Dr. Vandana Pathak

Romance

4.3  

Dr. Vandana Pathak

Romance

“चिंब भिजलेले, बरसूनी आले रंग प्रीतीचे”

“चिंब भिजलेले, बरसूनी आले रंग प्रीतीचे”

27 mins
325


 भाव्या खिडकीतून बाहेर पाहत होती. पुण्याला मान्सूनचे आगमन झाल्यामुळे बाहेरची हवा दमट होती. दिवसभर ऊन तापले होते आणि सूर्यकिरणांचा रथ पश्चिम दिशेला वळत असतानाच आकाशात अबीर रंगाबरोबर काळे मेघ दिसू लागले होते. दुरून कुठून तरी थंड वारा येत होता आणि अत्यंत सुखद असा मृदगंध तनामनाला मोहून घेत होता. थोड्याच वेळात टीप टीप बारिश सुरू झाली. दिवसभर आठ तास काम ऑफिसमध्ये केल्यामुळे भाव्याच्या मनाला जी मरगळ आली होती व तिला जो थकवा जाणवत होता, तो छू मंतर झाला. नकळत तिने गुणगुणणं चालू केलं. तिचा आवाज गोड होता व तिला स्वरांची चांगली जाण होती. “ टीप टीप बारिश शुरू हो गई” या लयबद्ध गाण्यानंतर, नकळत ती “रिम झिम रिम झिम रुम झुम रुम झुम” म्हणायला लागली. बाहेर मोत्यासारखे टपोरे थेंब पडत होते. आपल्याच नादात मग्न असणारी भाव्या खिडकीच्या तावदानावर ठेका धरत सुंदर गात होती. हे गाणं गात असताना तिच्या डोळ्यासमोर ‘१९४२ अ लव स्टोरी’ मधील दृश्य उभे राहिलं. ती एका वेगळ्या विश्वात भटकंती करत होती. त्यामुळे आईने मारलेल्या दोन-तीन हाका तिला ऐकूच आल्या नाही. 

“ भाव्या, अगं बेटा, किती गोड गाणं म्हणते तू? पण अशी हरवली कुठे? तुला हाका मारलेल्या ऐकू येत नाही”, आई तिच्या जवळ येऊन म्हणाली.

“ मॅडम, अहो मॅडम”, तिच्या खांद्यावर हात ठेवत तिचा लहान भाऊ स्वप्निल म्हणाला,” जरा पुण्यातल्या आपल्या घरी परत येता का? आई हाका मारते आहे तुम्हाला.”

“ अरे स्वप्निल, असं का बोलतो तिच्याशी? ती तिच्या गाण्याच्या विश्वात आहे”, त्याला टोकत आई म्हणाली.

“ इतकं सुंदर रोमँटिक गाणं म्हणते तर खरी. पण हिचा बॉयफ्रेंड हिला सोडून सुंदर मुली बरोबर पळून गेला. तिच्या लग्नाकरिता वर संशोधन करून अनेक चपलांचे जोड झिजले. पण कोणी हिला पसंत करेल तर शपथ”, स्वप्निल उपहासानं म्हणाला.

 मोठ्या बहिणीला, भाव्याला, लग्नावरून टोमणे मारणं हा त्याचा आवडता उद्योग. त्याला टोकणारं किंवा आवर घालणार त्या घरात कोणीच नव्हतं. त्यांच्या वडिलांना जाऊन आठ दहा वर्षे झाली होती. वडिलांच्या निधनानंतर घरची सर्व जबाबदारी भाव्याच्या खांद्यावर होती कारण आई गृहिणी असून फक्त स्नातक पदवीधर होती.. नोकरी करून शिकत भाव्याने सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग करून, नंतर फायनान्स मध्ये एम.बी.ए. केलं होतं. सतत गुणवत्ता श्रेणीत नाव असणाऱ्या भाव्याला M.N.C. मध्ये उच्चपदावर भरघोस पगाराची नोकरी सहज मिळाली होती. स्वप्निल नावाप्रमाणेच स्वप्नाळू होता. त्याला अभ्यास न करता, मेहनत न करता, यशाची अपेक्षा होती. सहाजिकच त्याला वारंवार अपयशाचा सामना करावा लागत होता व त्यामुळे त्याचा कटूपणा दिवसेंदिवस वाढतच होता. पुरुषप्रधान संस्कृतीत, तो घरातील एकमेव पुरुष असल्यामुळे, त्याला रागवणं किंवा टोकणं आईला उचित वाटत नव्हतं. त्याच्या अपयशाचा खापर तो नेहमी भाव्यावर राग काढून, तिला हिणवून, मनात येईल ते बोलून, काढत होता. 

सरस्वतीचा वरदहस्त लाभलेली भाव्या ठेंगणी व सावळ्या वर्णाची होती. तरी तिचे एकंदर व्यक्तिमत्व आकर्षक होतं. तिचे डोळे सुंदर व बोलके होते. M. B. A. ला तिच्या वर्गात असणारा मनिष तिचा बॅायफ्रेंड होता. नातेवाईक व सर्व शेजारी मनिषला तिचा भावी नवरा म्हणून ओळखत होते. पण घरच्यांच्या आग्रहाला बळी पडून त्याने गोऱ्या व सुंदर मुलीसाठी भाव्याला तोंडावर संबंध संपवत असल्याचं सांगितलं. भाव्याच्या अंगावर जणूकाही अकस्मात वीज पडली व तिचं आयुष्य उध्वस्त झालं होत. बाहेर धरतीवर अमृतधारांमुळे नवचैतन्य पसरलं होतं, पण तिच्या मनात हिरवळीचं चिन्ह दिसत नव्हतं. नंतर आईने तिला समजवून तिचं नावं वधू-वरं सूचक मंडळात नोंदवलं. तिच्या शिक्षणामुळे व गलेलठ्ठ पगारामुळे अनेक मुलं बघायला येतं व पाहिल्यावर नकार देत.

“ आई, काही मुलांनी होकार दिल्यावर आपल्या मॅडमनी नखरे केले व नकार दिला “, स्वप्निलने निदर्शनास आणून दिले.

“बेटा, त्याला कारणही तसंच होतं ना? काही व्यसनी होते- दारूडे व जुवा खेळणारे, तर बाकी रिकामटेकाडे होते किंवा अशिक्षित. त्यांना लोभ होता तिच्या पगाराचा. सोन्याचं अंडं देणारी…”, आईला स्पष्ट करणं आवश्यक होतं.

स्वप्निलच्या शब्दांच्या प्रपातात तिचं मन ढगाळ आणि ओलचिंब व्हायचं. तिच्या आईला कुंद करणारं तिचं नैराश्य व मनातील मळभ जाणवायचं. पण स्वप्निलसमोर ती काहीच बोलू शकत नव्हती. ढग ओथंबून यावे पण कोसळू शकत नाही, सर्व वातावरण आंधारून जावं, तसं काहीस आई व भाव्याचं व्हायचं., किती तरी दिवसांनी लेक आनंदी भासत होती आणि मातीतील मृदगंधानं जणू तिच्या मनातील मरगळ व उदासीनता नष्ट झाली होती. आकाशात ढगाचं पहिलं पाऊल पडल्याबरोबर, त्यांच्या लगबगीची चाहूल लागताच, पावसाची गाणी आपोआप सुचतात. नकळत “गारवा, वार्‍यावर भिरिभर पारवा, नवा नवा” मनात पिंगा घालू लागते. ‘ असंच काहीसं माझ्या बाळाचं झालं असावं’ , आई स्वतःला म्हणाली. व्यक्त होत ती म्हणाली,

“ स्वप्निल, गाऊ दे रे तिला. तेवढाच तिला आराम. थकून जाते ती दिवसभर.”

“ कामचं करते ना? उपकार नाही करत. किती अंत पाहते आपला, खरं ना?” त्याच्याकडून चांगल्या बोलण्याची अपेक्षाच नव्हती.

“असं कसं बोलू शकतो तू? आपलं घर तिचं चालवते. खाणं-पिणं, कपडेलत्ते, औषधपाणी , तुझ्या शिक्षणाचा भार, तुझा पॅाकेटमनी, काय सांगू? किती सांगू?” , आईचे शब्द संततधार पावसासारखे भासत होते.

“ चूप बस ग. रिपरिप पाऊस पडतो, तशी बोलू नको. थोरवी नको गाऊ तिची. लोढणं वा धोंड आहे ती आपल्या गळ्यातील”, स्वप्निल रागात बरळत होता.

“ असं बोलू नये. रंग-रूपात काय ठेवलं आहे? आपल्या हातात असतात का या गोष्टी? दृष्टी तशी सृष्टी. काळे ढग पाहिले की मन मोरासारखं नाचतंच ना? म्हणतात ना , ‘ लग्नाच्या गाठी स्वर्गात…”, आई समजावत म्हणाली.

“ ज्या दिवशी ही ब्याद टळेल, हिची हाकलपट्टी होईल, त्या दिवशी माझा मनमयूर नाचेल.”

भाव्या आतापर्यंत शांत होती. ती स्वतःला कोसळण्यापासून थांबवत होती. मग ढगांसारखा गडगडाट करीत ती भीषण हसली, 

“ हाहाहा, तोंड बघा मला हाकलणाऱ्याचं. घर कसं चालवशील, बाबा? काय खाशील- पिशील? तूझी कमाई शून्य. आईला धाडशील का बाहेर पैसे कमवायला?”

स्वप्निलचा पारा खूप चढला व तो त्वेषात तिच्या अंगावर धावून गेला. आईने तिला कसंबसं वाचवलं.


बाहेर ढग ‘हंबरायला’ लागले होते. भाव्याचं मन चिंब भिजलं होतं. झरझरणाऱ्या सरींसारखे डोळ्यातून अश्रू झरू लागले. दाटून आलेल्या गर्द अंधारात ते बरसू लागले. बरंच झालं की घरातील व रस्त्यावरील दिवे गेले होते. बाहेर निसर्गाने रौद्र रूप धारण केले होते. सर्वत्र भीषण अंधार पसरला होता. बाहेर मुसळधार पाऊस सुरू झाला होता. विजांच्या लखलखाटात व ढगांच्या गडगडात, सोसाट्याच्या वाऱ्यात, अजून भयानक वाटत होतं. झाडांची पानं सळसळ करीत होते. जणू तिच्याशी बोलून ती सळसळ तिला शांत करायाचा प्रयत्न करीत होती. भाव्या अंधारात त्या पानांशी संवाद साधत मनातील विचारांचे थैमान थोपविण्याचा प्रयास करीत होती. झाडांशी संवाद करायची सवय तिला लहानपणीच लागली होती. ‘दिसायला सुमार म्हणून मी धोंड? मी कमावते, घराला हातभार लावते, तरी मी यांच्या गळ्यातील लोढणं? लग्नाच्या नकारांचा विष पचवते मी. मनस्तापही सोसते मीच व या पुरुषप्रधान संस्कृतीत मला नाव ठेवणार, वाटेल तसं बोलणार, हा मुलगा? काही न करणारा? स्वतःच्या पायावर उभं न राहू शकणारा. मला या घरात काही किंमत नाही. माझं स्वतःचं असं स्थान नाही. असं का?’ तिने खिडकीतून बाहेर पावसात हात काढले. ते क्षणातच ओले चिंब झाले. त्या ओल्या हातांनी तिने तिचा चेहरा पुसला. पावसाचं ते गार पाणी तिच्या गरम अश्रूत मिसळलं.’ अरे मी इतकी दुखावल्या गेले… माझा कोंडमारा, घुसमट, … या पावसाला तरी मोकळेपणानं व्यक्त होता येतं. माझी मात्र कुचंबणा होते .आता हे सहन होत नाही. काय करावं? निघून जावं कुठेतरी? पळून जावं का?’

 नैराश्यानं तिच्या मनाला ग्रासल होतं. तिने नेटवर पटापट सर्च केलं. रात्री दोन वाजता कन्याकुमारीला विमान जाणार होतं. महागात का होईना, तिला त्याचं तिकीट मिळालं. आवश्यक तेवढे कपडे घेऊन, ती रात्री नऊच्या सुमारास घराबाहेर पडली. आई तिला काय करते विचारत होती, बॅग घेऊन कुठे चालली, हे तिला जाणून घ्यायचं होतं. स्वप्निल “ जाऊन जाऊन जाणार कुठे? यावच लागणार आहे घरी”, असे म्हणत आगीत तेल ओतत होता. 

“ आई, मन भरून आलाय. ते मोकळं झाल्याशिवाय, निरभ्र झाल्यावरच, मी परत येईन. कधी येईन ते सांगू शकत नाही. तू काळजी करू नको”, असं सांगत, सुटकेस उचलून, ती कॅबमध्ये बसली. बाहेर अंदाधुंद पाऊस पडत होता. कॅबमधूनच तिने १५ दिवसाच्या रजेचा अर्ज कंपनीत पाठवला. विमान रात्री दोन वाजताचं असल्यामुळे पूर्ण रात्र जागरणातच गेली. तिला विंडो सीट मिळाल्यामुळे व देशभरात मान्सूनने आपले हातपाय पसरवल्यामुळे तिला बाहेर अंधारात विजांच्या उमटणाऱ्या रेघा दिसत होत्या. ढगांमुळे विमान हेलकावे खात होते. ते दृश्य पाहत असतानाच तिला डुलकी लागली. सकाळी चार वाजता तिचे विमान तिरूअनंतपूरमला पोचले. दुपारच्या जेवणानंतर तिने काही खाल्लं नव्हतं. रात्री जेवायच्या पूर्वीच ती निघून गेली होती व त्यामुळे तिला प्रचंड थकवा व कमजोरी जाणवत होती. जणूकाही पुण्यापासून केरळच्या या राजधानीपर्यंत ती पायदळ आली होती. त्या आंतरराष्टीय विमानतळावर रात्रीसुध्दा प्रवाश्यांची गर्दी होती. सूटकेस घेऊन ती बाहेर पडली. दिवस निघायला वेळ होता.

तिरूअनंतपूरमला नुकताच पाऊस कोसळला होता. बाहेर हवेत गारवा होता व ढगांमुळे झुंजुमुंजु व्हायला वेळ होता. पण दिव्यांच्या कृत्रिम झगमगाटात अंधार दडून बसला होता. विमानतळापासून शहर चार किमी दूर होतं. भाव्याला थेट कन्याकुमारीला जायचं होतं. अंतर साधारण ९५ किमी होतं. तिथे पोचायला जवळपास २.३०-३ तास लागणार होते. तिने कॅफेत कॅाफी व सॅंडविचेस खाण्यात एक- दीड तास घालवला. त्या वेळात तिने सेल्फ ड्राईव्ह कार शोधून काढली व व ती बुक करून विमानतळावरच मागवली. अंदाजे साडे पाचच्या सुमारास कॅफेच्या दारातून ‘मिस भाव्या’ करून आवाज आला. तिची गाडी तिच्याकरिता तयार होती. गाडीबद्दल आवश्यक ती माहिती घेतल्यावर, हवा, डिझेल, व इतर गोष्टी चेक केल्यावर ती निघायला तयार झाली. तेथून पाणी व खाण्याचे पदार्थ विकत घेऊन, जाण्याचा मार्ग पाहून, ती मार्गस्थ झाली. तिचा बहुतेक प्रवास किनारपट्टीच्या बाजूनंच होणार होता. ढग ओथंबून आले होते.

श्री गणेशाला नमन करून तिनं इग्निशन सुरू केलं व गुगल मॅप ॲान केला. ड्राईव्ह करतानाच तिने आईला व्हॅाईस मेसेज पाठवला. “ मी तिरूअनंतपूरमला पहाटे पोचली व आता कन्याकुमारीला जाते आहे. तिथेच राहीन.” आईची आठवण आल्याबरोबर घरातील वादाचा प्रसंग स्पष्टपणे डोळ्यासमोर आला. चटकन डोळ्यात पाणी आलं. ते पूसन टाकत तिने स्वतःला समजावलं, ‘ खूप झालं रडणं व चिडणं. आता फक्त निसर्गसौंदर्याचा आनंद घ्यायचा. सर्व ताण, तणाव, व मनस्ताप मागे सोडायचा. नवीन कोरी पाटी घेऊन, नवा अनुभव घ्यायचा.’ 

तिच्या मनातील गीत ओठांवर आलं -

“भले बुरे जे घडून गेले

विसरून जाऊ सारे क्षणभर, 

जरा विसावू या वळणावर.”

‘जीवनाचं तत्वज्ञान सरळ सोप्या शब्दात सांगितलं आहे यात.’ ड्राईव्ह करत ती लवकरच NH 66 वर आली. पावासाचे थेंब अधूनमधून पडत होते. सूर्यदेव एकतर रूसून बसले होते किंवा सुट्टीवर गेले असावे. कार चालवताना ती बाहेर डोकावत होती. सुस्नात झाडं व त्यांची पालवी मनाला आनंद देत होती. पावसाचे थेंब पानांना बिलगून बसले होते. ओलेत्या वेली, निथळत, झाडांना बिलगून बसल्या होत्या. दूरवर असणारी नारळाची व सुपारीची झाडं तिला खुणावत होती. ती त्यांना म्हणाली, “मी आता तुमच्यासारखंच जगणार आहे मुक्त व स्वतंत्र. मस्त गप्पा मारू आपण, हो ना?” रस्त्याच्या दोन्ही बाजूला हिरवळीने सुंदर कलाकुसर केली होती. गवताची पानं आनंदाने लवलवत होती. इंद्रधनुष्याच्या रंगाची रानफुलं माना उंचावून जणूकाही तिचं स्वागत करीत होते.

२५-३० किमी दूर आल्यावर सूर्यदेव पावसाबरोबर लपंडाव खेळू लागले. पानावरील थेंबांना सूर्याची किरणं हिऱ्यांचे सौंदर्य बहाल करीत होते. एका बाजूला असलेला समुद्रकिनारा तिला मोहवित होता. तिने कॅाफी ब्रेक घ्यायचं ठरवून गाडी थांबवली. बाजूला छोटा कॅफे होता. हाय वे वर पावसाळी हवामानामुळे सकाळी गर्दी नव्हती. कॅफेतही दोन- तीन जणचं होते. ती निवांतपणे कॅाफी घेत समुद्र व निसर्ग न्याहाळत होती. तिच्या बाजूला कोणी येऊन उभं आहे, याचं तिला भान नव्हतं. ती मग ठेवायला म्हणून मागे वळली, तेव्हा ती त्या व्यक्तिवर आदळणार होती. त्याने एका हाताने तिला सावरलं. 

“ ओह, सॅारी, मी निसर्गात हरवले होते. Hope you are alright.”

“ It is okay. Are you from Maharashtra?”, त्या अनोळखी माणसानं विचारलं.

“ It is none of your business “, ती उर्मटपणे म्हणाली.

“ अहो मॅडम, पहिलं वाक्यं मराठीत बोलल्या नकळत तुम्ही. इथे केरळमध्ये मराठी बोलणारे विरळेच. “

भाव्याला तो उगीच सलगी करायचा प्रयत्न करतो आहे, असं वाटलं व म्हणून तिने त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलं. 

ती बाहेर आली व तिच्या मागेमाग तो पण बाहेर पडला. पावसाचा जोर वाढला होता. पळतच तिने गाडी गाठली. अजून बरंच दूर जायचं होतं. छान गाणे ऐकत गाडी चालवू, असा विचार करीत तिने पावसाची गाणी लावली. टपावरील कर्टन दूर केला व पावसाच्या थेंबांच्या लयबध्द आवाजासोबत तिची गाणी सुरू झाली. “ बरसातमें हमसे मिले तुम सजन” चालू झाल. ‘Old world romantic charm’ म्हणत ती खुदकन हसली. एकामागून एक मधूर गाणी सुरू झाली. ‘बरसो रे मेघा’, ‘‘भागे रे मन’ , आणि ‘मेरे ख्वाबों में जो आए’ वगैरे गाण्यांनी तिला तिच्या जीवनात कोणी बॅायफ्रेंड नाही याची जाणीव झाली. ‘पावसाची दुःखद गाणी कोणती आहे बरं? काही आठवत नाही.’ मग तिने मराठी पावसाची गाणी लावली. ‘ए आई मला पावसात’ , ‘चिंब भिजलेले’, ‘उनाड पाऊस अशांत पाऊस’ इत्यादी गीतांच्या सरीवर सरी बरसू लागल्या. हिरवा निसर्ग, हिरवाईच्या विविध छटा, काळे- पांढरे मेघ, बाजूने वाहणारे ओहळ, मातेरी डबकी, पंख फुगवून बसलेले तारेवरचे पक्षी, मध्येच येणारी घरं व वस्ती, आणि एखादं- दुसरं राऊळ… 

‘ Wow, awesome!  हा निसर्गाविष्कार म्हणजेच देवाचा अविष्कार. वर्डवस्वर्थना ईश्वर व सृष्टी एकच आहेत असे वाटायचं. इथे किती मनशांती आहे. My decision to come here was perfect.’ 

आपल्या विचारांच्या तंद्रीत मागची गाडी साईड मागते आहे, हे लक्षात यायला तिला थोडा वेळ लागला. तिने त्या काळ्या हॅरियरला साईड दिली. तिच्या बाजूने जाताना गाडीच्या ड्रायव्हरने तिच्याकडे पाहून हात हालवला. 

‘ कोण आहे हा माणूस? इथे मी कोणालाही ओळखत नाही’ हा विचार करीत तिने आपला वेग वाढवला. 

‘ आता रस्त्यात कुठंही थांबायच नाही. फक्त साईबाबांचे दर्शन घ्यायचे.’ तिथून थोडं पुढे गेल्यावर तिला NH 7 कडे वळायचं होतं. मग २.५० -३ किमी वर कन्याकुमारी होते. कारच्या खिडकीतून विलोभनीय दिसणाऱ्या निसर्ग सौंदर्याची क्षुधा न संपणारी होती. ते दैवी वैभव तिला आकंठ प्राशन करायचं होतं. तो निसर्ग दोन्ही बाहू पसरून, स्मितहास्य करत, तिला आलिंगन द्यायला आतूर झाला होता. ‘माझं मन किती भराऱ्या घेतं आहे कल्पनेच्या जगात.’

साईबाबा मंदिरात बरीच गर्दी होती. मंदिर कन्याकुमारी जवळ असल्यामुळे अनेक प्रवासी तिथे दर्शनाला आले होते. तिथेही सर्व ओलेचिंब होतं. थेंबांचे नर्तन सुरूच होते. गाडी तिला थोडी दूर लावावी लागली. पायी मंदिराकडे जाताना तिला रस्त्याच्या कडेला काळी हॅरियर दिसली. ‘ याने आपल्याला हात दाखवला होता का? पण ही तीच गाडी कशावरून? सारख्या दिसणाऱ्या अनेक गाड्या असतात.’ मंदिरात रांगेत उभं राहून तिने दर्शन घेतले. प्रदक्षिणा , तीर्थ व प्रसाद घेताना लक्षात आलं की तेथे भरपूर परप्रांतिय होते. मग ती शांतपणे बेंचवर बसून परिसरातील वृक्ष व फुलझाडं न्याहाळत होती. अनपेक्षितपणे आकाशात वीज कडाडली व तिच्या मनात विचार आला, ‘ OMG, मी घाईत घरं सोडलं, विमानाचं तिकिट मिळालं या आनंदात इथे आले. पण हॅाटेलचा विचार केलाच नाही. आज रात्रीपर्यंत सोय करावी लागेल. बघू नेटवर काय मिळतं ते?’ नेटवर्कची समस्या होती. ते येत- जातं होतं. तरी ती कसोशिनं प्रयत्न करत राहिली. काही हॅाटेलचे नंबर घेऊन तिने फोन लावले. पण ते सर्व फुल्ल होते. एकतर तिला कोणते हॅाटेल कसं आहे, हे माहित नव्हतं. ती चौकशी करून आली नव्हती. मंदिराजवळ राहावं, असं तिच्या मनात होतं. अनेक प्रयत्न करूनही निराशाच पदरी पडत होती. ‘हे देवा, आता काय करू? मोठी चूक झाली. इथे कोणी परिचितही नाही.’

ती विचारात मग्न असताना कोणीतरी विचारले,

“ काय झालं, मॅडम? मी काही मदत करू का?”

तिनं चमकून पाहिलं. तिला कॅफेत हाच तरूण भेटला होता. ‘हा इथे कसा?’ 

“नाही, काही गरज नाही.”

“ तुम्ही काळजीत दिसता. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेऊ शकता.”

तिच्या चेहऱ्यावरील प्रश्नचिन्ह पाहून त्याने सांगितलं, 

“ मॅडम, आपण परमुलखात आहे. आपण दोघंही मराठी. थांबा, तुम्हाला मी माझी ओळख करून देतो. मी अमोघ देशपांडे. हे माझ्या कंपनीचं ओळखपत्र व हे ड्रायव्हिंग लायसेन्स. माझ्या घरचा पत्ता पण आहे त्यावर. तुम्ही ॲानलाईनही पाहू शकता. ठीक आहे ना? सांगा आता काय झालं ते?”

अमोघ मुंबईतील नामांकित कंपनीत C. E. O. होता. ‘परप्रांतात परकीयांची व अनोळखी व्यक्तींची मदत घेण्यापेक्षा आपल्या राज्यातील समभाषिक व्यक्तीची मदत घेणं कधीही बरं.’ हा विचार करत , तिने आपली समस्या त्यांना सांगितली.

“ ठीक आहे. मी पण कन्याकुमारीला जातो आहे. अर्ध्या तासात आपण तिथे पोचू. कन्याकुमारीत जो पहिला कॅफे लागेल, तिथे बसून आपण काय करता येतं पाहू. तुम्ही शांत रहा. काहीतरी करू नक्की.”

दोघंही मंदिर परिसरातून एकसाथ बाहेर आले. ती तिच्या कारकडे जात असताना तिने त्याला काळ्या हॅरीयर मधून जाताना पाहिले. ‘ अरे, हा तोच तरूण आहे तर.’ तिची समस्या शेयर केल्यामुळे तिला बरं वाटत होता. कन्याकुमारीत ती पोचल्यावर, पहिल्या कॅफेच्या बाहेर तो तिची वाट पहात उभा होता. पावसामुळे सर्वत्र चिखल होता. आत जाऊन रेस्टरूम मध्ये तिने चेहरा व हात धुतले. सकाळचे साडे नऊ झाले होते. तिला भूकेची जाणीव झाली. अमोघ बसला त्या टेबलवर ती गेली. 

“ काय घ्यायचे? कॅाफी व सॅंडविच?”, त्याने विचारलं.

“ मी सकाळी विमानतळावर सॅंडविच घेतलं होतं. कॅाफी पण दोन- तीनदा झाली. सडकून भूक आहे पण …”, भाव्याने उत्तर दिलं. 

“ इथे साऊथ इंडियन जास्त मिळेल. थांबा, पहिलें मेन्यु पाहू. पण तुम्ही व्हेज की… इथे सी फूड चांगलं मिळेल”, त्यानं विचारलं.

“ I am a pure vegetarian. Not an eggetarian as well.  तुम्ही?” तिने विचारलं.

“ Same as you, a pure vegetarian. तेच मेन्यू कार्ड आपल्या कामाचं.”

त्यांनी ऑर्डर देऊन हॅाटेलची यादी पहायला सुरवात केली. बहुतेक हॅाटेलमध्ये जागा नव्हती. समुद्रकिनाऱ्यावरील एक हॅाटेल दहा दिवसाकरिता रूम देऊ शकतं होतं. त्यांना सर्व रक्कम अग्रीम हवी होती. अमोघ तिला हॅाटेल पहिले पाहायचा सल्ला देत होता. पण नंतर हे हॅाटेल मिळालं नाही तर राहायचा प्रश्न भेडसावेल म्हणून तिने १०,०००/- रूपये ॲानलाईन पाठवले व हुश्श केलं. झडीच्या पावसानंतर सूर्याचं दर्शन झाल्यावर जसा आनंद होतो, तसा तिला त्या क्षणी झाला. खाऊन- पिऊन ते बाहेर पडले. 

भाव्या म्हणाली, “ Thank you, you were a great help and support. But now it is time to say goodbye. Enjoy your vacation आणि योग असेच तर भेटू परत”, म्हणत ती पटकन निघून गेली. अमोघ ती गेली त्या दिशेला पहात राहिला.

कॅफेतून निघून भाव्या सरळ त्या हॅाटेलमध्ये गेली. गुगल मॅपच्या मदतीने ती १५-२० मिनिटात तिथे पोचली. हॅाटेल भोवती उंच भिंत होती व भव्य प्रवेशव्दार बंद होतं. ते सेक्युरिटी गार्डने उघडलं. गेट पासून रिसेप्शन एक -दीड किमी आत होतं. बगिच्याकडे कोणी बहुदा लक्ष देत नव्हतं. भर पावसाळ्यात झाड खुरटलेली होती व हिरवळ पिवळी पडली होती. आत जायच्या आधीच भाव्याला ‘bad vibes’ जाणवू लागले होते. आत पाऊल टाकताच तिला तिची चूक उमगली व ती उलट्या पाऊली परतली. गाडी काढून ती बाहेर रस्त्यावर आली. आपण भलत्याच संकटात फसत होतो ही जाणीव होताच तिने ब्रेक मारला व हमसाहमशी रडू लागली. पुन्हा तिने हतबलता, नैराश्य, भीती, व एकटेपणा अनुभवला. रडता रडता आता पुढे काय हा प्रश्न तिच्यासमोर उभा राहिला. 

“आई…”,म्हणत स्टेरिंग व्हिलवर डोकं टेकवून ती बसून राहिली

परत तोच प्रश्न. राहायचं कुठे? एकच जण येथे ओळखीचा होता. तो कुठं निघून गेला, कोणास ठाऊक? नावा व्यतिरिक्त तिला अमोघबद्दल काहीच माहित नव्हतं. फोन नंबरही नाही. अचानक खिडकीच्या काचेवर टकटक ऐकू आली. तिने वर पाहिलं. बाहेर अमोघ उभा होता. ती पण बाहेर आली. तिच्या डोक्यावर छत्री धरत तो म्हणाला, 

“ अरे, पाऊसाची बुंदाबांदी तुमच्या डोळ्यातून झरायला लागली. काय झालं असं? आवडलं का हॅाटेल? केलं चेक इन?” त्याने विचारलं. 

सतत येणारा पाऊस, समुद्र व वेस्टर्न घाट, यामुळे बाहेर गार वारा होता. तिला हुडहुडी भरल्यासारखं झालं. 

“ अरे, are you alright? Why are you shivering?”, अमोघने काळजीनं विचारलं.

“ I am fine but…”, तिला रडू कोसळलं.

“ प्लीज सांगा तर काय झालं. मला कसं कळेल त्या शिवाय?” तो म्हणाला.

“ ते हॅाटेल… वेगळ्या प्रकारचं आहे. वाचले मी थोडक्यात”, भाव्यानं कसंबसं सांगितलं.

“ओह, मी चेक करू म्हणत होतो… जाऊ द्या आता तो विषय.पैसे परत घेतले ना? बरं मी बघतो काय करता येतं ते.”

ती चिडून म्हणाली, “ अहो, मला रहायला जागा नाही. हे एकमेव हॅाटेल मिळालं होतं मला. आता गाडीत राहावं लागेल वाटतं.”

“ मी करू का प्रयत्न? मी कंपनी गेस्ट हाऊसमध्ये थांबलो आहे. तुमचा गैरसमज होऊ नये म्हणून पहिले बोललो नाही. पण हा शेवटचा प्रयत्न …”

“ वेगवेगळ्या रूम आहे ना? इतर कोणी आहे का उतरले तिथे? बाकी सोयी चांगल्या आहे का?” , तिने विचारलं. 

“ मी पहिले ॲानलाईन तुम्हाला दाखवितो. दहा रूम आहे व बाकी सर्व सोयी उत्तम आहे. चौकीदार पण असतो. समोर समुद्र किनारा आहे”, बोलताना त्याने आयपॅड वर लॅाग इन करून तिला त्याचे फोटो व व्हिडीओ दाखवले. 

“ Wow, हे तर खूप सुंदर आहे. पण जागा…”, तिने विचारलं.

“ चेक करू आता. पहा ही रूम मिळू शकते. करू बुक?”, त्याने विचारलं.

“हो नक्कीच. काय करायचे? किती पैसे भरायचे?” तिला घाई झाली होती. 

“ सध्या दहा हजार भरून देऊ. मग तुम्हाला किती दिवस राहायचं व किती पैसे भरायचे, हा हिशोब तिथे गेल्यावर करू. ते इथून दूर आहे. ओळखपत्र- आधार कार्ड वगैरे काही देता का? मी इथून बुकींग करून टाकतो. तिने आधारकार्डची स्कॅन केलेली प्रत दिली. फोनवरून त्याने भाव्या जोशीच्या नावाने बुकींग केलं. पहिल्यांदाच त्याला तिचं नाव, वय व पत्ता कळला. पण त्याने ते दर्शविलं नाही. 

“ झालं, मॅडम”, तो म्हणाला. 

“ परत तुम्ही मला मदत केली. तुमचे आभार कसे मानावे?”, ती म्हणाली.

“ कशाला मानायचे मग?” तो हासत म्हणाला.

मग तिला काहीतरी खटकलं. 

“ का हो, तुम्ही इथे कसे? तुम्ही गेला नाही तिकडे? का ?”, ती संशयानं म्हणाली. 

“ तुम्ही इतक्या घाईत ते हॅाटल बुक केलं, काही चेक केलं नाही, मला ते खटकतं होतं. मी तुमच्या मागे तिथे आलो. रस्त्यात मी रिव्हू चेक केले. ते सर्व वेगळ्या प्रकारचे होते. तुमच्या वागण्या- बोलण्यावरून तुम्हाला एकटीने प्रवास करण्याचा अनुभव नाही, हे समजलं. कोणीच हॅाटेल बुकिंग केल्याशिवाय घर सोडत नाही, मॅडम. “

ती काहीच बोलू शकली नाही.

रात्रीचं जागरण, मनावरील ताणं, इतकं ड्रायव्हिंग, सतत पडणारा पाऊस, व अवेळी खाणं यामुळे तिला प्रचंड शीण व कणकण जाणवत होती. डोकं धरलं होतं. आता राहायला जागा मिळाली. तिथे पोचायला एक तास लागणार होता. स्टॅमिना संपला होता. ती खूप रडवेली झाली होती. 

“ भाव्या मॅडम, काय झालं? “

“ तुम्हाला माझं नावं कसं कळलं?”, तिने घाबरून विचारलं. 

“ इतकं का घाबरता? मी चांगला माणूस आहे, हे अजून समजलं नाही तुम्हाला? अहो, तुमच्या आधार कार्डवर नाव आहे ना तुमचं? मग…”, तो रागानं म्हणाला. 

“ सॅारी, मला तसं म्हणायचं नव्हतं. ते काय आहे, मला थोडी कणकण वाटते आहे , म्हणून चिडचिड होते आहे. खरंच सॅारी”, ती हळवी झाली होती.

“ अहो, I am sorry. मी उगीच चिडलो. तुम्हाला आरामाची गरज आहे. गेस्ट हाऊस मध्ये जाऊ आपण लवकर” , असं म्हणत तो त्याच्या गाडीकडे गेला. त्याने कार अनलॅाक केली व तिच्याकडे पाहिलं. ती पावसात भिजत सुन्न होऊन उभी होती. स्वतःची कार लॅाक करून तो तिच्याकडे आला. कारचे दार उघडून त्याने तिला आत बसायला सांगितलं व तो ड्रायव्हर सीटवर बसला.

“ तुमची गाडी?”, भाव्याने डोळे पुसत विचारलं.

“ मी कोणाला तरी पाठवून मागून घेईन कार नंतर.”

गेस्ट हाऊसला गेल्यावर अमोघने तिच्या रूमच्या औपचारिकता पूर्ण केल्या. ती रूममध्ये गेल्यावर अर्ध्या तासात त्याने तिचं जेवण व औषध पाठवलं. ती दुपारी इतकी गाढ झोपली की दुसऱ्या दिवशी सकाळी उशीरा तिला जाग आली. ती तयार होऊन बाहेर आली. पाऊस तर धुवांधार बरसत होता. ढगांचे ढोल वाजत होते व विजा काळ्या नभात आसूड ओढत होत्या. पाण्याचे ओहोळ वाहात होते व वाऱ्यात फांद्या, फुलं व वेली लवत होत्या. जणूकाही या भूमीच्या पाया पडायला ते आतूर होते. मंत्रमुग्ध होऊन ती जागेवर खिळली होती. 

“ मिस भाव्या, निसर्गावलोकन करून पोट भरलं का तुमचं? की उपास आहे कन्याकुमारीचा?”

ती हसायला लागली. 

“ जठाराग्नी मस्त प्रदीप्त झाला आहे. गरमागरम चहा व नाश्ता पाहिजे. तुमचा झाला ब्रेकफास्ट?”

“ And I thought you would never ask”, अमोघ हळूच म्हणाला.

चहा घेताना त्याने आज बाहेर कुठे जाणार हे विचारलं.

“ आज मी पहिले मंदिरात दर्शनाला जाणार आहे. पुढचे नंतर.”

“ मी ही पहिले दर्शनच घेणार आहे. एकत्र जायचं? नाही, म्हणजे तुला… तुम्हाला ड्रायव्हिंगचा त्रास होणार नाही.”

तिला आरामाची गरज वाटत होती व म्हणून ते सोबतच मंदिरात गेले.

तिथे गेल्यावर त्यांना कळलं की कन्याकुमारी किंवा देवी भगवती अम्मन देवी मंदिर सुंदर दाक्षिणात्य वास्तुकलेचा कलाविष्कार आहे. देवीच्या १०८ शक्तीपिठामध्ये याचा समावेश आहे. तीन समुद्रांचं संगमस्थान हे मंदिर आहे. मंदिराचे बांधकाम व त्यावरील कलाकुसर पाहून डोळ्यांचे पारणे फिटले. दर्शन झाल्यावर व प्रसाद घेतल्यावर तिने कुमारी व बाणासूराची कथा गुरूजींकडून ऐकली. मंदिर परिसरातील इतर मंदिरांना तिने भेट दिली व दर्शन घेतले. भगवती माता मंदिरात पुरुषांच्या प्रवेशावर बंदी आहे. त्यामुळे अमोघला दर्शन घेता आले नाही. तिने या मंदिराच्या उत्तर दिशेला भद्रकाली (शर्वाणी देवी) मंदिरात दर्शन घेतले. ही देवी कन्याकुमारीची सखी होती. इथे देवी सती यांचे निर्जीव शरीर पडलं होतं.

बाहेर आल्यावर तिने निवांतपणे समुद्र सौंदर्याचा आस्वाद घेण्याचं ठरविलं. सतत होणाऱ्या मुसळधार वृष्टीमुळे समुद्राच्या लाटा जोरात उंच उसळत होत्या. त्या वेगाने खडकांवर आदळत होत्या. पाण्याचे तुषार उडत होते. समुद्रतटावर ऊभे राहून पाहिलं तर तिन्ही समुद्रपाण्यांचे वेगवेगळे रंग सहज दिसून येत होते. समुद्रतटावरची रेतीही तीन रंगात आढळली. तीन समुद्रांच्या संगमाचा नजारा नेत्रदीपक होता. निसर्गाचं ते अलौकिक रूप पाहणाऱ्याला नतमस्तक व्हायला भाग पाडत होतं.. तिथे तिला शांत व प्रसन्न वाटत होतं. आजूबाजूचे निसर्ग सौंदर्य व दृश्य अत्यंत मनमोहक होतं. निर्मात्याने सर्व कौशल्य पणाला लावून जणूकाही हे अद्भूत,दैवी व अध्यात्मिक स्थान निर्माण केलं होतं. ईश्वराने स्वतः या जागेचा अलौकिक श्रृंगार केला होता. येथील सूर्योदय व सूर्यास्त अभूतपूर्व असायचे. भाव्याला मान्सूनमुळे कदाचित त्या आनंदाला त्या दिवशी तरी मुकावं लागणार होतं.

