Sunita madhukar patil ( मधुनिता )

Tragedy Inspirational Thriller

4.0  

Sunita madhukar patil ( मधुनिता )

Tragedy Inspirational Thriller

सोनपावले

सोनपावले

7 mins
223


चुलीत फुंकर मारणाऱ्या आईकडे पाहून सम्याच्या चेहऱ्यावर नावाप्रमाणेच समाधान विलासत होतं. त्यानं खूपदा आईला अशी फुंकर मारताना पाहिलं होतं, जेंव्हा ती सिग्नलवर फुगे विकायला जायची... तेंव्हा फुगे फुगवायला मारलेली फुंकर त्याला तितकं समाधान देत नसायचं, जितकं समाधान त्याला चुलीत फुंकर मारल्यानंतर सुलगलेले अंगार पाहून मिळायचं, कारण ती धग त्याच्या पोटातील भुकेचा डोंब शांत करायची. पाच वर्षांचा लहानगा सम्या आपली आई तारा...! आणि दोन वर्षाच्या लहान भावासोबत रस्त्याकडेला टाकलेल्या पालात राहत होता.

ताराने आपल्या दोन वर्षांच्या झोपलेल्या तान्हुल्याला न्याहाळतं फाटक्या पातळाची चिंधी त्याला पांघरु घातली आणि, " ए पोरा...सम्या...! आरं, ध्यान कुठाय तुझं. मी जरा बाहीर जाऊन येती, तवर ह्या आपल्या बाळाकडं ध्यान दी." बोलतच ती बाहेर पडली देखील...!

तारा या शहरात आल्यानंतर तिने खूप लोकांकडे काम मागितलं. कुठे घरकाम मिळतंय का याचा शोध घेत ती दोन लेकरांना घेऊन दारोदार भटकली पण तिचा अवतार, मळकट कपडे, डोक्यावर तेल न मिळाल्यामुळे वाऱ्यावर झुलणाऱ्या झिपऱ्या पाहून लोकांनी तिला काम देण्याऐवजी तिला पाहून नाकं मुरडली.

तारा आपल्या नवऱ्यासोबत एका खेडे गावात राहत होती. तिच्या साऱ्या सकाळी नेहमीच गरम, धूसर असायच्या. आ वासून ठाकलेला दुष्काळ संपायचं नाव घेत नव्हता. सरत नव्हता...! पाऊस नसल्यामुळे स्वतःच्या छोट्याशा जमिनीच्या तुकड्यावर ही काही पिकत नव्हतं आणि दुसऱ्या कोणाच्या शेतातही काम मिळत नव्हतं. दुष्काळाला कंटाळून तिच्या नवऱ्यानं फास लावून स्वतःची सुटका करून घेतली. सारा भार, जवाबदारी हिच्या एकटीवर टाकून तो मुक्त झाला. त्याच्या मृत्यूनंतर तिच्या अशिक्षित असण्याचा फायदा घेत तिच्या दिरांनी होता तो जमीनीचा तुकडा ही स्वतःच्या नावावर करून घेऊन तिला हाकलून दिलं. माहेरी देखील कोणी आसरा दिला नाही. लग्न झालं त्या दिवशीच तू तिकडची झाली बाकी तुझं नशीब म्हणत त्यांनी हात वर केले. ती रस्त्याच्याकडेला पाल टाकून राहत होती. गावी असताना मुलं आणि ती दिवसभर अन्न धुंडाळत राहायची. भाकरी आणि पोटाचं गणित काही सुटत नव्हतं.

तिची अवस्था पाहून सहानुभूतीने कोणीतरी तिला सांगितलं," पोरी...! इथं काय तुझी धडगत दिसत नाय बघ. तुझा निभाव इथं लागायचा नाय. तुझ्या घरची तुला नीट जगू द्यायची नाहीत. तिकडं शेहरात लै पैका असतुया म्हणं...! मोठ्या शेहरात गेलीस तर हाता अन तोंडाची गाठ तर पडलं. लेकरांना दोन येळ पोटभर जेवू तर घालशील. इथं राहिलीस तर नुसता वणवा...!"

