Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

डॉ. मुक्ता बोरकर - आगाशे

Inspirational

3  

डॉ. मुक्ता बोरकर - आगाशे

Inspirational

जननायक तंट्या

जननायक तंट्या

5 mins
207


आज गोऱ्या सरकारचे शिपाई गावात आले होते.सोबत त्यांचे मोठे गोरे साहेब ही होते.

कोतवालाने पुन्हा दवंडी पिटली....

" ऐका हो ऐका सरकारने ठरवलेल्या नियमानुसार आज शेतसारा भरायची शेवटची तारीख आहे. आज जो कोणी शेतसारा भरणार नाही त्याच्यावर कारवाई करण्यात येईल हो....!"


कोतवाल गावभर दवंडी पिटत होता अन् प्रत्येकालाच घाम फुटू लागला होता. मुळात मागच्या वर्षी उत्पन्न झालेच कुठे होते शेतात...? अन् तरीही त्याचा काहीही विचार न करताच जुलुमाने वसुली करणार होतं हे सरकार...!


लोकांनी त्यांचे संस्थानिक असलेल्या राज दरबारी पण दाद मागितली होती, थोडा शेत सारा कमी करण्यासाठी अन् मुदत वाढवून देण्यासाठी...!


पण संस्थानिक सुद्धा त्यांच्याच दावणीला बांधले गेलेले...., गरिबाचा कोणीच वाली नसतो रे बाबा....!


तीच गोष्ट होती जंगलांच्या आधाराने राहणाऱ्या आदिम जमातींची. जंगलातून लाकूड गोळा करणं, तिथले गवत आणून पशुपालन करणं अन् शिकार करून पोट भरणं,जमेल तशी शेती हे यांचे पिढीजात व्यवसाय होते पण गोऱ्या सरकारने तर आता नवीन जंगल कायदा लागू करून या साऱ्यांवर सुद्धा चाप ओढला होता. 


सगळ्यांचं जगणं अन् पोट भरणं कठीण झालं होतं अन् तरीही सक्तीची करवसूली ही होतीच...!


कुणाजवळ काही नव्हतेच तर कर भरणार तरी कसा???

हतबल होते सगळे...!!!


" दया करा सायेब,काही बी नाही हो जवळ.....! इथं पोट भरायची मारामार तर कुठून कर भरावा आमी लोकांनी???" गावातला तो गरीब शेतकरी गयावया करत होता 


" ये आम्हाला कायबी ऐकायचं नाही तुजं,वरून जसं सांगितलं तेच करणार आम्ही." म्हणत त्या शिपायांनी त्याला तसेच फरफटत नेलं साहेबासमोर ..


तो गयावया करत होता पण फटक्यांवर फटके, कोड्यांवर कोडे बरसत होते. घरातील सामानाची नासधूस करून ते गेले होते. 


सारं गाव आज एक विचित्र सन्नाटा अनुभवत होतं. घरी चुली पेटल्या नव्हत्या, लहानगी भुकेने कळवळत होती.


गावोगावी,वस्ती,पाड्यांमध्ये हेच चित्र दूरदूर वर दिसत होतं. 


खुश होते फक्त गावातले सरकारचे हुजरे अन् सावकार...!

सावकारांना तर सक्तीने कर्जवसुली चा जणू परवाना च मिळाला होता.अन् दीन, दुबळा ,गरीब मात्र पिचला जात होता. 


गोऱ्यांचेच सरकार ते..! गोरे तर इथल्या जनतेवर राज्य करायला अन् जुलूम करायला आलेले...!


सुरुवातीला संस्थानिकांनी थोडा फार विरोध केला पण त्यांचेच अस्तित्व धोक्यात आहे असे वाटताच त्यांनी सुद्धा इंग्रजांचे वर्चस्व मान्य केले...! ते नामधारी राजे झाले अन् महत्वाची आर्थिक खाती इंग्रजांच्या हाती गेल्याने त्यांच्याही आर्थिक नाड्या आवळल्या गेल्या.

जुलूम ,जबरदस्तीने , वसूली सुरू झाली...!

मानवता,दया माया ,कशाचाच विचार न करता फक्त ओरबाडणे सुरू झाले.


जुलुमी राजवटीचा वरवंटा साऱ्या संस्थानावर फिरला अन् लोकांचे जिणे हराम झाले.