‘ माझा इथे येण्याचा निर्णय योग्य होता तर. पण माझ्या मनात इथे यायचा विचार का बरं आला असेल? कुमारी जन्मभर अविवाहित राहिली म्हणून? मलाही बहुदा अविवाहितच राहावं लागणार आहे.’ ती पावसातच बसून विचारात मग्न झाली होती. तिच्या केसांवरून पाणी निथळतं होतं. ते झटकताना तिला अचानक अखिला आठवली. स्वातंत्र्य व अधिकारांचा शोध घेत अनिता नायर यांच्या ‘लेडीज कूपे’ कादंबरीची नायिका अखिला कन्याकुमारीला गेली होती व तेही तिच्यासारखी एकटी. अखिलाने प्रवास करताना, काही प्रश्नांची उत्तरं शोधायचा प्रयत्न केला होता. एक स्त्री एकटी आनंदात राहू शकते का आणि एखाद्या स्त्रिला परिपूर्ण करण्यासाठी पुरूषाची आवश्यकता असते का? भाव्याला सुध्दा अखिला सारखीच नवीन जीवनाला सुरवात करायची इच्छा असते. या प्रवासात अखिला एका अनोळखी पुरूषासोबत रात्र घालवते. 

‘ OMG! हे काय आठवलं मला? मी अखिला नाही व माझ्यासोबत…’

पावसाचा वेग वाढला होता. पावसाचे थेंब रपरप तिच्या चेहऱ्यावर आदळले व ती भानावर आली.

“अहो मॅडम, आपण सोबत आलो होतो ना? विसरला का? एकट्याच गायब झाल्या आणि हे काय चिंब भिजल्या?”, अमोघने हाक मारत विचारलं.

“ मंदिराच्या परिसरात व निसर्गाच्या सान्निध्यात हरखून व हरवून गेले मी. हा पाऊसही इतका धुसमुसळा आहे की…”, ती तिच्या नादात होती. 

ती ओलेती होती व गार वारा शिरशिरी उठवित होता. तिची ती अवस्था पाहून अमोघने विचारलं,

“ काय झालं का दर्शन? जेवायची वेळ टळून गेली आहे. जाऊ या का परत? रस्त्यात जेवून मग परत जाऊ. “

“ चालेल. पण तुझं, सॅारी, तुमचं दर्शन झालं ना नीट? “

“ तुम्ही मला नावानेच हाक मारा. मी तुम्हाला मित्र समजतो व मैत्रीत औपचारिकता नको. बाकी मला मंदिर परिसर व समुद्रकिनारा फार भावला. सर्व टेन्शन छू मंतर झालं”, तो मनमोकळेपणानं म्हणाला. 

“ Wow, that is good. मला ही तसंच वाटलं. अलौकिक आनंद प्राप्त झाला. मन हलकं झालं”, भाव्या वदली. 

जेवत असताना तिला आईचा फोन आला. तिने ‘ आई, तू काळजी करू नको’ म्हटल्याामुळे ती घरी बोलते आहे, हे त्याला समजलं. ती इतकी तुटक बोलते आहे, हे त्याला खटकलं. नंतर ती जेव्हा ‘माझी सध्या घरी येण्याची मुळीच इच्छा नाही’ असं म्हणाली, तेव्हा तिची समस्या तिच्या घरच्यांशी निगडीत आहे, हे त्याला कळलं. त्याने तसं अजिबात दर्शविलं नाही. आईशी बोलताना भाव्याचे डोळे ढगाळले होते. 

दुसऱ्या दिवशी, ते ठरवून सोबत विवेकानंद स्मारक पाहायला गेले. ते बाहेर पडले तेव्हा काळ्याकभिन्न मेघांनी आकाश व्यापलं होतं. त्या अक्राळविक्राळ ढगांनी सूर्याला जणू जकडून ठेवलं होतं व धरेला अंधारात डांबलं होतं. पहिले त्यांनी स्मारकाचा इतिहास वाचला. विवेकानंद रॉक मेमोरियल किंवा विवेकानंद स्मारक शिला येथे 1892 मध्ये स्वामी विवेकानंदांनी पोहत येऊन एका प्रचंड निर्जन खडकावर साधना केली आणि त्यांना मार्गदर्शन लाभले होते. 1970 मध्ये त्या प्रचंड खडकावर एक भव्य स्मारक इमारत बांधण्यात आली. समुद्राच्या लाटांनी वेढलेल्या या खडकापर्यंत मुसळधार पर्जन्यधारात पोहोचणं हा त्या दोघांकरिता अत्यंत रोमांचक अनुभव होता. लाल खडकाने बनविलेल्या या स्मारकाच्या बांधकामाचा इतिहास व वर्णन त्यांना रोमहर्षक वाटले. मुख्य दरवाजा, त्यावरील कलाकुसर, 70 फुट उंचीचे घुमटं, स्वामीजींची पितळेची प्रचंड जीवंत मूर्ती, आणि बरसणाऱ्या पावसातील समुद्र पाहण्यात ते मग्न झाले. थोड्या वेळाने ऊन- पावसाचा लपंडाव सुरू झाला. आभाळातील रंगांची पखरण, गार वारा, व तुफानी लाटा पाहत असताना भाव्या एकदम म्हणाली, “ मनोहर दृश्य! Silver lining too ! Wish my life too…”

अमोघने तिची प्रतिक्रिया ऐकली होती. तरी त्याने विचारलं, “ Silver lining to life? “

भाव्याने त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलं. आजूबाजूचा हिरवा निसर्ग पाहून सर्व चराचर जणूकाही तृप्त झालं , असं वाटत होतं. पण तिच्या आयुष्यात…

परत येताना एक दिव्य अनुभव घेतल्याचा आनंद व समाधान दोघांच्याही चेहऱ्यावर बोलण्यात झळकत होतं. बोलता बोलता ती अचानक म्हणाली, “ You know what, I enjoyed it so much in your company…”

“ Absolutely, मी ही हाच विचार करत होतो. कदाचित आपण एकटेच मंदिरात किंवा स्मारक पाहायला गेलो असतो, तर कंटाळलो असतो. किती चर्चा केली आपण या दोन्ही विषयांवर व भरपूर शेयर केलं. खरेच, चांगला पार्टनर असला तर आनंद द्विगुणीत होतो. Thank you for being with me”, तो मनापासून म्हणाला. 

“ I too am grateful to you. तू, नाही, तुम्ही मला खूप मदत केली व सुंदर साथही दिली निरपेक्षपणे. ‘आयुष्यात एक वेळ अशी येते की, जेव्हा प्रश्न नको असतात फक्त साथ हवी असते’, बोलताना तिने अचानक त्याचा हात धरला, “ अगदी मनापासून बोलते आहे मी.”

ती एकदा बाहेर हिंडून - फिरून  व जेवून गेस्ट हाऊसमध्ये परतली की मग रूममध्येच राहायची. रात्रीचं जेवण ती रूममध्येच घ्यायची. टी.व्ही. पाहाण्यात, गाणे ऐकण्यात, आयपॅड वर सर्च करण्यात ती वेळ घालवायची. पण स्मारक पाहून परत आल्यावर संध्याकाळी ती रूममधून बाहेर आली. तिला खूप प्रसन्न व हलकं वाटत होतं जणूकाही तिच्या मनावरचं ओझं ऊतरलं होतं. बाहेर विजांचा कडकडाट व पर्जन्यधारा अविरत बरसत होत्या. ‘आपण आलोच इथे जुलै- ॲागस्टमध्ये- भर पावसाळ्यात. या ऋतुची मजा इथे आगळीच आहे.म्हणून तर इथे मान्सून फेस्टिव्हल साजरा करत असतील.’ पानांवरील नर्तन करणारे मोती पाहत असताना तिला डेव्हिसच्या The Rain मधील ओळी आठवल्या. नितांत सुंदर चित्तार्षक ओळी होत्याः

“I hear leaves drinking rain;

I hear rich leaves on top

Giving the poor beneath

Drop after drop;

'Tis a sweet noise to hear

These green leaves drinking near…”

या कवितेचा मूर्तिमंत प्रत्यय तिला क्षणोक्षणी कन्याकुमारीला येत होता. तिचं मन झिम्माड झालं होतं.ती गाऊ लागलीः

“हो हो नभं उतरु आलं चिंब थरथर वलं

अंग झिम्माड झालं हिरव्या बहरात”

ती त्या गाण्यात रंगून गेली होती. कोणीतरी त्या गाण्यावर सुंदर ठेका धरला होता. तिला त्याची जाणीवही नव्हती. गाणं झाल्यावर टाळ्यांचा कडकडाट झाला. गेस्ट हाऊसमधील लोक बाजूला उभे राहून तिला दाद देत होते. 

