Dr. Vandana Pathak

Others

4.5  

Dr. Vandana Pathak

Others

नवरात्री डायरी सीझन 2 कथास्पर्धा

नवरात्री डायरी सीझन 2 कथास्पर्धा

21 mins
289


नवरात्री डायरी सीझन 2

कथास्पर्धा

 

शुभ्रा

 आज शुभ्राचा दिक्षांत समारोह. सभागृह खचाखच भरले होते. राज्यपाल प्रमुख पाहुणे होते. शुभ्राला पीएचडीची उपाधी मिळणार होती. समारोहाच्या शिष्टाचारानुसार ती पांढऱ्या शुभ्र साडीत खूप मोहक दिसत होती. तिच्या गौर वर्णाला तो रंग अजून खुलवत होता. त्या सर्व शुभ्रवस्त्रधारकांमध्ये ती उठून दिसत होती. तिचे आई- बाबा व मम्मा- पप्पा तिचं कौतुक पाहायला उपस्थित होते. नव्हता फक्त अविनाश. पण त्याचीच स्वप्नपूर्ती करत होती शुभ्रा.

“वहिनी, आपण सरस्वती देवी पाहिली नाही. पण शुभ्राकडे पाहताना मला तिचाच भास होतो आहे”, मम्मा म्हणाल्या. त्यांचे डोळे भरून आले होते.

शुभ्राच्या आईने त्यांचा हात धरून म्हटलं, “ आज डोळ्यात पाणी आणायचं नाही. ठरवलं आहे ना आपण? शांत रहा ना.”

शुभ्रा एक उच्चशिक्षित सुंदर तरूणी होती. उंच, गोरीपान, शेलाटा बांधा व लांबसडक केस असणाऱ्या शुभ्राला साधं राहणीमान पसंत होतं व ती सौम्य रंग परिधान करायची. जाई- जुई, चमेली, कुंदा किंवा मोगऱ्याचा गजरा केसात माळायला तिला आवडायचं.

तिला लहानपणापासून आर्मीचं आकर्षण होतं. त्यामुळे लग्नाचा विषय निघताच तिने तिची इच्छा बाबांना सांगितली,

“बाबा, माझ्या मनात काय आहे हे मी सांगितलं. तो मुलगा जिथे राहिल, मी तिथे जे काम मिळेल ते करीन. समाज सेवेच्या रूपाने…”

“अग, बरेचदा आर्मीवाल्यांना कुटुंबासोबत राहता येत नाही. सीमारेषेवर किंवा संवेदनशील जागी ते एकटे जातात.”

“बाबा, मला माहिती आहे. तरी मी तयार आहे.”

आईला काही राहवेना,

“मनु, ते वर्षातून, सहा महिन्यातून एकदाच घरी येतात. मग लग्न करूनही एकटीच राहशील. तुला चांगला मुलगा मिळू शकेल.”

शुभ्रा तिच्या या विचारावर ठाम राहिली. योगायोग पहा, तिच्या मावशीच्या नात्यात असलेल्या मुलाचं स्थळ सांगून आलं. अविनाश आर्मीत मेजर होता. अविनाशचे पप्पा निवृत्त ब्रिगेडियर होते. मम्मा गायिका होती. त्यांच्या घरातील खेळीमेळीचं वातावरण शुभ्राकडे सगळ्यांनाच आवडलं.

अविनाश खरोखरच ‘रफ टफ हाय इन जोश’ तरूण होता. मग काय ‘चट मंगनी पट शादी’ झाली. शुभ्रा व अविनाश पंधरा दिवस छान फिरून आले. अविनाशला दीड महिन्याची सुट्टी होती व बाकी दिवस त्यांनी कुटुंबीयांसोबत घालवले.

अविनाशचा जायचा दिवस जवळ येऊ लागला. तो म्हणाला,

मला ‘ फॅमिली पोस्टींग’ मिळायला सहा-आठ महिने लागणार आहे, शुभ्रा. तू लग्नाआधी जे करायची, ते करत रहा. व्यग्र ठेव स्वतःला. कॅालेजच्या सुट्टया संपल्या की परत जॅाईन कर. तुला मदतीला मम्मा आहेच.” 

“ सवाल है क्या? माझी मुलगीच आहे ती. कामांच टेन्शन घ्यायचं नाही. माहेरी जशी राहायची, तसंच इथेही राहिलं. मस्त तयार व्हायचं, नटायचं आणि मुरडायचं वय आहे , हो ना? आणि शुभ्रा, मला माहिती आहे तुला पाढरा रंग प्रिय आहे. तू सौम्य रंग घालते. पण गडद रंगही तुला खुलून दिसतात. लक्षात ठेव, ‘ दिवस तुझे हे फुलायचे, झोपाळ्यावाचून झुलायचे’”, मम्मा म्हणाल्या.

पप्पा लगेच म्हणाले, “ अग, काय सासर, काय माहेर? ही दोन्ही घरं आहेत तुझी आत्ता.”

अविनाशचे डोळे भरून आले,

“ ये हुई ना बात, मम्मा- पप्पा. शुभ्रा, आगे बढो. शिकवता शिकवता स्वतः शिक.”

शुभ्रा हसत म्हणाली, “ भाग्यवान आहे मी. पण आता काय शिकू रे, अवि?”

“ Sky is the limit, dear. मस्त पीएचडी कर. जे वाटेल ते कर ग. फक्त बिझी रहा.”

 अविनाश डयुटीवर गेला. शक्य असेल तेव्हा फोन करायचा. कधी कधी बरेच दिवस बोलणं व्हायचं नाही. सीमारेषेवर काय घडामोडी होतात, यावर सर्व अवलंबून राहायचं. शुभ्राने लग्नाआधीच हे मान्य केलं होतं. तिने पीएचडीचा अभ्यास सुरू केला. कॅालेज व कुटुंबीय सोबत होते. त्यामुळे ती आनंदात राहायची.

 मग तो फोन आला व तिचं भावविश्व हादरून गेलं. शत्रुने अचानक केलेल्या गोळीबारात अविनाश शहिद झाला. संपूर्ण घर जणूकाही उध्वस्त झालं. बातमी आल्यानंतरचे काही दिवस कसे आले व गेले कळलचं नाही. अविनाशचा शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाला. तोफांची सलामी झाली. ओळखी- अनोळखी लोकांनी साश्रू नयनांनी अविनाशला निरोप दिला.

एके दिवशी, त्याचं सामान घेऊन सैनिक आले व मग त्या घराला ते दुःखं खऱ्या अर्थाने पचवावं लागलं. त्याच्या सामानाला हात लावायची कोणाचीच हिम्मत नव्हती. मम्मा- पप्पा शुभ्रासमोर ‘नॅार्मल’ असल्याचं भासवायचे. पण शुभ्राचं दुःख त्यांच्यापेक्षा मोठं होतं व वय लहान. ते तिला आधार देण्याचा प्रयत्न करत होते. आईने शुभ्राला भानावर आणलं,

“ बेटा, अविनाश गेले. तुझं दुःख मला समजतं. पण बेटा, मम्मा- पप्पांचा मुलगा पण अकाली गेला ग. तू त्यांना हिंमत देऊ शकते. तुझी अवस्था पाहून ते खचून गेले आहे.”

“ आई, काय करू मी?”

“ माझं ऐकशील, शुभ्रा? ते शून्यात नजर लावून खिडकीत ऊभं राहणं, शांत बसणं व कॅालेजलाही न जाणं थांबव. थिसीसचा अभ्यास व लेखन कर. उद्यापासून तू नेहमीसारखं वागायचा प्रयत्न कर. मला माहित आहे की ते कठीण आहे. सुरवातीला ढोंग कर. नाटक कर. काहीही कर. घराला घरपणं आणणं तुझ्याचं हातात आहे.”

आईचं म्हणणं शुभ्राला पूर्णपणे पटलं. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर शुभ्रा तयार झाली. तिला पाहून मम्मा- पप्पांना आश्चर्य वाटलं. तिला रोज हाका मारून बोलवलं तरी ती खोलीबाहेर येत नव्हती. ती आज सकाळी तयार होऊन, चहाचा ट्रे घेऊन आली होती.

“गुड मॅार्निंग पप्पा- मम्मा, चहा घेता ना?”

“ मॅार्निंग बेटा, आज सकाळी एकदम..”

“ हो, आज पहिले लायब्ररीत जाते व मग कॅालेजला. माझ्या व विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचं भरपूर नुकसान झालं. आजपासून मी रूटीन सुरू करायचा प्रयत्न करते. जाऊ ना, मम्मा?”

“ जा ग, बेटा. मन रमेल तुझं.”

“ तुम्ही दोघही देवळात जाता का? बरं वाटेल तुम्हाला. बाबा येणार आहे तुम्हाला न्यायला.”

“ अग पण…”

“पप्पा, तुम्ही पण प्रयत्न करा.”

पहिले काही दिवस सर्वांना त्रास झाला. एक दुसऱ्याला सावरत आणि सांभाळत ते आला दिवस ढकलू लागले. शुभ्राने थोडं धाडस करून एक दिवस अविनाशच्या बॅग उघडल्या. वरच त्याचा कडक युनिफॅार्म होता. त्याला मिळालेली पदकं होती. तिने ते सामान खूप सांभाळून ठेवले. त्यात अनेक फोटो होते. तिचे एकटीचे, त्या दोघांचे, मम्मा- पप्पांचे, आई- बाबांचे… त्याचं वॅालेट, फोन, कपडे, आणि अनेक इतर वस्तू होत्या. सर्वात खाली होती त्याची डायरी.

‘ अरे वा, अवि डायरी लिहितो मला माहितच नव्हतं. मला वाचायला आवडेल. पण दुसऱ्याची डायरी वाचू नये म्हणतात. पण अवि तर माझा आहे , मग मी वाचू शकतेच. तसंही आम्ही कधी काही लपवलं नाही एकमेकांपासून.’

त्या रात्री तिने डायरी वाचायला सुरवात केली. डायरी लिहायला सुरवात त्याने आर्मी जॅाईन केल्यावर झाली होती. त्यात त्याने घरापासून दूर गेल्यावर जाणवतं असलेला एकटेपणा, मम्मा- पप्पा, मित्र, आर्मी लाईफ, सिनीयर व शिस्त, हमले, जखमी मित्र, मृत्यु, शहिद होणं, आणि रक्तपात, असुरक्षितता, काळजी व भय व्यक्त केलं होतं. लग्न करावं की नाही, मम्मा- पप्पांचा आग्रह, आपल्या माघारी बायकोचं काय होईल ही काळजी व चिंता व्यक्त केली होती. शुभ्राचा फोटो पाहिल्यावर मनात आलेले विचार, मित्रांनी काढलेली समजूत, बायकोकडून असलेल्या अपेक्षा, त्याच्या मनातील तिचं चित्र, सर्व त्याने नमूद केलं होतं. सीमारेषेवर सतत होणारा गोळीबार, रात्री- बेरात्री होणारी आक्रमणं, जखमी सैनिक, घरी बोलता येत नाही म्हणून होणारी तगमग… शुभ्राला त्याच्या मानसिक अवस्थेची कल्पना आली.

अविला स्वतःच्या मृत्युची भिती नव्हती. देशाकरता वीरमरण स्वीकारायला तो एका पायावर तयार होता. आपल्या माघारी शुभ्राचं काय होईल ही काळजी त्याला पोखरत होती. मम्मा- पप्पा तिला लेक मानत होते व तसेच सांभाळतील याची त्याला खात्री होती. घर- पैसे हे प्रश्न तिला कधीच भेडसवणार नव्हते. पण तरूण वयात हा आघात…तिने परत उभारी घ्यावी, रडत- कुथत बसू नये. स्वतः ला असं घडवावं की सर्व दिग्मूढ व्हावे.

‘ अविला असं काही घडेल असं जाणवलं होतं का? त्याला माझी किती काळजी व चिंता वाटत होती. वाचताना मला ती जाणवते आहे. अविला मी इतकी कमजोर, नाजूक, कमकुवत किंवा नैराश्यात जाणारी मुलगी वाटली का? ‘

ती सुन्न होऊन थोडा वेळ तशीच बसली. मग तिला वाटलं, ‘ त्याला वाटणारी भिती मी खरी ठरवली का?’ ती नखशिखांत हादरली.

त्या रात्री तिला झोप आली नाही. दुसऱ्या दिवशी कॅालेज व अभ्यास पटापट आटोपून ती परत डायरी वाचायला बसली. त्या काळात तो व त्याचे मित्र ‘कहीं दूर जब दिन ढल जाये’, ‘मैंने तेरे लिये ही सात रंग के सपने चुने’, आणि ‘कल क्या हो किसको पता, अभी जिंदगी का ले लो मजा’ गाणी ऐकायचे. ते सर्व एकत्र ‘ कल क्या होगा…’ म्हणायचे.

वाचता वाचता शेवटची काही पानचं उरली होती. त्यात एका पानावर चक्क तिला संबोधून अविने पत्र लिहिले होते.

हॅलो शुभ्रा,

तू हे पत्र वाचते आहे म्हणजे माझी डायरी तुझ्या हातात आहे व मी तुझा गुडबाय म्हणून निरोप घेतला आहे. लढताना मरण यावे, देशाकरता शहिद व्हावे, ही प्रत्येक सैनिकाची आंतरिक इच्छा. मला वीरमरण आले याहून गौरवाची गोष्ट कोणती? पण तू वीरपत्नी झाली, हे लक्षात आलं का? मग तसंच धैर्याने व हिंमतीने पुढे वाढ. तुला माहित आहे की मला आनंदचा संवाद ‘बाबूमुशोई, जिंदगी बड़ी होनी चाहिए...लंबी नहीं’ अत्यंत आवडतो. माझ्या जीवनाचं ते सार समज व दुःख करू नको. माझं आवडतं गाणं ‘ कल क्या होगा’ जीवनाचे तत्वज्ञान शिकविते. प्रत्येक क्षणाला जीवनाचा आस्वाद घे.

तुला मी पहिल्यांदा पाहिलं पांढऱ्या शुभ्र साडीत. किती सोज्वळ, सुंदर व शालीन दिसत होतीस तू. अग, मला साक्षात सरस्वतीला पाहिल्यासारखं वाटलं . माझ्या मनात ही शुभ्रा वसते. तुला माहिती असेलचं, गंगा नदीला शुभ्रा म्हणतात. किती छान खळाळून वाहते ती. तू नेहमी तशीच खळाळून हस. निर्मळ, पवित्र व शुध्द राहा. आनंदात रहा.माधवी हो. मोगऱ्यासारखी दरवळत रहा.

खूप शिक. पीएचडी पूर्ण कर. त्या पुढेही शिक. सरस्वती हो. मी नेहमी तुझ्यासोबत आहे. मी ‘अविनाश’ आहे. मम्मा- पप्पा आणि आई-बाबा आहेतच. शुभ्रा, तू नावाप्रमाणे स्वतंत्र आहे. जे योग्य वाटेल, ते कर व आनंदात रहा. तुझ्या आनंदात माझा व आमचा सर्वांचा आनंद आहे…

पत्र अपूर्ण होते. पण त्या पत्राने तिला जगण्याची नवीन ऊर्मी दिली. तिच्या राहणीत, वागण्या-बोलण्यात परिवर्तन झाले. ती चांगली तयार होऊ लागली. पण वस्त्र पांढरेच पसंत करायची.

सर्वांनी विचारायचा प्रयत्न केला. मम्मांनी तिला पांढरा सोडून कोणतीही रंग परिधान कर सांगितले. पण ती गोड हसायची. त्यांना सांगायचाी, “ मी लग्नाच्या आधीपासून जास्त पांढरा रंगच परिधान करते. मम्मा, अवि गेला म्हणून नाही तर मला पांढरा रंग आवडतो म्हणून घालते. पांढरा रंग शुद्धता, स्वच्छता, पवित्रता, चांगुलपणा, आणि निरागसपणा सूचित करतो.”

शुभ्रा जगण्याचा आनंद लुटायला लागली. अभ्यास लक्ष केंद्रित करू लागली व त्याच्यामुळेच आज ती दिक्षांत समारंभात होती.

पदवीदान समारंभानंतर घरी छोटीशी पार्टी आयोजित केली होती. त्यात तिने लखलखती पांढरी साडी व हिऱ्यांचे दागिने घातले. त्या दिवशी पांढरा परिपूर्णतेचा रंग होता. मोगऱ्याचा गजरा माळला.

“साक्षात सरस्वती अवतरली या धरेवर” असंच भासत होतं. तिने डेकवर गाणं लावलं,

‘ कल क्या होगा किसको पता…’


2. प्रतिकार

विनया बस मधून उतरली. ती चार दिवस ९० किमी दूर असलेल्या घरी सुट्यांमध्ये गेली होती. सोमवार पासून कॅालेज सुरू होणार म्हणून रविवारी आरामात घरच्यांसोबत जेवण करून दुपारच्या बसने ती नागपूरला परतली. तिचं कॅालेज व वसतिगृह गावाबाहेर होतं. तिच्या स्टॅापवर उतरणारी ती एकटीच होती. तिने आपली बॅग पाठीवर घेतली व मैत्रिणीशी फोनवर बोलत दीड किमी दूर असलेल्या वसतिगृहाकडे पायी निघाली. त्या रस्त्यावर ॲाटो रिक्क्षा मिळणं कठीण होतं. चार वाजता त्या हायवेवर वाहतूकही कमीच होती. आपल्याच नादात व तालात असलेल्या विनयाला कोणीतरी आपल्या मागे येतो आहे, याची कल्पनाच आली नाही. 

“ ईशा, तू चहा करायला सुरवात कर. इकडे चहा तयार होत नाही तर मी आत प्रवेश करीन”, तिने फोनवर मैत्रिणीला सांगितलं. 

“ जो हुकुम मेरे आका”, ईशा हसत म्हणाली. 

“दूध आहे…”

अचानक ईशाला विनयाचा ओरडण्याचा आवाज आला.

‘ए, सोड. सोड मला. कोण आहे ? का खेचता मला?’

“ विनया, काय झालं? तू ठीक आहे ना?”

‘चूप बस. आरडाओरड करू नको. कुऱ्हाड मारीन डोसक्यावर…’ आवाज ऐकू आला.

‘ हेल्प, हेल्प…’

विनयाचा आवाज ऐकू येत नव्हता. 

‘ तो फोन खाली पडण्याचा आवाज होता का?’ ईशा घाबरली. काय केले असेल त्या माणसाने विनयाला?’

तिने दहा बारा जणींना गोळा केले. जे मिळेल ते हातात घेऊन त्या दुचाकी गाड्यांनी त्या रस्त्यावर गेल्या. विनयाचा फोन सापडला, पण ती दिसत नव्हती. गाड्या लावून त्या तिला हाका मारत होत्या. रस्त्याच्या बाजूला झाडंझुडपं होती. दोघी- दोघींचे गृप करून हिमतीने त्या आत शिरल्या. हाका मारणं सुरूचं होतं पण प्रतिसाद शून्य. विनयाने पोलिसांनाही कळवलं होत. पण त्यांना पोचायला वेळ लागणार होता. पेट्रोलिंग व्हॅन लवकर पोचेल असं त्यांनी सांगितलं होतं. 

एका जागेवरून थोडा विचित्र आवाज येत होता. ईशा व रश्मी तिकडे कानोसा घेत जात असताना, त्यांना दूर दोन मैत्रिणी दिसल्या. त्यांना बोलावून चौघी आत शिरल्या. समोरचे दृश्य पाहून त्या रागाने लालीलाल झाल्या. त्या माणसाने विनयाच्या तोंडात बोळा कोंबला होता. तिच्या ओढणीने तिचे पाय बांधले होते व तो तिच्यावर झुकला…

एका क्षणात चौघी त्याच्यावर तूटून पडल्या. स्वतःला सांभाळत त्याने कुऱ्हाड उगारली. तोच सणकन रश्मीचा स्टंप त्याच्या डोक्यात पडला. लाल कुडता परिधान केलेली ईशा हातातील काठीने सपासप वार करू लागली. एकीने त्याच्यावर दगडांचा वर्षाव केला. त्या सर्वजणी चवताळून उठल्या होत्या. एका मैत्रिणीने विनयाला सोडवलं. ईशाने त्याच आोढणीने त्याच्या छातीवर बसून त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याला लाथाबुक्यांनी मारणं सुरू होतं.

 दूरून पोलिस सायरनचा आवाज येऊ लागला. तसा तो माणूस सुटकेसाठी धडपड करू लागला. रश्मीने त्याला जोरदार थोबाडीत मारली व म्हणाली,

“ तुला काय स्त्री फक्त उपभोग्य वस्तू वाटते? अबला समजतो स्त्रीला? तिची इतर रूपं पाहिली नाही का? आदीशक्तीचं रूप…”

तेवढ्यात पोलिसांनी येऊन त्याला ताब्यात घेतले. विनयाची चौकशी करून ती ठीक असल्याची खात्री केली. मुलींचं अभिनंदन करून त्यांना पोलिस ठाण्यात औपचारिकता पूर्ण करण्यास बोलावलं. 

विनया अजूनही भितीने थरथर कापत होती. ईशाने तिला मिठी मारत धीर दिला. 

“ ईशा, तू प्रसंगावधान दाखवलं म्हणून मी वाचले. काळ आला होता ग त्या नराधमाच्या रूपात. म्हणतात ना ‘ कठीण समय येता कोण कामास येतो.’ पण तुम्ही सर्वजणी धावत आल्या माझ्याकरिता व त्या राक्षसावर साक्षात दुर्गा देवी सारख्या तूटून पडल्या.”

ईशा म्हणाली, “ तिनेच हिमंत दिली असावी आम्हाला. वाईट गोष्टींना विरोध केलाच पाहिजे. प्रतिकार करून वाईटाचा नायनाट व्हायलाच पाहिजे. प्रत्येकीमध्ये तिचा अंश असतो व तोच आपल्याला सबला करतो.”


3. कौशिकी

कौशिकी तिच्या शाळेचा गणवेश घालून तयार झाली. तिला शाळेचा गणवेश खूप आवडायचा. गडद निळ्या रंगाचा पिनाफोर फ्रॅाक, आतलं पांढरं ब्लाऊज, निळा टाय व निळा बेल्ट, पायात शुज व मोजे घालून, दोन छोट्या वेण्या पाहून मम्मा म्हणायची,

“ पुतुल, माझी पुतुल, तुला निळा रंग खूलून दिसतो.” 

“मॅाम, निळा नाही ग. हा रॅायल ब्लू आहे. म्हणून ‘ रॅायल’ दिसते मी.”

 ती तयार झाल्यावर दादी तिला ‘ मिष्टी’म्हणून मिठी मारायची. 

शहरातील एका प्रतिष्ठित शाळेत ९ वर्षाची कौशिकी शिकत होती. शाळेचे व्यवस्थापन बंगाली संस्थेकडे होते. या शाळेचे भव्य व विशाल खेळाचं मैदान होतं. शाळेच्यासमोर एका बाजूला समोर मोठा हॅाल होता. गणपतीपासूनच तिच्या शाळेची स्वच्छता, साफसफाई व रंगरंगोटी सुरू व्हायची. अनेक वर्षांपासून समोरच्या हॅालमध्ये नवरात्रीत बंगाली देवीची ‘पूजो’ व्हायची. कोलकताहून मूर्ती बनवायला विशेष कारागीर यायचे. ते दुर्गेची दशभुजा मूर्ती बनवायचे. ती सिंहारूढ महिषासुरमर्दिनी असायची. तिच्या दोन्ही बाजूंना कार्तिक, गणेश, लक्ष्मी व सरस्वती यांच्या मूर्ती असायच्या. शाळेतून जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ती लपून छपून त्यांचं काम पाहायची. ती मूर्ती साकार होताना पाहून तिला अद्भूत आनंद व्हायचा. किती ही पाहिलं तरी ते कमी वाटायचं. पण नेमकी नवरात्रात शाळेला पंधरा दिवस सुट्टी मिळायची. शाळेच्या पटांगणातही मोठे प्रदर्शन भरायचे. 

पूजोच्या वेळी ते वेगवेगळ्या मंडपांना सकाळ- संध्याकाळ भेट देत. रोज शाळेच्या देवीला संध्याकाळी जाण्याचा ती हट्ट करायची.

“ पप्पा, तिथे किती सुंदर वातावरण असतं. रोषणाई असते. फुलं, उदबत्या, व धूपाचा, आणि प्रसादाचा सुगंध दरवळत असतो. नवीन कपड्यांचा व अत्तरांचा सुवास मन मोहवतो. विविध कार्यक्रम होतात. लोकांची लगबग असते. खूप छान वाटतं तिथे.”

“ अग, हे सर्वच मंडपात असतं, हो ना?”

“हो, पण इथे सप्तमीपासून नवमीपर्यंत होणारे धुनुची नृत्य मला फार आवडते. तिथला कापूर व हवन सामग्रीचा गंध नवीन उर्जा व शक्ती प्रदान करतो.”

“पण दादीला…”

“ माझ्या शाळेतील देवी ‘बेस्ट’ देवी असते. पण मम्मा, एक विचारू का? माझी देवी नेहमी पांढऱ्या साडीत का असते? एकदाच ती लाल साडीत होती.”

“ पाढरा रंग निर्मलतेचा, पवित्रतेचा, व शुध्दतेचा रंग असतो.”

“ आणि गडद निळा रंग?”

मम्मा, पप्पा व दादी खळाळून हसले.

दादींनी सांगितले, “ तो उर्जेचा रंग आहे. न्याय, सहिष्णूता, शांतता, विपूलतेचे व विस्ताराचे प्रतीक आहे.”

“ किती छान! एक सांगू का? ‘सिक्रेट’ आहे ते. माझी देवी या वेळी गडद निळी साडी नेसणार आहे.”

मम्मा व दादीने एकमेंकीकडे पाहिले. पप्पांनी विचारलं, “ तुला कसं माहिती आहे मग ‘सिक्रेट’?”

“ त्या काम करणाऱ्या अंकलना मीच सांगितलं. त्या दिवशी ते मला शाळेबाहेर दिसले. तेव्हा आम्ही बोललो. मी त्यांना निळी साडी नेसवाल का असं विचारलं. तेव्हा ते ‘खूब भालो’ म्हणाले.”

“ पण हाच रंग का ग?” मम्माला उत्सुकता वाटत होती.

“ मग माझ्या देवीलापण सर्व ‘पुतुल’ व ‘मिष्टी’ म्हणतील, मला म्हणता तुम्ही अगदी तसं” ती खळाळून हसत म्हणाली.


4. सोनेरी गरिमा


भव्या आई-वडिलांसोबत कन्याकुमारीला गेली होती. देवीचे दर्शन झाल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता ते विवेकानंद स्मारक पाहायला गेले. आकाश निरभ्र होतं. निळे आकाश, निळा- हिरवा समुद्र, मधून कुठेतरी दिसणारी उन्हात चमकणारी सोनेरी वाळू, सर्वच मन मोहित करणारं होतं. स्मारकाजवळ गेल्यावर त्याची भव्यता मनाला स्पर्शून गेली. 


विवेकानंद रॉक मेमोरियल हे किनार्‍यापासून सुमारे 500 मीटर अंतरावर समुद्रात असलेल्या दोन खडकांपैकी एकावर होतं. स्वामी विवेकानंद यांची आकर्षक मूर्ती पितळेची असून, तिची उंची साडेआठ फूट होती. ही सोनेरी मूर्ती इतकी प्रभावी भासत होती की त्यात स्वामीजींचे व्यक्तिमत्त्व जीवंत असल्याचा भास होत होता.


1892 मध्ये स्वामी विवेकानंद कन्याकुमारीला असताना एक दिवशी पोहत या प्रचंड खडकावर पोहोचले. या निर्जन स्थळी साधना केल्यानंतर जीवनाचे ध्येय गाठण्यासाठी त्यांना मार्गदर्शन लाभले होते. 

त्या स्मारकाची दिव्यता अनुभवणे ही आगळीच अनुभूती होती. सूर्याच्या सोनेरी प्रकाशात स्मारक न्हाऊन निघाले होते. एखाद्या मंदिराची पवित्रता व शूचिता तेथे होती. अद्भूत आनंद प्राप्त झाला होता. तेव्हापासून पिवळा वा सोनेरी रंग पाहिला की भव्याला त्या स्मारकाची आठवण होते व मनाने ती तेथे विहरत रहाते.


 5. बीज अंकुरले

सकाळी राम्याचा फोन आला.

 “ बाईसाहेब, म्या आज कुआ खनतो म्हनतो. दोन गडी सोबत हाय. जागा तुमी ठरवली हाय. मंग करू ना शुरवात?”

“हो. हो, करा सुरवात. तीन हजार रूपये फूट, ना? “, राधाक्कांनी विचारलं.

“व्हय जी. भाऊला दर म्या सांगितलं व्हते.तुमी येता ना आज? आट वाजता न्याहरी करतो व कुराडीचा पयला घाव घाल्तो.”

“हो. आम्ही पण लवकर पोचतो. रस्त्यात जो वेळ लागेल तो व अर्धा तास जास्त आम्हाला निघायला. बेस्ट लक.”

“व्हय जी. ये जा मंग”.

राधाक्काला ही बातमी ऐकून आनंद झाला. तीन वर्ष होऊन गेले होते शेतीचा हा पट्टा घेऊन. पण मध्येच कोरोना आला व ७० किमी दूर असणाऱ्या या शेतावर जाणं कठीण होऊन गेलं. एका वर्षी नांगरणी केली, बेड तयार केलं व बियाणे ही घेतलं, पण त्या वर्षी पाय फ्रॅक्चर झाला व ऐन पेरणीच्या दिवसात घराबाहेर निघणं कठीण झालं.

राधाक्काच्या कुटुंबात त्यांचे यजमान मधुकरराव, मुलगा मंगेश, सून वीणा, व त्या स्वतः होत्या. मुलगी सीमा लग्न होऊन बाहेरगावी होती. मघुकररावांना शेतीत रस नव्हता. त्यांची शेती भाऊबंदकीत अडकली होती व ते ७१ व्या वर्षी दगदग व मनस्ताप मागे लावून घ्यायला तयार नव्हते. वीणाच्या माहेरी शेती असल्यामुळे तिला शेतीची जाण व आवड दोन्ही होतं. पण तिच्या मंगेशला शेतीकरता वेळ नव्हता. तो त्याच्या कंपनीत व्यस्त राहायचा. 

त्या दिवशी वीणा राधाक्कांसोबत शेतीवर गेली. पाणी व डब्बा घेऊन दोघी निघाल्या व मग त्या दोघी नेहमी सोबत शेतावर जाऊ लागल्या. विहिराला तीस फूटावर भरपूर पाणी लागलं. दोघी आनंदल्या व त्या दिवशीच त्यांनी कोणती झाडं लावायची, कुठे लावायची, व फुलझाडं कुठली आणायची, ठरवून टाकलं. पुढच्या वेळी दोघी फळांची व फुलांची रोपं घेऊनच गेल्या. शेतात तणं वेचणं, खुरपणी व नांगरणी सुरू होते आहे, हे पाहून आजूबाजूचे शेतकरी भेटायला आले. ओळखीपाळखी झाल्या व त्यात जमीनीचा कस कमी असल्याचं कळलं.

‘अरे, ही तर माझ्यासारखीच आहे. लग्न होऊन तीन वर्ष झाली पण आई व्हायचं आमचं स्वप्न अजून पूर्ण झालं नाही. आता या भूमीची सुपिकता कमी आहे? देवा, काय आहे तुझ्या मनात?’

लोकांचं बोलणं ऐकून राधाक्का हिरमुसल्या. त्यांना हिमंत देत ती म्हणाली,

“आई, देवी धरित्रीच्या कृपेने सर्व ठीक होईल. ही धरती माता आहे. ती नापीक राहिलच कशी? आपण तज्ञांचा सल्ला व मार्गदर्शन घेऊच. “

वीणा स्वतः डॅाक्टरांकडून औषधोपचार घेत होती. तिच्यात सकारत्मकता ठासून भरली होती व त्यामुळे घरात मंगेशला फक्त तिची मनोदशा व व्यथा माहित व समजत होती. तिने सल्ला- मसलत करून पहिले सोयाबीन व कापूस लावायचं ठरविलं व राधाक्कांनी ते मान्य केलं. पाऊस यथायोग्य झाला होता व दोघी मायलेकी बी- बियाणं घेऊन शेतावर निघाल्या. पेरणी करता शेत तयार होतं. 

रस्त्यात वीणा हळूच म्हणाली,

“ आई, एक विचार मनात सारखा येतो आहे.”

“ अग, सांग मला. काही पाहिजे का तुला?”

“ नाही हो. शेतात देवीचं लहान देऊळ बांधायचं का? आपण दोघीही स्त्रिया, धरती पण माता व आपली देवी माता आहेच. “

“ किती सुंदर विचार. आजच जागा ठरवून टाकू.”

“पार्वती किंवा गौरी सुपिकतेच्या देवी म्हणून ओळखल्या जातात. त्यांच्या आशीर्वादाने आपल्याला उत्तम पीक मिळेल, आई.”

त्या दिवशी पेरणी झाली व देऊळाची जागाही ठरली. तिथल्याच माणसाला लगेच काम व अग्रीम रक्कम देऊनही टाकली. वीणाने मनात देवळाच्या आजूबाजूला फुलझाडंही लावून टाकली.


नंतर एका लग्नामुळे त्या महिनाभर शेतावर जाऊ शकल्या नाही. पण शेताची काळजी घेणारा कर्तव्यदक्ष होता. त्या शेतात गेल्या तेव्हा शेताने पोपटीसर हिरवा गालीचा पांघरला होता. ते दृश्य पाहताच दोघींचेही डोळे पाणवले.

“ आई, आपली देवी शैलपुत्री हिरवी साडी परिधान करेल. हिरवा रंग प्रतीक आहे निसर्गाचे, सृजनतेचे, सुपीकतेचे, प्रजननाचे, भरभराट, समृद्धी,सुसंवाद, स्थिरता,संतुलन, सहनशक्ती , अंत:र्बाह्य सौंदर्य आणि चैतन्याचे. बघा ना, देऊळाचे काम जोरात सुरू आहे. आपण प्राणप्रतिष्ठा धुमधडाक्यात करू या का? मला आज फार प्रसन्न वाटतं आहे. “

तेवढ्यात तिच्या फोनवर मेसेज आला. तिने तो दोन- तीनदा वाचला. मग ती पटकन खाली बसली व रडायला लागली. राधाक्का घाबरल्या. 

“अग बेटा, काय झालं? काही वाईट…”

“ आई, नाही. तसं काही नाही. आई, सर्व बीजं एकत्रच अंकुरले. आई, माझा प्रेगनेंसी रिपोर्ट पॅाझिटिव्ह आला. मी आई होणार आहे व तुम्ही आजी.”


6. प्रचिती


प्रिय आई, 

एक नवीन प्रवास. नवीन जागा. नवीन शहर. आप्तस्वकीयांची भेट. मनसोक्त हिंडण- फिरणं, खाणं- पिणं. ..

आई, परीक्षेनंतर बाहेर फिरायला जायचा आम्हा भावडांचा बेत ठरला व मी रोमांचित झाले.मी पहिल्यांदाच विमानाने प्रवास केला व मनात आठवणींची शिदोरी जमा करायला सुरवात केली. 

कालपासून नवरात्र पर्व सुरू झालं. आज मावशीने देवीच्या दर्शनाला जायचा कार्यक्रम ठरवला. तिला आम्ही कोणती देवी, कुठे आहे, आजूबाजूला काय आहे, इत्यादी प्रश्न विचारीन भांडावून सोडलं. पण ती ठाम राहिली व हसत म्हणाली, 

“ तुम्हाला आवडेल ही देवी. तिच्यात व तुमच्यात खूप साम्य आहे. तुमच्या ‘हिरोची’ ही प्रिय देवता.”

आम्ही बसलो डोकं खाजवतं. ‘कोण असेल ही देवता? काय साम्य असेल तिच्यात व आमच्यात?’

आई, मी दुर्गादेवी, गृहलक्ष्मी, अंबाबाई, व शीतलामाता यांचं दर्शन घेतलं होतं. ही नवीन देवी पाहण्याची प्रचंड उत्सुकता होती. सकाळी साबुदाणा खिचडीचा नाश्ता करून ( तबला व डग्गा नाही केलं बर), मोठी कॅब करून घर सोडलं. अग, इथल्या रस्त्यांवर रहदारी खूप जास्त. रस्ते सुंदर व आधुनिक आहे. पण अर्धे रस्ते अजून बनतात आहे. त्यामुळे पोचायलाच दीड तास लागला. मंदीराचा कळस दूरवरून दिसत होता. प्रचंड मोठं मंदिर असावं , असं वाटत होतं व ते खरेच तसचं होतं.

नावावरून ते भवानी मातेचे मंदिर असल्याचं समजलं. भवानी माता म्हटल्याबरोबर डोळ्यासमोर आले शिवाजी महाराज-आमचे ‘हिरो’. त्यांच्या प्रत्येक गोष्टीत भवानी मातेचा उल्लेख येतो. शत्रुचा नायनाट करण्याची उर्जा व शक्ती त्यांना भवानी माता प्रदान करायची. 

मंदिराच्या विशाल सभागृहात प्रवेश करण्याआधीच माझ्या मनात मूर्ती दिसू लागली. पण माझ्या मनातली देवी व ही खरी मूर्ती प्रत्यक्षात वेगळी, वैशिष्ट्यपूर्ण आहे. लाल चुनरी घेतलेला देवीचा मुखवटा राखाडी रंगाचा आहे. फक्त मुखवटा आहे. पण दागिन्यांनी मढवलेले देवीचे रूप मनोहर, सुंदर व मोहक आहे. देवीला ‘चारूता’ का म्हणतात, ते या दर्शनाने कळलं. मी नतमस्तक तर झालेच पण ते रूप माझ्या मनात ठसलं. डोळे मिटले की तो अद्भूत मुखवटा समोर येतो. अपार महिमा व अपार शक्ती!

आई, तुझी प्रकर्षानं आठवण झाली. मला राखाडी रंग मुळीच आवडत नाही. तू मला नेहमी मला माझा हा दुराग्रह सोडायला सांगायची. कोणतीही गोष्ट, वस्तू, रंग किंवा माणूस हा पूर्णपणे नाकारू नये, असं समजावयची. पण “ मै नन्हा बालक…मतिसे मुढो”.

आज मला तुझ्या सांगण्याचं महत्व उमजलं. कृष्णवर्णाची ही छटा बुध्दिमत्ता, तटस्थता, संतुलन व अलिप्तता दर्शविते. वाईटाचा विनाश सूचविते. हा शिवशंकराचा रंग म्हणून ओळखल्या जातो, असं मावशीने सांगितलं. 

बघ ना, या भवानी मातेच्या दर्शनाने व कृपेने माझा दृष्टिकोन बदलला व नवीन ज्ञान प्राप्त झाले. माझ्यातील ताठरपणा व ‘मी’ पणाचा नाश झाला. 

आई, तू आलीस की आपण या देवीच्या दर्शनाला परत जाऊ. माझी ही अलौकिक प्रचिती तुझ्याबरोबर कधी शेयर करते, असं वाटत होतं. फोनवर बोलताना बऱ्याच गोष्टी निसटून जातात व या अनमोल अनुभवातलं सर्वच जतन करण्यासारखं आहे. म्हणून ही लांबलचक नोट.

भेटू या लवकरच, 

तुझी आद्या

ता. क.: भवानी मातेचा फोटो पाहून तुला काय अनुभव आला जरूर कळव. फोटो सोबत पाठवते आहे.


7. रंग दे बसंती

रिध्दी १०-११ वर्षाची असताना गडावर देवी दर्शनाला गेली होती. गडाच्या पायऱ्या चढत असताना जागोजागी तिला नारिंगी झेंडे व पताका दिसत होत्या. देवीचा भगवा मुखवटा, चेहऱ्यावरील तेज, पुजाऱ्यांची भगवी वस्त्र, होमकुंडातील ज्वाळा, आणि भाविकांच्या सोवळ्यांचे रंग सर्व वातावरणाला पावित्र्य व मंगलता प्रदान करत होते. ते मंदिरात असताना देवीची आरती ढोल, ताशे, नगाड्यांच्या गजरात सुरू झाली. आरतीसुरू असताना दोन बायांच्या अंगात देवी आली. रिध्दी थोड्या भितीनं व उत्सुकतेनं ते पाहत होती. ग्रर्भगृहात सर्वत्र नारिंगी झेंडूंच्या माळा लावल्या होत्या. ही आरती व देवी दर्शन तिच्या मनावर कायमचं कोरल्या गेलं व त्यात ठळक होता नारिंगी वा केशरी- भगवा रंग. 

तो सर्व प्रसंग पाहताना रिध्दीला आठवले भगतसिंग कारण नारिंगी रंग बल आणि शक्तीचं, गौरव आणि वीरतेचं प्रतीक आहे. तिच्या डोळ्यासमोर आले तेजोमय व ज्ञानाचे मूर्तरूप स्वामी रामकृष्ण व स्वामी विवेकानंद, इस्कॉन , अक्षरधाम, व वेगवेगळ्या ठिकाणी पाहिलेले साधू व बौध्द भिक्षु. ध्यान आणि करुणा व आध्यात्माशी हा रंग जुळलेला आहे , हे उमजलं. धर्म, दिव्यता, भव्यता, तेजस्विता, व अलौकिकता यांची सांगड तिने घातली. तिच्या भावनांची उत्कटतता सकारात्मकतेशी जोडल्या गेली. भय दूर पळाले . हा चमकदार आणि दोलायमान नारिंगी रंग तिच्या जीवनात उत्साह, तारुण्य, ऊर्जा आणि आनंदाची उधळण करू लागला.


8.गृहप्रवेश व गोंधळ


मी नित्या. शिव आणि माझी वरात घरी येऊन पोचली. तशी मी आधी घर पाहिलं होतं. पण आज त्याचं रंगरूप खूप मोहक वाटत होतं. घरावर लाल, निळ्या व हिरव्या रंगांच्या दिव्यांची आकर्षक रोषणाई केली होती. समोर अप्रतीम रंगसंगती केलेली सुंदर मोराची रांगोळी होती. 

घराच्या प्रवेशव्दारावर आम्हा दोघांचे पाय धूऊन आईंनी आम्हाला ओवाळले. उंबरठ्यावरचे माप ओलांडून आम्ही घरात प्रवेश केला. उंबरठ्यापासून देवघरापर्यंत सुंदर पायघड्या अंथरल्या होत्या. त्यांची सजावट ऑर्किडच्या निळ्या जांभळ्या फुलांनी, मोरपिसं व विद्येच्या पानांनी केली होती. मला तर स्वप्नात विहरत असल्यासारखं वाटतं होतं. देवघरात पिठाची देवी केली होती. हिरव्या खणांची साडी, मंगळसूत्र, हिरव्या बांगड्या व इतर सोन्याच्या दागिन्यांनी तिला मढवलं होतं. आईंनी मला कुंकू लावून साडी हातात दिली व वरातीची पांढरी साडी बदलून ही नवीन साडी नेसायला सांगितलं. 

साडीची घडी उकलताच मला अत्यंत आनंद झाला. मोरपिशी रंगाची ती साडी मनमोहक होती. असं म्हणतात की देवाने मोराला घडवताना त्याच्या पिसाऱ्यावर मुक्त हस्तानं रंगांची पखरण केली व निळ्या आणि हिरव्या रंगाच्या चित्तार्षक छटा अस्तित्वात आल्या. मी आईंना साडी व तिचा रंग आवडल्याचं सांगितलं.

त्या म्हणाल्या, “ आम्ही गृहप्रवेशाची ‘थीम’ मोरपंखी रंग ठेवली. म्हणून बघ, सर्व त्याच रंगाचं आहे. लग्नात हिरव्या रंगाला स्थान असतेच. मोरपंखी रंग महागौरीचा आवडीचा असल्याचं म्हटलं जातं. हा रंग सद्‍भावना, सुंदरता, समृध्दी यांचं प्रतीक समजला जातो. यात हिरव्या रंगाची संपन्नता आणि निळ्या रंगाची स्थैर्यता आहे. मनभावक मोरपिशी रंगात निळ्या रंगातला विश्वास, एकनिष्ठता, आत्मविश्वास आणि सचोटी तर हिरव्या रंगातली सृजनता, सुपिकता, आरोग्यसंपन्नता आणि नावीन्य आहे. या प्रसंगाकरिता हा रंग म्हणूनच एकदम उचित आहे. चल, नंतर निवांत गप्पा मारता येतील. पहिले तुम्हाला देवीची पूजा करायची आहे. ही आपल्या घराण्याची परंपरा आहे. पूजेनंतर गोंधळी ( आता शीर्षकातल्या गोंधळाचा खरा अर्थ समजला ना, वाचकहो?) येणार आहे, व त्याकरिता सूनबाई, माहेरची मंडळी येणार आहेत, बरं का?”

गंमत अशी की पूजेकरिता सर्व महिला मंडळ मोरपंखी, हिरव्या किंवा निळ्या रंगाचे कपडे परिधान करून होतं. माझ्याकरिता गोंधळ प्रकार नवीनच होता. मंगलकार्याची सांगता गोंधळाने होणार होती. मला गोंधळींची देवीची उपासना फार भावली. त्यांची विविध वाद्यं, संबळ, तुणतुणे, टाळ, झांजरी, डिमडी, आणि हातातल्या दिवटीचा उपयोग प्रभावशाली होता. मी त्यातील देवीची गीतं, संगीत, नाद, लय व ताल मनात साठवून ठेवली. 

लग्नानंतर इतक्या वर्षांनी अजूनही मी कुठेही मोरपंखी रंग पाहिला तर मला तो प्रसंग जसाच्या तसा आठवतो व मी भारवून जाते.


9.बॅाडीगार्ड

संध्याकाळची वेळ. भाविनी मैत्रिणींबरोबर दांडिया खेळायला जाणार होती. माँ उमियाच्या मंदिरात दांडिया होणार होता. तिने ते मंदिर पाहिलं होतं. माँ उमियाची भव्य मूर्ती, मोठमोठे लॅान्स, समोर उभारलेला गोलाकार मंडप व त्या पलीकडे असलेला तलाव, बगिच्यात विहरणारी बदकं, खूप रमणीय व चित्रमय होतं ते मंदिर.

गुजरातहून खास दांडिया कलाकारांना आमंत्रित करण्यात आलं होतं. रोजचे रंगपण ठरविण्यात आले होते व ’ ड्रेसकोड’ मध्ये फक्त भारतीय कपड्यांचा समावेश होता. त्या दिवशीचा रंग गुलाबी होता. भाविनीकडे गुलाबी रंगाचं काहीच नव्हतं व म्हणून न जाण्याकरता भक्कम कारणही होतं. तशी ही तिची जायची इच्छा नव्हती. पण आई- वडिलांचा आग्रह दुर्लक्ष करण्यासारखा नव्हता.

गुलाबी रंग प्रेमाचं प्रतीक व भाविनी तर प्रेम गमावून बसली होती. तिचं दुःख काळाच्या प्रवाहात कमी होतं नव्हतं. तिला त्यातून बाहेर काढण्यासाठी आई- वडील जमेल ते प्रयत्न करत होते. आईने दुपारीच तिच्याकरता गुलाबी रंगाचा अनारकली ड्रेस आणला होता. संध्याकाळी ती तयार झाली. गुलाबी रंगाचा अनारकली व कानात लहानसे गुलाबी टॅाप्स, हातात नाजूकसे घड्याळ, पांढरे सॅंडल्स व लहानशी पर्स. मेकअप अजिबात नाही. फक्त कपाळावर गुलाबी टिकली. ती सुंदर दिसत होती. तो गुलाबी रंग तिच्या चेहऱ्याला वेगळेच तेज देत होता. पण चेहऱ्यावरची खिन्नता लपत नव्हती.

मंदिरात त्या दिवशी सर्वत्र गुलाबी रंग होता. कलशावर गुलाबी प्रकाशझोत सोडले होते. देवीची गुलाबी भरजरी वस्त्रं, गुलाबी फुलं, व गुलाबी पडदे. गुलाबी रंग देवीचा, शीतलतेचा, प्रसन्नतेचा, आल्हादाचा,  प्रेमाचा, स्त्रीत्व, प्रेम, करुणा आणि कोमलतेचा, निष्पापतेचा व गोडव्याचा…

देवी लक्ष्मीचा तो आवडता रंग व राधा- कृष्णाचाही आवडता. मैत्रीचा, आपुलकीचा, सुसंवादाचा, आंतरिक शांतीचा, करुणेचा, आणि जवळ येण्याची क्षमता दर्शविणारी रंग. साहजिकच तिथले वातावरण “ ही गुलाबी हवा, वेड लावी जीवा’ असचं होतं.

तरूण- तरूणी तालात- नादात, जोशात दांडिया खेळत होते. दोन तरूण सारखे भाविनीवर येऊन आदळत होते. गर्दीत असं होतं हे तिला कळत होतं. पण ते वारंवार घडू लागलं. तिच्या मैत्रिणी आपल्याच धुंदीत होत्या. मग भाविनी दुसरीकडे जाऊन दांडिया खेळू लागली. तिथेही तिला ती व्दयी त्रास देऊ लागली. एक गुलाबी कुर्ता घातलेला तरूण त्या दोघांना दूर करायला तिच्या बाजूला येऊन दांडिया खेळू लागला. पण ये रे माझ्या मागल्या. शेवटी कंटाळून ती बाकावर जाऊन बसली. तेव्हा तिथे ही ते दोघे हजर. कुठूनतरी तो गुलाबी कुर्तेवाला तरूण बाकावर तिच्या बाजूला येऊन बसला. तो बाकावर हात पसरून बसला. तो काहीही बोलत नव्हता व करतही नव्हता. फक्त त्या दोघांकडे पाहात होता. त्याचं तिथे असणं व बसणं तिला हिंमत देत होतं. तिला सुरक्षित वाटत होतं. तो भाविनीशी एक शब्दही बोलला नाही. ती रात्री मैत्रिणींबरोबर घरी जायला निघाली, तेव्हा ते तरूण आजूबाजूला नसल्याची त्याने खात्री करून घेतली. 

कोण होता तो? इतका शांत व समंजस! तिची अव्यक्त भिती व चिॅता समजून घेणारा? तिच्याशी एक शब्दही न बोलणारा व तरी आपलासा वाटणारा? तिला सुरक्षिततेची जाणीव देणारा हा ‘ बॅाडी गार्ड’ कोण होता?



Rate this content
Log in