Dr. Vandana Pathak

Others

4.0  

Dr. Vandana Pathak

Others

भागी – अभागी

भागी – अभागी

6 mins
221


संध्याकाळची वेळ. सूर्यदेवांचा रथ पश्चिम दिशेला प्रस्थान करायला सज्ज झाला होता. भागीने घर चुना लावून , जमीन सावरून स्वच्छ केले होते. तिला सकाळी कामांमुळे घरी वेळ देता येत नव्हता. ती स्वयंपाकाची आठ- दहा घरी कामं करायची. त्यात तीन घरी पूर्ण स्वयंपाक. भरपूर वेळ लागायचा. सन्वी मॅडम तर फक्त ॲार्डर द्यायच्या. त्यांच्या भाकऱ्या, पोळ्या, कुत्र्याचं जेवण, मुलं म्हणतील त्या दोन- तीन भाज्या किंवा त्यांच्या आवडीचे पदार्थ सर्व करावं लागायचं. दिवाळीच्या फराळाची त्यांनी बाहेर ॲार्डर दिली होती. त्यामुळे भागी थोडी निश्चिंत होती. पण रोजचा नैवेद्याचा स्वयंपाक व गोड पदार्थ तिलाच करायचा होता.

ती भराभर कामं उरकत होती. तिला सन्वी मॅडमकडे रात्रीच्या स्वयंपाकाला जायचं होतं. तिची धावपळ चालू असतानाच तिला राजूचा, सन्वी मॅडमच्या ड्रायव्हरचा, फोन आला.

“ताई, आज तुला सुट्टी. साहेब- मॅडम बाहेर चालले. मुलं झोमॅटोवर ॲार्डर देणार आहे. उद्या सकाळी लवकर ये. उद्या लक्ष्मीची पूजा आहे ना?”

“ हो, हो, दादा, उद्या नऊ वाजताच येते.”

भागीला अनपेक्षित सुट्टी मिळाल्याचा आनंद झाला. तिला लक्ष्मीपूजनाची तयारी करता येणार होती. तिने सिरीज व आकाशदिवा मुलाच्या मदतीने लावला .रवा व पोहे भाजून ठेवले. रात्री चिवडा व लाडू करायचा तिचा बेत होता. पण रात्री तिच्या घरवाल्याने, गण्याने, धुमाकूळ घातला. तो दारू पिऊन तर्र होता व वांग्याची भाजी कर असा हट्ट करत होता.घरी वांगी नव्हतीच. भागीने पिठलं, पोळ्या व भात केला होता. गण्याने वाढलेले ताट हवेत उडवलं व एक लाथ भागीच्या पेकाटात घातली. बंटीमध्ये पडला व त्याने भागीला मार खाण्यापासून वाचवलं. पण भागीचा मूड गेला. ती रडतच झोपी गेली.

भागी व तिचा लेक पहाटेच उठले. तिने सडा घातला व रांगोळी काढली. बंटीला ओवाळले. लाडू चिवडा काहीच झालं नव्हतं. पण कामं आटोपून आल्यावर ते करायचं तिने ठरविलं. ती लवकर घराबाहेर पडली. दोन घरची कामं आटोपून ती सन्वी मॅडमकडे गेली. बंगला शांत होता. बंगल्यावरील दिपमाला अजूनही बंद केल्या नव्हत्या. रांगोळी काढलेली होती. ‘ती रांगोळी काढणारी मुलगी कालच आली असावी’, भागीला वाटलं.

‘अरे, आज लवकर उठलं नाही कोणी? झोपलेच आहे का सगळे?’

बंगल्याचं दार उघडंच होतं. ती आत गेली. साहेब सोफ्यावर बसून पेपर वाचत होते. ती सरळ किचनमध्ये गेली. तिथे कोणीच नव्हतं. टेबलवर भरपूर फुलं व फळं ठेवली होती. पण मॅडम दिसत नव्हत्या. ड्रायव्हरपण दिसत नव्हता. ती क्वचितच साहेबांशी बोलायची.

पण त्यांच्या जवळ जाऊन तिने विचारलं,

“सर, मॅडम कुठे आहे? वर बेडरूममध्ये आहे का?”

“अरे भागी, आलीस का? मॅडम घरी नाही. “

“मग माझ्याकरीता काही सांगितलं आहे का? “

“हे पहा, तू आठ-दहा पराठे कर. टेबलवरील फुलाफळांचे चार हिस्से करून पिशव्यांमध्ये भरून ठेव. तुम्ही काम करणारे चौघजण घेऊन जा. जाताना तुझी पिशवी घेऊन जा.”

