Varsha Nerekar

Classics

4  

Varsha Nerekar

Classics

उत्तरायण

उत्तरायण

7 mins
319


कहीं दूर जब दिन ढल जाए 

साॅंझ की दुल्हन बदन चुराए

चुपके से आए

मेरे ख़यालों के आंगन में

कोई सपनों के दीप जलाए दीप जलाए..... 


मुकेशजींचे गाणे शांततेत सांज होताना मनावर मोहिनी घालणारे. गाणी ऐकण्याचा आणि काही अंशी गाण्याचा अमितला छंद. तसा आवाज चांगला कधी गंभीर होणारे वातावरण क्षणात एखादे सुंदर सुरावटीचे गाणे गात तो खेळकर करायचा...... 

अमित कॅमेऱ्यासह सज्ज होत गाणे गुणगुणत होता. 

"हं घ्या चहा"

"अहाहा दाटलेलं धुकं हि हिरवाई आणि मस्त स्पेशल चहा क्या बात है.. "

चहाचा आस्वाद घेत अमित गार्गीला दाद देत होता अलिकडे हे ठरवल्या सारखेच अन् गार्गीच्या चेहऱ्यावर स्मितहास्य उमटायचे. 


"बघ भास्करराव संध्येला टाळी देत निघण्याच्या तयारीत आहेत आणि तो रोहिणीनाथ इंद्रगृहातून येईल रजनीच्या हाती लखलख चांदण ठेवा द्यायला. तोवर मधल्या संधी प्रकाशात हि अमित रावांची स्वारी फिरत हे संध्या छायेचे विलोभनीय नजारे या रंगांच्या छटा सर्व जरा कॅमेऱ्यात कैद करू इच्छितात तेवढ्याच रंगीत आठवणी उद्या शेअर करता येतील. आज्ञा असावी राणी सरकार....कोण आहे रे तिकडे..." चेष्टा करत स्वारी निघाली. 


अमित गेला आणि गार्गी गेट लावून झोपाळ्यावर विसावली. तसा तिचा प्रवास सर्वसामान्य गृहिणी सारखाच. नोकरी आणि संसार यातील रस्सीखेच, येणाऱ्या कौटुंबिक जबाबदारीने नोकरी सोडली तर परत घरातूनच हातभार लागावा म्हणून काहीना काही खटपट करत "जीवन चलने का नाम.. . " प्रवास करत राहिली. अर्थातच प्रवासी मग भेट गाठ घेत येणे जाणे जीवाचे बालपण, तारूण्य, वृद्धत्व तीन रंगी सोपानी जीवन पिढ्यांच्या सहवासात अनुभवले आणि आता स्वतःचा तिसरा सोपान पार करणार होती अमितसह उत्तरायण दोन वर्षांपूर्वी सुरू झाले दोघांचे. मागच्या पिढीच्या अपेक्षांवर खरे उतरत जाणत्या वृक्षाची पानगळ तर नव्याने अपेक्षांचे आव्हान स्विकारत नवजीवनी वसंत पालवीच्या साथीने दुःख सुखाचे हिंदोळे सरले. 


हात सोडून जात राहिले जाणकार आणि थोरलेपणाने खांदे खंबीर होत गेले. रोजच्या चाकोरीबद्ध जीवनाची मोहोर उमटलेली लगेच रिकामपणाचे परिवर्तन हात पसरून कवेत घेणार म्हणून अमित निवृत्त होणार या जाणीवेने थोडा सतर्क होवून कार्यरत झाला. आयुष्याने पुढे काय प्रश्न दिला तसे त्याचे उत्तर तयार. रिकामपणा म्हणजे आजार होवून अवलंबून रहात इतरांनी कीव करावी असे नको होते त्याला. स्वाभिमानाने आजवर जगलो तसेच पुढे. दोन वर्षे आधी गार्गी चल आपण काहीतरी शिकू म्हणत तिच्या व त्याच्या आवडीनिवडी, काय करावे वाटते, आपले छंद काय हे जाणून घ्यायला सुरुवात केली. गार्गीने न सांगता त्याला कळले होते सतत तिचे एक अस्वस्थ रूटीन होतेच की. मुलांची जबाबदारी पार पडली आता ती मोकळी पण ती उगाच इकडे तिकडे भटकणारी नव्हती त्यामुळे तिने प्रवास करावा त्याला वाटले म्हणजे ती चार लोकांत मिसळेल. छोट्या सहलींचे नियोजन झाले. "वेळ सांगून येत नाही गार्गी उत्तरायण सुरू झाले आपण कोण एकमेकां आधी कोण नंतर हे होणार पण माझ्या नंतर तू सक्षम असली पाहिजे, गेल्या पंधरा वर्षात नोकरी सोडली तशी तू घरीच सगळ्यांत अडकलीस कुठे बाहेर येणे जाणे नाही तुझे. तू सर्वोत्तम साथ दिलीस. तुझ्या साथीमुळे हा अमितचा संसार झाला. तुला वेळ नाही दिला आता ठरवले आपण मागे वळून पहायचे नाही. नवी सुरूवात." तिला एकटीला प्रवासाला जाण्याची अट घातली ती तेवढ्यासाठी, सुरूवातीला अवघड वाटले पण हळूहळू जगाचा अनुभव आला तिचा आत्मविश्वास वाढला अनामिक पोकळीतून, कोशातून ती बाहेर येत फुलपाखरू होऊ लागली. अमितला हेच हवे होते नोकरी करताना तिच्याकडे दुर्लक्ष झाले ते तो भरून काढत होता. कधी दोघे प्रवासाला जात. अमितने बासरी, तबला वर्ग सुरू केले, फोटोग्राफीची आवड जोपासून लागला, तो आणि त्याचा कॅमेरा. कोणत्या मासिकात प्रसिद्धी मिळायची. कला अविष्कार संघात कार्यरत झाला दिवसातले चार पाच तास आनंदात जायचे. 


रोज सकाळी फिरायला जाण्यापासून एक वेगळे छान रूटीन त्यांचे सुरू झाले आनंदात. माणूस रिकामा म्हणजे आजारी त्याचे मत होते. कारण मग जुन्या आठवणीत रमणे सुरू होते पुन्हा त्याच वेशीवर जाऊन घट्ट झालेले पापुद्रे मन कुरतडत रहाते. त्यापेक्षा पुढे जात बकेट लिस्टने जीवन परीपूर्ण करू नव्या ओळखी. परदेशी ट्रीप करायची तर तिला घेऊन फ्रेंच, जर्मन क्लासला गेला. जगात काय चाललय धावता आढावा तिच्यासाठी सांगे. आता नवीन छान आठवणी निर्माण करू त्याचा दृष्टीकोन. अंधारायला लागले तशी गार्गी विचारातून बाहेर पडली. 


"आजकी फरमाईश चांदण्यांत मेजवानी ..गरमागरम खिचडी, तूप, लोणचे, पापड, भाकरी, भाजी, स्वीट वा...याला म्हणायचे धुंधुरमासाची मेजवानी साधी पौष्टिक, अहाहा छान मस्त " गार्गी हसली तसा तो म्हणाला "अगं आनंदासाठी छोट्या छोट्या गोष्टी हव्यात मोठ्या गोष्टींसाठी वाट पहावी लागते तोवर काळ सरतो." पूर्वी जेवणानंतर इकडच्या तिकडच्या कोणाचे काय कसे चर्चा पण ते बंदच केले त्याने 'नवीन विषय नवीन विचार, भिजत घोंगडे बादच' 


चहा.. आवाज दिला तरी तो आला नाही काय झाले म्हणून आत गेली तर स्वारी निघायच्या तयारीत होती. "अरे कुठे" "काही नाही आलोच जरा जायचे" चहा घेऊन गेला. गार्गी कामात व्यस्त झाली. लायब्ररीतून जावून आली तर अमित अस्वस्थ वाटला. काय झाले एवढा गंभीर का? "अगं काही नाही तुझी तयारी करत होतो, तुला चैत्रालीने बोलावले अमेरीकेला तू एकटीने जायचे. उद्या पासपोर्ट, व्हिसा काढायला जायचे फॉर्म तूच भरायचे सगळे व्यवहार तू करायचे", तो म्हणताच ती खाली बसली अरे कसे जमेल... "मी नाही एकटी. मला माहीत नाही काही नवीन देश लोकांशी बोलणे एकट्याने परदेश प्रवास." "अगं एकदा जावून आलो आपण तुला माहीत नाही असे नाही." तो समजावत राहिला. दोन आठवड्यात तिला एअरपोर्टवर सोडले आणि तो परत काउंटर कडे वळला.... 


गार्गी परावलंबी होती असे नक्कीच नव्हते पण जगातला वावर तिने सोडला. ती तशी चौकशी करत मदत घेत फोन करून चैत्रालीकडे पोचली. अशक्य शक्य झाले एक परीक्षा पास झालो असे तिला वाटले. "अगं चैत्राली तू दिसली आणि जीवात जीव आला, दडपणच गं इथे येईपर्यंत. देश वेगळा सगळे कल्पने पलिकडे. तुझे बाबापण हट्टी काही विचार नाही, एकटे पाठवले. स्वतः बसले निवांत" तिचे डोळे पाणावले "असे कसे होईल तू हुशार आहेस सगळे पाठ केले लिहून घेतले, जमले की तुला" हा तर अमितचा आवाज तिने शोधक बघितले, फोन आलाय का अमितचा. तेवढ्यात दारात अमित हजर. म्हणजे तुम्ही येणार होता मग मला एकटीला का पाठवले कळेल का? लांबून मजा बघत होतात माझी. "अग माझ्या शिवाय तुला जमले पाहिजे गं जगात वावरता आले पाहिजे, परिवर्तन घडते काळासह प्रवासी होता यायला हवे गार्गी मॅडम.... ओके, ऑल वेल यू आर विनर" "मैने तेरे लिए हि सात रंग के सपने चुने सपने सुरीले सपने....." अमित गाऊ लागला आणि सगळे हसायला लागले. आता सहा महिने आपला मुक्काम आहे. 


मुलगी, जावई, नातवंडे सर्वासह दिवस आनंदात चालले होते. नवा देश, तिथली संस्कृती देशी परदेशी व्यक्तींशी ओळख झाली. आठ दिवसांची छोटी सहल काढत बरीच ठिकाणे फिरून आले. सहा महिने सरले मुलांचा निरोप घेऊन दोघे मायदेशी पुन्हा घरोंद्यात. 


"मी एक विचारू मला एकटीला का पाठवले.. " तसा अमित थोडा गंभीर झाला. "विचारचक्र सुरू आहे अजून तुझे, मी निवृत्त होण्याआधी पासून जे चालले ते काय असाही प्रश्न असेल." सांगतो आज. "गार्गी अगं एका पुरूषाची निवृत्ती होते पण स्त्रियांची होत नाही. मी तुला नोकरी कर म्हणालो ते तुझे स्वतःचे व्यक्तिमत्व ओळख असावी. तुला घरच्या जबादाऱ्या पार पाडताना नोकरी सोडावी लागली तरी तू काहीतरी करत रहा म्हणून पाठींबा दिला. तूच बघ तू नोकरी सोडली, बाहेर पडेनाशी झालीस. मैत्रिणीत जाणे बंद केलेस का तर तुला माझ्याकडे पैसे मागणे संकोच वाटायचा. म्हणून तुझे अकाउंट सुरू करून जमा टाकत आलो. आई गेली, मुलांची जबाबदारी संपली आणि तू हळूहळू कोशात जाते जाणवले अन् मी सावध झालो मला काहीतरी करावे लागणार. अगं माझी आई एकत्र कुटुंबाचा गोतावळा सावरत जगली. पूर्णतः बाबांवर अवलंबून जुने रीती रीवाज. ती दाखवायची नाही पण मनमोकळेपणाचा अभाव जाणवायचा मला, दडपणाखाली असल्यासारखी. तेच स्विकारले अलिप्त होवू लागली. बाबांच्या पाठी परावलंबी जगलेली ती तिला जड जायचे दैनंदिन व्यवहार साधे सांभाळताना, समाजात वावरताना. आणि कदाचित म्हणून लवकर निरोप घेतला जगाचा तिने. 


गार्गी तुझे असे व्हायला नको. समजा होवू नये पण मला काही झाले तर तू न हरता जीवन प्रवास करावा वाटते मला, म्हणून बॅंक व्यवहारापासून जे बदलले ते सर्व शिकवले पुन्हा तुला. काळासह चालता आले पाहिजे. बघ गेल्या काही वर्षात तुझ्यातला बदल तुलाच जाणवतो. तुझा चेहरा हसरा पाहिला की मला बरे वाटते. विनाकारण भटकणाऱ्याला लगाम घालावा लागतो पण एकटे घरी बसणाऱ्याला काहीतरी निमित्त, आस दाखवून घरा बाहेर पाठवावे लागते. तू आधी सगळे बाहेरचे व्यवहार बिले भरणे, बॅंकेत जाणे करायची. मुलांना शाळा, क्लास ने आण, बिझी होतीस आनंदी दिसायची, मैत्रिणी होत्या. ऑनलाइन झाले तसे तूच म्हणाली बाहेर जायला कारण नाही. म्हणून तुला परत तशीच कामे सांगू लागलो. चार लोकांशी संवाद होतो, ओळख वाढते. कुठे काय चालले, काय बदलते हे समजते. आत्मविश्वासाने वावरता येते हे आता तुझ्यात जाणवते तू एकटी प्रवास करू लागली तसे. तू कुंपण घातले स्वत:च्या आशा, अपेक्षा, इच्छांना. तुला एकटीला अमेरीकेला पाठवले वेळप्रसंगी तुला असे जावे लागले तर तू सक्षम आहेस आता अनुभवाने. आपण दोघे आहोतच एकमेकांसाठी पण मीही कदाचित असा झालो असतो मी गुंतवून घेत व्यस्त राहतो. तुला तो संकेत आठवतो तो कोशात गेला उदासवाणे जगतोय. अगं बायका स्वयंपाक घरात व्यस्त होतातही पण पुरूषांना जर समजले नाही निवृत्तीनंतर काय करावे तर परिस्थिती त्याच्या सारखी अवघड होते. आयुष्यभर नोकरी केली आता कशाला म्हणत घरी आहे तो. घरी नीट संवाद नाही. बायको गेली मुलगा विशेष लक्ष देत नाही. स्त्री अथवा पुरूष कोणीही असो पण आपल्या जोडीदाराला हात देवून सावरता यायला हवे. उत्तरायण तसेही अवघड हातात हात तोवर जपायचे पण नंतर खचायचे नाही."


"अमित पटले मला, थॅक्स तू आहेस म्हणून मी.... जाणवते मला तुझी धडपड. पण आपले ठरले निरोपाची भाषा बोलायची नाही हळवी होते मी, प्लीज" ओके "तुम्हारी नजर क्यों ख़फा हो गई ख़ता बक्ष दो गर खता हो गई.. हमारा इरादा तो कुछ भी न था... 

त्याचे गाणे सुरू झाले, दोघेही हसले "बरं ठीक आहे चला आज बाहेर फिरू, मग जेवण मग खरेदी संक्रांतीसाठी... आपल्यावर चैतन्याची असीम कृपादृष्टी ठेवणारा रवीराज उद्या उत्तरायणात प्रवेश करणार तो आपल्याही उत्तरायणाचा साक्षीदार...... 


Rate this content
Log in

Similar marathi story from Classics