबाई म्हणाली. नाहीतरी कामवाल्यांना कामापेक्षा अशा भोचकपणातच रस!

'आमच्या वस्तीमधल्या शांताबाईनं मलाच विचारलं होतं त्या मुलीला काम कुठं गावंल तर मीच फुंडकरबाईचं नाव सुचवलं होतं.पण साहेब, काय झालं?'

  'हे पहा सरुबाई, मी त्या मुलीची चौकशी करतोय हे सगळ्यांना सांगत बसू नको. ती मुलगी कुठे रहाते माहित आहे का तुला?'

  'नाही बा.पण शांताबाईला माहित असेल.'

'बरं शांताबाईचा पत्ता दे.'

 इ.शिंद्यांनी आल्या आल्या हवालदार भोसलेंना बोलावणं पाठवलं.

  'भोसले तुम्ही जागृती चौकात रहाता ना?'

  'हो सर.'

  'त्याच्यापुढेच एकता नगर आहे ना? तिथे रहाणाऱ्या शांताबाईला शोधून रुपा नावाच्या मुलीची चौकशी करा.'

  'ठीक आहे सर.'भोसलेंनी शांताबाईचा पत्ता असलेला कागद खिशात ठेवला.

एकता नगर ही एक प्रचंड झोपडपट्टी होती.एकाला एक लागून असलेल्या खोल्या, चिंचोळ्या गल्ल्या,वहाणारी गटारं यातून कसाबसा मार्ग काढत हवालदार भोसलेंनी शांताबाईचं घर शोधून काढलं.

 दारात पोलीस बघून शांताबाई घाबरलीच.दारुड्या नवऱ्यानं परत मारामारी केली का काय? हवालदार भोसलेंनी येण्याचं कारण सांगितल्यावर शांताबाईने सुटकेचा निश्वास टाकला.

 'आवो ती पोरगी व्हय? म्या तिला वळखित न्हाई. शनवारी मारुतीच्या देवळात भ्येटली.लैच रडत हुती, कायतरी काम द्या म्हनून! म्या सरुबाईला इच्यारलं तवा तिनं त्या म्हतारीचं काम सांगिटलं.मंग म्या त्या पोरीला त्या म्हतारीकडं घिऊन गेलो.

 'काय नाव होतं त्या मुलीचं?'

  'काय की बा, तिला कामाची लैच जरुरत हुती म्हनून म्या तिला काम ढुंढलं बस्स!'

हवालदार भोसलेंनी मनातल्या मनात कपाळावर हात मारला.देवळात भेटलेली मुलगी, जिचं नावगाव काही माहीत नाही अशा मुलीला एका एकट्या राहणाऱ्या वृद्धेकडे कामाला ठेवतात!

आता कसं काय शोधायचं त्या मुलीला? तिने सांगितलेलं नाव तरी खरं असेल का?

हवालदार भोसले विचारात बुडले.


Rate this content
Log in

Similar marathi story from Crime