Sunita madhukar patil ( मधुनिता )

Tragedy Inspirational

4.0  

Sunita madhukar patil ( मधुनिता )

Tragedy Inspirational

स्वीटहार्ट

स्वीटहार्ट

8 mins
411


दहा दिवस झाले ना तिच्याशी बोलणं झालं होतं ना तिचा मेसेज आला होता. एक एक क्षण युगासारखा वाटत होता त्याला. मनात शंकाकुशंका घर करत होत्या पण तो स्वतःची समजूत घालून मनात चाललेल्या वादळाला शमवण्याचा प्रयत्न करत होता. हाच उहापोह सुरू असताना अचानक मोबाईलवर मेसेजची नोटिफिकेशन ट्यून वाजली तसा त्याने घाईघाईने मोबाईल पाहिला. तिचाच मेसेज होता,


" हाय! पंधरा मिनिटात शंकराच्या देवळासमोरच्या बागेत ये."


मृत्यूशैयेवर असलेल्या शरीराला संजीवनी मिळताच जसं त्याच्यात चैतन्य संचारतं अगदी तसंच तिचा मेसेज वाचताच त्याच्या अंगात वीज संचारली आणि तो चौदाव्या मिनिटाला बागेत हजर झाला. 


" काय हे, आज दहा दिवस झाले, ना तुझा मेसेज ना फोन आणि मी फोन करतोय तर तुझा फोन आऊट ऑफ कव्हरेज. तुला माहिती आहे माझी काय अवस्था झाली होती इथे. राहून राहून एकच विचार मनात येत होता..." तिला पाहताच त्याचा संयम गळून पडला 


" काय... कोणता विचार? मी गचकले की काय हाच ना पण देवबाबू इतनी आसानी से तेरा पिच्छा नही छोडेगी यह तेरी स्वीटहार्ट! अरे, मैत्रिणींनी अचानक केरळची ट्रिप प्लॅन केली. घाईगडबडीत तुला सांगायलाच विसरले बघ. नंतर लक्षात आलं पण म्हटलं होऊ देत तुलाही थोडं कासावीस." ती मिश्कीलपणे हसत म्हणाली.


" हे बघ तू जर असं करणार असशील ना तर मला तुझ्याशी बोलायचंच नाही. बोलायचं काय... मला तुझ्याशी कुठलं नातंच नाही ठेवायचं. मागेही चार दिवस असेच न सांगता गायब झाली होतीस. तुला कोणतं सुख मिळतं गं माझा जीव असा टांगणीला लावण्यात." त्याच्या डोळ्यात ढग दाटून आले.


" तू नातं तोडणार माझ्याशी? अरे जा... जा शक्यच नाही. देव कधी लांब जातो का? तो तर नेहमी हृदयात वास करून असतो, एकरूप असतो. मग कसा जाशील तू माझ्यापासून लांब."


" म्हणूनच अशी छळतेस ना मला?" तो कासावीस झाला.


" तसं नाही रे, तुला सवय... बरं ते जाऊ दे. हे पहा मी केरळहून तुझ्यासाठी काय आणलं आहे." 


तिने बोलता बोलता विषय बदलला आणि बॅगेतून सुंदर शंखशिंपल्यानी सजवलेली फोटो फ्रेम बाहेर काढली. त्या फ्रेममध्ये तिने मागच्यावेळी दोघांनी समुद्रकिनारी मावळतीचा सूर्य पाहताना काढलेला फोटो सजवला होता. 


" ह्या सुर्यासारखी मीही एखाद्या दिवशी अशीच अस्त..." 


ती पुढे काही बोलणार इतक्यात त्याने तिच्या तोंडावर हात ठेवला आणि तिला जवळ घेतलं. दोघांच्याही डोळ्यातून आसवे वाहत होती. बराच वेळ कोणी काहीच बोललं नाही. वातावरणानेही बहुदा मौन साधलं होतं. थोड्याच वेळात आरतीची वेळ झाल्याने देवळातली घंटा वाजू लागली आणि दोघांची तंद्री भंगली.


" बरं चल निघते आता, बराच उशीर झाला. उद्या भेटू आपण. फोन करेन मी." बोलता बोलता तिने पदराने त्याचे डोळे पुसले आणि फोटो त्याच्या हाती टेकवून तरा तरा निघूनही गेली. ती नजरेआड होईपर्यंत तो तसाच तिला पाहत उभा राहिला.


दुसऱ्या दिवशी दिवसभर तो तिच्या फोनची वाट पाहत होता पण तिचा फोन आलाच नाही त्यामुळे तो थोडा अस्वस्थ झाला. शेवटी वाट पाहून त्याने तिला फोन केला. तो बोलणार इतक्यात समोरून आवाज आला.


" देवा अरे, दार उघड ना."


" म्हणजे...?"


" अरे ऐकू नाही आलं का दार उघड."


त्याने गडबडीत दरवाजा उघडला तर दारात ती उभी. हातातलं पार्सल सांभाळत त्याला धक्का देत ती आत घुसली.


" अगं काय हे, तू इथे का आलीस. तुला माहिती आहे ना मी इथे पेइंग गेस्ट म्हणून राहतो आणि इथल्या काकूंना बाहेरच कोणी इथं आलेलं आवडत नाही. माझा रूममेटही आता येतच असेल. तू चल बरं इथून मी तुला घरी सोडतो." त्याने इकडे तिकडे पाहत अंगावर शर्ट चढवला.


" ए गप्प रे तू. किती घाबरतोस. मी इथे येता येता तुझ्या काकूंनाही आमंत्रण देऊन आलेय. त्याही इथे येतच असतील. आज मस्त पार्टी करायचा मूड आहे. ही पहा तुझ्या आवडीची कोथिंबीर वडी आणि मँगो मस्तानी घेऊन आलेय." त्याच्याशी बोलता बोलता तिने आणलेलं जेवण ताटांमध्ये वाढूनही घेतलं. 


तिला असे वेळी अवेळी धक्के देण्याची सवय होती. ती कधी कशी वागेल याचा त्याला कधीच अंदाज बांधता आला नाही. मागील महिन्यात त्याच्या सत्ताविसाव्या वाढदिवशी ती त्याच्यासाठी सत्तावीस गिफ्ट घेऊन आली होती. कधी रात्री तिला बाईकवर लॉंग राईडला जायचं असायचं तर कधी काहीच पूर्वकल्पना न देता ट्रेकिंगला जायचं असायचं.

तिच्या अशा वागण्याचा त्याला कधी कधी राग यायचा तर कधी तिच्यातील असाधारण ऊर्जा पाहून तो आश्चर्यचकित व्हायचा.


असंच एका रविवारी सकाळी उशिरा पर्यंत ताणून द्यावं म्हणून त्याने फोन सायलेंट मोड वर ठेवला होता. पहाटे कसल्याशा आवाजाने त्याची झोप चाळवली. त्याने सहजच मोबाईल पाहिला. पहाटेचे पाच वाजले होते आणि तिचे पंधरा मिसकॉल. घाबरून त्याने तिला फोन केला,


" हॅलो, काय झालं, बरी आहेस ना?"


" तू तयार होऊन गावाबाहेरील तळ्याकाठी ये." 


" आत्ता, इतक्या सकाळी... बाहेर थंडी किती आहे माहिती नाही का?"


" हो माहिती आहे तरीही आता लगेच निघ. मी दहा मिनिटात पोहचेन तिथे." इतकं बोलून तिने फोन कट केला.


तो दहा मिनिटात तिथे पोहचला. ती आधीच तिथे येऊन बसली होती. तो गुपचूप तिच्या शेजारी जाऊन बसला. त्याची चाहूल लागताच तिने सोबत आणलेल्या थर्मासमधून दोन चहाचे कप भरले. एक त्याच्या हाती सोपवला आणि बोलायला सुरुवात केली,


" तळ्यातल्या पाण्यात पाय सोडून या उगवत्या सूर्याला न्याहाळण्याची मजा काही औरच ना! हा वाहणारा मंद गार वारा आणि सोबत वाफाळणारा चहा." 


" ह्या अशा गोठवणाऱ्या गार पाण्यात... धन्य आहेस तू." त्याला शहारून आलं.


" ए आपल्याला भेटून किती दिवस झाले रे?"


" दोन वर्षं तरी उलटून गेली असतील, हो ना." त्याने अंदाज व्यक्त केला.


" तिसावा महिना चालू आहे. म्हणजेच जवळ जवळ अडीच वर्षे होतं आली. ए तुला आपली पहिली भेट आठवतेय का रे?" ती शून्यात पाहत बोलली.