हा काळ होता अठराशे अठ्यात्तर चा...!अन् वर वर्णन केलेली परिस्थिती होती जिथे जिथे इंग्रजांनी पाय रोवले तिथली. आता हे सगळं सहन करण्यावाचून पर्याय नाही असं साऱ्यांनाच वाटत होतं. अन् सर्व शेळ्या मेंढरांसारखे ही जुलमी राजवट सहन करत होते.


पण महाराष्ट्र अन् मध्यप्रदेशच्या सीमावर्ती भागात असलेल्या. निमाड,बैतूल , होशंगाबाद या पट्ट्यात वावरणाऱ्या भिल्ल समाजातील एका व्यक्तीला हे सर्व अगदी असह्य झाले होते. ही दैना, ही दुरवस्था त्याला बेचैन करत होती. शेती आमची, जमीन आमची, जंगलं आमचे,आम्ही इथले मूळ निवासी, अन् बाहेरून येणाऱ्या गोऱ्यांनी आमच्यावर अधिराज्य करून वरून जुलूम जबरदस्ती करावी ,हे कुठेतरी त्याच्या मनाला खटकत होते. त्याचे संवेदनशील मन अन् अंत: करणात असलेली इंग्रजांविरुद्ध ची खळखळ त्याला या विरुद्ध बंड करण्यास प्रवृत्त करत होते.


काय करावे रस्ता सुचत नव्हता. मनगटात तर पुरेसा जोर होता पण एवढ्या मोठ्या इंग्रजी सत्तेला आणि त्यांना जाऊन मिळालेल्या स्वकियांना शह देणे काही मामुली काम नव्हते. सोबतीला फसलेल्या अठराशे सत्तावन च्या उठावाची पार्श्वभूमी होतीच...! अन् हे सरकार त्याचाच तर सूड उगवत होते ना साऱ्यांवर..!!!


अविवेकाने निर्णय घेऊन चालणार नव्हते. कमी लोकं अन् अतिशय कमी संसाधनं यांच्या भरोशावर हे शिवधनुष्य पेलायचं होतं. 


खूप विचारा नंतर शिाजीमहाराजां चा इतिहास त्याच्या डोळ्यासमोर आला अन् त्या भागातील दाट जंगल,डोंगर , दऱ्या यांचा उपयोग करत छुप्या गनिमी काव्याचा वापर करत इंग्रजांना शह देण्याची योजना त्याने आखली. 


तरुण,सळसळत्या रक्ताचे ,जीवाला जीव देणारे मोजकेच सवंगडी सोबतीला घेतले. त्यांच्या मनाची अन् तनाची सुद्धा मशागत केली .सगळी सिद्धता झाली अन् एका बैठकीत एक गुप्त कट शिजला....!


रात्रीच्या वेळी ते मोठी पेठ वजा सारं गाव गाढ निद्रिस्त झालं होतं. अचानक काही लोकांचे एक टोळके घर फोडून त्या घरात घुसले होते...! त्या गावातल्या प्रतिष्ठित सावकाराचे घर होते ते. झोपेत असलेल्या सावकाराच्या मानेवर शस्त्र रोखले गेले अन् सावकार दचकून उठला..!


घाबरलेल्या सावकाराने तिजोरीच्या चाव्या गपगुमान दरोडेखोरांच्या हवाली केली अन् होते नव्हते ते लुटून ते सारे पसार झाले.


"सावकार यानंतर जुलूमाने गरिबाकडून अशी वसूली करशील तर सांगतो गाठ या तंट्याशी आहे." जाताजाता तंट्या सावकाराला ओळख द्यायला विसरला नव्हता.


सावकार पार गर्भगळीत झाला होता. सरकारला वर्दी गेली होती. सावकाराचा जीव वाचला होता हेच खूप होते. आतापर्यंत कधी न घडलेले आक्रित यावेळी घडले होते.


ही भरपूर मिळालेली लूट पाहून एखादा मिजासीने जगला असता, ऐशोआरामात त्याच्या साथीदारांसह लोळला असता पण त्याचा मूळ उद्देशच तो नव्हता. लुटीत मिळालेली सारी रक्कम त्याने गोरगरिबांमधे वाटून दिली. घरोघरी चुली पेटल्या,थांबलेले कामं मार्गी लागले, रखडलेले लग्न मार्गी लागले....!


पुढे अशाच लुटींवर लुटि पडू लागल्या जुलुमी राज्यकर्ते ,अधिकारी ,सावकार अशा अपिरिमित मालमत्ता लुटल्या जाऊ लागल्या अन् गरिबांचे जिणे सुकर होऊ लागले.


काहीच दिवसांत तंट्या ची दहशत साऱ्या जागी इतकी वाढली की सारेच बडे धेंडं त्याचा धसका घेऊ लागली.


सामान्य ,गोर गरीब लोकांना मात्र तंट्या त्यांचा दोस्त ,तारणहार वाटू लागला. त्याची तुलना विदेशातील अशीच गोर गरिबांना मदत करणाऱ्या रॉबिन हूड सोबत केली जाऊ लागली. गोरे अधिकारी त्याला इंडियन रॉबिन हूड म्हणून संबोधू लागले.


"आता मात्र तंट्या चा उपद्रव फारच वाढला आहे. अशाने आम्ही जगणार कसे? याचा काही बंदोबस्त करा साहेब." साऱ्या सावकारांचे मंडळ सरकारला साकडे घालत होते. 


तसाही याचा फटका सरकारला बसला होताच. त्याच्या धाका पायी कर वसूली थांबली होती. सावकारांच्या पेढ्या, तिजोऱ्या ओस पडू लागल्या लागल्या होत्या अन् याचाच प्रादुर्भाव सरकारला सुद्धा होत होता.सगळी कडे तंट्या ची दहशत पसरली होती पण तो काही कुणाच्या हाती लागत नव्हता. 


लोकांमध्ये वावरून ही लोकं त्याचा पत्ता कुणाला कळू देत नव्हते. तो दरोडा घालून कुठे पसार व्हायचा? त्याला कोण मदत करते? सारे अगदी कोडेच होते साऱ्यांसमोर..!


या तंट्या ने सरकारला अगदी सळो की पळो करून सोडले होते. सारे जंग जंग पछाडत होते पण तो काही हाती लागत नव्हता. जनसामान्यांचा तो महानायक होता. 

इंग्रजांच्या सत्तेला एकट्या तंट्याने जबरदस्त हादरा दिला होता.


सरकारने तंट्या ला पकडून देणाऱ्यासाठी १०,५०० रुपये आणि पंचवीसशे एकर जमीन घोषित केली . होळकरांनी सुद्धा स्वतंत्र बक्षिसाची घोषणा केली. तरी तो पकडला गेला नाही यावरून जनमानसात असलेली त्याची प्रतिमा आपल्या लक्षात येते.


बऱ्याच जणांना तर त्याला दैवी शक्ती अवगत आहेत असेच वाटायचे. तो एकाच वेळी अनेक ठिकाणी असतो अशा वदंता त्याच्याबद्दल होत्या. लोकांसाठी तो दैवी पुरुष अन् मासीहा पेक्षा कमी नव्हताच!!!


तंट्या पोलीस दल नावाचे सशस्त्र दल त्याच्या बंदोबस्त करण्यासाठी सरकारने बनवले पण काहीच फायदा होत नव्हता. सरकार तंट्या च्या केसालाही हात लावू शकले नव्हते.


तब्बल अकरा वर्षे तंट्या सरकारशी झुंजत साऱ्यांचा महानायक बनला होता. एक एकाकी झुंज देऊन त्याने शत्रू सत्तेला चांगलाच हादरा दिला होता.


सगळं कसं सुरळीत सुरू होतं. पण म्हणतात न आपणच आपले शत्रू असतो. एखाद्याच्या रक्तात असलेली फंद फितुरी साऱ्या मेहनतीवर पाणी फिरवते. याच फंद फितुरी चा फायदा घेत आजवर इंग्रजांनी त्यांचे पाय इथे मजबूत रोवले होते अन् अशाच एका फितुरा मुळे पोलिसांच्या आवाक्याबाहेर चा असणारा तंट्या एका बेसावध क्षणी जेरबंद झाला होता. फितुरी मुळे एका महान योद्ध्याचा, एका महानायकाचा घात झाला होता.


सरकारच ते,त्याच्या जीवावर टपलेले. त्याला अटक करून ,त्याच्यावर खटला भरला आणि फाशी देऊन मोकळे झाले.


फाशी दिलेला त्याचा देह त्यांनी इंदोर संस्थानातील खंडवा रेल्वे मार्गावरील पायापाशी रेल्वे स्टेशन जवळ फेकून दिला. 


लोकांच्या लेखी तेच तंट्या भिल्ल नामक महानायकाचे स्मारक आहे.


सतत अकरा वर्षे इंग्रजांना एकाकी शह देणाऱ्या या जननायकाला माझी ही शब्दांजली समर्पित...!


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational