Neelima Deshpande

Inspirational Others

4.3  

Neelima Deshpande

Inspirational Others

प्रतिसाद...

प्रतिसाद...

3 mins
184


"आताशा असे हे मला काय होते? कुण्या काळचे पाणी डोळ्यात येते...

बरा बोलता बोलता स्तब्ध्द्द होतो कशी शांतता शुन्य शब्दात येते..."


दाराबाहेर रस्त्याने जात असलेल्या कुल्फीवाल्याच्या गाडीवर लागलेल्या गाण्याच्या ओळी कानावर पडल्या आणि अचानक हरवलेला सुर सापडावा तसे माधुरीला तिच्या मनात चाललेल्या घालमेलीला संपवण्याचा मार्ग गवसला.


मनात विचार येताच तिने भावाला फोन लावला,


"रोहन मला माफ कर आणि शक्य असेल तर एकदा तरी माझे म्हणणे शांतपणे ऐकून घे. तुला नाही पटले तर माझी हरकत नाही.


काल जी काही आपल्यात कुरबुर झाली ती मुळात व्हायलाच नको होती असे मला वाटते. जोवर एक जण जरी शांततेत घेत असतो तोवर कधीच वाद वाढत नाही हे चांगले ठावूक असूनही काल माझा तोल ढळला. स्वत:वरचे नियंत्रण मी कशी काय गमावून बसले आणि आपल्यात शब्दाने शब्द वाढत गेला.नंतर कुणीच माघार घ्यायला तयार नसल्याने उणे दुणे निघत गेले आणि मग उगाचच आपल्या आजवर चांगल्या ठेवलेल्या मनात एकमेकांचे कटू शब्द साचत गेले.


भौतिक गोष्टींचा मोह मला आजवर कधीच नव्हता व यापुढेही तो कधीच नसेल. आजवर फक्त आणि फक्त आपल्या नात्याला महत्व देत आणि ते नेहमीच चांगले रहावे म्हणून मी प्रयत्न केले हे तर तुला आठवत असेल आणि मान्यही असेल हो ना?"


मनातला राग अजून निवळला नसल्याने माधुरीला काही तिच्या या बोलण्यावर रोहन कडून प्रतिसाद मिळाला नाही. खूपदा आपण समोरुन मिळालेल्या चांगल्या प्रतिसादाने जसे आनंदी होतो आणि करत असलेली चांगली कृती वारंवार करण्याचे ठरवतो तसेच योग्य तो प्रतिसाद न मिळाल्याने खूपदा आपल्या ध्येयापासून भरकटतही जातो. काल रोहनशी झालेल्या वादाचे मूळ कारणही हेच होते हे आठवताच माधुरीने अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही तरी मनावर ताबा ठेवला आणि भावाशी पुन्हा प्रेमाने संवाद सुरु केला,


आपले नाते सांभाळण्यात मला आनंद आहे व समाधानही आणि म्हणूनच त्यापलिकडे कधी आजवर मी माहेरुन कुठलीच अपेक्षा ठेवली नव्हती आणि कधी ठेवणारही नाही.


जिवंतपणी मुलगी म्हणून जिथे मी कायम उपेक्षित राहिले तिथे प्रेम आणि सन्मान यापलिकडे काही मिळावे हा विचारच माझ्या मनात आला नाही. मी सक्षम बनत तुमच्यासाठी आधार देणारी व्यक्ती बनले आहे म्हणून आपले नाते आजवर टिकले व या पुढेही ते टिकवायचे असेल तर ती भूमिका मला कायम वठवायची आहे याची जाणीव मला कायम आहेच.


पण त्याच नात्याची गरज नसल्यासारखी जाणीव तू अशात करुन देत गेलास आणि त्याने माझ्या मनाला काल खुप वेदना झाल्या. त्या रागातच मी ही उत्तरं देत राहिले याचा मला खेद आहे.


बाहेर कुणीतरी तुला काही बोलले. त्यांनी स्वत:च्या मतलबासाठी तुझे कान भरले जे तू आम्हाला न सांगता मनात ठेवून वावरत राहिलास. अगदी योगायोगाने घडलेल्या गोष्टींकडेही मग तू साशंक नजरेने पाहत गेला आणि कुठेतरी हाती येत असलेल्या संपत्तीत अनेकांचा वाटा होईल का या भितीने तू बिथरला. तो वाटा इतरांना हवा आहे की नाही हे मला आज ठावूक नाही आणि असेल तर तो द्यायचा की नाही हा सर्वस्वी तुझा निर्णय असेल. मला यात आपल्यातील नाते अखंड रहावे या पलीकडे काही नको. हे सांगण्याचा मी अतोनात प्रयत्न केला पण तो फसला. तू काही ऐकून घेण्याच्या मन:स्थितीत नव्हतास म्हणून मी तिथून निघून आले.


आजवर तुला दिलेले प्रेम, लावलेला जीव विसरुन कुणातरी परक्या लोकांच्या सांगण्यावरुन तू आपले आजवरचे नातेही तोडायला सरसावला ही गोष्ट मनाला लागून राहत होती म्हणून तुला फोन केला. माफी मागण्यासाठी व तुला बोलते करण्यासाठी ! कुणीतरी माघार घेतल्याशिवाय हा वाद मिटणार नाही म्हणून मी माघार घेतेय.


जवळच्या नात्यात गैरसमजातून फक्त आणि फक्त नुकसान होते हे तुलाही समजत असेल तर लवकर शांत हो. कोण काय सांगते यापेक्षा नेहमी आपल्याशी कसे वागते, किती काळजी घेते, आपल्याला जपते व आपल्या भल्याचा विचार करते हे समजून घे मग आपण बोलू आणि तुझ्या मनातील शंका कायमच्या कशा संपवता येतील यावर तू सांगशील ते उपाय लगेच करूत."


इतके बोलून माधुरीने फोन ठेवला. फोनवर जरी अपेक्षित प्रतिसाद दिला नसला तरी माधुरीच्या चूक नसताना स्वत: फोन करून माफी मागण्याने आणि विसंवाद मिटवत संवाद साधण्याचा प्रयत्न करण्याने रोहन खरेच शांत झाला. त्यालाही गाण्याच्या पुढच्या कडव्यातील ओळी आठवल्या,


"कधी दाटू येता पसारा घनांचा कसा सावळा रंग होतो मनाचा...

असे हालते आत हळूवार काही जसा स्पर्श पाण्यावरी चांदण्याचा...."


आठवलेल्या ओळींचा अर्थ लक्षात येताच त्याच्या मनात देखील माधुरी ताईच्या आजवरच्या प्रेमळ आणि काळजीयुक्त वागणुकीचे शुभ्र चांदणे पसरले. गैरसमजाचे धुके पळवत लावत त्याने संवाद साधायला आणि रेशमाचे बंध नव्याने जोडायला प्रतिसाद म्हणून माधुरीला लगेच फोन लावला.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational