Vanita Bhogil

Crime

2  

Vanita Bhogil

Crime

निषेध

निषेध

7 mins
417


      निषेध...  पण कोणाबद्दल?? आज स्वतःबद्दलच निषेध करावासा वाटतोय. तुम्ही म्हणाल ,,अस थोडीच कोण स्वतःचा निषेध करेल!! पण खरच स्वतःचाच राग येतोय , आणि हे आजच नाही वाटत ,आणि हे मला एकटीलाच नाही तर आपल्या सर्वांना वाटत असणार. पण मनातील खदखद बाहेर काढायची कुणाची हिम्मत होत नाही किंवा स्वतःला चुकीचं ठरवण्याचे धाडस होत नाही.....  मला आज बोलल्याशिवाय रहावत नाही..   बहुतेक जणांना मी लिहिलेलं नाही आवडणार ,बरेच जण मला वेड्यात काढतील,  चालेल मला, पण जे मला म्हणायचं आहे हे तुम्हालाही कधीतरी वाटलं असेल नक्कीच...... ज्यांना आवडेल ते वाचून कमेंट देतील किंवा नाही देणार आणि ज्यांना नाही आवडणार ते टाइम पास म्हणून विषय सोडून देतील...      


मुद्दा असा की  आपण काय करतोय हे आपल्यालाच कळेनासं झालय,   आपल्याला म्हणजे आपल्या सगळ्यांना, पहिली गोष्ट मी कोणत्याही पक्ष, पार्टी, समाज,जात किंवा राष्ट्र किंवा एखादी व्यक्ती याच्या बाजूने किंवा विरोधात नाही...मी फक्त मी म्हणून विचार मांडत आहे.आपण लहानपणी पण पाहिलं असेल किंवा ऐकल असेल आपले आजोबा, वडील गावी शेती नाही पिकली की सरकारी कर्ज घेत,   त्या कर्जाच्या परताव्याची मुदत एक वर्षाची असायची ,व्याजा सहित रक्कम दिलेल्या तारखेस न भरल्यास बँकेची माणस जप्ती साठी येत,   मग त्यांचे पाय धरून मुदत वाढून घेतली जाई, जप्ती आल्यामुळे गावभर चर्चा होई, वडीलधारी इज्जतीला खूप जपणारी, नाहीतरी त्यांच्याकडे इज्जतीशिवाय दुसरं काहीच नसायचं. मग पुन्हा मुदतीची तारीख यायची आणि आदल्या रात्रीच आपला आजा किंवा बाप इज्जत जाईल त्या भीतीनं माळावरच्या झाडाला दोरखंड लावून लटकलेला असायचा.....  मग सरकारी गाडी यायची ,तपास व्हायचा, मग त्या भागातील कुणी निवडून दिलेला खादीवाला चार चाकी मधून येऊन छपराच्या दारातून फोटो काढून निघून जायचा...         


पुन्हा निवडणुकीशीवाय किंवा दुसरा कुणी झाडाला लटकल्याशिवाय त्या गावात तो खादीवाला फिरकत नसे... शहरी भाग काही याला अपवाद नव्हताच..     अशिक्षित तो आणि पुढची पिढी शिक्षित व्हावी म्हणून तो अंगठा बहाद्दर रोज पाटी फावडा घेऊन नाक्यावर सकाळी उभा असायचा. त्यात काही कमी पडल की कुण्या पठाणाकडून कर्ज घ्यायचा,    दर महिन्याच्या तारखेला पठाण नाक्यावर याला गाठायचा, व्याज देऊन पाटी फावड थकून जाई पण पठाण यायचा काही थांबत नसे....   मग एखादा महिना चुकला की पठाण थेट दहा बाय दहाच्या महालाच्या दारात येऊन उभा राहायचा, पठाण घरी आला म्हणून अख्या चाळीत चर्चा रंगायची.. त्या रंगलेल्या चर्चेचा शेवट म्हणून हा नाक्यावर जायचं सांगून कुठल्यातरी स्टेशन वर आडवा व्हायचा... 

दोन एक दिवसांनी त्याचे तुकडे पोत्यात घालून सरकारी गाडी यायची, आणि चर्चा संपायची... मग हे सगळं आपल्याच वाट्याला??     गरीब, मध्यमवर्गीय??   पैसेवाले कर्ज काढत नाही का?  त्याच्या घरावर जप्ती जात नाही का? गेलीच तर तो आत्महत्या का करत नाही ?  त्याला इज्जतच नसते का?? हो असते न .. श्रीमंताला इज्जत असते,पण त्याच तराजू पैशामुळे कुठेच झुकत नाही.....  कोणताही राजकारणी असो उद्योगपती असो ,कधी कुणी आत्महत्या केल्याचं ऐकिवात आहे का ??   नाही.... तो आत्महत्या करणारच नाही,कारण त्याचा ठेका फक्त मध्यमवर्गीय आणि गरिबांकडे दिलेला आहे..  


विचार करू थोडासा ...  कुठे चुकत हो आपलं,   हात जोडत गल्लोगल्ली फिरणारे खुर्ची मिळाली की त्यांना त्या गाव, गल्ली ,वाडया ,वस्त्यांची नावे सुद्धा आठवत नसतात,मग आपण कुणाला पुढे आणतो??    आपन कधीच विचार करत नाहीत की आपण ज्या व्यक्तीसाठी काहीतरी करत आहोत त्यात आपलं भलं किती आहे.    निवडणुका आल्या की आपल्याला सण आल्यासारखा वाटतो. शंभर पन्नास हातात कोंबून आपलीच पोर दारू पाजून बिघडवली जातात, तेवढ्या एका नोटेवर तमाशातील बाईसारखे सतरंज्या उचलायला आपले तरुण तयार...    आलाच त्यातला एखादा निवडून तर स्वखर्चाने त्याचे फटाके फोडून स्वागत करायला आपली मंडळी तयार...  आणि मग शपथविधी झाला की तोच खादीवाला त्याच तरुणाला पाळीव कुत्र्यासारखा दारात उभा करतो...    कसली ही लाचारी??   आणि का?? कोणत्या निवडून आलेल्याने ज्या गावखेड्यात हात जोडत गेला तिथे शाळा बांधली??  त्याच गावाचा रस्ता नीट केला? दवाखान्याची सोय केली??   का करतील हे ?? सगळी सोय केली तर यांच्या चपला कोण उचलणार??     प्रत्येक राजकारणी आश्वासन देऊन मोकळा होतो, त्याला फक्त त्याच्या जीवावर पुढच्या किमान पाच पिढ्या तरी बसून खातील याची व्यवस्था करायची असते,     तुम्ही कोण? तुमच्या अडचणी काय? याच्याशी त्यांना काडीमात्र घेणं नसत..     


मग आपल्यातील कुणी आवाज उठवलाच तर त्याला देशद्रोही ठरवायचं किंवा जातीवरून वाद लावून आपल्या फायद्याचे काय करता येईल हे बघायचे..      कोण कुणाविरुद्ध आंदोलन करतो,कोण कुणाविरुद्ध उपोषण करतो,कोण कुणाविरुद्ध मोर्चे काढतो ,, पण खरच हे सगळं तयार करणारा म्होरक्या शेवट पर्यंत उपोषणकार मोर्चेकरी यांच्या सोबत असतो का??   नाही?? त्याला फक्त त्याची पोळी कशी भाजून घेता येईल एवढं माहीत असत ,आणि मग त्याच्या पोळीच्या भाजण्यात आपली तरुण पिढी वैचारिक क्षमता संपून पूर्ण होरपळून निघते..  तरीही आपल्या डोक्यात प्रकाश पडत नाही..  एकाच घरात कोण कोणत्या नेत्याला देव मानतो यावरून मतभेद चालू असतात..  अरे कोण तो नेता?  सत्ता पिपासू ,सत्तेवर असणारा त्याच्या पुढच्या पिढ्या किती कमावतील यात गुंतलेला असतो,   त्याचा विरोधक स्वतःची आणि त्याची घाण उचकत बसतो,मग हे सगळं उघड पाडण्यात आणि झाकण्यात बेवारशी आपण कष्टाचं खाऊन यांच्या बाजूने बोलून रक्त जाळून घेतो..  बर एवढ्यावरच थांबत नाही,     आपल्या आजूबाजूला काय चालले आहे याच्याशी आपल्याला सोयर सुतक नसत. पण एखाद्या आवडत्या नेत्याबद्दल कुणी काही उच्चारले तर बापाच आयत खाल्लेलं रक्त अगदी पोलीस स्टेशन पर्यंत पोहचत....  


अरे पण तू ज्याच्यासाठी भांडत आहेस तो तुला ओळखतो का?      तो का ओळखेल?? तू तर त्याच खेळणं आहेस..   दर पाच वर्षांनी तेच खेळणं कामी येत..  शिकलेली मूल बेरोजगार फिरत आहेत, आईबाप मुलांवर खर्च करून कर्जबाजारी झालेत,   मुलींच्या लग्नाला पैसे नाहीत म्हणून उपवर मुली घरात आहेत..     पसाभर पिकत ते ही नैसर्गिक आपत्तीमुळे घरापर्यंत येत नाही आणि आलंच तर दलालांच्या घरात भरण्या पलीकडे पर्याय शिल्लक नसतो...    गाव सोडून शहरात आलेल्यांची तर कुत्रे हाल पाहत नाहीत,   छोट्या कंपन्यांचा भरोसा नाही, ग्रॅज्युएट मूल कपबश्या धुताना दिसतात,     नाही ओ कामाची मुळीच लाज नाही पण मग आपण आपलं भविष्य कुणाच्या हातात सोपवलंय??       प्रत्येक ठिकाणी जात,प्रांत राज्य यांच्यात भांडण लावून राजकारणी निवांत कमवायला मोकळे,    आपण विचार करतो का हो? समोरच कुठलाही असला तरी तो माणूस आहे एवढातरी..    नाही करत आपण विचार...  कारण आपली बुद्धी ,स्वाभिमान राज्यकर्त्यांच्या पायाशी घाण टाकलेला आहे... आपल्या घरात येणारी प्रत्येक वस्तू तिप्पट भावाने येते, यावर आपण कधी बोलतच नाहीत, का बोलणार ??  कारण आपल्या आवडीचे नेतेमंडळी केंद्रापासून राज्यापर्यंत एक तरी त्यात सामील असतोच न..   मग आपण त्यांच्या कुणाच्या विरोधात बोलून कस चालेल नाही का??        


आपण फेस बुक वर एकमेकाविरोधात एवढ्या कमेंट देतो की कधी आपण शिव्या ही घालतो, ज्याचा काहीही सबंध नसतो..  पण आपल्याला अस वाटत की आपण आपल्या आवडत्या नेत्याबद्दल बोलतोय म्हणजे तो नेता येऊन आपल्याला मोठा पुरस्कारच जाहीर करणार आहे..       सरकार कोणतंही असो, मंत्री कोणताही असो , कधी तुमच्या घरी तुम्ही उपाशी आहेत की खाता हे विचारत नाही..     आपल्या कडून चूक केली तर कायदा, आणि यांनी चुका केल्या तर निलंबन किंवा राजीनामा...        आज पण अशी किती कुटुंब आहेत ज्यांच्या घरात दिवसभर काम केल्याशिवाय रात्री अन्न मिळत नाही..         राजकारणी एकमेकांची उनी दुनि काढण्यात व्यस्त आणि चुकीचे वागणारे ते निस्तरण्यात व्यस्त..  रस्त्यावर काम करणारे कुटुंब दुकानाच्या पडवीत सहा महिन्यांची लेकरं झोपवून डांबर टाकायला निघतात, आणि हो हे डांबर सुद्धा निवडणुका तोंडावर आल्या की रस्त्यावर दिसत , नाहीतर एरवी चारचाकी गाडी मावेल एवढे खड्डे सुद्धा कुणाला दिसत नाहीत.. आणि हे एकच कुणी नाही बर ,सगळे एकाच माळेचे मनी..    दया माया यांनी सत्तेसाठी विकून खाल्ली.    कुणाला शेतमालाचा पडलेलं नाही,कुणाला शेतकऱ्याचं पडलेलं नाही, कुणाला तरुणांच्या नोकऱ्या रोजगाराच पडलेलं नाही, लाखो बेरोजगार पडलेत पन याना काहीही मतलब नाही..     


याना हे सत्तेत कसे येतील,किंवा सत्तेत असणाऱ्यांना सत्तेत कसे राहतील एवढंच पडलेलं आहे.... का आपण यांच्यावर दर वेळी विश्वास दाखवायचा आणि यांनी तेवढाच निर्लज्ज पणा दर वेळी दाखवून द्यायचा..   सध्या तर काय कोण म्हणतो डिजिटल इंडिया बनवायचा देश ..तर कोण म्हणतो बिना पुस्तकांची टॅब वर मूल शिकवायची,कोण म्हणतो आम्ही तुमच्यातील आहोत तर कोण म्हणतो मला रस्ते फॉरेन सारखे बनवायचेत...  अरे तुमचं सगळं खरं आहे पण आज प्रत्येकाच्या घरात खायला राशन आहे का हे तरी माहीत आहे का तुम्हाला??      देश डिजिटल बनवणाऱ्यांनी बघावे की कर्ज घेऊन पळून जाणारे पळपुटे आणि उद्योगपती सोडले तर अजून अर्धा देश फूटपाथ वर अर्ध्या फाटक्या कपड्यात राहत आहे...     टॅब वर शिकवणार्यांनी थोडासा विचार करावा की जिथं भाकरी मिळत नाही, पुस्तक मिळत नाही तिथं तुमचा टॅब कुठून यायचा?? आणि काही म्हणतात ते आपल्यातील आहेत ,मग साहेब आमची मूल बेरोजगारीने आत्महत्या करायला निघतात तेव्हा तुम्ही झोपा काढता का?? रस्ते फॉरेन सारखे बनवायचेत काही साहेबाना, मग रस्त्यावर राहणारयावर काय बुलडोजर फिरवणार का? त्याची सोय करा न.. नुसती घाण ..याने त्याची काढावी त्याने याची काढावी,अरे पण ज्या जनतेने तुम्हाला काहीतरी कराल या अपेक्षेने कधी न कधी ती जागा दिली त्यांचं काय?? पोलीस बदनाम.. डॉक्टर बदनाम.. ड्रॉइव्हर बदनाम.. कंडकटर बदनाम..सगळे बदनामत्यात चाकरमानी तर काय त्यांना कोण विचारतच नाही,  पण राजकारणी सगळे धुतल्या तांदळासारखे नाही का??     ते का सभ्य???कारण आपण त्यांना ती जागा दिली ,मग आपल्यात कुठे हिम्मत आहे त्यांना वाईट ठरवण्याची.. बघा आजचे दिवस परीक्षेचे आहेत ,कोरोना काळ हा डोळे उघडण्यासाठीतर नाही आला ना??   कोणतंही सरकार असो,कोणताही नेता असो खरच आपल्या अडचणी दूर होतात का? विचार करा,        "सत्तापिपासू" ही घाण मुळा सहित संपवायची की आपल्या पुढच्या पिढया सतरंज्या उचलण्या साठी ठेवायच्या ,, निर्णय आपला आहे, आपल्या जीवावर माजुरडे सुरक्षित आहेत...       


प्रत्येक राजकारणी नेता,  खा... दी पलीकडे विचार करणार नाही..     आताच काय, कोरोना,लॉक डाउन,रेल्वे बंद,बस बंद,बस चालू,विमान चालू,राज्य सीमा सील,पर प्रांतीयांना परत परवानगी..  शाळा कॉलेज बंद,फी चालू,  काम बंद भाववाढ चालू..   दुसरी लाट,निवडणुका चालू.   वॅक्सिंन आले,पुन्हा कोरोना आला,    लॉक डाउन तयारी,परीक्षेच्या तारखा जाहीर..    काय चालय??कुणाचा कुणाला कसलाही मेळ नाही.     सहा महिने दिल्ली बॉर्डर शेतकरी धरण्यावर, महाराष्ट्रात एमपीएससीसाठीच्या विद्यार्थ्यांवर कारवाई..या सगळ्यात सामान्य माणसाच्या नोकरी धंद्याचा कुठे विचार नाही,महागाईचा कुठे उल्लेख नाही, पुढे काय आणि कसे होईल याच काहीच नियोजन नाही,        आपल्या सगळ्या सामान्य जनतेच्या विचारा पलीकडचं चालू होतं चालू आहे आणि असच चालू राहील..   आणि मी हे आताचच नाही बोलत ..    जे होऊन गेले ते तसेच आता आहेत ते ही तसेच...   मला एवढंच सांगायचंय की निदान आपण यावर विचार तर नक्कीच करू शकतो, जेणेकरून आपली येणारी पिढी तरी सुरक्षित होऊ शकेल...  विचार नक्की करापोस्ट आवडल्यास कृपया नावासहित शेअर करावी मी कोणत्याही पक्षाविरोधात किंवा पक्षाच्या बाजूने ही पोस्ट टाकत नाही...         


Rate this content
Log in

Similar marathi story from Crime