Sunita madhukar patil ( मधुनिता )

Tragedy Inspirational Thriller

4.0  

Sunita madhukar patil ( मधुनिता )

Tragedy Inspirational Thriller

गुपित

गुपित

7 mins
249


भेगाळल्या भुईत हिरवं सपान पेरिते... मी

फाटक्या आभाळा रोज ठिगाळ जोडीते.


आपल्याच तंद्रीत ती फरशी पुसता पुसता असचं काहीसं गुणगुणत होती. तिचे हात भराभर फरशीवर फिरत होते.


" काय गं कांता, पाचव्यांदा." कांताच्या अर्धमेल्या शरीराला वाढताना पाहून अवनीने शेवटी न राहवून तिला विचारलंच.


अवनीच्या या वाक्यावर कांताला काय बोलावं काही सुचेना. तिने पदराने आपलं पोट झाकत अवनीकडे केविलवाण्या नजरेने पाहिलं. तिच्या नजरेत अवनीला हतबलतेची भावना स्पष्ट जाणवत होती.


" अगं, तुला हे बाळंतपण झेपणार आहे का? बाळाला जन्म देऊ शकशील इतकं रक्त तरी आहे का तुझ्या शरीरात." अवनी जवळजवळ तिला ओरडतच होती.


" नशिबाचे भोग बाईसाहेब, ते कुणाला चुकल्यात होय. ते भोगायाच लागणार. पयल्या चार पोरीचं जन्माला आल्या. पोरगं होईस्तोवर हे सगळं असचं चालू राहणार." एव्हाना कांताच्या डोळ्यात आसवांनी गर्दी केली होती.


" अगं कसले नशिबाचे भोग? तू ठरवलसं ना तर हे सगळं थांबू शकतं. नसबंदी करून घे स्वतःची. आधीच चार पोरी आहेत पदरात आणि तू अशी दिवसेंदिवस खंगत चालली आहेस. उद्या तुला जर काही झालं तर त्या पोरींकडे कोण बघणार." अवनी तिला समजावण्याचा हरसंभव प्रयत्न करत होती.


"जाऊ द्या, बाईसाहेब तुम्ही मोठी माणसं. तुमास्नी काय कळणार आम्हा गरीबा घरच्या कथा." कांता तो विषय तिथेच थांबवत आपल्या कामाला लागली.


पंचविशीच्या आसपासची कांता अवनीकडे घरकाम करायची. ऐन पंचवीशीतच ती चाळीशीची वाटू लागली होती. अंगाने बारीक जणू हाडांचा सापळाच बनलं होतं तिचं शरीर. डोळ्यांखाली काजळी वर्तुळ फेर धरू लागली होती. चेहऱ्यावरचा गोडवा, तेज हरवून त्याची जागा थकव्याने आणि चिंतेने घेतली होती. हे सगळं वरवरचं होतं पण तिच्या आत जे विस्कटलं होतं ते तिचं तिलाच ठाऊक होतं.

कणाकणाने लोप पावणारं तिचं अस्तित्व आत टाहो फोडत होतं आणि त्याच्या किंकाळ्या तिच्या तिलाच ऐकू येत होत्या.


सोळावं सरताच लग्न होऊन गुलाबी स्वप्नं रंगवत ती नवऱ्यासोबत पहिल्यांदा शहरात आली होती. दिवसभर काम करून थकूनभागून रात्री अंथरुणाला पाठ टेकताच नवराबायकोच्या नात्याचं वर्तुळं एकमेकांना थोडसं छेद देत होतं ते ही फक्त शारीरिक गरज म्हणून...! दोघांच्या मनाचं मनाशी जुळण कधी झालंच नव्हती. भावनांची, प्रेमाची गुंतवणूक अशी कधी झालीच नव्हती.


वर्षभरातच घरात पाळणा हलला आणि लक्ष्मीच्या पावलांनी एका गोड परीचं आगमन झालं. परी आली खरी पण येताना आपल्यासोबत जादूची कांडी आणायला ती विसरली होती बहुतेक कारण ती येताच कांताच्या नशिबाचे भोग सुरू झाले होते. 


मुलगी झाली म्हणून नवऱ्याचं दारू पिऊन मारहाण करणं आणि रात्री अंथरुणात राक्षसासारखा राग काढणं सुरू झालं. तिची खूप मानसिक कुचंबणा आणि हेळसांड होऊ लागली. मुलगी झाली म्हणून तो नाराज आहे मुलगा झाला की सगळं ठीक होईल. या आशेवर ती दिवस कंठत होती पण एका पाठोपाठ तिला चार पोरीचं झाल्या. रोजचं जगणं देखील तिला मरणासारखं वाटत होतं. 


आणि या अवस्थेतच आता ती पाचव्यांदा गरोदर होती. यावेळी तरी मुलगा व्हावा म्हणजे हे भोग तरी सरतील म्हणून ती देवाकडे प्रार्थना करत होती. देवानेही यावेळी तिच्याबाजूने कौल दिला आणि खरंच तिला मुलगा झाला. हॉस्पिटलमध्ये जेव्हा नर्सनं येऊन तिला मुलगा झाल्याचं सांगितलं, तेव्हा ती रडायलाच लागली. कमकुवत, अशक्त शरीरात बाळ सांभाळल्यामुळे आलेला थकवा आणि सहा सात तास सहन केलेल्या प्रसवकळेच दुःख एका निमिषात दूर झालं.


मुलगा झाल्यावर तरी ग्रह फिरतील आणि सुख दारी येईल अशी आशा होती तिला पण तसं काहीच घडलं नाही. पूर्वीचे वाईट प्रकार सुरूच राहिले. अन्याय आणि राक्षसासारखं वागणं हे कमी होण्याऐवजी अधिकच वाढत होतं. आता माझं काय चुकलं? आता तर मी मुलालाही जन्म दिला असे अनेक प्रश्न तिच्या मनात पिंगा घालायचे पण या सगळ्यांची उत्तरं तिच्याकडे नव्हती. हळूहळू तिला आता खात्री पटत चालली होती की तिच्या नवऱ्याला राक्षस बनण्याची सवयच लागून गेली आहे. तिचं शरीर आणि मन आता पूर्ण तुटलं होतं. या सगळ्या अत्याचारांमुळे पुन्हा गरोदर होईल की काय ही भीती आता तिला सतत वाटू लागली होती कारण तिचं शरीर इतकं कमकुवत झालं होतं की पुन्हा जर असं काही घडलं तर ते तिच्या जीवावर बेतणार होतं. 


दिवसेंदिवस ती अधिकच कृश होत चालली होती. तिचं खंगत चाललेलं शरीर आणि पडलेला चेहरा पाहून एक दिवस अवनीने तिला विचारलं,


" काय गं, आता तर मुलगाही झाला मग ही अशी उतरती कळा का? चांगलं अंगावर मूठभर मास चढण्याऐवजी दिवसेंदिवस ढासळतच चालली आहेस. सगळं बरं आहे ना?"


अवनीच्या या प्रश्नावर कांता फक्त तिच्याकडे पाहून कसनुसं हसली.


" बरं मला एका प्रश्नाचं उत्तर देशील, उद्या समज देव तुझ्यावर प्रसन्न झाला आणि तुझ्यासमोर प्रकट झाला तर त्याच्याजवळ तू काय मागशील." अवनीने परत प्रश्न केला.


" मला परत आई नाही बनायचं." कांता क्षणाचाही विलंब न करता पटकन बोलून गेली.


" अगं मग हे तुझ्याच हातात आहे. त्यासाठी देव प्रकट होण्याची काय गरज आहे. मी तुला आधी पण सांगितलं होतं."


" अहो बाईसाहेब, मी नवऱ्याला खूप समजवायचा प्रयत्न केला. खाणारी चार तोंड हायती घरात. त्यांची जिम्मेदारी उचला, जरा काम करा. उगं बिथरल्यागत वागू नका पण त्याला काय मी रानट्यासारखं वागण्यापासनं आडवू शकत नाय. त्यो काय माझं ऐकत नाय. माझ्या या अशक्त शरीराची त्याला काही बी फिकीर नाय बघा आणि मुलांची जिम्मेदारी त्यो बाप जन्मात घ्यायचा नाय." कांताने खुलासा केला.


" अगं पण कांता तू त्याला रात्री अडवू शकत नाहीस. पण स्वतःला गरोदर होण्यापासून तर वाचवू शकशील ना. माझं ऐक तू नसबंदीच ऑपरेशन करून घे." अवनीने उपाय सुचवला.


" अहो पण त्याला अजून एक पोरगा पायजी. एकाला दोघ असलेली बरी असं त्याचं म्हणणं हाय. त्यो काय ह्या ऑपरीशनाला तयार हुणार नाय." कांता बिचकत बिचकत बोलली.


" अगं त्याला ऑपरेशनाबद्दल सांगूच नकोस. तुझं तू गुपचूप करून घे. असही तो लक्ष देतच नाही तुझ्या तब्येतीकडे मग तूच तुझी काळजी का घेत नाहीस. त्याला जेंव्हा समजेल तेंव्हा बघता येईल." अवनीने सुचवलं.


अवनीने जो उपाय सुचवला होता ते ऐकून कांता विचारात पडली. नवऱ्याला खोटं बोलायच. इतकी मोठी गोष्ट त्याच्यापासून लपवायची. असं नव्हतं की ती या आधी खोटं बोलली नव्हती. ती यापूर्वीही नवऱ्याशी कित्येकदा खोटं बोलली होती पण आधीची गोष्ट जरा निराळी होती. ती नवऱ्यापासून स्वतःचा खरा पगार लपवायची. खोटाच कमी पैशाचा आकडा ती त्याला सांगायची कारण त्यामुळे तिला काही पैसे संसारासाठी साठवता येत होते. मुलांच्या प्राथमिक गरजा पूर्ण करता येत होत्या. नवऱ्याला दारूत पैसे उडवण्यापासून रोखताही येत होतं. 


पण आताचं हे खोटं बोलणं म्हणजे...


तिला हे देखील चांगलंच ठाऊक होतं की, जर खोटं बोललेलं त्याला समजलं तर तो तीचे हालहाल करेल. राक्षसासारखा तो तिच्यावर तुटून पडले मग ती जिवंत आहे की मेली याचा देखील विचार तो करणार नाही. ती द्विधा मनस्थितीत होती काय करावं तिला काही कळत नव्हतं. खूप दिवस विचार करण्यात निघून गेले. तिला बरेच प्रश्न पडले होते. एक मन अवनीने दाखवलेल्या रस्त्याकडे ओढ घेत होत तर दुसरं मन भीतीने त्या रस्त्यावर जाण्यास धजावत नव्हतं. हा सगळा मानसिक गुंता काही केल्याने सुटत नव्हता.


एक दिवस कांता रडत रडतच अवनिकडे आली. तिच्या नवऱ्याने दारू पिऊन तिला खूप मारले होते. इतकंच करून तो थांबला नव्हता तर रात्री अंथरुणात त्याने तिच्यावर अमानुष अत्याचार केला होता. या सगळ्यामुळे ती पुरती कोलमडून गेली होती.


" का इतका अत्याचार सहन करतेस, सोडून का देत नाहीस त्याला. अगं एखाद्या दिवशी जीव घेईल तो तुझा. निदान पोरींचा विचार करून तरी वेगळी हो. तुला काय झालं तर त्याला काही फरक पडणार नाही पण तुझ्या पोरी अनाथ होतील गं." कांताची अवस्था पाहून अवनी भयंकर चिडली होती.

 

" त्याला कसं सोडणार बाईसाहेब, त्याला नाही सोडू शकत. बाईच्या जातीला हे सगळं सहन करायाचं लागतं. नवरा म्हणजे देव, त्याच्या म्होरं जाऊन कसं चालणार. आईनं लहानपणापासू हेच सगळं शिकवलं हाय. मी त्येला, त्याच्या सवयीला नाय बदलू शकत. मग म्याच ह्या सगळ्याची सवय स्वतःला लावून घेतली हाय बघा पण ह्या समद्यात म्या परत पोटुशी राहिली तर... त्याला अजून एक पोरगा पायजी.. नाय नाय..! बाईसाहेब हे समदं आता मला काय झेपायचं नाय. मला त्या डाक्टरचा पत्ता द्या. म्या आपरीशन करून घेती." कांता चिरडीला येऊन बोलत होती.


अवनीकडून दवाखान्याचा पत्ता जरी तिने घेतला असला तरी तिथे जाण्याची तिची हिम्मत काही होत नव्हती. बरेच दिवस तिने विचार करण्यात घालवले. काही दिवसांच्या विचरांती नवरा आणि मुलींना खोटंच सांगून ती एकटीच दवाखान्यात गेली. अवनीचा मानसिक आधार तिला होताच तरीही तिच्या मनात एक प्रकारची भीती दाटून आली होती. वारंवारच्या आईपणामुळे तिच्या शरीराची चाळण झाली होती. हे एक पाऊल उचलल्यामुळे किमान जबरदस्तीच्या, नको असणाऱ्या आईपणापासून तरी तिला सुटका मिळणार होती. या एका विचाराने तिच्या मनातील भीतीवर मात केली आणि अखेर तिने नसबंदीच ऑपरेशन ( laproscopic tubal ligation ) करवून घेतलं होतं.


या गोष्टीला आता बराच काळ लोटलेला आहे. आता कांता पस्तिशीच्या आसपास पोहचली आहे. त्यानंतर ती कधीच आई बनली नाही पण तिच्या नवऱ्याला यात काहीच वावगं आहे असं वाटलं नाही कारण त्याचं जीवन त्याची दारू, नशा, तिला मारहाण आणि अंथरुणात तिला राक्षसासारखं ओरबाडून काढणं यातच व्यतीत होत आहे त्यामुळे तिच्याकडे त्याच लक्षच नाही आणि काही फरकही पडत नाही.


ती लोकांच्या घरी घरकाम करून त्यातल्या पैशातून मुलांना मोठं करते आहे. नवऱ्याने जरी तिची काळजी घेतली नसली तरी तिने स्वतःच स्वतःची काळजी घेतल्याचं समाधान तिला सुखावून जातं. आयुष्यात हा तिने स्वतःसाठी घेतलेला सर्वात मोठा निर्णय होता आणि या गोष्टीचा तिला अभिमान आहे.


तिचं हे ऑपरेशन तिच्या मनाच्या कुपित दडवलेलं सगळ्यात मोठं गुपित आहे. 


तर माझ्या वाचक मित्रमैत्रिणींनो तुम्हाला ही कथा कशी वाटली हे सांगायला अजिबात विसरू नका. असेच आणखी ब्लॉग वाचायचे असल्यास माझ्या मधुनिता या फेसबुक पेजला नक्की follow करा. कथा आवडल्यास लाईक, कमेंट आणि लेखकाच्या नावासहित शेअर करा.

© copyright

© all rights reserved.

या कथेच्या प्रकाशनाचे आणि वितरणाचे सारे हक्क लेखिकेकडे राखीव. कथेत अथवा कथेच्या नावात किंवा कथा लेखिकेच्या नावाशिवाय आढळून आल्यास तो कॉपी राईट कायद्याचा भंग मानला जाईल. कथा जशीच्या तशी शेअर करण्यास काहीही हरकत नाही.








Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy