सुगंधी जखमा
सुगंधी जखमा
अल्लड अवखळ कशा
माझिया सुगंधी जखमा
अंतरंगी दरवळताना का
बाळगत नाही त्या तमा
थोड्या आहेत हळव्या
पण तितक्याच संयमीत
वर्दळीत हसून मुक्याने
जपतात हृदयातले मीत
एकांतातील धुंद संगत
अन् गर्दीतले पोरकेपण
अलवारपणे गोंजारतात
खचलेले हे माणुसपण
चंचल या भावभावनांना
घेतात आपल्या मिठीत
काजव्यांपरी विहरतात
रम्य आठवांच्या कुपीत
हुंदक्याच्या तालावरती
घालतात खूप धिंगाणा
कधीकधी अबोल राहून
साधतात गुढ निशाणा
आसवांनी कुरवाळतात
नजरेतील कोवळी प्रीत
मनपटलावर रेखाटतात
जीवनाची अनोखी रीत