Avni Khandale

Crime Inspirational Thriller

3  

Avni Khandale

Crime Inspirational Thriller

ओली बाळंतीण भाग ४

ओली बाळंतीण भाग ४

9 mins
217


   विचारांच्या तंद्रीतच ती फ्रेश झाली. बेड शेजारचा ड्रॉवर उघडुन तिने आपली पिस्तूल घेतली व आपल्या घोळदार ड्रेसच्या पोटाच्या बेल्टखाली असणाऱ्या चोर कप्प्यात लपवली. थोडेसे पाणी पिऊन ती ट्रस्टींच्या केबिन मध्ये निघून गेली .


    " आत येऊ का सर?" तिने अगदी नम्रपणे नेपाळी भाषेत विचारले. 



" ये ये... बाळ." ट्रस्टी



  ते सुद्धा अवेळी झोपेतून उठले असावेत हे स्पष्ट होते. त्यांच्या खुर्ची समोर असणाऱ्या दोन खुर्च्यांवर दोन वृद्ध व्यक्ती बसले होते.



   दरवाजातून ते ओजस्वी ला पाठमोरे दिसत होते. ती त्यांच्याकडेच पाहत होती पण त्यांनी मात्र वळून मागे पाहिलं नाही. 



   ट्रस्टी ची परवानगी मिळताच ओजस्वी आत येऊन उभी राहिली. 


   " बसून घे बेटा. अश्या अवस्थेत जास्त वेळ उभा राहू नये. " ट्रस्टी काळजी ने म्हणाले आणि त्यांनी मोकळ्या खुर्ची कडे इशारा केला तशी ओजस्वी तिथे जाऊन बसली. 



   ओजस्वी ने त्या दोघांना पाहून स्मितहास्य केले व ट्रस्टी ना म्हणाली, 

   " माफ करा सर , माझ्यामुळे आपणास अवेळी विनाकारण त्रास झाला. "



   " काही हरकत नाही बेटा. आपली नात गरोदरपणात ठीक आहे का याची हुरहूर म्हाताऱ्या जीवाला वाटणे साहजिकच आहे. मी सुद्धा दोन नातवंडांचा आजोबा आहे. समजू शकतो."  ट्रस्टी हसत म्हणाले.



   " मी निघतो , योगाची वेळ झाली आहे. तुम्ही भेटून घ्या. काही हवं नको असेल ते बींसा मावशींना सांग. मी नाष्टा पाठवतो." इतकं बोलून ते बाहेर निघून गेले. 



   " आजोबा ... तुम्ही असे अचानक इथे?" अंदाज घेण्याकरिता ओजस्वीने सहजपणे विचारले.



   "आम्ही इथे आलो ते तुला आवडले नाही माहिती आहे बेटा." त्यातला एक जण थरथरत्या आवाजात म्हणाला आणि दुसऱ्याने केबिन च्या दरवाजा जवळून कानोसा घेतला आणि पहिल्या व्यक्तीला इशारा केला. ओजस्वीच त्यांच्या हालचालींवर व्यवस्थित लक्ष होत, ती सावध होती.



    " तुझ्या आजीने तुझ्या आवडीचे लाडू केले होते. राहवलं नाही म्हणून एवढ्या लांब आलो." त्याने ओजस्वी समोर एक डबा उघडला . डब्यात तिच्या आवडीची बर्फी होती. ते पाहून ती खूप खुश झाली. 



   याचा अर्थ ते दोघे विराट आणि सूर्या होते. आनंदाच्या भरात ती त्यांना मिठी मारण्यासाठी पुढे झाली पण दुसऱ्याने म्हणजेच विराटने लगेच तिला अडवले.



    " बेटा आत्ताच नको खाऊ हा. प्रवासात एखादा दुसरा लाडू फुटला ही असेल. तू रूम मध्ये बसून खा नंतर ." तो देखील थरथरत्या आवाजात म्हणाला.



   एखादा दुसरा लाडू फुटला होता म्हणजेच आश्रमातील एक-दोन जण तिच्यावर लक्ष ठेवून होते. आत्ताच ही गोष्ट विराट ने सांगितली म्हणजेच आत्ता सध्या कोणीतरी तिच्यावर लक्ष ठेवत होत. 



   याचाच अर्थ ट्रस्टी जे आत्ता बाहेर गेले होते ते बाहेरून यांचं बोलण अजून ऐकत होते. हे कळायला ओजस्वी ला वेळ लागला नाही. 



    तेवढ्यात बिनसा हातात नाष्त्याच्या दोन प्लेट्स घेऊन आली. तिने दोन्ही आजोबांना नाष्टा दिला. 


   " तुमच्यासाठी वरच्या मजल्यावरची खोली तयार केली आहे. नाष्ता करून तुम्ही तिकडे विश्रांती घ्या. " बिंसा



    थोडी विश्रांती घेऊ मग आपण बोलत बसू असे ठरवून ते रूम मध्ये गेले. ओजस्वीने देखील तीचं आवरलं आणि तिची नित्य दिनचर्या करण्यात व्यस्त झाली. मनातून ती खुश जरी असली तरी देखील तिला काळजी वाटत होती. 



   योगा, प्रार्थना , नाष्टा वगैरे झाल्यानंतर सकाळी आठच्या दरम्यान ती आश्रमाच्या महागुरुंच्या केबिनमध्ये गेली. ते आश्रमाचे सर्वेसर्वा होते. त्यांच्याकडून तिने आजोबांसोबत आजचा थोडा वेळ बाहेर जाण्यासाठी परवानगी घेतली. 



   ती तयार होऊन खाली आली. सूर्या आणि विराट देखील आधीच तिची वाट बघत खाली थांबले होते. बाहेर जाण्याची परवानगी मिळाल्याचे तिने त्यांना सांगितले. खरं तर ते दोघे देखील नुकतेच महागुरूंना भेटून ओजस्वीच्या तब्येतीबद्दल चौकशी करून आले होते. 



    शिवालयाच्या बाहेर येऊन त्यांनी कॅब बुक केली. आधी डेस्टिनेशनमध्ये त्यांनी नेपाळच्या एका टुरिस्ट पॉइंटचे नाव टाकले होते. पण थोडेच अंतर गेल्यानंतर त्या तिघांच्याही लक्षात आले की आश्रममधून बाहेर पडल्यापासून एक कार त्यांचा पाठलाग करत होती. तिघांनाही हे अपेक्षितच होते. त्यांनी डेस्टिनेशनवर टाकलेले नाव बदलले आणि त्या जागी 'अगस्थ्या आयुर्वेदा आणि पंचकर्मा सेंटर' चा पत्ता टाकला.


   

     अर्ध्या एक तासातच ते तिघेही ठरलेल्या पत्त्यावर पोहोचले. खाली उतरून ओजस्वी ने दोन्ही आजोबांचा एक-एक करून हात धरला आणि त्यांना खाली उतरायला मदत केली. ते तिघेही आयुर्वेदा सेंटरमध्ये गेले. आत त्यांचाच माणूस होता.



   नेपाळ मधील ते त्यांच्या हक्काचे ठिकाण होते . सूर्याने आत जाताच तिथल्या मॅनेजर च्या हातात काही भारतीय चलनाच्या नोटा ठेवल्या. तो काय ते समजून गेला आणि त्याने सूर्याच्या हातात एक की ठेवली.



     पंचकर्मा सेंटरच्या एका रूम मध्ये ते पोहोचले तेवढ्यात विराटचा मोबाईल ब्लिंक झाला. त्याने आश्रम मधील ट्रस्टी चा मोबाईल हॅक केला होता. त्याच मोबाईल वर कोणाचा तरी कॉल येत असल्याने विराटच्या मोबाईल वर नोटिफिकेशन येत होते. ते तिघेही आता लक्षपूर्वक कॉल ऐकत होते. 


   " सलाम शाब जी , वो लडकी वो दो बुढे लोगोंको लेके पंचकर्मा सेंटर में आई है। मैने इंक्वायरी की , सुबह ही उन्होंने बुकिंग किया था उधर , तीनों के लिए। " 



    "ठीक है। ध्यान रखो।" ट्रस्टी


इतके बोलून ट्रस्टी नी फोन ठेवला. 



    इकडे ओजस्वी ,सूर्या आणि विराटने पटकन आपली कपडे बदलली आणि रूम मधून बाहेर पडले. सूर्याने पुन्हा मॅनेजर च्या हातावर त्याच किंमतीच्या नोटा ठेवल्या. 



  " काली घोडी खडी है बाहर ." असं म्हणत मॅनेजरने आणखी एक किल्ली सूर्याच्या हातावर ठेवली. आता आश्रममधून दोन श्रीमंत पुरुष उंची वस्त्रे घालून बाहेर पडले. त्यांच्या पाठोपाठ एक अतीश्रीमंत भरजरी कपडे घातलेली पण अंगाने खूप स्थूल अशी स्त्री बाहेर पडली. त्यांची बहीण असावी असे वाटत होते.



    ओजस्वी च्या मागून तिच्यावर लक्ष ठेवण्यासाठी आलेला व्यक्ती त्या श्रीमंत परिवाराकडे एकटक पाहत होता. त्यांच्या उंची कपडे आणि दागिण्यामुळे त्याचे डोळे दिपले होते. 



   " एक्सक्युज मी !" त्यातल्या श्रीमंत महिलेचा आवाज आला तसा तो व्यक्ती भानावर आला आणि आपल्या कार मधे जाऊन बसला.



   ते कुटुंब गेटजवळ थांबलेल्या काळया मर्सिडीज जवळ गेले. रिमोटनी डोअर उघडुन त्यांनी आधी आपल्या बहिणीला आत बसायला मदत केली. आणि दोघेही आत बसून भरधाव वेगाने निघून गेले. 



   " कसे आहात तुम्ही दोघे? " ओजस्वीने शेजारी बसलेल्या सूर्याला मिठी मारली. 



   विराट गाडी चालवत होता. तिघेही खूप महिन्यांनी भेटत होते. या पूर्वी देखील मिशनसाठी बऱ्याचवेळा त्यांची एकमेकांसोबत महिनो न महिने भेट होऊ शकत नव्हती. पण या काही महिन्यात इतक्या अनपेक्षित गोष्टी घडल्या होत्या की ही भेट त्यांना खूप महत्वाची वाटू लागली होती. 


   

 "वुई आर गूड डियर!" सूर्या


 

  " तू कशी आहेस ते सांग आधी ." विराटने आरश्यात पाहत विचारले. 


   " वेल, कशी दिसतेय ? " ओजस्वी



   " गोड दिसतेस तशी .... पण थोडी जास्तच जाड झाली आहेस." विराट म्हणाला तसे तिघेही हसायला लागले. 


  

  " बर जोक्स अपार्ट , आता कुठे जायचे आहे आपण? संध्याकाळी सहापर्यंत परत जावं लागेल ." ओजस्वी



   "त्या पूर्वीच जाऊ. काळजी करू नको. " विराट



  " हो. तू थोडी रेस्ट घे . लोकेशनवर पोहोचलो की मी उठवतो तुला. तिथे थोडं चालावं लागेल तुला." सूर्याच्या डोळ्यात तिच्याबद्दल काळजी दिसत होती. 



   गाडीत चर्चा करणे ठीक नाही असा विचार करून ओजस्वीने देखील लगेचच डोळे मिटले. त्यापूर्वी तिने अंगात घातलेले दागिने काढून ठेवले आणि केस मोकळे सोडले. 



  थोड्याच वेळात ती निद्राधीन झाली. सूर्याने लॅपटॉप उघडून आपल्यासाठी काही अपडेट्स आहेत का ते बघायला सुरुवात केली . 



   विराट ने गाडी चालवता चालवता त्याच्या माणसाला कॉल केला आणि जिथे ते जाणार होते तिथे कोणी नसल्याची पुन्हा एकदा खात्री करून घेतली.



तासाभराच्या प्रवासानंतर ते तिघे एका खेडेगावात पोहोचले. सूर्याने ओजस्वी ला उठवले आणि तिघे गाडीतून उतरले . 



 सूर्या आणि विराट साठी ती जागा नवीन नव्हती पण ओजस्वी मात्र पहिल्यांदाच तिथे आली होती. 

तिने आजुबाजुला पाहीलं... समोर दूरवर एक खूप जुना राजेशाही वाडा दिसत होता. ते जिथे उभे होते तिथे आजूबाजुला घरे आणि छोटे वाडे होते. पण ते गाव पाहून असं वाटतं होतं की त्या गावात गेल्या कितीतरी वर्षांपासून कोणीही राहत नाही .

   


     "चला..." सूर्या म्हणाला. पायात खाचखळगे असल्याने सूर्याने ओजस्वीचा हात पकडला होता.

   

  

  " ही कोणती जागा आहे?" ओजस्वीने चालता चालता विचारले.



    " हे एक खूप जून गाव आहे . पंचवीस -तीस वर्षांपूर्वी या गावातल्या राजाची आणि संपूर्ण गावकऱ्यांची , राजाच्या भावाने आणि त्याच्या लोकांनी सुड भावनेतून हत्या केली होती. तेंव्हापासून या गावात कोणीही वस्ती केली नाही. इथे भुतांच वास्तव्य आहे असं इथल्या माणसांचं म्हणनं आहे. " विराट



   " ओह आय सी.." ओजस्वी



  " एस जी चे जेंव्हा नेपाळ मिशन्स असतात तेंव्हा आपल्या सिक्रेट मीटिंग इथेच करतो आपण. इट्स अ सेफेस्ट प्लेस इन धिज कंट्री. " सूर्या हसत म्हणाला.



  " हो.... त्यात शंकाच नाही ." ओजस्वी



  चालत चालत ते तिघे एका घरात पोहोचले. घर बऱ्यापैकी साफ दिसत होतं. शिवाय पिण्याच्या पाण्याचा एक हंडा देखील भरून ठेवलेला होता. बसण्यासाठी बऱ्यापैकी उंचीचे तीन दगड तिथे मांडून ठेवलेले होते. 



   विराटने ओजस्वीला आधी पाणी दिले. आणि ते तिघे पुढचं डिस्कशन करण्यासाठी बसले. पुन्हा विराटचा मोबाईल ब्लिंक झाला. त्याने रेकॉर्डिंग प्ले केले. त्यांचा पाठलाग करणाऱ्या त्या व्यक्तीनेच ट्रस्टीला कॉल केला होता.


   " बोला.." ट्रस्टी म्हणाला.


   " अरे शाबजी.. वो तीनो अभी तक तो बाहर नही आए। मैने अंदर भी पूछा । उनका शाम तक का बुकिंग है। "


   " हा। कोई बात नही। निकलो तुम वहासे ।" ट्रस्टी



   " पक्का शाबजी?"



   " हा निकलो । वो दोनो सच में उसके दादाजी है। किसी बुढ्ढा - बुढ्ढी को संभालती है वो। मनाली में रहते है। बुढ्ढा सच में कल नेपाल आया है। मैने सब इंक्वायरी की है। " ट्रस्टी तोऱ्यात म्हणाला



  " अच्छा । ठीक है। और कुछ काम हो तो बताना ।"



 " जरूर।" ट्रस्टीने फोन ठेवला. 



  "मनालीच्या ग्रँडपापर्यंत चौकशी झाली...म्हणजे आपल्या डिपार्टमेंटशी रीलेटेडच कोणीतरी लक्ष ठेवून आहे आपल्यावर." ओजस्वी रागात म्हणाली.


  " त्यात तर काही वादच नाही. पण सिरिया मिशन जर अर्ध्यावर सोडलं तर देशाचं खूप मोठं नुकसान होईल. " सूर्या



 " चिफ सोबत काही कॉन्टॅक्ट? नेक्स्ट कोणाला पाठवायच काही ठरलं का? " ओजस्वी



 " चिफ सोबत सेफ कॉन्टॅक्ट होणं आत्ता सध्या तरी शक्य नाही. कोणास ठाऊक, कदाचित त्यांच्या मुलाप्रमाणेच त्यांच्या घरातील आणखीही कोण हीपनोटाईज असेल किंवा डायरेक्ट मिसळलेला सुद्धा असू शकेल." विराट



   " हो खर आहे तुझं. .. इतकी मोठी रिस्क आपण नाही घेऊ शकत. " ओजस्वी



  " ऑपरेशन नंतर दोन दिवसांनी चिफनी ते रजेवरून येईपर्यंत एस जी च्या सगळ्या निर्णयाचे हक्क सिंघानिया सरांकडे दिलेत." सूर्या



  " ओह अच्छा. ते काय विचार करत आहेत ?" ओजस्वी



  " अजून तरी कोणाचं नाव त्यांनी निश्चित सांगितलं नाही. उद्या ते दिल्लीमध्ये असणार आहेत. पाहूया काय निर्णय सांगतात ते." सुर्या



" हो पण सिंघानिया सरांनी पुढचा जो काही निर्णय असेल तो अगदी गुप्तपणे घेतला पाहिजे. " ओजस्वी



    " खरं आहे. नाहीतर आणखी एका देशभक्ताच विनाकारण शहीद होणं ठरलेलं आहे. " विराट



    या गोष्टींवर चर्चा सुरू असताना ओजस्वी एका वेगळ्याच विचारात हरवली होती. सूर्या आणि विराट सिरिया मिशन बद्दल आणि सध्याच्या एस जी च्या एकूणच हालहवालाबद्दल तिच्याशी बोलत होते. पण बराच वेळ तिची काहीच प्रतिक्रिया नाही पाहून सूर्याने तिला हाक मारली.



   " ओजस्वी.... कुठे हरवलीस? बरं नाही वाटतं आहे का तुला? " त्याने काळजीने विचारले.



  त्याच्या हाकेने ओजस्वी विचारांच्या तंद्रीतून बाहेर आली.


   "अं....? काही नाही .... मला एक सांग , सिरियाच मिशन आणखी किती दिवस चालू ठेवावं लागणार आहे? म्हणजे आपल्याला हवी असलेली गोष्ट नेमकी कधीपर्यंत हाती लागू शकते? " ओजस्वीने विचारले



  " आपल्याला हवी ती गोष्ट आणखी दीड महिन्यानंतर सिरियामध्ये मिळेल.तोपर्यंत हे मिशन चालु ठेवावं लागेल. " सूर्या



  "अच्छा ... दीड महिन्याच्या पुढे मिशन लांबण्याची कितपत शक्यता आहे?" ओजस्वी



  " शक्यता खूपच कमी आहे. पण तू हे सगळं का विचारतेस?" 

तिच्या डोक्यात काय चालू आहे याचा अंदाज सुर्या आणि विराट दोघांनाही येत नव्हता. 



   " मी जो विचार करतेय तो तुम्हाला पटेल की नाही माहीत नाही. पण सध्या हे मिशन पूर्ण करण्याचा हा एकमेव सुरक्षित मार्ग आहे. असं मला वाटत. " ओजस्वी अजूनही विचारात हरवली होती



"म्हणजे ? नक्की काय विचार करत आहेस तू? " विराट



   " दिल्लीमधून सध्या ज्या कोणाचे नाव या मिशन साठी फायनल केले जाईल ते नाव कसेही करून बाहेर पडेल आणि सिरिया मधल्या पाकिस्तानी आतंकवाद्यांपर्यंत पोहोचेल यात शंकाच नाही. त्यापेक्षा ते नाव जर का बाहेरूनच निश्चित झाले आणि त्या व्यक्तीबद्दल चुकीची माहिती आपण दिल्ली हेड ऑफिस मध्ये पसरवली जसं की त्याचं सिरियामध्ये राहण्याचं ठिकाण, त्यानं परिधान केलेला वेश , तो वापरत असलेला नंबर ......." ओजस्वी



  " तू म्हणतेस ते बरोबर आहे. पण त्यासाठी असा एखादा ऑफिसर हवा जो बरेच दिवस बाहेर आहे किंवा एखाद्या वेगळ्या मिशनसाठी तो काम करत असेल. " विराट विचार करत म्हणाला. 



    "आणि सध्या तू सोडून दुसरा कोणी ऑफिसर खुप दिवसांपासून दिल्ली बाहेर नाही आहे. जे आहेत ते सध्यातरी परतू शकणार नाहीत अश्या मिशन्स वर बिझी आहेत. " सुर्या



   " मला कल्पना आहे त्याची. " ओजस्वी



   "म्हणजे तू .....नाही नाही ... तुझ्या अशा नाजूक अवस्थेत आम्ही हा विचार करूच शकत नाही. सिंघानिया सरांची गोष्ट तर दूरच ." सूर्या थोडा आवाज चढवून म्हणाला. 



   विराट ला सुद्धा ही गोष्ट पटली नव्हती. 



   " माझी तब्येत अगदी उत्तम आहे. आणि हवी ती माहिती दीड महिन्यात हाती लागणार असेल तर मी माझ्या डिलिव्हरीच्या आधी या मिशन मधून मोकळी झालेली असेन. शिवाय मी इथे नेपाळमध्ये असल्याची माहिती हेड ऑफिस सोबत कॅबिनेटमध्ये सुध्दा आहे. त्यामुळे तिथला जो कोणी गद्दार व्यक्ती असेल त्याला सुद्धा हेच वाटत राहील की मी नेपाळमध्ये आहे. त्यामुळे माझ्या जिवाला काही धोका नसेल. आणि मिशन पूर्ण होण्याची शक्यता शंभर टक्के असेल. फक्त सिंघानिया सरांनी अनऑफिशीयल डिसिजन घेतला पाहिजे. " 



ओजस्वी हरएक प्रकारे त्या दोघांना समजावण्याचा प्रयत्न करत होती. पण विराट आणि सुर्या दोघांनाही तिचा आणि तिच्या बाळाचा जीव धोक्यात घालने पटत नव्हते. पण ओजस्वी हार मानणारी नव्हती. .....





क्रमशः.....




Rate this content
Log in

Similar marathi story from Crime