Dr. Vandana Pathak

Romance

4.0  

Dr. Vandana Pathak

Romance

हिट विकेट

हिट विकेट

24 mins
61

अवनी संध्याकाळी कॉलेजमधून घरी आल्यावर निवांतपणे ऑनलाईन फेसबुक व इन्स्टावर वेळ घालवित होती. मित्र मैत्रिणींशी चॅटिंग करत होती. मध्येच व्हिडिओ व रील पाहत होती. नंतर तिने नवीन आलेल्या फ्रेंड रिक्वेस्ट पाहिल्या. त्यात दोघी- तिघी तिच्या शालेय मैत्रिणी होत्या. एक रिक्वेस्ट मावस भावाच्या मित्राची होती व एक अनोळखी व्यक्तीची. त्या अनोळखी व्यक्तीच्या ‘सर्कलमध्ये’ दोन-तीन तिचे कॉमन फ्रेंड होते. तो मुलगा, नील, इंजीनियरिंग पूर्ण करून एम.बी.ए. करीत होता. म्हणून अवनीने ती रिक्वेस्ट स्वीकारली. त्यानंतरअधून मधून ते एकमेकांच्या पोस्ट पाहत होते. त्यावर प्रतिक्रिया किंवा लाईक्स देत होते.

एकदा अवनी ऑनलाईन असताना नीलने तिला पर्सनल संदेश पाठवला. तेव्हापासून त्यांच्या बोलण्याची सुरुवात झाली.. सरळ व साधा संदेश होता तो.

“हॅलो, काय म्हणतेस? कसा गेला आजचा दिवस?”

हळूहळू ते रोज एकमेकांशी चॅटिंग करू लागले. कोणतं पुस्तक वाचलं? ते कसं वाटलं? कोणता सिनेमा पाहिला? कोणते सिनेमे आवडतात? कोणती गाणी आवडतात? वगैरे त्यांचे चॅटिंगचे विषय असायचे. चॅटिंग करता करता त्यांच्या लक्षात आलं की वाचनात व संगीतात त्यांच्या आवडीनिवडी सारख्या आहे रोज चॅटिंग केल्याशिवाय त्यांचा दिवस संपायचा नाही. त्यांची ऑनलाइन मैत्री दोघांनाही आनंद प्रदान करायची . एक दिवस चॅटिंग संपल्यावर, तिने बाय म्हटल्यावर, नील म्हणाला,

“ अवनी, एक विचारू का?”

“अरे, विचार ना.”

“बघ, राग नाही ना येणार? चुकीची समजूत तर नाही ना करून घेणार?”

“नील, इतक्या दिवसांची आपली मैत्री आहे. तू काही चुकीचं विचारणार नाही याची मला खात्री आहे.”

“अवनी, आपण रोज चॅटिंग करतो. पण त्याकरिता दोघांनाही ऑनलाईन राहावं लागतं. इतर वेळी आपल्याला बोलता येत नाही. म्हणून तुझा फोन नंबर देते का?”

“का बरं?”, अवनी गोंधळून गेली होती.

“अग मग आपल्याला कधीही बोलता येईल, राईट?”, नीलने विचारलं.

“नाही. मला त्याची मुळीच गरज वाटत नाही”, तिने स्पष्टपणे सांगितलं.

“ अवनी, ऐक ना…”

“नाही. त्याची गरज नाही .”

त्यानंतर त्यांचे चॅटिंग रोज सुरू राहिलं परंतु त्याने तिला कधीही मोबाईल नंबर मागितला नाही. काही घडलं नाही असाच तो वागत होता. तिच्या आईला ती नीलशी चॅटिंग करते, हे माहीत होतं. तिच्या आई-वडिलांचा तिच्यावर पूर्ण विश्वास होता.

हा हा म्हणता म्हणता, दीड वर्ष होऊन गेलं. या दीड वर्षात, तिने मानसशास्त्रातील तिचा ऑनर्सचा कोर्स पूर्ण केला व पुढील शिक्षणासाठी लंडनला जाण्याचा निर्णय घरच्यांच्या संमतीने घेतला. ती लंडनला जाणार आहे व तिची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली हे तिने चॅटिंग दरम्यान नीलला कळवलं होतं. याच कालावधीत, नीलने फायनान्स मधील एम. बी. ए. पूर्ण केलं. तो नंतरचे Advanced Courses करू लागला. दोघांनाही एकमेकांच्या प्रगतीचा आनंद वाटत होता व ते दुसऱ्याला प्रोत्साहन देत होते. पण दोघेही आपल्या मर्यादा पाळत होते. त्यांच्या चॅटिंगमध्ये घरच्यांचा व कुंटुंबियांचा मुळीच उल्लेख येत नव्हता.

अवनी लंडनला गेल्यावरही त्यांचे चॅटिंग सुरू होतं. नीलला अनेक कंपनींमध्ये गलेलठ्ठ पगारावर नोकरीच्या ॲाफर्स मिळत होत्या. अभ्यास करत असताना त्याने एका प्रसिध्द कंपनीची ॲाफर स्वीकारली व तो ठाण्याहून बंगलुरूला गेला. तत्पूर्वी दोघेही ठाण्यातच होते. पण त्यांची कधी भेट झाली नाही व त्यांनी तसा प्रयत्नही केला नाही. गंमत म्हणजे त्यांनी एकमेकांना पाहिलं नव्हतं कारण दोघंही आपले फोटो कुठेही पोस्ट करत नव्हते. परंतु हा विषय त्यांच्या मैत्रीच्या आड कधीच आला नव्हता. मैत्र जुळायला स्वभावाची परिक्षा, गुणांचे आकलन, व कौतुक महत्वाचं. रंगरूप दुय्यमच ! व पु काळेंचे “ज्या माणसाशी आपण मैत्री करतो त्याला अंशतः तरी समृद्ध करण्याची पात्रता आपल्यापाशी आहे का हे पाहावं” हे विचार दोघांना आवडायचे सुध्दा.

लंडनमध्ये शिक्षण पूर्ण करून अवनी घरी परतली. तिने योग्य जागा पाहून स्वतःचं समुपदेशन केंद्र सुरू केलं. साहजिकच आई बाबांनी तिच्या लग्नाच्या दृष्टीने विचार करायला सुरवात केली.

आई म्हणाली, “ बेटा, आता तुझ्या लग्नाचा विचार करायला पाहिजे, नाही का? तसाही उशीर झाला आहे. पण तुझ्या आवडीप्रमाणे शिक्षण व करियर दोन्ही आवश्यक होतं.”

अवनी म्हणाली, “ आई-बाबा, अजून थांबायचं का? मला थोडं स्थिरस्थावर होऊ द्या ना प्लीज.”

“ नाही अवनी, आता नको ग. तुला त्रास होईल पुढे. योग्य वयात योग्य गोष्टी होणं आवश्यक आहे”, आई म्हणाली.

“ए, बाळा, लगेच मुलगा मिळेल असं नाही. वेळ लागेलच”, बाबांनी सांगितलं व पुढे म्हणाले, “अग, तुझ्या मनात कोणी आहे का?”

“हो , तसं असेल तर सांग ग आताच”, आई म्हणाली.

“आई…”

“ त्यात काय संकोच करायचा? एवढी तू फॅारेन रिटर्न मुलगी. भेटला का कोणी ‘प्रिन्स चार्मिंग’ किंवा प्रेम आहे का कोणावर? तसे असेल तर स्पष्ट सांग न लाजता.”

“नाही ग आई. तसं काही असतं तर तुला कळलच असतं. मी पण सांगितलं असतं ना?”

“हे बघ बेटा, आई म्हणत होती की तू नील नावाच्या मुलाशी रोज चॅटिंग करते गेल्या दोन-तीन वर्षांपासून. काही आहे का तुझ्या मनात? आत्ताच सांग नाहीतर आम्ही पुढे वाढू आणि…”, बाबा म्हणाले.

“ नाही हो बाबा. तसं काही नाही. फक्त ऑनलाईन मैत्री आहे आमची.”

“Strange!...”

“बाबा मी खरं सांगते. एकदाही भेटलो नाही आम्ही. तो कसा दिसतो, गोरा आहे की काळा, उंच वा ठेंगणा, हे सुद्धा मला माहित नाही व सध्या तो बंगलुरूला आहे. भेटायचा प्रश्नच नाही.”

“ मग असे रोज चॅटिंग? का बरं?”

“फक्त चॅटिंग बाबा! त्या पलीकडे काही नाही. तसंही तुम्हाला माहिती आहे की मी किंवा आपण याबद्दल काय विचार करतो ते. आपल्या मितालीला इतका वाईट अनुभव आला…”

“खरंच ग’, आई म्हणाली, “तिने कुठल्या त्या नितीनला ऑनलाइन मित्र म्हणून निवडलं व नंतर त्याच्याशीच लग्नाचा ध्यास घेतला.”

“आई-बाबा, तो नितीन तिला स्वतःबद्दल, त्याच्या शिक्षणाबद्दल, व कुटुंबीयांबद्दल खोटंच सांगत आला. तिने पण त्यावर पूर्ण विश्वास ठेवला. त्याने जवळजवळ तिला आपल्या कह्यातच घेतलं होतं. आई, तिला लग्नानंतर लक्षात आले की सर्व मैत्री व त्यांचं लग्न खोट्यावरच आधारित होतं.”

“ हो ग, आपण सर्वांनीच पाहिली ना तिची वाताहात.”

मिताली अवनीची मावस बहिण होती. सधन आई- वडिलांची एकुलती एक कन्या. उच्चशिक्षित व भरपूर कमावणारी. सामाजिक माध्यमावर तिची नितिनशी मैत्री झाली व त्याचे रूपांतर प्रेमात झालं. तो ही चांगल्या घरातील असून तिच्या सारखाच शिक्षित आहे, उत्तम पदावर कार्यरत आहे व उच्चकुलीन आहे, अशी त्याने बतावणी केली. दोन - तीन महिन्याने ते जेव्हा प्रत्यक्ष भेटले, तेव्हा ती त्याच्यावर पूर्णपणे भाळली. तो मिल्स ॲंड बुन्स मधल्या हिरोसारखा ‘tall, dark, and handsome’ होता. आई वडिलांना त्याची माहिती काढण्याची संधी न देताच तिने आर्य समाजात लग्न केलं. लग्नानंतर काही दिवसातच तिचे डोळे खाडकन उघडले. तिने आई वडिलांना संबोधून लिहलेल्या पत्रात ती कशी वाहवत गेली, याचं वर्णन केलं. त्यांची क्षमा मागून तिने आयुष्य संपवलं. तिच्या घरच्या व सर्व नातेवाईकांकरिता ती घटना अत्यंत हृदयविदारक होती. तिच्या जाण्याच्या धक्यातून ते सावरले नव्हते.

मितालीची आठवण आल्यामुळे व ती पूर्ण घटना डोळ्यासमोर आल्यामुळे आई परत हादरून गेली.

“हो ग, धास्तीच वाटते आज-काल. काय काय वाचतो ना आपण?” आई अद्यापही त्या धक्क्यातच होती.

“मी ती रिस्क घेतली नाही. म्हणूनच आई -बाबा, मी नीलशी अंतर राखून ऑनलाइन मैत्री व चॅटिंग केलं. त्याला माझ्याबद्दल काही जास्त माहिती नाही’’, अवनीने सांगितलं व वातावरण आणि मूड दोन्ही बदलण्याकरिता ती मिश्किलपणे म्हणाली,

“तुमच्या या जबाबदारीतून तुम्ही असे सहज मोकळे होणार नाही. जोडे-चपला झिजवाव्या लागतील. तुम्ही चालू करा तुमची शोधमोहिम. माझी अट एकच. मी जिथे राहीन, तिथे माझे समुपदेशन केंद्र सुरू करीन.”

बाबा आनंदात म्हणाले, ‘”बढिया. मी नाव नोंदवतो तुझे मग.”

असं ठरलं की पहिले आई-बाबांनी स्थळाची व घरच्यांची सर्व चौकशी करायची व त्यांना स्थळ योग्य वाटलं, तर ते अवनीला त्या स्थळाचा फोटो व परिचय करून देतील. त्यामुळे अवनी निश्चिंत होती. सकाळी योगासनं, वॉक व एरोबिक्स, नंतर क्लिनिक, दुपारी निवांतपणे वाचन, संध्याकाळी परत क्लिनिक असं तिचं दैनंदिन वेळापत्रक होतं. रात्री तिला थोडा फार वेळ मिळायचा व तो वेळ ती सामाजिक माध्यमांवर घालवत होती. त्याचवेळी तिचं नीलशी चॅटिंग व्हायचं .

रविवारच्या दिवशी ती मित्र-मैत्रिणींबरोबर फिरायला, सिनेमाला किंवा हॉटेलिंगला जायची. एकदा ती आपल्या मैत्रिणींबरोबर दुपारच्या सिनेमाला गेली होती. सिनेमापूर्वी त्या सर्वजणी गप्पा मारत असताना सीमाला एका मुलाने येऊन ‘हॅलो’ म्हटलं . त्याला पाहून सीमाला आनंद झाला. ते एकमेकांशी बोलले व नंतर त्याला घेऊन सीमा आपल्या मैत्रिणींकडे आली. तिने हा माझा मामेभाऊ अशी त्याची ओळख करून दिली.

“अग सीमा, काय नाव यांचे?”, नीताने विचारलं .

“अगं, हा निखिलेश बापट. एम.एन.सी. मध्ये काम करतो.”

सीमाने आपल्या सर्व मैत्रिणींची त्याच्याशी ओळख करून दिली. सहा फूट, दोन इंच उंची असलेला निखिलेश गोरा, सुदृढ व रुबाबदार दिसत होता. तो पण सिनेमाला त्याच्या ग्रुप बरोबर आला होता. सीमाने संध्याकाळी सिनेमानंतर त्याच्याबरोबर कॉफी घेण्याचा बेत आखला. ते जवळच्या कॉफी शॉपमध्ये भेटणार होते. कॉफी शॉपमध्ये तो एकटाच आला. मित्रांचे दुसरे कार्यक्रम ठरले असल्यामुळे ते आले नाही, असे तो म्हणाला. अर्धा पाऊण तास तो व या सर्व मैत्रिणी एकत्र गप्पा मारीत बसले होते. त्यानंतर अवनीला एकदा वॉक घेताना निखिलेश भेटला. तो रोज जॉगिंग करायला त्याच बगीच्यात यायचा. अवनीने फक्त ‘हाय- हॅलो’ केले व घाई आहे म्हणून ती निघून गेली. त्यानंतर योगायोगाने ती कार पार्क करत असताना त्यांची क्लिनिक समोर भेट झाली. तिने बाहेरून त्याला क्लिनिक दाखवलं. त्याने क्लिनिक बद्दल चौकशी केली व तिचं अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

पंधरा दिवसांनी एकदा ती रात्री क्लिनिक मधून परत आली, तेव्हा दारात तिला एक अनोळखी कार दिसली. ‘कोणी पाहुणे आले वाटते’ असा विचार करत ती घरात गेली. बाहेर चपलांचा एकच जोड होता. ‘बाबांचे मित्र असावे बहुदा’ असा विचार करत त्यांना उगीच डिस्टर्ब कशाला करायचं म्हणून ती सरळ जिन्याकडे वळली. तिची चाहूल लागतात बाबांनी हाक मारली,

“अवनी. आलीस का? जरा ये ना इकडे.”

“बाबा, फ्रेश होऊन येऊ का?”

“अगं, पहिले ओळख करून देतो. मग जा तू.”

“आले हो”; अवनी म्हणाली.

ती हॉलमध्ये गेल्यावर बाबांनी ओळख करून दिली. पाहुण्यांची पाठ तिच्याकडे होती.

“अवनी बेटा, हे निखिलेश.”

“नमस्कार” म्हणत ती त्यांच्या समोर आली.

‘]” हाय अवनी”, आवाज तर ओळखीचा होता.

“हॅलो निखिलेश, तू इथे कसा?”, तिने आश्चर्यानं विचारलं.

“अरे, म्हणजे तुम्ही ओळखता एकमेकांना? कसे काय?”, आईने उत्सुकतेने प्रश्न केला.

“हो आई. हा सीमाचा मामेभाऊ आहे. पहिल्यांदा आम्ही एका सिनेमाला आणि नंतर दोन-तीनदा इतरत्र भेटलो. भेटलो म्हणजे We just bumped into each other.”

निखिलेशने मग त्यांना त्यांच्या कुठे व कशा भेटी झाल्या हे सांगितलं. अर्धा- पाऊण तास बसून, चहा सोबत गप्पा मारून, निखिलेश गेला.

‘”बाबा, हा कुठे भेटला तुम्हाला?”, अवनीला तिची उत्सुकता लपवता आली नाही.

“अगं, तुझ्याकरिता हे स्थळ सांगून आलं आहे. मला व तुझ्या आईला मुलगा व त्याचे घर, आई-वडील, व इतर सर्व गोष्टी चांगल्या वाटल्या. पण तुझी भेट घडवून आणण्याआधी मला त्याच्याकडून काही जाणून घ्यायचं होतं. मग निवांत बोलता यावं म्हणून त्याला घरी बोलावलं”, बाबांनी सांगितलं.

“अरेच्चा, small world, isn’t it?” अवनीला या योगायोगाची गंमत वाटली.

“बेटा, आम्हा दोघांना निखिलेश फार आवडला आहे. एकुलता एक मुलगा आहे. त्याची आई प्राध्यापिका व वडील डॉक्टर आहे. ठाण्याला त्यांचा 3 बेडरूमचा प्रशस्त फ्लॅट आहे. बोलून चालून चांगले वाटले ते आम्हाला”, बाबांनी माहिती सांगितली व त्यांचं मतही.

“अवनी, तशी तर तू त्याला ओळखते, पण लग्नाच्या दृष्टीने कसा वाटला तुला हा मुलगा?”, आईने विचारलं.

“आई, तसा तो साधा, सरळ व चांगला मुलगा आहे. I mean well behaved and mannered. पण मला फारशी माहिती नाही” , अवनीने स्पष्ट केलं.

आईने सांगितलं, “आपले ते केळकर काका आहे ना…”

“म्हणजे माझा मित्र ग”, बाबांनी सांगितलं “तुला केळकर काका माहिती आहे. केळकर काकांचा व यांचा छान घरोबा आहे. काकांनी तर आपल्याला ‘Go ahead’ चा सिग्नल दिलेला आहे. पण आमच्याकरिता सर्वात महत्त्वाचं तुझं मत आहे. तुला काय वाटतं, स्पष्ट सांग.”

“बाबा, मी लग्नानंतरही प्रॅक्टिस करणार आहे, हे सांगितलं ना त्यांना? सकाळ-संध्याकाळ मी समुपदेशन केंद्रात जाईन , हे त्यांना मान्य आहे का?”

“त्यांना तशीच मुलगी हवी आहे. फक्त तुला नवीन शहरात, नवीन जागी जावे लागेल.”

“तुम्हाला कबूल असेल, तर माझी काही हरकत नाही.”

“अरे वा, जमलं तर मग. कळवू का त्यांना तसं?”, बाबांनी प्रश्न केला.

“हो बाबा. पण आई, एकदा त्याच्या आई-वडिलांची व माझी भेट होऊ द्या. त्यांनी अजून मला पाहिले पण नाही. एकदा त्यांच्याशी बोलणं होऊन, भेट झाल्यावर, मला जास्त चांगले वाटेल. बरोबर बोलते आहे ना मी?” अवनीने साशंक मनानं विचारलं.

“हो ग. तुमची एकमेकांची ओळख होणं, विचारांचे आदान प्रदान होणं, थोडेफार समजून घेणं, आवश्यकच आहे.” आईच्या या उत्तराने अवनीला बरं वाटलं.

मग निखिलेशने सुचविल्याप्रमाणे, नंतरच्या रविवारी, अवनी व तिचे आई-बाबा ठाण्याला निखिलेशच्या घरी गेले. त्यांच्या घरी तिचं मोकळेपणाने व आनंदाने स्वागत झालं. तिला तिथे खूप आपलेपणा, प्रेम व जिव्हाळा जाणवला. त्यांच्याशी बोलताना तीन चार तास कसे निघून गेले, हे त्यांना कळलंही नाही. तदनंतर, लग्न ठरविण्याकरता, साखरपुडा व इतर खरेदी करण्याकरिता, अवनीची निखिलेश व त्याच्या आई-वडिलांची अनेकदा भेट झाली. तिचे त्यांच्या घरी जाणं-येणं सुरू झालं होतं. ती अत्यंत आनंदात होती व तो आनंद तिच्या वागण्या -बोलण्यात जाणवत होता. नीलने तिला चॅटिंग करताना विचारले सुद्धा,

“का ग,काय झालं? सध्या फार खुश दिसतेस?”

“हो नील, लग्न ठरलं माझं व ते ही माझ्या व आई-वडिलांच्या मनासारखं.”

“क्या बात! हार्दिक अभिनंदन. अगं, आता तरी फोन नंबर दे तुझा. प्रत्यक्ष अभिनंदन करतो ना तुझं.”

“नाही नील, मी तुला मागे फोन नंबर द्यायला नाही म्हटलं होतं, हे विसरला का तू?”, तिने प्रश्न केला.

“अजिबात नाही. ठीक आहे, मग भेट तरी एखाद्या वेळी. ही आनंदाची बातमी साजरी करू या. कॉफी घेऊ या का आपण एकत्र? प्लीज आता नाही म्हणू नको”, नीलने विनवणीच्या स्वरात म्हटलं.

“नाही नील, शक्य नाही. आपली मैत्री इथपर्यंतच मर्यादित राहील.”

“म्हणजे लग्नानंतर तू माझ्याशी चॅटिंग करणार नाही? चॅटिंग बंद? इतक्या वर्षाच्या रोजच्या सवयीला गुडबाय म्हणायचं? काय बोलते आहे तू? You know, I look forward to our daily chats.” नील गोंधळून गेला.

“तसं नाही रे’, अवनीने स्पष्ट केलं. “लग्नानंतर अधून मधून चॅट करू आपण. तू माझा मित्र आहे. तुझी ख्याली –खुशाली जाणून घ्यायला आवडेलच मला. पण प्रत्यक्ष कधीही भेटणार नाही व फोनवर बोलणारही नाही. समजलं तुला?” अत्यंत प्रांजळपणे तिने त्याला सांगितलं.

“अवनी, काय बोलू मी? काही सुचत नाही.”

“बाय म्हण आता पुरत”.

दुसऱ्या दिवशी अवनी- निखिलेश फिरायला गेले. फिरताना निखिलेश म्हणाला,

“कॉफी घ्यायची का ग? चालेल ना तुला?”

“आज छान मसाला टी घेऊ या. चालेल तुम्हाला?”

एका छानशा हॉटेलमध्ये आल्यावर निखिलेश म्हणाला,

“अवनी, काही खायचं आहे का तुला? तू क्लिनिक मधून सरळ इकडे आली ना? भूक लागली असेल थोडी फार.”

“खरेच हो. व्हेज सँडविच चालेल मला. तुम्ही काय घेता?”, तिने विचारलं.

“हे काय? अवनी, तू मला अहो, तुम्ही, वगैरे काय म्हणते? आधी सीमाचा भाऊ म्हणून ‘तू’ म्हणत होती ना? मग मित्रासारखं वागव मला. मला आवडेल”, त्याने तिच्या निदर्शनास तिच्या बोलण्यातील फरक आणून दिला.

“अहो, पण आता आपण भेटलो ते एका वेगळ्या नात्यामुळे. तेव्हाची गोष्ट वेगळी होती व त्याही मोजक्याच भेटी होत्या. अजून खूप काही वेळ…”, तिने स्पष्टीकरण दिलं.

निखिलेश हसून म्हणाला, “आता कुठे भेटलो आपण? जुनी ओळख आहे आपली. तुला सुफी गाणे आवडतात. तू पॉप म्युझिक पसंत करत नाही. तुला सॉफ्ट रोमँटिक सिनेमा आवडतो. पावसाळा तुझा आवडता ऋतू आहे. तू नॉनव्हेज खात नाही. काय सांगू तुला तुझ्याबद्दल अजून?”

“आईशप्पथ, माझ्या आवडीनिवडी इतक्या लवकर कोणी सांगितल्या? कशा समजल्या तुम्हाला? आईने सांगितल्या का?” संभ्रमित अवस्थेत अवनीने विचारलं.

“Come on, मी त्यांना का विचारीन? मी तुलाच विचारलं होतं हे सर्व. तूच दिली मला ही माहिती.”

“Are you kidding? मी कधी सांगितल्या या सर्व गोष्टी? I am lost.”

“अग इतकं गोंधळून नको जाऊ. गेले तीन-चार वर्ष ओळखतो आहे आपण एकमेकांना. आपण एकमेकांच्या आवडीनिवडी जाणतो. रोज गप्पा मारतो आपण. मग अचानक हा परकेपणा कशाला व का? मी म्हणायला पाहिजे, I am lost.”

“मी कुठे बोलते तुमच्याशी? त्या दिवशी सिनेमात पहिल्यांदा ओळख झाली आपली. काहीतरी सांगू नका मला.”

“खरं तेच सांगतो. रोज बोलतो आपण, म्हणजे चॅटिंग करतो. तू खरं सांग, तू करते ना नीलशी चॅटिंग रोज? गेली अनेक वर्ष करते आहेस. मग…?”

“पण नीलचा याच्याशी काय संबंध?” अवनीला काहीच कळत नव्हतं.

“कारण मीच नील आहे.” निखिलेश ठामपणे बोलत होता.