“वा, भाव्या, खूप गोड गाते तू. माझंही मन झिम्माड झालं”, अमोघ कौतुकाने म्हणाला, “ हे गाणं म्हणताना तुझे डोळे खूप सुंदर दिसत होते. तू वर्णन केलेले देवीच्या नाकातील हिऱ्याचे तेज व चमक मला तुझ्या डोळ्यात दिसली.”

कोणी तिची कधीच तारीफ केली नव्हती. कसा प्रतिसाद द्यावा तिला कळलंच नाही. तिने त्याला काही प्रतिसाद दिला नाही.

मग ते दोघं बराच वेळ गप्पा मारत होते. त्यांनी तिथे एकत्र जेवायचा बेत केला. जेवताना अमोघने विचारलं,

“ मग उद्या कुठे जाणार? काही ठरवलं का?”

“ नाही. पाहाण्यासारखं खूप काही आहे. आज नेटवर मी वाचून पाहिलं. उद्या मी पहिले अवर लेडी ऑफ रैनसम चर्चला भेट देईन. चर्च निर्माण प्राचीन गोथिक कला व संस्कृतीच्या मॉडेल वर केले आहे. नवीन व जुन्या चर्चचे फोटो मला आवडले. तिथून तिरुवल्लुवर यांच्या मूर्तीचे मोहक दृश्य दिसते. त्या नंतर मी फक्त निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेईन. तू काही ठरवले का? नाहीतर सोबत जाता येईल.”

अमोघ थोडा वेळ काहीच बोलला नाही. मग म्हणाला,

“ उद्या माझा इथला शेवटचा दिवस. परवा सकाळी मी मुंबईला परत जाईन. पण उद्या मी येईन तुझ्या सोबत.”

“ काय? परत जाणार? का बरं?”, तिने विचारलं.

“ तुला सांगायला हरकत नाही. आई माझं लग्न जबरदस्ती तिच्या भाचीशी करू इच्छित होती. वाद टाळायला मी निघून आलो. पण आता मन शांत व प्रसन्न आहे. कंपनीची कामं अडली आहे. किती दिवस समस्या आहे म्हणून पळणार? जिवंत आहे तो पर्यंत सामना करावाच लागणार. आपल्या लोकांचा रागही किती करायचा?”

तिच्या मनात आलं,

‘हा जे बोलतो ते किती बरोबर आहे. मलाही लागू पडते. मी पण पळतेच आहे. किती दिवस पळायचं? कधीतरी घरी परतावं लागेलच. अरे, याला मी पळते आहे, हे माझ्या वागण्या- बोलण्यावरून समजलं का?’


त्या रात्री ती शांतपणे झोपू शकली नाही. बाहेर ढग गडगडाट करत होते. विजाचा लखलखाट अंधाराला भेसूर करीत होता. वारा उधाणला होता. तिच्या मनात वेगवेगळे विचार येत -जात होते. मनिषचा नकार, स्वप्निलचे टोमणे, आईची अगतिकता आणि सतत येणारे नकार तिच्या मनाला पोखरत होते. स्वप्निलने तिच्यावर उगारलेला हात जणूकाही last straw ठरला. अमोघ सारखी ती पळूनच आली होती. तिलाही परत जावंच लागणार होतं. विचार करत असतानाच ती झोपेच्या आधीन झाली.

रात्र जरी बेचैनीत गेली होता, तरी ती सकाळी लवकर उठली. निसर्गाच्या कुशीत ती ताजीतवानी झाली होती. हिरवाकंच निसर्ग, पावसाचा तूफान मारा सोसत, तिला नवचैतन्य बहाल करत होता. पाऊस थांबायचे नाव घेत नव्हता. तो दृत लयीत पडत होता. ‘तसाही केरळचा पावसाळा अनुभवण्यासारखाच आहे. ‘ सर्व आन्हिकं आटोपून ती लवकर तयार झाली. कॅाफी घेत असताना अमोघ आला. लवकर खाणं- पिणं आटोपून ते अमोघच्या कारने बाहेर पडले. 

“ चर्च पहिले ना?”, त्याने विचारले. 

“तुला वाटेल तिकडे गाडी ने. आज रस्त्यात जे येईल ते पाहू. मस्त मजा करू”, ती निष्पाप आनंदाने म्हणाली. 

थोडं पुढे गेल्यावर रस्ता शांत व निर्जन वाटत होता. कार बंद करून ते बाहेर पडले. दोघांनीही छत्र्या घेतल्या व जीन्स खालून फोल्ड केले. त्या हिरव्यागार पावसात भटकंती करायची मजा काही औरच होती. जागोजागी रंगीबेरंगी रानफुलांचे गालिचे बहरले होते. कळ्या, फुले, पाने, रानवेली व झाडे इत्यादी गवती प्रकार ढगांच्या सावलीत व ओलाव्यात धुंद होऊन डोलत होते. भाव्याने ही इवलीशी रानफुले खुडून केसात माळली व कानात घातली. फोन बाहेर काढून, मान हालवत व नाचत, तिने रिल्स तयार केल्या. पुष्पगुच्छ हातात घेऊन सेल्फी काढल्या. रानफुले माळून टियारा ( मुकुट) बनवला व मिरवून घेतलं. 

“ थांब भाव्या, मी तुला सुंदर फोटो व व्हिडिओ काढून देतो. तू तुझ्या मित्र- मैत्रिणींना व घरच्यांना पाठव. सामाजिक माध्यमांवर टाक. खूप सुंदर येतील हे फोटो”, तो स्वतःहून म्हणाला.

“ राहू दे रे. माझे फोटो वाईट येतात. आडात नाही तर पोहऱ्यात…”, ती म्हणाली.

“ Come on Bhavya, fishing for compliments? तुला माहिती आहे तू किती सुंदर आहे ते”, तो मनापासून म्हणाला. 

मेघातील पाणी चटकन तिच्या डोळ्यात अवतरले. 

“मी व सुंदर? काळी आणि ठेंगणी मुलगी?”

“ कोण म्हणतो असं? तुझे डोळे सुंदर व बोलके आहे. तुझी बुध्दीमत्ता तुझ्या चेहऱ्यावर झळकते. अजून…”, 

त्याला थांबवत ती उपरोधानं म्हणाली, “ म्हणून माझा बॅायफ्रेंड मला सोडून गेला. लग्नाच्या बाजारात नकाराच नकार मिळतात मला. माझा लहान भाऊ मला गळ्यातील लोढणं समजतो…” भावनांच्या आवेगात ती सर्व बोलून बसली. 

“ रंग-रूपात काय असतं व ते आपल्या हातात आहे का? कावळा व कोकिळ एकाच वर्णाचे. पण कोकिळेला गुणांमुळे महत्व प्राप्त होतं. इथल्या ढगांचे उदाहरण घे. काळे मेघच बरसतात ना?”, तो अगदी शांतपणे तिला समजावत होता.

“ अमोघ, अगदी माझी आई बोलते, तसा तू बोलतो. “

“ तुझ्यावर प्रेम करणारे सर्व असचं बोलणार. तू गुणांची खाण आहे ग.”

“ तुला माझ्याबद्दल काही माहिती नाही.” 

“ देवाशप्पथ , मला माहिती आहे. खरं सांगतो. मॅडम, आपण माहिती तंत्रज्ञानाच्या जगात राहतो. नाव कळलं एकदा की सर्व पटकन कळतं” 

“हो का?”, म्हणून विषय बदलवत ती म्हणाली, 

“ अमोघ, समोर व नजर जाते तिथे नारळाची उंच- ताडमाड झाडं दिसतात आहे. सुपारीची झाडं ही तशी उंचच आहे. केळ्यांची बाग, ती तिकडे आहे बघ, केळांनी लगडलेली आहे. चहा- कॅाफीचे मळे, त्यांच्यातील वाटा, तमालपत्र, लवंग, वेलचीच्या बागा बघून देवाची विशेष कृपादृष्टी या वनस्पतींवर आहे, हे जाणवतं.”

“खरंच आहे, जिकडे पाहाल, तिकडे हिरवा रंग व त्याच्या विविध छटा आहे. भाव्या, जास्त आत शिरू नको. आपणच नाही फक्त पावसाची मजा घेत. सरपटणारे प्राणी पण पावसात मनमुराद फिरतात. नीट पहा, बेडकं, गाडूळं, सरडे, सापाची मावशी सापसुरळी, साप आणि नाग दडलेले असतील. Please don’t take any risk.”

“ Yes Sir”, ती हसून म्हणाली, “ बघ ना बियाणं रूजलं आहे मातीत. इवलेशे नाजून कोंब डोकवतात आहे बाहेर. किती अफाट व अलौकिक क्षमता व शक्ती आहे या नृत्यधारात. वसुंधरेला हा पाऊस नवसंजीवनी देतो. आपल्याला नवीन उर्मी मिळते. त्याची सृजनाची क्षमता त्याच्या अलौकिकतेची साक्ष आहे.”

“ भाव्या, किती सुंदर बोलते तू. ऐकत राहावसं वाटतं. ही उंच नारळाची झाडं जणू आकाशाला हात लावून देवाशी संवाद साधून राहिले, असा भास होतो. सृष्टीचं हे मनोहर रूप व हे विहंगम दृश्य पाहिल्यावर हा पाऊस मला अलौकिक पातळीवर नेतो. “

“ अमोघ, हा अलौकिक अनुभव मला मंदिरात, विवेकानंद शीला स्मारकात व चर्चच्या तिथे आला.”

“हो ना, हा अनुभव कन्याकुमारीला पदोपदी येतो. हा निसर्ग आपल्याला सतत साद घालतो. म्हणूनच केरळला ‘ God's own country’ म्हणतात.”

“ भगवान परशुरामांची कथा याच्याशी संबंधित आहे. अमोघ, इथली मंदिरं, चर्च, स्मारक, समुद्रांचा त्रिवेणी संगम, रमणीय समुद्रतट, निसर्गाचं अद्वितीय सौंदर्य आणि पर्यावरणीय विविधता पाहून ‘ मी’ पण गळून पडतं. एकात्मभाव अनुभवायला मिळतो. वर्डस्वर्थसुध्दा ‘Immortality Ode’ मध्ये लिहितातः

“ ‘The earth, and every common sight; 

To me did seem; Apparell'd in celestial light.’

ही भेट जणू जीवाशिवाची भेट असते. निसर्गरूपी देवाची व मानवाची जणू उराउरी भेट होते. विंदांचे शब्द वेगळ्या अर्थाने वापरून म्हणता येईल, 

 “जाहली दोघांची l उराउरी भेट

उरातले थेट l उरामधे ll”

तिच्या बोलण्याचा अमोघ आनंद घेत होता. तो म्हणाला,

“ भाव्या, तू एकदम एकरूप झालीस इथल्या निसर्गाशी. तुझी तादात्म्यता व अध्यात्मिकता दोन्हींचा प्रत्यय आला मला. तुझ्या अजून एका गोष्टीचे मला कौतुक करायचं आहे व ती आहे तुझं वाचन आणि व्यासंग. तुझ्या शब्दाशब्दात झळकते तुझी विद्ववत्ता.”

आतापर्यंत कोणीही खुल्या अंतकरणाने तिचं कधी कौतुकच केलं नव्हतं.

अशा प्रशंसेला कशी दाद द्यावी हे तिला अनाकलनीय होतं. परत तिने विषय बदलला,

“ अमोघ, आपण इथे पाण्याचे ओहळ, निर्झर, झरे, जलाशय, धबधबे, नद्या व अथांग समुद्र पाहिले. लहानापासून मोठ्यापर्यंत, प्रत्येकाचे स्वरूप वेगळं, भूमिका, महत्व व कार्य वेगळं. पटतं का माझं म्हणणं?”

“ Bull’s eye, Bhavya. जसं या जलयुक्त क्षेत्रांचे कार्य व स्वरूप वेगवेगळं असलं, तरी प्रत्येक स्त्रोत महत्वाचा असतो, तसंच माणसाचं असत. प्रत्येकाचं रूपरंग वेगवेगळं असलं तरी कार्य महत्वाचं ठरतं. मला व्हिक्टर फ्रँकल म्हणून भावतात. तुला सांगतो त्यांचं म्हणणं. तुझा दृष्टीकोनही बदलेल. “Everyone has his own specific vocation or mission in life; everyone must carry out a concrete assignment that demands fulfillment.” ते पुढे म्हणतात, ”त्या विशिष्ट कार्याकरिता त्याची जागा कोणीही घेऊ शकत नाही किंवा त्याच्या जीवनाची पुनरावृत्ती होऊ शकत नाही. मग प्रत्येकाचं कार्यही अद्वितीय आहे व ते पूर्ण करण्याची त्याला मिळालेली संधीही अद्वितीय असते.”

भाव्याच्या मनात आलं, ‘ माझ्या जटिल समस्येचे उत्तर किंवा न्यूनगंड घालवायचा किती सहज व सोपा दृष्टीकोन आहे हा. मला काही खटकू न देता वा दुःख न देता अमोघने माझे डोळे उघडले.’

“ भाव्या, ए भाव्या, कुठे हरवलीस ग? “ हातातील पाण्याचे तुषार तिच्यावर उडवत अमोघने विचारले. 

“ तुझ्यासोबत इथेच तर आहे. या झाडाला फुटलेल्या धुमाऱ्यांकडे पाहात होती. नभाचे व पृथ्वीचे मिलन अवनीवर टपटप पडणाऱ्या पाण्याच्या थेंबांनी होतं. मग बियाणं रूजून धरेला हिरवा बहर येतो. हिरवाईची किमया पहा- पाऊसही हिरवा भासू लागतो.”

“हिरवा पाऊस?”, अमोघ हळूच म्हणाला, “ मला तर हा पाऊस गुलाबी वाटतो.” 

“ गुलाबी पाऊस? Never heard of it”, भाव्याने गोंधळून विचारलं. 

“ पावसाळ्यात मातीत रूजणारं बियाणं अंकुर फुटल्यावर जसं मनाला चैतन्य व उभारी देतं, अगदी तसंच तुझ्या सोबत हिंडताना आणि वेळ घालवताना माझ्या मनात नवीन भावना, कोमल व तरल प्रेमभावना, रूजली. तुला माझी साथ आवडते, भावते, हे मला समजतं. इतक्या लवकर तू प्रेमात पडली असशील, ही माझी अपेक्षा नाही. तुला माझी व माझ्या कुटुंबाची ओळख नाही. पण आपण एकत्र वेळ तर घालवू शकतो. Let us give ourselves a chance at least. “

भाव्या म्हणाली, “ मैत्री आहेच आपली. तू मुंबईला व मी पुण्याला राहाताना कसं भेटणार?”

“ मस्त चॅटींग करू. शनिवारी- रविवारी भेटू अधून- मधून. तुला काही हरकत नाही ना? “

“ अजिबात नाही. पण आता ओलंचिंब झालोत, परत जाऊ या का? “ 

“ माझं मनंही प्रेमात ओलंचिंब झालं. त्या भावनेचे तुषार तुझ्यावरही उडलेत, हो ना?”

“चला, जाऊ या तर.”

रस्त्यात त्याने गाडीत गाणं लावलंः

“जब मैं बादल बन जाऊं

तुम भी बारिश बन जाना

जो कम पड़ जाए सासें

तू मेरा दिल बन जाना

हाँ रिम झिम सावन की बूदें

तू हर मौसम बरसाना

जो कम पड़ जाए सासें

तू मेरा दिल बन जाना”


दुसऱ्या दिवशी तो गेस्ट हाऊस मधून बाहेर निघाला, तेव्हा ती पण सुटकेस घेऊन जायला तयार होती. पाऊस धो धो पडत होता. त्याच्याजवळ जाऊन ती म्हणाली,

 “Excuse me, मला पुण्याला जायचं आहे. तुम्ही मला लिफ्ट द्याल का प्लीज?”

“Oh, with pleasure. अग पण तू तर १०-१५ दिवस राहाणार होती ना? व तुझी कार?” त्याला काही सूचत नव्हत.

“ मला कोणीतरी सांगितलं की जीवनात समस्यांपासून पळून जाता येत नाही व आपल्या लोकांचा राग करायचा नाही. कारचं म्हणाल तर मी ती इथेच स्थानिक केंद्रावर परत करीन. मनपसंद सोबत असताना मी एकटी का जाऊ?”

“ क्या बात! चला तर मग. सुहाना सफर है, मौसम भी हसीन है।” नकळत तो गुणगुणत होता,


‘कितना हसीं है मौसम

कितना हसीन सफ़र है

साथी है खूबसूरत ये

मौसम को भी खबर है।’”


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance