Jasmin Joglekar

Others

4  

Jasmin Joglekar

Others

आता तरी शहाणे होऊया का?

आता तरी शहाणे होऊया का?

2 mins
172


तो रस्ता...अखंड वर्दळ असलेला...पूर्वी असा नव्हता तो...कसा होता माहितेय? एक छोटीशी लाल रंगाची पायवाट...एखाद्या लावण्यवतीच्या भांगात भरलेल्या सिंदूरासारखा रेखीव! आजूबाजूला गर्द हिरवाई...त्या पायवाटेची जीवापाड काळजी घेणारी हिरवाई! सूर्याची प्रखर किरणं ही त्याच्यापर्यंत पोहोचणार नाही इतकं त्याला जपणारी...पशुपक्ष्यांनाही तेवढ्याच मायेने जपणारी...बहराच्यावेळी तर जत्राच असायची तिथं...वेगवेगळ्या पक्ष्यांचा मधुर किलबिलाट, सोबतीला मधमाशांचं घोंगावणं...तेव्हा ती पायवाट अगदी ओसाड होती असं नाही. आवाज ऐकायची ती...येणाऱ्या-जाणाऱ्या गाईगुरांचे, बैलगाडीच्या खडखडाटाचे... बैलांच्या गळ्यातील घुंगराच्या लयबद्ध नादाने तो परिसरच डोलायचा. माणसांची ये जा असायची त्या पायवाटेवरून, पण तुरळकच...एकंदरीत एकमेकांच्या सोबतीने, एकमेका साह्य करू या न्यायाने सगळं सुरळीत सुरू होतं तेव्हा...


आणि आता...अखंड वर्दळ...पायवाटेचे एका मोठ्या रस्त्यात रूपांतर झालेलं. बैलगाडीच्या खडखडाटाऐवजी गाड्यांचे झुमक्कन पळणारे आवाज, पक्ष्यांच्या मधुर कुजनाच्या जागी आता गाड्यांच्या हॉर्न चे कर्कश्य आवाज आणि पायवाटेची काळजी घेणारी ती झाडं? ती दूरवर उभी...आपल्या साथीदारांचं मरण बघत, कधी ना कधी आपलीही अवस्था अशीच होणार या विचाराने त्रयस्थासारखी...सगळ्यांपासून अलिप्त...पूर्वीच्या स्थितीच्या अगदी विरुद्ध स्थिती! म अशावेळी सामंजस्याने राहणं तरी टिकेल कसं ना! एकजण वर चढताना दुसऱ्याला हात देऊन वर घेण्याऐवजी खालीच ओढायला बघणार अशी परिस्थिती! 


प्रगतीचं एक पाऊल पुढं पडताना ते निसर्गाला मात्र दहा पावलं मागे ढकलतं... शेवटी कधीतरी जे व्हायला नको तेच होणार!! 


आज त्या रस्त्यावरची लांबवर उभी असलेली झाडं आश्चर्याने विचार करत होती की, रोजच्या गाड्या, त्यांचे कर्कश्य हॉर्न, त्यांचा काळा धूर अचानक दिसेनासा कसा झाला? विचार करून थकलं ते झाड तरी एक माणूस त्याला दिसला नाही. मग काय...उभं राहिलं ते तसंच पूर्वीचे दिवस आठवत! 

असेच अजून वीस-पंचवीस दिवस गेले. रस्त्यावर माणूस, गाड्या नसण्याची सवय होऊन ते पूर्वीसारखंच मोकळा श्वास घेत, तेवढंच आपलं मरण पुढं गेलं या खुशीत डोलू लागलं...


आणि तेव्हाच...माणूस मात्र...आपणच निर्माण केलेल्या मरणाच्या खाईत पडण्यातून स्वतःला वाचवण्यासाठी घरात बसला होता...कुढत! 


आतातरी शहाणपण येईल का???


Rate this content
Log in