“काय म्हणतो? I don’t believe you.” अवनीला आता काही सुचत नव्हतं.

“रिलॅक्स अवनी, आपले काही कॉमन फ्रेंड आहे, म्हणून तर तू माझी फ्रेंडशिप रिक्वेस्ट स्वीकृत केली ना? मी सीमाचा भाऊ, राईट? कळतंय का काही?”

पण अवनीची मती जणूकाही गुंग झाली होती. तिच्या मनातला गोंधळ वाढतच होता.

“तुम्ही आणि नील? हे शक्यच नाही.”

“अगं अवनी, तो मीच आहे. विश्वास ठेव. निखिलेश- पेट नेम नील. समजलं?”

“व आडनाव? नीलचे आडनाव दापोलीकर आहे.”

“व बापट फॅमिली दापोलीची आहे. म्हणून मी दापोलीकर बापट. सामाजिक माध्यमांवर तू जसं फक्त अवनी नाव टाकून बाकी स्वतःची काही माहिती देत नव्हती, कॉलेजचं नाव सांगत नव्हती, फोन नंबर देत नव्हती, त्याच कारणामुळे,तसंच स्वतःची पूर्ण माहिती मी कधी दिली नाही. विचार करून बघ.” तो तिला शाळकरी मुलीसारखं समजवत होता.

“OMG! तू नील? माझा विश्वासच बसत नाही.”

“हो का? कालच तू मला, म्हणजे नीलला, फोन नंबर द्यायला व भेटायला नाही म्हटलं, बरोबर?” निखिलेशने विचारलं.

“खरं सांगू? माझं डोकं अजिबात चालत नाही आता. मला शब्द सुचत नाही. पार…” ती म्हणाली.

“बरं, तुझा विश्वास बसावा व खात्री पटावी म्हणून तू माझ्याशी चॅटिंग करताना कोणतं गाणं ऐकत होती, ते सांगतो. “तेरे अन्दर एक समंदर…तोहे पिया मिलेंगे” हे सुफी गाणं ऐकत होती तू.”

अवनीला आता पटलं होतं की निखिलेशच नील आहे. तिनेच ती ते गाणं ऐकत असल्याचं नीलला काल सांगितलं होतं. पण त्याचं वागणं तिला कळत नव्हतं. का बरं केलं त्यांनी असं? न राहून तिने हा प्रश्न त्याला विचारला,

“तुला कधी व कसं समजलं की चॅटिंग करणारी अवनी मी आहे?”

“Simple, सिनेमानंतर मी सीमाला तू कोण व काय करते विचारलं. तिने ‘अवनी’ म्हणताच माझे कान टवकारले व लंडन म्हणताच मी ‘two plus two’ केलं. माझ्या मनातील विचारांची मी सीमाकडून खातरजमा करून घेतली.”

“मग इतके दिवस का नाही सांगितलं मला? का लपवून ठेवलं?”

“मला इच्छा तर खूप होत होती. पण तू माझ्याशी अंतर ठेवून बोलत होती. वैयक्तिक माहिती कळू देत नव्हती. म्हणून तू कशी रिऍक्ट होशील, मला कळत नव्हतं. काही अंदाज बांधता येत नव्हता. पण सीमाशी बोलणं झाल्यावर, तिने मला तुमचा, म्हणजे फॅमिलीचा, फोबिया किंवा भीती सांगितली. त्या वाईट अनुभवामुळे, तू ताकही फुंकून पिणार, हे मला उमगलं होतं. म्हणून मी सर्व रीतसर आई-बाबांना करायला सांगितलं. नशीबही जोरावर होतं. केळकर काका मध्यस्थ म्हणून पुढे आले. पण माझी खरी ओळख मलाच करून द्यायची होती. काय मग…?”

“I am speechless”, अवनी म्हणाली.

“का ग, झाली का ‘क्लीन बोल्ड’?”, निखिलेशने भुवया उंचावत विचारलं.

अवनी उत्तरली, “निखिलेश, नाही नाही, नील, ‘क्लीन बोल्ड’ की ‘ हिट विकेट’ रे?

तो आनंदात म्हणाला, “तुझ्या हिट विकेटमुळे आपल्या आवडत्या व. पुं. चे “मैत्री आयुष्याची घडी नव्याने घालते” हे वाक्य खरं ठरलं.”

Rate this content
Log in

Similar marathi story from Romance