" हो आठवतेय ना, एकदम स्पष्ट.." आणि तो दिवस दोघांच्याही स्मृतीपटलावर फेर धरू लागला.


त्या दिवशी तब्येत बरी नसल्याने त्याने ऑफिसमधून हाफ डे घेतला होता. बस स्टॉपवर बसची वाट पाहत उभा असताना त्याने आजूबाजूला पाहिलं. दुपारची वेळ, वर्दळ तशी कमीच होती. मागे बाकावर ती बसली होती. त्याचं लक्ष तिच्याकडे गेलंच होतं की काही कळायच्या आत ती चक्कर येऊन खाली कोसळली. त्याला काय करावं काही कळेना. बसस्टॉपवर त्यावेळी कोणीच नव्हतं. त्याने लगबगीने पुढे होऊन तिला उठवण्याचा प्रयत्न केला. पण काहीच प्रतिसाद मिळत नव्हता. तिच्या अचेत चेहऱ्यावर त्याने पाणी शिंपडलं पण काही उपयोग झाला नाही. रस्त्यावरून जाणाऱ्या व्यक्तींच्या मदतीने त्याने तिला घेऊन हॉस्पिटल गाठलं. वेळीच उपचार मिळाल्याने तिच्यावर ओढवलेलं संकट टळलं होतं. नियमित घ्यायची औषध न घेतल्यामुळे तिला चक्कर आली होती. थोडं बरं वाटल्यावर तिला घरी सोडून निघताना तिने त्याचा हात पकडला.


" माझा शेवटही असाच पार लावशील का रे..?" तिला गहिवरून आलं.


" तुम्ही वेळेवर औषधं का नाही घेतली काकू." 


" काकू... काकू नको रे. आता ह्या नात्यांची फार भीती वाटते. जिथे रक्ताच्या नात्यांनी पाठ फिरवली तिथे आणखी खोटी नाती नकोत आणि औषधांच काय रे... ती हातातून निसटून जाणारं आयुष्य परत थोडंच देणार आहेत." ती बोलता बोलता उठली.


" तुम्हाला काय झालं आहे, मला सांगाल का प्लिज!." त्याने कुतूहलाने विचारलं.


" मला हृदयविकार आहे. हृदयाच्या झडपा खराब झाल्या आहेत, आणखीही बरंच काही. मला नाही कळत ती डॉक्टरी भाषा. तातडीने ऑपरेशन करायला सांगितलं आहे. लाखांमध्ये खर्च होणार पण इतके पैसे मी कुठून आणणार?" हतबलता तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट जाणवत होती.


" तुमचे कोणी नातेवाईक..."


" आहे एक मुलगा, परदेशात स्थायिक आहे पण त्याला माझ्याशी काही देणं घेणं नाही. तो रमलाय त्याच्या संसारात महिन्याला ठराविक रक्कम खात्यात जमा केली की झाली कर्तव्यपूर्ती. आता तर तेही कमी झालं आहे. आठवण करून द्यावी लागते. पाच वर्षांपूर्वी वडिलांच्या कार्याला आला होता त्यानंतर वळून पाहिलं नाही. पाच वर्षांपूर्वी हे गेले आणि सारं संपल..." तोंडाला पदर लावत तिने गळयात दाटलेला आवंढा गिळला. यावर काय बोलावं त्याला काही कळेना. थोडा वेळ तो तसाच बसून राहिला. थोड्यावेळाने तो निरोप घेऊन निघणार तोच ती म्हणाली,


" उद्या येशील का रे? माझ्याकडे फक्त एक महिना शिल्लक आहे. तीस दिवसांचेच श्वास माझ्या पदरात आहेत. प्लिज येशील." तिच्या डोळ्यात एक आर्जव होती.


त्याला गलबलून आलं. एक नजर त्याने तिला पाहिलं आणि तो तिथून निघाला. दुसऱ्या दिवशी आपसूकच त्याची पावलं तिच्या घराकडे वळाली. तीस दिवसांची तर गोष्ट होती. ओळख वाढली, फोन नंबरची आदला बदली झाली. रोज औषधांच्या वेळा लक्षात ठेवून तो तिला फोन करू लागला. भेटीगाठी वाढल्या. तासनतास गप्पा रंगू लागल्या. एकमेकांची काळजी घेतली जाऊ लागली. वेळ मिळेल तेंव्हा बाहेर फिरणं, शॉपिंग, हॉटेलात जेवण, तिची बकेट लिस्ट पूर्ण होऊ लागली. बघता बघता महिना कधी सरून गेला दोघांनाही कळलं नाही. मध्येच कधी तरी तिची तब्येत अचानक बिघडायची पण तो आहे हा विश्वास तिला बळ द्यायचा. दोघांमध्ये एक अनामिक नातं तयार झालं. त्यात फक्त आणि फक्त प्रेम होतं... निस्वार्थ प्रेम. 

एक दिवस चेष्टेत तिने त्याला विचारलं,


" मी तुझी कोण लागते रे, माझी इतकी काळजी करतोस."


" स्वीटहार्ट...!" 


क्षणाचाही विलंब न करता तो उत्तरला आणि मोठमोठ्याने हसू लागला. आयत्या वेळेला तो देवा सारखा धावून आल्यामुळे ती त्याला नेहमी देवा म्हणायची. असा हा त्यांचा तीस दिवसांसाठी सुरू झालेला अनामिक प्रवास आज तीस महिन्यांवर येऊन ठेपला होता. 


एव्हाना सूर्य बराच वर आला होता. बघता बघता चहाचा थर्मासही रिकामा झाला. ऑफिसला जायची वेळ झाल्याने दोघे उठले आणि घरच्या दिशेने चालू लागले. 


दोन दिवसांनी तिचा साठावा वाढदिवस होता. तो संपूर्ण दिवस तिच्यासोबत घालवायचा त्याचं ठरलं होतं. तिच्यासाठी त्याने सरप्राईज प्लान केलं आणि सकाळी लौकरच तो तिच्या घरी पोहचला. ती थोडी अस्वस्थ दिसत होती. बहुधा तिला त्रास होत होता. तिने केक कापला आणि केकचा तुकडा हातात घेऊन त्याला भरवणार इतक्यात ती खाली कोसळली. तो घाबरला,


" काय होतंय तुला, आपण डॉक्टरकडे जाऊ. तू अजिबात घाबरू नकोस. मी आहे ना!"

 

" नाही देवा, माझ्याकडे जास्त वेळ नाही. जायच्या आधी मला एक वचन हवं आहे. माझे सगळे अंतिम विधी तू करायचे, मला वचन दे, देवा." ती बोलताना अडखळत होती. तिला छातीवर दबाव जाणवत होता. श्वास घ्यायला त्रास होत होता. तिने त्याचा हात घट्ट धरून ठेवला.


" नाही, तुला काही होणार नाही. आपण लगेच हॉस्पिटलला जायला निघतोय. देव इतका निष्ठुर नाही. त्याने एकदा मला पोरकं केलं होतं. आता परत नाही. तू घाबरू नकोस मी आहे ना. थोडा धीर धर." त्याने हात सोडवण्याचा प्रयत्न केला पण तिची पकड अधिकच घट्ट झाली.


" नाही देवा, मला वचन हवंय. दे ना मला वचन. माझे अंतिम विधी तुझ्याच..." पुढील शब्द तिच्या तोंडातच विरले

तिची काया थंड होती. चेहरा पिवळा फटक पडला होता. ओठांवर सस्मित भाव होते आणि चेहऱ्यावर समाधान...

______________________


हातातला कलश त्याने हळुवारपणे पाण्यात सोडला. कृष्णेच्या पवित्र पाण्यात राख आणि अस्थींचा एक पांढरा ठिपका उमटला. निश्चल नजरेनं तो समोर पहात होता. ती समोर उभी असल्याचा भास झाला. त्याने ड़ोळे मिटले तसं डोळ्यातलं पाणी ओघळून गालावर आलं.


मानवी जीवनात नात्यांना फार महत्व आहे. इथे प्रत्येकजण वेगवेगळ्या नात्यांच्या वर्तुळाने वेढला आहे. प्रत्येकाचा व्यास आणि परीघ वेगळा. पण त्या परिघापल्याड काही नाती अशी तयार होतात त्यांना कोणतंही नावाचं लेबल नसतं. अशी नाती अबाधित असतात आणि आजन्म मनात घर करून राहतात ती व्यक्ती काळाच्या पडद्याआड गेली तरीही...


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy