Jasmin Joglekar

Abstract

4  

Jasmin Joglekar

Abstract

मर्यादवेल

मर्यादवेल

2 mins
249


तो आणि ती

दोघांची मैत्री अगदी निरागस. रोज भेटल्याशिवाय दोघांनाही चैन पडायचं नाही. भेटही ठरलेल्या वेळी ठरलेल्या ठिकाणी. संध्याकाळी शांत समुद्र किनारी. तिची अत्यंत आवडती जागा.


त्यादिवशी संध्याकाळी ते नेहमीप्रमाणे समुद्रावर भेटले. त्याला तिच्यात काहीतरी बदल जाणवत होता. तिच्या डोक्यातल्या विचारांची गर्दी त्याला दिसत होती. तसंही किनाऱ्यावर गेलं की ती अंतर्मुख होऊन जायची नेहमीच. पण आज अजून काहीतरी वेगळं होतं. 


पाण्यावर सोनेरी सडा टाकत सूर्य अस्ताला चालला होता. त्याकडे एकटक बघत ती उभी होती. तिला काही विचारायला त्याने तोंड उघडलं, तेवढ्यात तीच त्याला म्हणाली. 'ह्या लाटांची गंमत बघ न. किनाऱ्याकडे येणारी लाट कशी उसळती, आक्रमक वाटते ना! सोबत धीरगंभीर गाज. उलट परत जाणारी लाट पाहिलीस का? तितकीच शांत, लीन होत जाते. आपला स्वभाव ही असा असला पाहिजे ना! जिथे काही चुकीचं घडत असेल तिथं येणाऱ्या लाटेसारखं आक्रमक होता यायला हवं. तेच जिथे योग्य घडत असेल, संतवृत्ती असेल तिथे लीन होणं जमायला हवं. या परतणाऱ्या लाटेसारखं. 


तो तिच्याकडे आ वासून बघत होता. त्याला कळेना आज हिची गाडी कुठे वेगळ्याच मार्गाला लागलेय. तो विचार करतोय तोवर तिने त्याला टिचकी वाजवून तंद्रीतून बाहेर काढलं आणि त्याच्या डोक्यावर हलकी टपली देत ओठावर मंद हसू आणत ती मावळतीकडे पाठ करुन चालूही लागली.


त्याने तिला गाठेपर्यंत ती किनाऱ्याच्या किनारी पोहोचली होती. तिथे पसरलेल्या वेलीकडे निरखून बघत उभी होती. तो जवळ पोहोचल्यावर त्याला परत तिच्या चेहऱ्यावर तेच भाव दिसले जे मगाशी होते. आता ही काय सांगणार म्हणून तो बघत राहिला. तोवर बोललीच ती. 'ही वेल पसरली आहे तिला काय म्हणतात माहितेय का तुला? हिचं नाव मर्यादवेल. हिला ओलांडून लाटा कधी पुढे जाऊ शकत नाहीत. लाटांची मर्यादा एवढीच म्हणून ही मर्यादवेल. आपल्यालाही आपल्यात अशी मर्यादवेल फोफावता आली पाहिजे. वागण्यावर, बोलण्यावर सगळ्याच गोष्टींवर मर्यादा आली की सगळं किती सोपं होऊन जाईल नाही का! 


त्याच्या कोणत्याच प्रतिक्रियेची वाट न बघता ती सरळ पुढं चालत गेली आणि तो एकदा मर्यादवेलीकडे आणि एकदा तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत राहिला.


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract