Sunita madhukar patil ( मधुनिता )

Tragedy Inspirational Others

4.0  

Sunita madhukar patil ( मधुनिता )

Tragedy Inspirational Others

चिंगी

चिंगी

8 mins
264


चिंगी


" काय गं प्राची सारखं तिला रागवत असतेस. लहान आहे ना अजून ती. काय तो सारखा अभ्यासाचा अट्टहास." 


तोंड फुगवून बसलेल्या आपल्या चार वर्षाच्या नातीला जवळ घेत अरुंधती सुनेला सुनावत होती.


" काय झालं पिल्लुला, मम्मा रागावली का बाळाला?" छोट्या आर्वीला समजावत आजीने तिला मांडीवर घेतलं.


" करा, तिचे आणखी लाड करा, तुमच्या असल्या लाडामुळेच ती शेफारली आहे." प्राची परत खेकसली.


" अगं, लाड करवून घ्यायचेच दिवस आहेत तिचे. लहान आहे, आता कुठे बालवाडीत जातेय ती. तू तर दहावी बारावीची परीक्षा असल्या सारखी मागे लागली आहेस तिच्या. आमच्या वेळी मुलं पाच सहा वर्षाची होईपर्यंत शाळेत प्रवेशच दिला जायचा नाही." अरुंधती प्राचीला समजावत होती.


" आई पहिली गोष्ट म्हणजे बालवाडी नाही. किंडरगार्टन म्हणतात आणि दुसरी गोष्ट बाहेर स्पर्धा किती वाढली आहे. अहो, शंभर टक्के गुण मिळवणारे विद्यार्थीही आहेत. स्पर्धेत टिकून रहायचं असेल तर आता पासूनच त्यांना अभ्यासाची सवय लागायला हवी."


" जाऊ द्या, तुम्हाला काय कळणार म्हणा. तुमच्या वेळी कुठे होत एवढं अभ्यासाचं महत्व. तुम्ही तिला बिघडवू नका म्हणजे झालं." प्राचीने आपला हेका काही सोडला नाही.


" हो बाई, आम्हाला कसं अभ्यासाचं महत्व माहिती असेल. आम्ही आपले आडणी. जुनी दहावी झालेले आम्हाला काय कळणार म्हणा अभ्यासातलं." 


प्राचीच्या अश्या बोलण्याने अरुंधती थोडी दुखावली गेली होती. इतक्यात रवी अरुंधतीचा मुलगा ऑफिसमधुन आला आणि दोघींच्या वाकयुद्धाला पूर्णविराम लागला.


रवी ऑफिसमधून आल्यानंतर सगळे मिळून गप्पा मारत संध्याकाळचा चहा घेतच होते की दाराची बेल वाजली.


" दार उघडंच असताना बेल वाजवण्याची तसदी का घेताय." अशोकराव अरुंधतीचे यजमान ओरडले.


" अहो बाबा ओरडताय काय? थांबा मी पाहातो." म्हणत रवी उठून दारात गेला. समोर पोलिसाच्या युनिफॉर्ममध्ये एक मुलगी उभी होती. 


" अरुंधती शिर्के इथेच राहतात ना? मला अरुंधती मॅडमला भेटायचं आहे." तिने रवीला सांगितलं.


" आई तुला भेटायला कोणीतरी आलंय." रवी बाहेरूनच ओरडला.


" कोण आहे रे..." 


अरुंधती उठून दरवाजात गेली. ती दरवाजात पोहचताच 'मावशी' म्हणत ती मुलगी तिच्या पाया पडली. सात आठ वर्षात चेहऱ्यात थोडाफार बदल झाला असला तरी आवाज तोच होता ओळखीचा, काळजात जपलेला. 


" चिंगे... तू! अशी अचानक. अगं किती वर्षांनी पाहतेय तुला आणि हा युनिफॉर्म. अगं तू पोलीस बिलिस झालीस की काय?" अरुंधती तिच्या शरीरावर पोलिसाचा युनिफॉर्म पाहून चकित झाली होती.


" हो मावशी, मी मागच्याच आठवड्यात पोलीस उपनिरीक्षक पदाचा कार्यभार हाती घेतला आणि योगायोग पहा ना, मी याच शहरात पी एस आय म्हणुन रुजू झाले. वेळ मिळताच पहिलं तुला भेटायला आले. काय गं मावशी सगळी चौकशी दारातच करणार आहेस का?"


" अरे देवा, तुला इतक्या दिवसानंतर पाहून इतका आनंद झाला की कशाचं भानच उरलं नाही बघ. ये... ये आत ये."


त्या मुलीला पाहून अरुंधती खूप खुश झाली होती. हे तिच्या चेहऱ्यावरून स्पष्ट जाणवत होतं. तिने तिला खूप मायेने घरात नेलं. तिला पाहताच अशोकरावांच्या चेहऱ्यावरही एक चमक आली पण प्राचीच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उमटलं होतं.