“सर, पुजेला व तोरण करायला लागतील ही फळं व फुलं. राहू द्या तशीच. सर, गोडधोड काय करू? व मुलं काय खाणार?”

“ए बाई, काही पूजाबिजा नाही आज. सांगितलं तेवढं कर व निघ. मुलं त्यांचं पाहतील. कळलं?”

भागीने मान हलवली व ती कामाला लागली. घर शांत होतं. मुलं व डॅन कुत्रा खाली आले नाही. तिने कुत्र्याच्या भाकऱ्या व पराठे केले. फुलाफळांची वाटणी केली. आपली पिशवी घेऊन हॅालचे दार ओढून घेत, तिने सायकल काढली. तेवढ्यात तिला राजू ड्रायव्हर दिसला.

“अरे राजू दादा, बरं झालं तू भेटला. मॅडम कुठे आहे? साहेब काही बोलले नाही. आज पूजा नाही म्हणाले. काही झालं का?”

“भागी, थोडं बाहेर ये. इथे बोलणं शक्य नाही.”

बाहेर बंगल्यापासून थोडं दूर उभे राहून तो सांगू लागला.

“काल साहेब व मॅडम पार्टीला गेले होते. पार्टीतून यायला त्यांना उशीर झाला. साहेबांनी ड्रिंक घेतलं असावं. ते मॅडमशी भांडत होते. मॅडमने डान्स केला नाही याचा त्यांना राग आला होता. मॅडम गाडीत शांत होत्या. पण घरी आल्यावर त्या म्हणाल्या,

‘अनिश, मी कोणाही ऐऱ्यागैऱ्या बरोबर डान्स करू शकत नाही ‘

‘कम ऑन, माझ्याबरोबर करतेस ना? मग राजला का नाही म्हणते?’

‘मला तो माणूस आवडत नाही. त्याची नजर व स्पर्श … शीऽऽऽऽ’

‘तो माझा बिझीनेस पार्टनर आहे. त्याला तू का नाराज केले?’

‘मी कारण सांगितलं ना?’

“भागी, साहेब मॅडमवर धावून गेले. त्यांना दोन गालात मारल्या. मॅडम तिथून जात होत्या, तर त्यांनी मॅडमचे कपडे ओढले व ते फाडून टाकले. मॅडमना पकडून मारलं. केस ओढले. मलाच कानकोंडं झालं. साहेब मग वर गेले व सुटकेसमध्ये कपडे भरून खाली आले. सुटकेस त्यांनी मला दिली व मॅडमला हात धरून घराबाहेर काढले.

मला म्हणाले,

‘विमानतळ किंवा स्टेशन, ही म्हणेल तिथे सोड. परत घरी आणू नको. ‘

‘अरे, माझे कपडे फाडले आहे तू. अशी बाहेर जाऊ? कपडे बदलते मी…’

‘ तंगडं तोडीन …’

भागी, मॅडमनी गाडीत कसेबसे कपडे बदलले व मी त्यांना विमानतळावर सोडल. मुलं वरून पाहत होती. थरथर कापत होते दोघेही.”

“अरे बापरे, बिचाऱ्या मॅडम. दादा, अशी मारहाण आमच्या वस्तीत, झोपडपट्टीत, होते. पण हे कपडे फाडणं, ते ही मुलं व तुझ्यासमोर? किती ही विटंबना? म्हणे पूजा वगैरे काही करायची नाही. लक्ष्मीला हाकलले भर दिवाळीत आणि म्हणे हे मोठे साहेब! शिकलेले साहेब!”

भागीचे डोळे पाणावले. तिला तिच्या घरी काय घडले, ते आठवले. बंगला असो की झोपडी, बाईची अवस्था सारखीच.

“दादा, मॅडम कुठे गेल्या? दिल्लीला माहेरी का?”

“त्या सारख्या रडत होत्या व इतक्या रात्री जायला विमान नाही म्हणाल्या. दिवाळीत अशी माहेरी कोण मुलगी जाईल ग, ताई? “

“आज सगळे लवकर उठले. लवकर आंघोळी केल्या. पूजा केली व इथे? बडे लोग, झुठे लोग?”

“बघ ना, भागे, माझी आई म्हणायची लक्ष्मीपूजनाला वाईट गोष्टी, गरिबी व अलक्ष्मीला बाहेर काढतात व इथे…”

“इथे रात्रभर लाईटिंग होतं, दार उघडं होतं, पण…त्या कथेत सांगतात ना तसं लक्ष्मीदेवी इथे मुळीच फिरकणार नाही.”

“अति लक्ष्मीमुळे तर बहकले साहेब…”

भागी घरी आली. पण तिचं मन थाऱ्यावर नव्हतं. दिवाळीत दोन- तीन दिवस ती संध्याकाळी कामाला जायची नाही. पण तिने सन्वी मॅडमकडे जाऊन पाहायचं ठरवलं. तिने दुपारी लवकरच स्वयंपाकाला सुरवात केली. लाडू व चिवडा केला. पुरणपोळी व मूगवड्यांची भाजी, कढी, वरण- भात, भजी करून ठेवली. सडा- रांगोळी केली. आंब्याचे तोरण झोपडीला लावले. बंटी पाच वाजता दुकानातून घरी येणार होता. तिची धावपळ चालू असतानाच ॲाटोचा आवाज आला व भागीच्या काळजाचा ठोका चुकला. गण्या कसा वागेल याची तिला धास्ती वाटत होती. पण गण्या आला तो हातात सामान घेऊन. त्याने झेंडूची फुलं, शेवंतीच्या वेण्या, भागीला साडी, बंटीला शर्ट व नैवेद्याचे पेढे आणले. भागीला सर्व देत त्याने पूजेकरीता नवीन साडी नेसायला सांगितलं. तिने पटापट दाराला झेंडुंची माळ लावली. पूजेची तयारी करून ठेवली.

तयार होऊन ,भागी नवीन साडी नेसून बाहेर पडणार तोच गण्याने तिला थांबवलं.

“भागे, आज कुठे चालली? सुट्टी ना आज?”

“आत्ता येते बंगल्यावरून. काही नैवेद्याचं करून देते.”

“अग, वेणी माळ ना? “

“ती देवीला घालू ना?”

“दोन आणल्या ग. एक घरच्या देवीला व एक लक्ष्मी मातेला.”

वेणी माळून भागीने सायकलला टांग मारली व ती विचारातच बंगल्यात पोचली. पण हे काय? बंगला अंधारात होता. लायटिंग, आकाश कंदिल लावले नव्हते. दारही बंद होते. वरती एका खोलीत प्रकाश दिसत होता. भागीने खालूनच तन्वीला फोन लावला.

“तन्वी, मी आले आहे. दार उघडते का?”

“भागीताई, आम्ही दोघचं आहे घरी. आम्ही मागवून घेऊ रात्री काहीतरी.”

“मम्मा आली ना घरी? ठीक आहे ना त्या? “

“नाही ग. ती आली नाही व कुठे आहे माहिती नाही. फोनपण नाही तिच्याकडे. पप्पा पण गायब आहे. काळजी वाटते ग.”

तन्वी रडू लागली.

‘साहेबांनी असं कसं पोराना एकटं सोडलं ? बिचारे पोरं, घाबरले असतील .’ भागीला वाईट वाटलं.

“ए ताई, रडू नको. आज दिवाळी आहे. तू व आशू चला बरं माझ्यासोबत घरी. एकटे नका राहू.”

“ताई…”

“मी रात्री सोडीन तुम्हाला घरी. तोपर्यंत पप्पा किंवा गार्ड घरी आलेले असतील. चला, आज पहा आम्ही गरीब लोक दिवाळी कशी साजरी करतो ते.”

त्या मुलांना घरी घेऊन जाताना भागी नशिबाचा विचार करत होती. भागीचं नाव भाग्यलक्ष्मी होतं. माहेरी तिला लाडाने लक्ष्मी म्हणत. बापूने प्रेमाने तिला बारावी पर्यंत शिकवलं. पण लग्नानंतर सासरी तिला कधी भागी म्हणू लागले, तिलाही कळलं नाही.

‘मी लक्ष्मीची भागी झाले व ही बंगल्यातील खरी लक्ष्मी बेघर व बेइज्जत होऊन रस्त्यावर आली व ही लहानगी लक्ष्मी भावाचे बोट धरून माझ्या बरोबर निघाली आहे. कोणती लक्ष्मी भाग्यवान व कोणती अभागी? कोण खरी लक्ष्मी? की खरी लक्ष्मी कथेतच राहते? प्रत्यक्षात नसतेच का? देवा,

आज लक्ष्मी, लक्ष्मी करती सकल जन

युगे गेली तरी तिचे अंधारातच स्थान,

दिशा, दिशा उजळतील दिव्यांनी आज

उजळू दे आमचे जीवन, देवा, राखशील ना लाज?


Rate this content
Log in