भर दुपारची वेळ..अंगाची काहिली...! उन्ह मी म्हणत होती. जीव पाणी पाणी होत होता. काळवंडलेली, कृश तारा... कळकट, मळकट ठिगळ लागलेली साडी... विंचवासारखं पाठीवर बिऱ्हाड घेऊन बिन चपलेची डांबरी काळ्या तापलेल्या रस्त्यावरून फिरत होती. खपाटीला लागलेल्या पोटाच्या खाचित बांधलेली विरलेली झोळी आणि त्यात गाढ झोपलेलं तान्ह पिटुकलं सोबत हात पकडलेला सम्या...! दारोदारी दोन वेळच्या अन्नासाठी भटकत होते.

वादळात अडकलेल्या दिशाहीन नौकेप्रमाणे तिची परिस्थिती झाली होती. वाट भेटेल तिकडे तिची पावले जात होती.

एक दिवस असचं ती रस्त्यावर भटकत होती. हताश होऊन तिनं वर आभाळाकडे पाहिलं. पाऊस पडायचं कोणतंच चिन्ह दिसत नव्हतं. दुपार सरत आली होती पण तिला काहीच मिळालं नव्हतं. ती शोधत शोधत खूप लांबवर आली. सोबतच्या बायका पांगल्या होत्या. काहीतरी मिळेल या आशेने ती गावाबाहेर आली.

रानातुनं भटकत, काहीतरी भेटतय का...! शोधत फिरताना तिच्या डोळ्यासमोर भुकेल्या लेकरांची केविलवाणी तोंड दिसायला लागली. ती तशीच सम्याचा हात पकडून आणि बारक्याला आपल्या उराशी कवटाळून उगीचच चालत होती. इतक्यात बाजूने जाणाऱ्या ट्रॅकवरून रेल्वे धडधडत गेली. ती तशीच रेल्वे रुळाच्या बाजूबाजूने चालत राहिली. स्टेशन येताच अंतिम गंतव्य माहीत नसताना देखील ती कुठल्यातरी रेल्वेत बसली आणि दोन्ही चिमुकल्यांसोबत मुंबई शहरात आली. इथे आल्यानंतरही परिस्थिती जैसे थे, अशीच होती. ती कामासाठी खूप भटकली पण पदरी नेहमी निराशाच आली. कोणी काही शीळपाकं द्यायचे तर कोणी रुपाया, दोन रुपये पुढ्यात टाकून जायचे. त्यातून फुगे, फुलं वगैरे घेऊन ती सिग्नल वर विकायची.

म्हणूनच सम्याला तिच्या लेकाला तिने फुग्यात मारलेल्या फुंकरीपेक्षा चुलीत मारलेली फुंकर तृप्तीची ढेकर देऊन जायची.

त्यादिवशीही सम्याला छोट्याकडे ध्यान द्यायला सांगून ती भाकरीच्या शोधत इकडे तिकडे भटकत खूप लांबवर चालत आली होती. रस्त्यावर जास्त रहदारी नव्हती. कधीतरी एखादी गाडी रस्त्यावरून धावत होती. तो निवांत मोकळा रस्ता तिला थोडा भयाण वाटला. चालता चालता तिच्यापासून थोडया लांब अंतरावर असणाऱ्या कचराकुंडीत कोणीतरी गाडीतून उतरून एक मोठी पिशवी टाकताना तिने पाहिलं. गाडी तिथून निघताच तिने धावत जाऊन त्या कचराकुंडीतील पिशवी बाहेर काढली. शीळ जेवण, काहीतरी खायला असेल या आशेने तिने अधाशासारखी ती पिशवी उघडली तर समोरील दृश्य पाहून ती हादरली.

प्लॅस्टिकच्या मोठ्या पिशवीत एक लहान दोन, तीन दिवसांची चिमुरडी तोंड बांधलेल्या अवस्थेत निपचित पडून होती. तिच्या अंगावर कपड्याच्या नावावर एक पातळ दुपटं होतं. तिने तिला हळूच बाहेर काढलं. तोंडावरची पट्टी सोडली. तिच्या शरीराला, छातीला हात लावून ती जिवंत आहे का? याची खात्री करताच तिचा श्वासोश्वास चालू असल्याचं तिला जाणवलं. ती त्या चिमुरडीला घेऊन बाजूला असणाऱ्या पुलाखाली आली. तिला हालवत, तिच्या हातापायाच्या तळव्यानां हळुवारपने गोंजारत तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करू लागली.

थोड्याच वेळात ताराच्या प्रयत्नांना यश आलं. ती चिमुरडी टाहो फोडून रडू लागली. ती रडताच ताराच्या चेहऱ्यावर एक समाधानाचं हास्य फुललं आणि तिने तिला प्रेमाने आपल्या छातीशी कवटाळलं. तिचा टाहो ऐकून त्या मातेला पान्हा फुटला. ताराने भुकेने व्याकुळ झालेल्या त्या लहानग्या जीवाला आपल्या छातीशी लावलं. जशी जशी त्या लहानगीच्या तोंडात अमृताची धार झरू लागली तशी तशी तारा तृप्त होऊ लागली.

चित्त एकाग्र करून ती तिथेच खुप वेळ बसून राहिली. इतक्यात एक कळकट, मळकट कपड्यातील एक गलिच्छ माणूस अचानक दात इचकत तिच्या पुढ्यात आला. तशी ती घाबरली. ती उठून तिथून चालू लागणार तोच त्याने तिचा हात पकडला आणि तिच्याशी झटायला लागला. तिच्या शरीराला झोंबू लागला. तिच्या अंगावारून हात फिरवू लागला. ती एक माता आहे लहान बालकाला दूध पाजतेय, या गोष्टीने त्या वासनांध लिंग पिसाटाला काही फरक पडत नव्हता. त्याला तर फक्त त्याची वासना शमवण्याशी कर्तव्य होते.

पुढे काय वाढून ठेवलंय याचा अंदाज येताच तिने त्या चिमुकलीला जोरात आपल्या छातीशी कवटाळलं आणि त्याचा प्रतिकार करू लागली, ओरडू लागली...! तिच्या किंकाळ्यांचा आवाज ऐकायला तिथे कोणी नव्हतं. त्याने पूर्ण ताकदीनिशी तिला खाली ऊताणी पाडली. तिच्या हातातल्या बाळाला खेचून तिच्यापासून वेगळं केलं. तो त्याचा कार्यभाग उरकणार हे तिनं ताडलं आणि क्षणाचाही विलंब न करता जोरात त्याच्या हाताचा चावा घेतला तसा त्याच्या हाताच्या मांसाचा मोठा लचका तिच्या तोंडात आला आणि तो वेदनेने तडफडू लागला. त्याच्या हातातून रक्त वाहत होतं आणि तिचं तोंड पूर्णपणे रक्ताने माखलं होतं. दोन्ही पायावर ती थरथरत उभी राहिली आणि पटकन त्या चिमुरडीला उचलून तिने तिथून पळ काढला.

ती धावत होती... जीव मुठीत घेऊन...! तिने एक वेळही मागे वळून पाहिलं नाही. भेरदरलेल्या अवस्थेत ती जिवाच्या आकांताने धावत होती. धावत धावत ती एका ट्राफिक सिग्नल जवळ पोहचली. ट्राफिक पोलिसाला पाहताच तिच्या जीवात जीव आला. ती त्याच्याजवळ पोहचताच तिने बाळाबद्दल त्याला सांगायला सुरुवात केली. तिचा अवतार, रक्ताने माखलेलं तोंड पाहून त्याने तिचं काहीच ऐकून न घेता तिला तिथून पिटाळून लावलं. तिला आता काहीच कळत नव्हतं काय करावं, कुठे जावं कोणाची मदत घ्यावी. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते.

तिची मानसिक अवस्था काही बरी दिसत नव्हती. ती भेदरलेल्या नजरेने कावरीबावरी होऊन इकडे तिकडे पाहत होती. तिला सम्या आणि लहनग्याचा चेहरा एकदम आठवला आणि तिची पावले आपोआप तिच्या पालाच्या दिशेने वळाली. मुलं भुकेली असतील,,, आपण कधीपासून बाहेरच आहोत याची जाणीव तिला होताच तिचा कंठ दाटून आला.

ती झपाझपा पावले टाकत निघाली इतक्यात पाठीमागून दुर्गा मातेच्या विसर्जनाची मिरवणूक आली. नवरात्रीचं पर्व नुकतंच संपलं होतं. दुर्गामातेच्या विसर्जनाचा मुहूर्त होता. ढोल, ताशे वाजत होते. एकच जल्लोष उसळला होता. ढोल ताशांच्या गजरात सारा आसमंत दणाणून गेला होता.

ढोलाचा आवाज कानावर पडताच ताराचे पाय थिरकू लागले आणि तिच्याही नकळत तिच्या पायांनी त्या ढोलाच्या तालावर ठेका धरला आणि एका हाताने त्या चिमुकलीला तशीच छातीशी कवटाळून ती बेभान, बेधुंद होऊन नाचू लागली. तिचा सगळा रोष, राग, मनाची तगमग सार काही त्या नाचातुन व्यक्त होत होतं. तिचा अवतार, फाटकी ठिगळ लावलेली मळकट साडी, रक्ताने माखलेलं तोंड, आग ओकणारी नजर...! तिच्या एकाएका अंगाप्रत्यांगातून भावनांचा उद्रेक होत होता. साक्षात दुर्गादेवीचं रौद्र रूप तिच्यात संचारलं आहे असा भास लोकांना झाला आणि त्यांच्या नजरा आपसूकच तिच्याकडे वळाल्या.

ती किती वेळ नाचत होती याच भान कोणालाच नव्हतं. लोकांनी तिच्या समोर पैसे फेकायला सुरवात केली. पैशासाठी, भाकरीसाठी दारोदार फिरणाऱ्या तिचं लक्ष मात्र आज पैशाकडे नव्हतं. तिच्या मनातील तगमग, राग बाहेर पडत होता. खूप वेळ नाचल्यानंतर ती दमली, थकून भागून तिच्यातील आवेश ओसरू लागला... हळुहळु शांत होत तिने तिथेच खाली फतकल मारले आणि त्या चिमुरडीला छातीशी कवटाळून जोरात टाहो फोडला. मनसोक्त रडून झाल्यानंतर तिने आजूबाजूला पाहिलं. लोकांची गर्दी जमली होती. सगळे तिच्याकडे कुतूहलाने पाहत होते. एक नयनरम्य नृत्याविष्कार लोकांनी अनुभवला होता. तिच्या आजूबाजूला पैशाचा पाऊस पडला होता.

कुशीतल्या त्या चिमुकलीकडे पाहून ती हसली. " माझी लक्षुमी... लक्षुमीच्या सोनपावलाने आलीस गं तू, माझ्या आविष्यात... आजपासून तू माझी लक्षुमी..!" म्हणत ताराने तिचे पटापटा खूप पापे घेतले. तिने सगळे पैसे गोळा करायला सुरुवात केली. खुप दिवसानंतर ती पहिल्यांदा इतके पैसे पाहत होती. पैसे गोळा केल्यानंतर तिने तिच्या पालाचा रस्ता पकडला. घरी जाताजाता तिने त्या पैशातून मुलांसाठी भरपूर खाऊ घेतला.

सम्या आपल्या लहान भावाला कडेवर घेऊन तिचीच वाट पाहत होता. त्या लहान चिमुरडीला पाहून सम्या खूप खुश झाला. ताराने, "आजपासनं ती तुम्हा दोघांची लहान बहीण बरं का...! हिची नीट काळजी घ्यायची, आन हीच नाव लक्षुमी... माझी लक्षुमी...! ह्या कोवळ्या जिवानं मला माझी वाट दावली रं, सम्या...!" म्हणत त्या तिघांनाही तिने घट्ट मिठी मारली. तिला आता तिची वाट गवसली होती. त्या चिमुरडीच्या येण्याने तिच्यातील नृत्यकलेची जाणीव तिला झाली होती.

आज पासून ती कोणापुढे हात न पसरता शहरातल्या मोठया देवीच्या देवळासमोर आपली कला... आपलं नृत्य सादर करून पोट भरणार होती. जी काळाच्या ओघात, परिस्थितीच्या तडाख्यात कुठेतरी हरवली होती...!

परिस्थिती बदलायला केवळ एक क्षण पुरेसा असतो, फक्त तो एक क्षण माणसाला ओळखता आला पाहिजे आणि मिळालेल्या संधीच सोनं करत जीवनाला एक नवी दिशा देता आली पाहीजे. तो क्षण ताराने ओळखला होता.

सम्याला त्याची आई आता रोज फुग्यात नाही तर चुलीत फुंकर मारताना दिसणार होती आणि तो तिला चुलीत फुंकर मारताना पाहून तृप्तीची ढेकर देणार होता.

(समाप्त)


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy