Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Jayshri Dani

Action Inspirational

3.4  

Jayshri Dani

Action Inspirational

एव्हरेस्ट गर्ल : मनीषा वाघमारे

एव्हरेस्ट गर्ल : मनीषा वाघमारे

3 mins
173


     एव्हरेस्ट सर करण्यापेक्षाही मोठी कामगिरी जर कुठली असेल तर ती एव्हरेस्ट सुखरुप उतरणे. पावलोपावली जीवनमृत्यूची लढाई, कठीण कसोटी घेणार्‍या बर्फाच्छादीत खाई आणि पूणर्तः लहरी अनिश्चित वातावरण. या सर्व अवघड बाबींचा सामना करुन जी व्यक्ती हे उत्तुंग शिखर पार करते ती खरी बाजीगर ठरते. मराठवाड्यातली पहिली महिला एव्हरेस्टविर मनिषा वाघमारे ही याच पठडीतली. सन 2018 ला त्यांनी एव्हरेस्ट काबिज करत तिथे डौलाने तिरंगा फडकवला.

     

     मनिषा या मुळात व्हॉलीबॉल खेळाडू होत्या. त्यांनी राज्याचे नऊ वेळा प्रतिनिधीत्वही केलेले आहे. पण पोटात अपेंडिक्स फुटल्यानंतर झालेल्या मोठ्या शल्यकर्मानंतर त्यांच्या खेळण्यावर अनेक बंधने आलीत. ती त्यांच्यासारख्या झुंजार अ‍ॅथलेटिक्ससाठी फार क्लेशदायक होती. सक्तीच्या आरामात मनाची घालमेल सुरु असतानाच त्यांच्या वाचण्यात कृत्रिम पायांनी एव्हरेस्ट शिखर चढणारे न्युझिलंडचे प्रसिध्द गिर्यारोहक मार्क इंग्लिस यांचे चरीत्र आले. मार्क इंग्लिस यांच्या व्यक्तीमत्वाने त्या इतक्या प्रेरीत झाल्या की त्यांनीही एव्हरेस्ट सर करण्याचा निश्चय केला.  

   

     निश्चय आणि त्या निश्चयाची परिपूर्ती यात जमीन अस्मानाचे अंतर होते. पण त्या दिशेने कठोर परिश्रम घेत कधी देवगिरी, सह्यांद्रीच्या रांगा तुडवत तर कधी सात खंडातले सात महाकाय पर्वत लंघत मनिषा आगेकूच करत होत्या. सरावाचा भाग म्हणून दोन दिवस एकटीने अ‍ॅमेझॉन जंगल भ्रमंती करताना त्यांनी स्वसंवाद, चालताना साधता येणारी ध्यानधारणा आत्मसात केली. कुटुंबियांची भक्कम साथ, आवश्यक पैशाचे पाठबळ, अनेक लहानमोठ्या कॅम्पचा अनुभव पाठीशी जमा होताच 2017 मध्ये मनिषा यांनी एव्हरेस्टवर चढाई करायला सुरुवात केली. 


     त्यांनी प्रत्यक्षात पाहिलेला एव्हरेस्ट त्यांच्या कल्पनेतील एव्हरेस्टपेक्षा अत्यंत वेगळा होता. कल्पनाविश्वातील एव्हरेस्ट अतिशय सुंदर, शुभ्र बर्फाच्या राशींनी माखलेला होता पण हा खरा एव्हरेस्ट तर उरावर कित्येक गिर्यारोहकांचे मृतदेह बाळगत मूक रुदन करणारा होता. या विशालकाय पर्वताच्या अंगाखाद्यावर खेळलेले खूप शेर्पा इथे मरुन पडलेले होते. बर्फाच्या आकर्षक विलोभनीय खाई होत्या पण त्यात एव्हरेस्ट सर करण्याचे स्वप्न पाहणार्‍या गिरीप्रेमींचे शव होते. अंगाचा थरकाप उडवणारे दृष्य. साक्षात मृत्यू समोर. 


     मनोधैर्य पक्के करुन पावले पुढे पडत होती पण खराब वातावरणामुळे एका दुर्दैवी घटनेत इंडीयन आर्मीचे पंधरा जवान मारल्या गेलेत आणि शिखरावर जायला केवळ 170 मिटरचेच अंतर बाकी असताना मनिषा यांना खाली परत यायचा निर्णय घ्यावा लागला. त्यांच्या त्या निर्णयावर काही स्थानिक वर्तमानपत्रांनी 'लूझर' म्हणून हिणवत प्रचंड तोडसुख घेतले तेव्हा निसर्गाशी तादात्म्य पावणार्‍या मनिषा यांना प्रचंड मानसिक त्रास झाला. त्याच दरम्यान त्यांची भेट ब्रम्हांडातले प्रत्येक शिखर ऑक्सिजनशिवाय पादांक्रांत करणारे रेनॉल्ड मिसनर यांच्याशी झाली. 


     पुस्तकात, गुगलवर बघितलेला हा मनुष्य त्यांच्याशी पुस्तकासारखाच बोलला. परत यायचा निर्णय अगदी योग्य होता म्हणून त्यांनी पाठ थोपटली तेव्हा आता एव्हरेस्टवर जायचे ते केवळ आपल्या जिद्दपूर्तीसाठी, जमान्यासाठी नाही हे मनिषा यांनी मनात पक्के केले.

      

     एव्हरेस्टवर क्षुल्लकशाही चुकीसाठी माफी नसते. निसर्ग जितका मायाळू असतो तितकाच क्रुर असतो. निसर्गापुढे माणूस अत्यंत खुजा असतो. एव्हरेस्ट चढून तर जाऊ पण परत न आल्यास त्याच निसर्गाच्या कुशीत शांतपणे चिरनिद्रा घेऊ हीच खूणगाठ मनाशी बांधत मनिषा यांनी सन 2018 मध्ये परत एव्हरेस्ट गाठले. कमीत कमी गोष्टीत जगता येतं, निसर्गाशिवाय मनुष्यजीवन अधुरे आहे, याक्षणी आपण वर नि निळे गगन खाली आहे, जीवनमरणाच्या या चरणसीमेवर कुणालाही काहीही सिध्द न करता फक्त स्वतःशी स्पर्धा करत पुढे जायचे आहे असे विचार बाळगत मनिषा दावा शेर्पा यांच्यासमवेत पुढे पुढे सरकत होती. एकवेळ ऑक्सिजन सिलेंडर नसले तरी चालेल पण शेर्पांशिवाय हा प्रवास अशक्य असतो.


      परिश्रमाच्या फलश्रुतीच्या वाटा बिकट असतात. चढाईदरम्यान मनिषा यांनाही अनेक भयानक संकटांचा सामना करावा लागला. जीव जाईल असे प्रसंग आलेत पण अखेर त्यांनी एव्हरेस्ट सर केला. सात मिनिटात त्या सतत आव्हान देणार्‍या एव्हरेस्टचे दैदिप्यमान दर्शन घेताना त्यांच्या मनात आले हा एव्हरेस्ट तर गेले 365 दिवस मी स्वप्नात चढतेय आज केवळ उघड्या डोळयांनी सर केलाय. 


     मनिषा वाघमारे यांच्या नावे अनेक लिमका, गिनिज बुक रेकॉड असले तरी अद्यापही त्यांची अवस्था साद देती हिमशिखरे अशीच असून पुन्हा पुन्हा एव्हरेस्ट सर करण्याची तयारी सुरुच आहे.


Rate this content
Log in

Similar marathi story from Action