" अरे चिंगीबाई, पोलिसाच्या गणवेशात. वाह, वाह! मेहनत फळाला आली म्हणायची. खूप प्रगती कर. खुप मोठी हो. प्रतिकूल परिस्थितीच्या आगीत तावून सुलाखून उजळून निघालीस पोरी. " अशोकरावांचा कंठ दाटून आला होता.


" आई, या कोण आहेत. तुम्ही आणि बाबा यांच्या येण्याने खूपच खुश झालेले दिसताय. आपली कोणी नातेवाईक आहे का? यांच्याबद्दल मला काहीच कसं माहिती नाही." प्राची कुतूहलाने अरुंधतीला विचारत होती.


" तुझी ओळख करून द्यायची राहिलीच बघ प्राची, ही सपना... पण आम्ही हिला चिंगीच म्हणतो. अगं, ही माझी लेकचं आहे असं समज. जवळजवळ सात आठ वर्षानंतर आम्ही दोघी भेटतोय." अरुंधतीने खुलासा केला.


" तुमची लेक, म्हणजे... मी नाही समजले आई." 


प्राचीला अरुंधती काय बोलतेय ते समजत नव्हतं. कारण रवी हा अरुंधतीचा एकुलता एक मुलगा होता मग ही लेक...कोण आहे ही. तिला काही कळत नव्हतं.


" अगं रक्ताच्या नात्यालाही पुरून उरतील अशी काही नातीही असतात ग जगात निर्व्याज...निर्भेळ!! त्यात असते ती फक्त मायेची ओलं. त्याचं ओलीने ती मनात रुजत जातात, अंकुरित होतात." अरुंधतीने चिंगीकडे कौतुकाने पाहिलं आणि तिला पहिल्यांदा पाहिलेली चिंगी आठवली.


" चार पाच वर्षांची, तुरूतुरू चालत वेणीचे टीचभर शेपूट पाठीवर हालवत पहिल्यांदा आपली आई सुमनसोबत आली होती तिच्या घरी. डोक्यावर कधी तेलाचं बोट फिरवलं होतं की नाही कोणास ठाऊक. अरुंद कापाळावर कोरड्या केसांच्या महिरपी सजलेल्या. टपोरे डोळे, बारीक नाक सावळ्या रंगाची सपना अगदीच गोड.


सुमन अरुंधतीच्या घरी धुणी भांडी करायची. सुमन तिला चिंगी म्हणायची त्यामुळे अरुंधतीही तिला चिंगीच म्हणू लागली. 


आपल्या इवल्या इवल्या हाताने ती छोटी छोटी भांडी सुमानला विसळू लागायची. अरुंधतीला तिचं भारी कौतुक वाटायचं. 


" सुमन तिला शाळेत घाल हं, ती तुझ्या मागे मागे करते. तिला शिकवून मोठी कर. तुझ्यासारखे भोग तिला भोगायला लावू नकोस." अरुंधती नेहमी सुमनला चिंगीला शाळेत पाठवण्याविषयी सुचवायची.


अरुंधतीच्या सांगण्यावरून आणि तिच्या मदतीने सुमनने सपनाला शाळेत घातले होते. बघता बघता दिवस सरत होते. सुमनला अरुंधतीकडे कामाला येऊन दोन वर्षे उलटत आली होती. 


नंतर अचानक काही दिवस सुमन कामाला आलीच नाही. असेल काहीतरी काम, आजारी असेल, आज येईल, उद्या येईल अरुंधती स्वतःचीच समजूत काढत घरातील काम स्वतःच करत होती. काम करताना तिचा जीव मेटाकुटीला यायचा. तिने ओळखीच्या कोणाकडे निरोप देऊनही महिना दिड महिना सुमन आलीच नाही.


एक दिवस चिंगी अचानक तिच्या काकीला अरुंधतीकडे घेऊन आली.


" बाईसाहेब, मी शोभा आजपासून सुमनच्या जागी मी कामाला येईन बरं. काय काय काम करायचं तेवढं सांगा." 


" का, तू का बरं येशील. सुमन कुठं आहे. ती का नाही आली? तिला सगळं ठाऊक आहे. तीच इथे काम करेल." अरुंधती चिंगीला जवळ घेत बोलली.


" बाईसाहेब, सुमन आता नाही यायची. ती आता या जगात नाही." शोभा उत्तरली.


" काय...? काय म्हणालीस," 


अरुंधती जवळजवळ ओरडलीच आणि तिने चिंगीला घट्ट मिठीत घेतले. थोडं आजारी पडल्याचं निमित्त झालं आणि सुमनने अंथरूण धरलं ती परत उठलीच नाही.


आपण कल्पनेचे उंचच्या उंच मनोरे उभे करावे आणि दैवाने ते निष्ठुरपणे जमीनदोस्त करावे असचं काहीसं चिंगी आणि सुमनसोबत घडलं होतं.


त्या दिवसानंतर शोभा अरुंधतीकडे कामाला येऊ लागली. पण का कुणास ठाऊक, चिंगीची काकी अरुंधतीला मुळीच आवडली नाही. खूपदा चिंगीकडून काकी मारते असे तिने ऐकलं होतं. काकी एकदम घुमी आणि आतल्या गाठीची असल्याची अरुंधतीची मनोमन खात्री झाली होती.


चिंगीच्या बाबांनी सुमनच्या जाण्यानंतर वर्षभरातच दुसरं लग्न केलं. सावत्र आईही सावत्र या शब्दाला मान देऊन त्याचा अर्थ सार्थ करायची. वर्षभरानंतर शोभाच्या जागी तीची सावत्रआई अरुंधतीकडे कामाला येऊ लागली. सोबतीला चिंगीही मदतीला येतच होती.


खरे तर चिंगीचे लाड करून घेण्याचे हे दिवस होते. शाळेत जाण्याचे वय होते. या वयात तिचीच कामे दुसर्‍या कोणी तरी करायला हवी होती; पण प्रत्यक्षात सहाव्या वर्षापासूनच तिने राबायला सुरुवात केली होती. 


शाळा, स्वच्छ कपडे, चांगलं दोन वेळचं जेवण याचा दुरदूरवर कुठेच चिंगीशी काहीच संबंध नव्हता. तिला काम करणे अपरिहार्यच होते.


एक दिवस ती खूप गप्प-गप्प होती. अरुंधतीने तिला खोदून खोदून विचारले असता काही न बोलता एकदम रडायलाच लागली. तिला तिच्या सावत्रआईने बेदम मारले होते. चिंगी अरुंधतीच्या घरी आवश्यकतेपेक्षा जरा जास्तच वेळ रेंगाळते हे तिच्या आईला आवडलं नव्हतं.


" तिला का मारलसं तू," असं तिच्या आईला विचारलं असता ती म्हणाली, 


‘‘ तिला काम करायला नको? फक्त खेळायला पाहिजे. टीव्ही पाहायला पाहिजे. गोष्टीचे, चित्रांचे पुस्तक पाहत बसायला हवं. मग मी तिला मारू नको तर काय करू?’’


तिचे वयच हे खेळण्या-बागडण्याचे. काही वेळा ती स्वत:मध्येच दंग असायची. फरशीवर लंगडी खेळून पाहायची, लहान मुलं अभ्यास करायची तेव्हा भान हरपून पाहत राहायची. गाणं गुणगुणायची. स्वतःमध्येच मग्न असायची. गाणं गाऊ लागली की एकदम स्वप्ननगरीतच जणू संचार व्हायचा तिचा. पण थोडा वेळच हं! पुन्हा उठून कामाला सुरुवात करायची. उमललेल्या फुलांकडे बराच वेळ पाहत बसायची.


अरुंधती तिला समजवायची, 


" तू रोज छान तेल लावून वेणी घालत जा. व्यवस्थित तयार होतं जा. शाळेत जात जा. चांगला अभ्यास कर. खूप मोठी हो."


हळूहळू ती रोज शाळेत जाऊ लागली. शाळा आटोपली की दुपारी आईला मदत करायची. 


शाळा-शिक्षणाचे महत्त्व तिला आता कळू लागले होते. मन लावून अभ्यास करतं ती एक एक इयत्ता उत्तीर्ण करत दहावी पास झाली. अरुंधती तिला शाळेसाठी गुपचूप आर्थिक मदत करत होती. तिचा अभ्यास घेत होती.


" आणखी शिक, खूप शिक. शिक्षण खूप महत्वाचं आहे." अरुंधती हे वरचेवर तिच्या मनावर बिंबवत होती. 


काही वर्षांनंतर अरुंधतीच्या यजमानांची दुसरीकडे बदली झाली आणि ते शहरात आले. येता येता अरुंधतीने तिला काही पैसे आणि एका कागदावर आपला पत्ता लिहून दिला होता. कधी आठवण आली आणि काही गरज भासलीच तर पत्र पाठवं, असं बजावून सांगितलं होतं.


त्यानंतर जवळपास सात आठ वर्षानीं अरुंधती चिंगीला पाहत होती ते ही पोलिसाच्या गणवेशात.


" काय गं अरुंधती कुठे हरवलीस. चहा पाण्याचं काही बघशील की नाही." 


अशोकरावांनी आठवण करून देताच प्राची चहा आणण्यासाठी किचनमध्ये गेली.


" मावशी तू इकडे निघून आलीस आणि माझा उरला सुरला आधारही गेला. एकदम वेड्यासारखं झालं होतं. कशातच मन लागत नव्हतं पण तुझे शब्द नेहमी माझा पाठलाग करत होते. 'खूप शिक... खूप अभ्यास कर... खूप मोठी हो.' आणि ठरवलं खूप शिकायचं मग झपाटून अभ्यासाला लागले. मागे वळून पाहिलं नाही. आज जे काही आहे ते तुझ्यासमोर आहे. मावशी हे सगळं तुझ्यामुळे शक्य झालं."


चिंगी भावविव्हळ झाली होती. तिने डोळे पुसले आणि उठून अरुंधतीला आपल्या पोलिसी ठेक्यात सॅल्युट ठोकला.


" अगं तू त्या चिखलात उमललेल्या कमळाप्रमाणे निरपेक्ष, निरलस जीवन जगलीस. अवतीभोवती कितीही प्रतिकूल परिस्थिती असली तरी त्यावर मात करून स्वतःचे जीवन घडवलेस आणि आता समाजासाठी काहीतरी करण्यासाठी सज्ज आहेस. सगळी तुझीच मेहनत आहे बाळा. मी विशेष असं काही केलं नाही राजा!!"


" एक नवी जवाबदारी आता तुझ्या खांद्यावर आहे. ती ही तू समर्थपणे पेलशील खात्री आहे मला. तू जे काही करशील ते अगदी प्रामाणिकपणे कर आणि यशस्वी हो. माझा आशीर्वाद नेहमी तुझ्यासोबत आहे बाळा." अरुंधती डोळे पुसत बोलली.


" मग चिंगीबाई, नाही... नाही... आता सपना मॅडम, चिंगी म्हणुन कसं चालेल? पार्टी कधी देताय." अशोकरावांनी भावुक झालेलं वतावररण थोडं निवळण्याचा प्रयत्न केला.


" काय हो काका? मी नेहमी तुमच्यासाठी चिंगीच असणार आहे." सपना असं बोलताच सगळे हसायला लागले.


हा सगळा सोहळा पाहून प्राची आश्चर्यचकित झाली. तिला आपल्या सासूबाईंचं कौतुक वाटलं पण सोबतच सकाळी दोघींच्यात झालेली वादावादी ही आठवली.


" तुम्हाला काय कळणार म्हणा शिक्षणाचं महत्व." तिने अरुंधतीला बोललेलं आठवलं आणि ती मनातल्या मनात खाजील झाली. तिला आपली चूक आता कळली होती.


" आई, मला माफ करा. मी सकाळी तुम्हाला जरा जास्तच बोलले. तुम्हाला काय कळणार, असं म्हणत आमची नवी पिढी जुन्या पिढीला नेहमीच डावलतं आली आहे. पण याच जुन्या पिढीच्या संस्काराची मुळं खोल आत मातीत मुरलेली असतात आणि त्याच घट्ट मुळाच्या जोरावर आमचं साम्राज्य उभं असतं हेच आम्ही विसरून जातो. मी चुकले आई, माफ करा मला."


प्राचीने सगळ्यांसमोर अरुंधतीची माफी मागितली तसं अरुंधतीने मोठ्या मनाने पुढे होऊन तिला जवळ घेतलं.


मुलांच्या सर्व लौकिक जबाबदाऱ्या त्यांच्या आईवडिलांच्याच असतात. आजी, आजोबांचे काम त्यांच्यावर निर्भेळ माया करणे एवढेच असते. म्हणूनच आईवडिलांच्या शिस्तीच्या बडग्यापेक्षा आपल्यावर निखळ प्रेम करणारे आजीआजोबा त्यांना जवळचे आणि आपलेसे वाटतात. नातवंडानां लागलेली वाईट सवय ही आजी आजोबांमुळे नसते. मुलं आजी-आजोबांमुळे बिघडत नाहीत तर त्यांच्या प्रेमळ समजावणीने मुलांवर चांगले संस्कार होतात आणि हीचं आजी आजोबांची खासियत आहे.


समाप्त.


तर माझ्या वाचक मित्रमैत्रिणींनो तुम्हाला ही कथा कशी वाटली हे सांगायला अजिबात विसरू नका. कथा आवडल्यास नक्की लाईक, कमेंट आणि लेखकाच्या नावासहित शेअर करा.

© copyright

© all rights reserved.

या कथेच्या प्रकाशनाचे आणि वितरणाचे सारे हक्क लेखिकेकडे राखीव. कथेत अथवा कथेच्या नावात किंवा कथा लेखिकेच्या नावाशिवाय आढळून आल्यास तो कॉपी राईट कायद्याचा भंग मानला जाईल. कथा जशीच्या तशी शेअर करण्यास काहीही हरकत नाही.



Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy