Deepak Kambli

Tragedy

2.1  

Deepak Kambli

Tragedy

पिझ्झा

पिझ्झा

3 mins
229


पिझ्झा


    नुकतंच ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं होतं त्याने. सद्या जिथे मिळेल तिथे स्वःताचा सीव्ही पाठवत होता. नुसत्या ग्रॅज्युएशने काही होत नाही हे टोमणेही ऐकत होता. 


     तशी टोमण्यांची त्याला लहानपणापासूनच सवय होती. कारण? कारण सोपं आहे. तो गरीब होता. त्याची आई लोकांकडे धुणी भांडी करायची. वडील मोलमजुरी करून पोटापुरते कमवायचे. अभ्युदय नगर शेजारच्या चाळीत यांचं दहा बाय दहाचे घर होतं. घर कसलं झोपडीच ती.


    मी कायम असाच राहणार नाही ही याची जिद्द. पेपरची लाईन, दुधाची लाईन करून लहानपणापासून त्याला मेहनतीचे धडे मिळाले होते. पुढे शिकायची हौसही होती आणि गरजही, पण पैशा अभावी ते शक्य नव्हतं. म्हणून अनुभवाच्या शाळेत शिकत शिक्षण पुर्ण करण्याचं यानं ठरवलं आणि मिळेल ती नोकरी करायचं ठरलं. लहानपणापासून आई वडिलांना राबताना पाहिलं होतं. आता त्यांना आराम द्यावा ही एकच इच्छा मनात होती. त्यामुळे जेव्हा मित्राने 'डिलीव्हरी बाॅयची' ऑफर दिली तेव्हा त्याला लाज वाटली नव्हती. पण एवढं शिकून ही नोकरी करावी लागते याची खंत होती. 


     या नोकरीत एक खास बाब होती ती म्हणजे बाईक. हो आपली स्वतःची एक बाईक असावी हे इतर तरूणां प्रमाणे याचंही स्वप्न होतंच. त्याला ती बाईक घरी आणतात येणार होती. वापरता येणार होती फक्त तेव्हा पेट्रोलचा खर्च स्वतः करावा लागणार होता. जाऊदे आई वडिलांना बाईक वरून फिरवता तर येईल. किती दिवस मित्रांची बाईक मागायची‌. याच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स तर होतच. जी कंपनीची रिक्वायरमेंट होती. बाईक मिळेल याच आशेवर त्याने ती नोकरी स्वीकारली. 


    पहिल्याच दिवशी त्याला बाईक मिळाली तेव्हा त्याचा भ्रमनिरास झाला. बाईकवर कंपनीच्या नावाची जाहिरात होती. त्याने लगेच मित्राला फोन लावला.

"मित्रा अरे बाईक घरी नेता येईल एवढंच म्हणालास. त्यावर जाहिरात असेल हे नाही सांगीतलस"

"अरे वेड्या डिकीत एक छोटा स्क्रू ड्रायव्हर ठेवायचा" 

"त्याने काय होईल?"

"माझे पूर्ण बोलणे ऐक आधी"

"बरं! बोल"

"तो जो पत्रा आहे ना जाहिरातीचा? त्याला चार स्क्रू आहेत. ते सहजपणे काढता येतात आणि डिकीत ठेवता येतात. फक्त ते चार स्क्रू सांभाळून ठेवायचे आणि नुसता रडत राहू नकोस जरा डोकं सुद्धा वापर. हा हा हा!"

"हा हा थॅंक्यू"

"चल ऑल द बेस्ट"

"धन्यवाद मित्रा"

फोन ठेवल्यावर त्याला हायस वाटलं. बाईकवर त्याने प्रेमाने हात फिरवला. आता या बाईकवर त्याला त्याच्या आईला फिरवायचे होते. 


   त्याच्या आईला ही नोकरी आवडली नव्हती.

"एवढं शिकून ही दारोदारी पार्सल घेऊन फिरायची कसली नोकरी?"

"अगं बाई मी कायम थोडी ही नोकरी करणार आहे? दुसरी मिळाली की ही सोडायची"

असं म्हणून त्याने तिची समजूत घातली.


    नव्या नोकरीचे नियम मात्र भारी होते. एक किलोमीटरच्या अंतरावरील ऑर्डर्स दिल्या जाणार होत्या. कंपनी नवीन असल्याने "४५ मिनीटात पिझ्झा घरपोच नाहीतर पिझ्झा फ्री" अशी कंपनीची ऑफर होती. पण जर वेळेवर पिझ्झा पोहचला नाही तर डिलीव्हरी बाॅयचे १०% मायनस होणार होते त्यामुळे अलर्ट रहावं लागणार होतं. 


    एक चटेरी पटेरी टी शर्ट त्याला घालायला दिला. याने तो शर्टवरच चढवला. मोबाईलच्या कॅमेरात सेल्फी मोडवर त्याने स्वतःला पाहिलं लय भारी दिसतोय मनात म्हणाला. पटकन एक सेल्फीही काढला आणि चटकन डीपी बदलला. आज तो खूप खुश होता. 


    कंपनीच्या आवारात दहा स्वार तय्यार होते. दरवाजात एक चटेरी पटेरी ड्रेस मधला मुलगा मेगाफोन घेऊन यायचा. ज्याला डिलिव्हरी असेल त्याच्या गाडीचा नंबर पुकारला जायचा मग पार्सल देऊन टाईम नोट केला जायचा. बऱ्याच मुलांना यात थ्रील वाटायचं. हा थोडासा घाबरलाच होता. 


    याच्या गाडीचा नंबर पुकारला गेला. "१४१६"

 हा पटकन गाडी घेऊन गेला. पार्सल आणि पत्ता घेतला आणि बाहेर पडला. पत्ता याला माहीत होता "मॅग्नम टाॅवर" म्हणून तो मेन रोडवरून न जाता गल्ली गल्लीतून जात होता. मधे ट्राफिक असल्यावर तो पॅनिक होत होता. पहिलं पार्सल वेळेवर पोहचलंच पाहिजे. त्याच्या गाडीचा वेग वाढू लागला. जसजसा टाईम होत होता हा एक्साईट होत होता. आता राईट मारला की तो लवकर पोहचणार होता पण तो बोळ छोटा होता. त्याने स्पीड कमी न करताच टर्न मारला आणि समोर टेम्पो आला. तो गाडी कंट्रोल करू शकला नाही आणि याची गाडी टेंपोवर आदळली. हा चेंडू सारखा वर उडाला आणि खाली आदळला शेवटी डोळे मिटताना याला आई दिसत होती

 "बाळा गाडी सावकाश चालव हां"

 याने आयुष्यात पहिल्यांदाच तिचं ऐकलं नव्हतं आणि आता तो ऐकणारही नव्हता. त्याचे डोळे कायमचे मिटले होते. त्याच्या टीशर्टवर असलेल्या पिझ्झा या अक्षरांवर लाल रंग चढला होता. 



Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy