Jasmin Joglekar

Others

3  

Jasmin Joglekar

Others

धुंद करणारा कुंद

धुंद करणारा कुंद

2 mins
259


मध्यंतरी कोविडमुळे कुठे बाहेर पडता येत नव्हतं. पण आमची कॉलनी गावाबाहेर आणि कोरोना पासून सुरक्षित होती तेव्हा कॉलनीत का होईना पण चक्कर मारता येत होती. 

  

एक दिवस संध्याकाळी असंच फिरत फिरत रस्ता संपतो तिथवर गेले. त्या टोकाला एका बंगल्यात मस्त झाडी आहे. कोणती कोणती झाडं लावलीत बघूया तरी म्हणून तिथं पोहोचले. तर कंपाउंडवरुन हळूच डोकावणाऱ्या कुंदाने हाक मारली आणि हरखूनच गेले. वेलीवर काही फार फुलं फुलली नव्हती तेव्हा. पण मनाच्या कोपऱ्यात या कुंदाने त्याची हक्काची जागा करुन ठेवलेय. मग शंभर फुलं पाहिली काय आणि एक फूल पाहिलं काय..ती आठवण सुगंधित ताजी होऊन जाते अगदी. 

  

त्या थोड्या फुलांनी आणि तिच्या गुलाबी कळ्यांनी थेट कोकणातच नेलं मला. दापोली माझं गाव..कोकणात असतं तसंच कौलारु घर आणि पुढं मागं अंगण. पुढच्या अंगणात बाबांनी कुंदाचे दोन वेल लावले होते. बेड्यामधून आत आलं की हे दोन वेल वाट अडवूनच उभे असायचे. फुललेले असले तर सुगंध भरुन घेतल्यावर नाहीतर केवळ दृष्टिक्षेपाने खुश होऊन वाट सोडायचे. पण बहरलेला वेल असेल तर तिथे रेंगाळल्याशिवाय पावलं पुढं पडायचीच नाहीत. 

  

रात्रीची अंधारी, नीरव शांतता प्यायला अंगणात कॉट टाकलेली असायची. साधारण ३०-३५ वर्षांपूर्वी म्हटलं तर सूर्यास्त झाल्यावर जसं अंधारु लागेल तसं गावही शांत होत जायचं आणि अशावेळीच आमच्या वेलींवरचा कुंद बहरु लागायचा. जसं काय एखादी सासुरवाशीण समोर कोणी असताना अदबीने वागणार आणि एकटी असताना किंवा मैत्रिणींच्या घोळक्यात असताना खुलून मोकळी होणार..तसा हा आमचा कुंद! रात्रीच्या वेळी कॉटवर पहुडलं की, सोबतीला अंधाऱ्या आकाशातल्या चमचमणाऱ्या चांदण्या आणि वेलींवर उमललेल्या या सुगंधित चांदण्या..बहार! 


  या फुलांसाठी मी फार हावरट होते. माझ्या लांबलचक वेणीत केवढाही गजरा घातला तरी समाधान मुळी व्हायचं नाही. त्यात जर कोणी वाटेकरी आला तर मग मनातल्या मनात धुसफूस. माझी ही धुसफूस बहुतेक कुंदाला कळत असणार. कारण नंतर तो पानागणिक फुलायला लागायचा. इतका की नजर हटायची नाही. मग गजरे करुन, देवाला वाहून, शेजारी पाजारी वाटूनही हा आपला वेलांवर उरलेलाच असायचा. 'द्रौपदीचा कुंद' आहे की काय असं वाटावा इतका! मग गावातल्या फुलविक्रेत्या काकांना गजरे ठेवणार का विचारलं आणि त्यांनी हो म्हणताच गजरे करुन त्यांना नेऊन देणं हा सिलसिला सुरु झाला. रोज अक्षरशः ७०-८० गजरे व्हायला लागले. अगदी सुखाचा काळ असायचा तो! गजरे देऊन येताना नजर मात्र सारखी तिकडे वळायची.. सासरी जाणाऱ्या एखाद्या नववधूच्या नजरेसारखी! पण तरी मन म्हणायचं, आपलं अंगण जसं हा सुगंधित करतोय तसंच आता इतर घरंही प्रफुल्लित, सुगंधित करेल. मग याच आनंदात मी घरी यायचे. 😊 

   

आता हाच कुंद माझ्या अंगणात हसत खेळत वाढतोय. माझा पाठराखा जणू.. आजच पहिलं फुलही त्यावर फुललंय. 😍 दिल खुश..


Rate this content
Log in