श्रावणधारा
श्रावणधारा
आला श्रावण महिना
चहू कडे हिरवळ
हर्ष मनात दाटता
पसरते दरवळ ||१||
रोज चालतो श्रावणी
खेळ ऊन पावसाचा
चाले लपंडाव जणू
रात्र आणि दिवसाचा ||२||
पशू, पक्षी, झाडे, वेली
निळ्या आभाळाच्या खाली
हात मायेचा फिरता
वसुंधरा तृप्त झाली ||३||
येता या श्रावणधारा
थेंब जणू अमृताचे
खडकाला फूटे पान्हा
झरे वाहती प्रेमाचे ||४||
मनभावन श्रावणात
वाहे भक्तीचाच झरा
भक्तीभावे पूजणाचा
मिळे आनंद हा खरा ||५||
असा श्रावण महिना
हवा हवासा वाटतो
होता आगमन त्याचे
हर्ष मनात दाटतो ||६||
येता हा श्रावण मास
रेलचेल ही सणांची
आम्हा सर्वांना लाभली
पर्वणी ही आनंदाची ||७||