Savita Tupe

Tragedy

3  

Savita Tupe

Tragedy

लग्नगाठ !

लग्नगाठ !

8 mins
199


 घरात लग्नाची गडबड चालली होती , घरातला प्रत्येक सदस्य वरवरचा उत्साह दाखवत सगळे कार्यक्रम पार पाडत होते . या सगळ्यांमध्ये मनातून दुखावलेली , स्वतःच्या अपेक्षांना बाजूला सारून आणि फक्त वडीलांच्या शब्दाला मान देवून आपले कर्तव्य पार पाडणारी अजून एक व्यक्ती होती आणि तीच या सगळ्यात महत्वाची होती .

 माधवी . उद्या तिचे लग्न होते पण ती मात्र आनंदी नव्हती . त्याला कारणही तसेच होते .

  एफ. वाय. च्या पहिल्या वर्षात असताना तिची आणि वरुणची एका कॉमन मैत्रिणी मुळे ओळख झाली .

  वरुण इंजिनियरिंगच्या तिसऱ्या वर्षाला होता . ओळखीचे रूपांतर प्रेमात कधी झाले दोघांना कळलेच नाही .

 वरुणच्या घरी माहित होते , लग्न करणार असशील तरच पुढे जाण्याचा वडिलांचा सल्ला त्याला मान्य होता . माधवी त्याच्या घरी बऱ्याच वेळा गेली होती .घरच्यांना ती आवडली होती आणि वरुणची नोकरी लागल्यावर रीतसर मागणी घालून लग्नाचा बार उडवून देण्याचा सगळ्यांचा मानस होता .

   माधवीनेही घरी आई आणि भावाला वरुणची ओळख करून दिली होती .त्यांनासुद्धा काही अडचण नव्हती . वरुण त्यांच्या जातीचा होता ही गोष्ट त्यांना जास्त महत्त्वाची होती .

  प्रश्न फक्त माधवीच्या वडिलांचा होता .ते थोडे कडक होते .त्यांचीच भीती होती .

  माधवीचे शेवटचे वर्ष चालू झाले तसे वडील तिच्यासाठी स्थळ शोधू लागले .जवळच्या नातेवाईकांकडे सांगून , त्यांच्या मध्यस्थीने त्यांनी एक स्थळ पसंत केले . 

  माधवी आणि वरुण मात्र या प्रकाराने धास्तावून गेले . घरात बाबांसोबत ह्या विषयावर बोलायला कोणी तयार होईना .शेवटी वरुणचे वडील तयार झाले .

    ते माधवीच्या वडिलांना भेटले , ते त्यांना म्हणाले , " दोघांनी एकमेकांना पसंत केले आहे . दोन वर्ष थांबावे , तोवर वरुण नोकरीला लागेल मग करू दोघांचे लग्न . "

  माधवीच्या बाबांना मात्र मुलीने परस्पर मुलगा पसंत केला आहे हे सहनच झाले नाही. त्यांनी स्पष्ट नकार दिला आणि परत जर तुमचा मुलगा माझ्या मुलीला भेटला तर पोलिसांना सांगेन ही धमकी दिली .

  हतबल होवून वरुणचे वडील तिथून निघून गेले . ते काहीच करू शकले नाही .त्यानंतर पण वरुण स्वतः भेटला त्यांना पण त्यालाही त्यांनी धमकावले आणि पुन्हा तोंड दाखवायचे नाही म्हणून त्यालाही परतून लावले .

  बाबांनी सगळ्यांनाच परत हा विषय घरात काढायचा नाही म्हणून दम दिला .कोणाचीच त्यांच्यापुढे बोलायची हिंमत नव्हती .पुढच्या दोन महिन्यात त्यांनी लग्नाची तारीख काढून सगळ्यांना तयारीला लागायला सांगितले .

  सगळेच हताश होवुन , बाबांनी आणलेल्या स्थळाला मान्यता देवून तयारीला लागले .

  मनातून सगळेच दुःखी होते पण उसने अवसान घेवून सगळीकडे वावरत होते .

   मुलीने आपल्या अपरोक्ष घेतलेला निर्णय पचवता न आल्याने, अहंकाराने बाबांनी जास्त चौकशी न करता सुहासचे स्थळ पसंत केले ,

  सगळे विधी पार पाडत लग्न थाटात झाले . माधवीने एकदाही मान वर करून सुहासला पाहिले नाही .निर्विकारपणे ती या सगळ्यात सहभागी होत होती .

 लग्न झाले .माधवी सासरी आली . घरात फक्त सुहास आणि त्याचा भाऊ दोघेच होते .आई वडील गावाकडे होते .वयस्कर असल्यामुळे लग्नाला येता आले नाही असे कळले .दोघे भाऊ नोकरी निमित्ताने शहरात आले होते .तसे सगळे स्थिर स्थावर वाटत होते . लग्न झाल्यावर दोन दिवसांनी तिघेपण गावाला जावून आले .सासू सासरे गरीब भोळे होते . दोन्ही भावांच्या पुढे त्या बिचाऱ्यांचे काही चालत नव्हते . माधवीचे स्वागत करायला घरात दुसरे कोणीच नव्हते . चार पाच दिवस गावी राहून ते परत आले शहरात .

  आता संसार सुरू झाला. माधवी मात्र वरुणला विसरू शकत नव्हती . एक एक दिवस ती यांत्रिकपणे पार पाडत राहायची . 

    " ना वाद ना संवाद ." फक्त एका घरात राहतात म्हणून एकमेकांशी संबंध ,असे दिवस चालले होते .

  दोघे भाऊ तसे बरे होते , पण मन नावाचा प्रकार जणू काही त्यांना माहीतच नव्हता . खुप अलिप्त होते दोघेही कोणत्याही मानसिक भावभावनेपासून त्यांना फक्त फायदा कळत होता .खूपच व्यवहारी होते प्रत्येक गोष्टीत .  

   घरातला सगळा कारभार छोटा भाऊ सोहमच्या हातात होता .तो अगदी मोजकेच सामान आणून द्यायचा , भाजी पण लागेल तेवढीच आणून द्यायचा . तेवढ्यातच तिला काटकसरीने भागवायला लावायचा. वरखर्चाला पैसा मागायची सोय नव्हती .सुहास पण भावापुढे काही बोलत नसायचा .दोघा नवरा बायकोचे संबंध पण अगदी गरज असेल तेवढेच जुळले होते . 

  कुठे फिरणे नाही .की नव्या नवलाईची हौसमौज नाही .माहेरी पण जाता येत नव्हते , ह्या दोघांचे खाण्याचे हाल होतात म्हणून . माधवीला कळत नव्हतं की ती या घरात बायको म्हणून आली आहे की एक कामवाली म्हणून ?

  वडीलांच्या धाकाने आई आणि भाऊ पण येत नव्हते आणि तिलाही माहेरी यायची परवानगी नव्हती.

  माधवी हेच आपले नशीब आहे असे समजून काही न बोलता तसेच दिवस ढकलत होती .

    लग्नाला चार पाच महिने झाल्यावर तिला नव्या पाहुण्याची चाहूल लागली . शरीराने सारं काही स्वीकारलं तर होतं पण मन मात्र कधीच त्यात रमलं नव्हतं . अगदी रात्रीच्या त्या एकांतात ती शरीराने सुहास सोबत असली तरी मन मात्र वरुण सोबत रत होत असायचं .

 जन्माला येणाऱ्या बाळासाठी आनंदी व्हावं का दुःखी व्हावं हेच तिला कळत नव्हतं . कारण घरातल्या परिस्थितीत माधवीच्या अश्या अवस्थेनेही काही फरक पडला नाही .न कामातून सुटका , न कुठले डोहाळ्याचे लाड .तिला दवाखान्यात सुध्दा नेल नाही सुहासने .उलट तिला तो आत्ताच हे बाळ नको म्हणून मागे लागला होता . तिला कोणाची मदत घ्यावी काही कळत नव्हतं .

   दोन महिने झाले होते . मानसिक ताण , शारीरिक कष्ट अन् पोटाला पुरेसे न मिळणारे अन्न .त्यामुळे तिला एकदा चक्कर आली आणि ती बेशुध्द पडली .घरात कोणीच नव्हते .शेजारी कुणाकडे जायची परवानगी नव्हती ,त्यामुळे कोणाशी ओळख सुध्दा नव्हती . दार कायम बंद त्यामुळे बाहेर कोणाशी संपर्क नसायचा . जरा वेळाने ती शुध्दीवर आली . तीला पोटात कळा येवू लागल्या , बाळाला काही व्हायला नको म्हणून ती तशीच दवाखान्यात निघाली .जवळ पैसे नाही , बाहेरची नवीन जागेची माहिती नाही .तरीही तशीच रडत , खुरडत , लोकांना विचारत ती दवाखान्यात पोहोचली .

   अगदी योगायोगाने त्या दवाखान्यात वरुण त्याच्या आईला घेवून आला होता .त्याने माधवीला अश्या अवस्थेत पाहिले .आई आणि तो माधवीकडे पळत आला . त्या दोघांच्या मदतीने तिला पटकन उपचार मिळाले , सर्व काही ठीक होते .थोडी काळजी घ्यायला सांगून , डॉक्टरांनी काही औषधे लिहून दिली . काउंटरवर जेव्हा तिला पैसे मागितले तशी ती कावरीबावरी झाली .तिच्याकडे पैसे नव्हते .ती हात जोडून काहीतरी बोलत होती तेवढ्यात वरुणने पैसे दिले .

  माधवीला अश्या अवस्थेत पाहून वरुण मनातून दुःखी झाला . तिची खालावलेली तब्बेत , निस्तेज चेहरा पाहून दोघेही तिला आस्थेने विचारू लागले . वरुणची आई प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवत होती . खुप दिवसांनी मायेचा स्पर्श झाल्याने माधवी हमसून रडायला लागली .त्या दोघांना काही कळेना हिला अचानक काय झाले ते .

 वरुण तिला पाणी प्यायला देवून म्हणाला ,

" शांत हो मधू .काय झालं सांगशील का ? "

आई पण घाबरून गेली वरुणची .

  माधवीने पाणी पिले , मग घरातली परिस्थिती सांगितली दोघांना. ते सारं ऐकून दोघेही निःशब्द झाले .एका निष्पाप मुलीच्या आयुष्याचे वडीलांच्या नसत्या अहंकारामुळे कसे वाटोळे झाले त्याचे उदाहरण त्यांच्या डोळ्यासमोर होते .

  माधवी घराची आठवण होवून , निघते म्हणाली तसे ते दोघेही तिला सोडवायला आले घरापर्यंत .

  घरी आले तर सुहास आणि सोहम दारातच त्या तिघांना अडवून ,माधवीला घरात यायचं नाही म्हणाले , ती घाबरली , तिला काही कळेना तिची काय चूक झाली ? त्या दोघांचा हा अवतार ती पहिल्यांदाच पाहत होती .ती काही बोलायच्या आधीच त्यांनी तिला बाहेर ढकलून दिले आणि दार लावून घेतले. तिला वरुणने सावरले त्यामुळे ती पडता पडता वाचली. दार वाजवले तसे सोहम आतून म्हणाला , " इथे तुला काही थारा नाही , तू चांगल्या वळणाची नव्हती म्हणून तूझ्या बापाने आमच्या माथी मारलं तुला , आता तू तुझ्या ह्या यारासोबतच तुझ तोंड काळं कर. हे मूल पण माझ्या भावाच नाही , आम्हाला आधीच कळलं असतं तर कधीच लग्न केलं नसतं तुझ्यासोबत .आम्हाला आता कळलं तू आमच्या माघारी काय थेरं करते . चालती हो आता इथून ."

ती सुहासला आवाज देत होती पण त्याने काहीच प्रतिसाद दिला नाही .

  वरुण आणि त्याची आई हा काय प्रकार चालला आहे हे न कळून निशब्द झाले होते .

 माधवी तशीच दारामध्ये रडत खाली बसली .

   वरुण आणि त्याची आई तिला सावरत म्हणाले ," मधू , आत्ता चल इथून , तूझ्या घरी जाऊ .आई आणि बाबांना घेवून या .ह्यांचा काहीतरी गैरसमज झालेला आहे .एकदा बोलून घेतलं की होईल सगळं ठिक . चल ऊठ !" माधवी उठली ती तिघे मग तिच्या आईकडे गेले .तिला बघताच तिची आई आणि भाऊ दोघेपण धावतच बाहेर आले . 

" काय झालं हिला ? हिची अशी काय अवस्था झाली आहे ? आणि वरुण तुम्ही दोघं हिच्यासोबत कसे ?" माधवीची आई माधवीला पोटाशी कवटाळून रडत रडत विचारात होती .

  वरुणने त्यांना काय झाले ते सांगितले .ते दोघेही स्तब्ध झाले सारं ऐकून .

लग्न झाल्यापासून त्यांना माधवीला भेटायची परवानगी नव्हती .तिचं घर जरी एका तासाच्या अंतरावर होते तरी तीच काय चाललय हे कळायला त्यांना काही मार्गच नव्हता .

  ते एकमेकांशी बोलतच होते तोवर माधवीचे वडील आले .ह्या सगळ्यांना बघून त्यांचा रागाचा पारा चढला. काही एक न विचारता त्यांनी त्यांच्या तोंडाचा पट्टा चालू केला , वरुणला म्हणाले ," तुला म्हणलं होतं ना पुन्हा तुझं तोंड दाखवायचं नाही म्हणून , का आला आहेस परत ? माझ्या मुलीच्या सुखी संसारात अखेर विष कालवून उध्वस्त केलं ना तिचं घर ? तिला रस्त्यावर आणल ना शेवटी ? झालं आता तुझं समाधान ?"

 वरुणची आई मध्ये पडली , " काय बोलता आहात तुम्ही ? तुमच्या मुलीचं वाटोळं तर तुम्ही केलं आहे .आम्हाला बोलण्यापेक्षा तुमच्या जावयाला विचारा की काय दोष आहे हीचा म्हणून हिला आज अश्या अवस्थेत घराबाहेर काढले ?"

 पण वडील ऐकायला तयार नव्हते ,ते म्हणाले ,

 " नवऱ्याने टाकलेल्या मुलीला माझ्या घरात जागा नाही, "

 खुप समजावून सुध्दा त्यांनी आपला हेका सोडला नाही .

 शेवटी मग, "मुलगी अशीही मेली आहे ना तुमच्यासाठी मग आता तिचे काय होईल याच्याशी तुमचा काही संबंध नसेल . तिचे काय करायचे ते आम्ही बघून घेतो .आमच्या मध्ये आता तुम्ही पडायचे नाही ." असा दम देवून वरुण आणि त्याची आई , माधवीला , तिच्या आई आणि भावाच्या संमतीने त्यांच्या घरी घेवुन आले .

  ह्या मानसिक धक्क्याने माधवीने तिचे बाळ गमावले .खुप दिवस गेले तिला सगळ्यातून सावरायला .पण वरुणच्या घरच्यांनी तिला खुप मोठा आधार आणि प्रेम देवून तिला यातून बाहेर काढले. सोबत आता तिची आई आणि भाऊ पण होते. वडिलांनी मात्र तोंड फिरवले ते कायमचेच .    

 लग्न झाल्यावर मुलगी सुखात असेल म्हणून माधवीच्या आई आणि भावाने तिला भेटायचं म्हणून माधवीच्या वडिलांजवळ आग्रह केला नव्हता पण आता तिला अश्या अवस्थेमध्ये त्यांची गरज होती म्हणून मग ते दोघेही कधी कधी त्यांना चुकवून जमेल ते माधवीसाठी करत होते . वरुणच्या घरी यायला त्यांना कोणतीच आडकाठी नव्हती .

 कालांतराने माधवी व्यवस्थित सावरल्यावर घटस्फोटाचा अर्ज दाखल करून , खुप साऱ्या बदनामीला तोंड देत अखेर ती या बंधनातून मुक्त झाली .

  माधवीच्या वडिलांना सुध्दा आता सत्य परिस्थिती लक्षात येत होती . त्यावेळी केलेली चूक त्यांना कळून चुकली होती . वरुण बद्दलचा राग आता कमी झाला होता . मूळचा अहंकारी स्वभाव मात्र , ते बदलले आहेत हे कोणाच्याही लक्षात येवू देत नव्हता .पण अलीकडे ते कुठला त्रागा न करता , होकार न देता , कोणत्या गोष्टीला नकारही देत नव्हते .

  त्यांची मुक संमती ग्राह्य धरून वरुण आणि त्याचे आई बाबा आता पुन्हा एकदा वरुण आणि माधवीच्या सुखी संसाराचे स्वप्न पाहू लागले .


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy