Sunita madhukar patil

Others

5.0  

Sunita madhukar patil

Others

आयुष्याला दयावे उत्तर.

आयुष्याला दयावे उत्तर.

3 mins
771


" आस्वाद " सुधाचं हॉटेल !!! आज तिच्या हॉटेलचा उदघाटन समारंभ होता.ती आज खूप खुश होती.जवळच्या सगळ्या आप्तेष्ट आणि हितचिंतकाना तिने आमंत्रित केलं होतं.प्रतिकूल परिस्थितीवर मात करून ती इथवर पोहचली होती.खरतरं तिच्या जिद्दीची, उमेदीची दाद द्यायला हवी होती.पण काही लोकांना तिचा हा निर्णय अजिबात पटला नव्हता ते आपापसात कुजबुजत होते.तिच्या एका नातेवाईकाने तसं बोलून ही दाखवलं...


" काय ह्या बाईला समजतं की नाही,असल्या अपशकुनी जागेत का हिने नव्याने सुरवात केली असेल कोणास ठाऊक ? ज्या जागेन हिचं कपाळ पांढर केलं त्याच जागेत नवीन सुरवात,मुलांचा तरी थोडा विचार करायला हवा होता. अशा अवलक्षणी जागेत पाऊल देखील ठेवायला नको होत". अस म्हणून त्यानीं तिच्या उत्साहावर पाणी टाकायचं काम केलं आणि तिचं मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला...


पण सुधावर आता कोणत्याही गोष्टीचा परिणाम होणार नव्हता.ती तिच्या निश्चयावर ठाम होती.जे साकार होणार होतं ते तिने आणि समीर तिचा नवरा दोघांनी पाहिलेलं स्वप्न होत.दोघांनी मिळून पाहिलेलं स्वप्न ती जगणार होती.आणि तिच्या दृष्टीत ह्या जागेव्यतिरिक्त दुसरी कोणती जागा योग्य असूच शकत नव्हती...तिला आता मागे वळून पहायचं नव्हतं,पुढे चालत रहायचं होतं.  


अशा लोकांना काय उत्तर द्यायचं हे ही तिला माहीत होतं.समीर आणि तिने याच जागेत काहीतरी मोठं भव्य करून दाखवायचं स्वप्न पाहिलं होत...

सुधा आणि समीर हसतमुख आनंदी जोडपं.घरात आई बाबा आणि त्यांची लाडकी लेक सावी.मस्त संसार फुललेला दोघांचा. पाच वर्षाची सावी सगळ्या घराचा जीव होती.त्यांचं " आस्वाद " नावच हॉटेल होत.स्वतःच मोठं हॉटेल असावं हॉटेल बिजनेस मध्ये मोठं नाव करायचं स्वप्न होतं त्याचं, आणि त्या दिशेने त्यांची वाटचाल चालू होती.घरातील सगळेजण आपापल्या परीने त्याला साथ देत होते.पण म्हणतात ना मानवी कल्पना आणि ईश्वरी योजना यांचा कधी मेळ बसत नाही...


तीन वर्षांपूर्वी त्यांच्या हॉटेलला आग लागली.आगीत हॉटेल जळून भस्मसात झालं,एवढंच नाही तर समीर देखील.त्या आगीने समीरचा देखील बळी घेतला होता.सगळया घरावर दुःखाचा डोंगर कोसळला.सुधा तर भ्रमिष्टा सारखी वागू लागली होती.तासनतास शुन्यात नजर लावून बसायची.कोणाशी बोलत नव्हती, आणि या सगळयांचा परिणाम सावी वर होत होता.सावी एक दिवस सुधाला म्हणाली " मम्मा !!! बाबा कुठे गेला , चल ना आपण सगळे बाबाकडे जाऊयात.आजी पण सारखी रडत असते.तु पण माझ्याशी बोलत नाहीस.मला बाबाकडे जायच आहे.बाबा असला की सगळे हॅपी असतात..." पाच वर्षाच लहान लेकरू तिचा बाबा आता या जगात नाही हे देखील तिला माहीत नव्हतं...

अशा बिकट प्रसंगी तिचा परिवार तिच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला.तिच्या सासू सासऱ्यानीं तिला आधार दिला.झाल्या प्रकारात तिचा काहीही दोष नव्हता हे तिला पटवून दिल.वेळ प्रसंगी मानसोपचार तज्ज्ञांची देखील मदत घेतली.जिथे तुझा रस्ता संपलाय असं तुला वाटतंय तिथूनच नवीन सुरुवात करं.एक नवीन उमेद एक उभारी तिला दिली.निदान सावीसाठी तरी तिला उठून उभं रहायला हवं. जीवनात अपघात घडतात , पण थांबून चालणार नाही. पुन्हा नव्या जोमानं कणखरपणे आयुष्याला उत्तर दे , वेळोवेळी तिच्या आई बाबा, सासू सासऱ्यानी तिला समजावून सांगितलं. हळूहळू सुधाला देखील सगळ्यांच म्हणणं पटलं.हळूहळू दुःखच साठलेलं मळभ दूर सारून ती पुन्हा नव्यानं जगू पहात होती...


आणि आज जवळपास तीन वर्षानंतर तीन पुन्हा नव्यानं आपल्या आयुष्याला सुरवात केली होती.आज समीर आणि तिने पाहिलेल्या स्वप्नाचा नव्यानं पुनर्जन्म झाला होता. तिच्या आणि समीरच्या " आस्वाद " हॉटेलचा उदघाटन संभारंभ होता.


सरळ आयुष्य कोणाच्याच वाट्याला येत नाही.त्यात चढउतार खाचखळगे असतातच.कधी कधी आयुष्याच्या वाटेवर काही कटू आठवणी इतक्या तीव्र असतात की त्यातून बाहेर पडणं अशक्यप्राय वाटत असतं आणि त्याची सावली पुढील आयुष्यावर , वाटचालीवर पडते. झालेला आघात विसरन सोपं नाही पण तेच कुरवाळून बसणं त्याच आठवणीत कुढत बसणं पण जीवन नाही ना!!! जीवनाची वाट पुढे जाण्यासाठी असते... आणि सुधाने त्या वाटेवर पाहिलं पाऊल ठेवलं होतं.ती आता मागे वळून पाहणार नव्हती, नवीन जीवनगीत गात आयुष्याला उत्तर देणार होती...


Rate this content
Log in