Varsha Nerekar

Classics

4  

Varsha Nerekar

Classics

त्रिवेणी संगम

त्रिवेणी संगम

5 mins
300


"काय झालं गं आई अलिकडे माझ्या लक्षात आलय तू आजीच्या खोलीतून बाहेर आलीस की तुझा चेहरा बदलतो, खूप मूडी होत आहेस. रात्री मधेच जावून डोकावतेस खोलीत. परवा आजीशी छान गप्पा मारत होतीस अन् मधेच उठून हॉलमध्ये शांतपणे डोळे मिटून बसली. अग बोलत जा नाहीतर घुसमटून जाशील. पण एक सांगू आजीला बरे वाटते तू बोलल्यावर अन पाठीवरून हात फिरवून थोपटले, तू मधूनच विचारून जातेस, अग ती खूप खूश होते हे जाणवते मला. बस जरा बोलू आपण." 

तसा हा संवाद आमच्या घराच्या भिंतींना ओळखीचा झालाय. लेक आता समंजस झाली सुनावते तशी मधूनच समजुतीच्या स्वरात हक्क दाखवते शालिनी विचार करू लागली. तिने ठरवले बोलूया अवनीशी "ए, एवढा का चेहरा बदलतो माझा प्रश्न पडला मला. कसे सांगायचे मोरपंखी मनातले भावतरंग." आज बऱ्याच दिवसांनी नव्हे वर्षांनी पहिल्यांदा असे शालिनी संवाद साधत होती, "अगं तू, मी, आजी जीवन सरीतेचा त्रिवेणी संगम नात्याचा तीन पिढ्यात अंतर खूप कधी लुटुपुटुचे भांडण तर कधी हसत खिदळत चालणारा सुसंवाद. अवनी, अगं नाते समजून घेतले दोन्हीकडून तर आनंदात नांदतात सारे. अधेमधे घडणाऱ्या घटनांचे पडसाद मग रुसवे फुगवे. कधी कोणी नातेवाईक भेटून गेले की होणारी चर्चा अन ते विसरून कानात वारे शिरू न देता सुरळीत चालू ठेवणे दिनक्रम हे आव्हान. कधी आजीने आमचीच घेतलेली शाळा. वादाला आळा घालत मार्ग काढणे आहे त्या परिस्थितीतून. कधी उपदेशाचे डोस पण तरी भासतात मायेने फिरणारा हात. खरे तर डोक्यावर छत्र आहे हे वात्सल्याचे म्हणून निभावले जाते सारे. लटकी तक्रार कधी शहाणपणाचे गान. आधी लेकीचा हात आधार शोधायचा माझा आता सासूबाई धरतात एकूणच मी मधली फळी पण कधी कधी बालेकिल्ला लढवावा लागतो तुमच्यासाठी व नंतर आजी-नात संगनमत मग वाटते उगाच पडतो मधे. अशी कथा घरोघरी आपली विशेष काही नाही."

शालिनीचे विश्व म्हणजे तिचे गोकुळ, सुरूवातीला सगळे एकत्र रहायचे.  शालिनी पण नोकरी करून हातभार लावणारी संसारात. अवनीच्या तिच्या लेकीच्या जन्मानंतरही कार्यरत दिवसभर सासरे सासूबाई बघायचे. एक नियमित धावपळीचे चक्र सुरू असायचे. नणंद यायची तेव्हा ती दोन तीन दिवस सुट्टी घ्यायची. शालिनीने तिला सांगितले होते वर्षातून काही दिवस मुक्कामी यायचे तिचीही मुले मोठी झाली तसे ती दोन-तीन दिवस येऊ लागली. भावंडांना एकमेकांचा सहवास हवाच. तिलाही माहेरी आल्याचे समाधान मिळावे हि शालिनीची भूमिका. यात कुठेतरी शालिनीची भावना होती तसे तिचे माहेर छान पण आई गेली अन् माहेरी जाणे कमीच झाले, वडीलांना भेटायला जायची अन् माघारी फिरायची भाऊ वहिनी नोकरी करणारे. प्रत्येकाची संसार रेटण्याची तारेवरची कसरत. तिलाही सुट्टी घेणे तेव्हा अवघड. मिळणाऱ्या सुट्टया सणवार, आजारपण, समारंभ यात जात. आता भाऊ एकटा नाही आपले जाणे आवडले नाही वहिनीला तर, उगाच त्रास नको माघारी बाबांना आपल्यामुळे. उपेंद्र झाला षटकोनी कुटुंब झाले पण सासरे गेले नोकरी सोडावी लागली "सगळे जमणार नाही गं" सासूबाईंनी सांगितले. 

सासुबाई सासू या भूमिकेच्या आग्रही असल्या तरी प्रेमळ होत्या. शालिनी मनमिळावू त्यामुळे लगेच सूर जुळला. आता बऱ्याच वर्षांचा सहवास दोघींना एकमेकींच्या सवयी पडल्य अंगवळणी विचार एक झालेले. सासूबाई आता थकल्या दिवसभर त्यांचे करणे, मधून पुस्तक, पोथी वाचून दाखवणे, खाली फिरायला नेणे सगळे करताना गुंतवणूक भावनांची. खूप सोसले माऊलीने देवा आम्ही उत्तरायणात नीट पार पडू दे रोज ती प्रार्थना करायची. 


कधी एकांतात वाचनात रमताना विचार करत रहायची. मैत्रिणी चार होत्या मनमोकळेपणाने बोलायला. "मध्यंतरी आईंना बरे नव्हते तेव्हापासून विनायक कामावरून आले की बोलतात आईंशी. अहो शेवटी सूनेने गप्पा मारणे व स्वतःच्या मुलाने संवाद साधणे यात फरक असतो. आमच्या मातेचे भावविश्व मुला भोवती गुंफलेले." सांगताना अलिकडे हळवी व्हायची थोडी. आज तीस वर्षांचा सासू-सून नात्याचा प्रवास आणि अनेक घटनांच्या साक्षीने लाभलेला सहवास. जीवनातल्या स्वप्निल दुःख सुखाच्या हिंदोळ्यावर प्रत्येक स्त्री झुलते. स्वतःला विसरून मुलगी, नातं, आई, पत्नी, सासू, नणंद, भावजय,मामी, काकी, आत्या, सखी अहो कितीतरी पैलू सर्व नात्यांची वेल भोवती. तिच्या परीने सर्व नाती जबाबदारीने जोडते अनेक प्रकारच्या रंगीत रेशीम धाग्यांच्या गुंफणीतून सजवते छान शेला. माहेर सासरच्या उंबरठ्यावर द्विधा मनस्थितीत जपते आपल्यांना प्रत्येक 'ती'. 


त्या थकल्या आता हे जाणवते म्हणून काळजी वाटते त्यांची अन् आतून कुठेतरी अनामिक खेच त्यांनाही तशीच जाणवता मधेच म्हणतात गीता वाचल्यावर "अग उमललेल्या फुलाचे निर्माल्य वहायचे देवाचरणी. पुनरपि जननम् पुनरपि...आता पानगळीचे वेध उतार होणार कधीतरी..., शालिनी तू हलगर्जीपणा करू नको आधी जप स्वतःला.... तुला खंबीरपणे पार पाडायचे सगळे लक्षात ठेव....सुखी, आनंदी आहे तुमच्यासह मी...माझ्या माघारी दुःख करू नका....काहीतरी पुण्याई हो तू सून म्हणून मिळालीस. खूप करतेस पोरी सगळ्यांसाठी...." बोलत रहायच्या.., मधेच हितोपदेश सुरू आणि मावळतीचे बोलू लागल्या होत्या अलिकडे वारंवार आयुष्याच्या सांजवेळी मग तिला गलबलायला होई. त्यांचा सुरकुतलेला हात हातात घेऊन पाठीवर,खांद्यावर हळूवार थापटत काही होणार नाही तुम्हाला आलेच मी म्हणत बाहेर यायची खोलीच्या शांत बसायची कंठ दाटून यायचा टिपायची डोळे. वटवृक्षाच्या संध्या छायेत सांज पार पाडताना जवळच्या व्यक्तीची अनोखी परीक्षाच. सध्या कल्पवृक्षाच्या सानिध्यात आहे पण हा हात हातातून सुटणार विचाराने बेचैन होई मन. 

खूप कष्ट सोसले माऊलीने निवृत्त मुख्याध्यापिका. स्वकष्टाने हिमतीने सर्व सांभाळले. सदा हसतमुख चार चौघांची चौकशी लाघवी बोलणे. इतरांना आपलेसे करणारा स्वभाव. अवनी ला सांगताना म्हणायची "अग माझ्या आईने खूप लवकर प्रयाण केले. मी म्हणते यांना नशिबवान आहात आईचा वरदहस्त डोक्यावर आहे आणि तुम्ही नातवंडे नशिबवान आजीची माया लाभली छान तुम्हाला. ज्याला आईची माया मिळत नाही तोच त्याची किंमत जाणतो. अगं मनाने खंबीर असले तरी सल्ला घेत राहते अनुभवी मातेचा. कधी इकडच्या तिकडच्या गप्पा कधी काही पटत नाही असेही. या संसार सागरात बराच प्रवास एकत्र केला आम्ही दोघींनी सास भी कभी बहू थी सारखे नाते जसे कालचक्रात शून्यातून अनंताकडे जात पुन्हा शून्य ब्रह्मांडात सामावणारे."आपले माणूस हवेच असते आपल्याला. 


नववर्ष कॅलेंडरचे स्वागतच घरात आईंमुळे, अर्थातच एक जानेवारी जन्म दिवस आईंचा. आदल्या दिवशी पासून सरप्राइज ठरते उत्साहात. सण समारंभ त्यातून मिळणारा आनंद ओसंडताना भावमुद्रा सुंदर दिसते त्यांची. "काय सांगू नित्याच्या हालचाली आता वेळापत्रका सारख्या पाठ झाल्यात. मध्यरात्री जाग आली की खोलीत डोकावून येते हल्ली अन् देवाला सांगते आई आमचा आधार आहे देवा हिरावून नेऊ नको. थांब थोडा त्या वेशीवर. कंठ दाटतो हल्ली अनामिक हूरहूर ग्रासते." 


शालिनी अवनी बरोबर बोलली आणि तिला जाणवले लेकही आता काळजी घेते आजीची कारण त्या आजीने जपलेली हि दुधावरची साय. जिथे आजी तिथे नात आणि ती पण लाडाची. मुलगा, नात, नातू गमती करतात आजी खूश असते हाच आनंदाचा लाभलेला अमृतकुंभ घरातला असाच राहो . देवा माझ्या सासूबाईंना निरोगी दीर्घायुष्य दे एवढे मी माऊलीसाठी मागते. 


अवनीशी बोलताना खूप दिवसांनी व्यक्त झाले खूप हलके वाटत होते तिला. आज फोटोचा अल्बम मुलांनी काढला अन् गत स्मृती गंधाळल्या त्या मोगऱ्या प्रमाणे ऋतू हसला छान. दारावरची बेल वाजली अन् विचारांना विश्रांती मिळाली क्षणिक. अवनी ही निघून गेली बाहेर. चला शालिनीताई उठा बसून चालणार नाही कामे पडली आहेत स्वयंपाकाची तयारी, सांजज्योती देवघरात लावायची, पोथी वाचायची आहे. उशीर झाला तर आई ये जा करतील कुठे आहेस हाक मारतील. हात जोडून प्रार्थना करून म्हणाली "बंध मायेचे जपलेले असेच राहो हाच माझा अनमोल ठेवा, आशीर्वाद दे परमेश्वरा ....



Rate this content
Log in

Similar marathi story from Classics