Savita Tupe

Inspirational

3  

Savita Tupe

Inspirational

साथ विश्वासाची !

साथ विश्वासाची !

5 mins
240


  राहुल आणि अनिशला सोबत बघून काजल धास्तावली . दोघे अगदी हसत हसत बोलत होते . त्यांचे नक्की काय बोलणे चालले असेल या विचारात काजल दरवाजात उभी राहून त्या दोघांकडे बघत होती तेवढ्यात आईने आवाज दिला . काजल पटकन आतमध्ये निघून गेली .

    अनिशसोबत बोलून राहुल घरात आला . काजल खुप भित भित त्याच्यासमोर जाऊन त्याला पाणी देत म्हणाली , " काय बोलत होता तुम्ही दोघे ? "

  तिच्या चेहऱ्यावरचे भेदरलेले भाव बघून राहुल तिला काहीच नाही म्हणाला . काजल अजूनच घाबरली . अनिशने नक्कीच काहीतरी चुकीचे सांगितले असावे म्हणूनच राहुल आता चिडला असावा या विचारात काजल गुरफटून गेली .

  आई तिला जेवायला ताटे वाढून घ्यायला सांगत होती आणि ही मात्र पुतळ्यासारखी निश्चल झाली होती .

   पुढची कामे यंत्रवत पार पाडून काजल तिची बॅग घेवून राहुल सोबत निघाली .आई बाबा आणि निखिल तिघेही तिला नजरेआड होईतोवर बघत होते .

   घरी येईतोवर राहुल सुध्दा शांतच होता त्यामुळे काजल पण मनातून पार कोसळली होती .तिला कळेना की आता तिच्यापुढे नक्की काय वाढून ठेवले असेल .

  घरी आल्यावर फ्रेश होवून ते दोघेही झोपायची तयारी करत होते . राहुल तिचे निरीक्षण करत होता . त्याच्या लक्षात आले की काजलचे काहीतरी बिनसले आहे .

   लग्नाला तर ३ महिने झाले होते .आत्तापर्यंत तिचे वागणे अगदी नॉर्मल होते मग आज ही एवढी का उदास झाली आहे ? तो ही जरा शांतच झाला .

  जरावेळ शांततेत गेला आणि राहुलने बोलायला सुरवात केली ." काजल काय झाले तुला ? तु का एवढी शांत बसली आहेस ? आईकडे अजून राहायचे होते का तुला ? "

 काजलने त्याच्याकडे न बघताच नकारार्थी मान डोलावली . 

   राहुल काय झाले म्हणून विचारत तिला जवळ घेवुन तिच्या डोक्यावर हात फिरवत बोलत होता . त्याच्या ह्या कृतीने काजल रडायला लागली . रडत रडत त्याला म्हणाली की , " तो अनिश तुमच्याशी काय बोलत होता , त्याने तुम्हाला काही सांगितले का काही म्हणून तुम्ही एवढे शांत झालात ? माझ्यावर तुमचा विश्वास आहे ना ? "

  "काजल आधी शांत हो . मला न रडता सांगशील का नक्की काय झाले ते ? " राहुल तिचे डोळे पुसत म्हणाला .

 काजल त्याला म्हणाली , " मी सांगितले काही तर तुम्ही मला सोडून नाही ना देणार ? यात खरंच माझी काही चूक नाही . पण माझी चूक ही झाली की लग्नाच्या आधी मी तुम्हाला हे सांगायला हवे होते . तो अनिश पुन्हा असे काही करेन याची आम्हाला काही शंका आलीच नाही .बाबा पण म्हणाले की काही करणार नाही तो . पण आज त्याला तुमच्या सोबत बोलताना पाहून मला खुप भीती वाटत होती ."

राहुल तिला हाताने हळू हळू थोपटत तिचे बोलणे ऐकत होता .मनातून तिच्या अश्या बोलण्याने थोडा चिडला पण होता पण स्वतःच्या रागावर नियंत्रण करत तो पूर्ण जाणून घेतल्या शिवाय लगेच स्वतःच्या भावना व्यक्त करणार नव्हता .

  काजल आज सगळं सांगून स्वतःच मन मोकळं करणार होती . 

ती पुढे म्हणाली , " मी बारावीला होते , आमच्या घरापासून लांब रहायला होता अनिश.अनिश मला येता जाता सतत हाय हॅलो म्हणत बोलायचा प्रयत्न करायचा .तो त्याच्या एका मित्राजवळ मला देण्यासाठी सतत काहीनाकाही चिठ्ठी नाहीतर चॉकलेट पाठवत असायचा .मी त्याच्याकडे दुर्लक्ष करायचे .पण मी काही बोलत नाही त्यामुळे त्याची जरा हिम्मत वाढली . तो कॉलेज सुटायच्या वेळेला कॉलेज जवळ येवून थांबायचा आणि घरी येईपर्यंत मागे मागे यायचा . त्याच्या ह्या कृतीने मला त्याची भीती वाटायला लागली होती . बाबांना सांगायचे ठरवले होते . त्याच दिवशी त्याने माझ्या स्कुटिवर फुलाचा बुके आणि एक ग्रीटिंग ठेवले होते . त्यात त्याने त्याच्या फालतू भावना व्यक्त केल्या होत्या . मी ते सगळं तसच बाबांना दाखवलं आणि त्याचे वागणे कसे आहे ते सांगितले .

  अनिशचे आणि माझे बाबा एकमेकांना ओळखतात त्यामुळे बाबांनी त्याच्या वडिलांना अनिशचे सारे प्रताप सांगितले . आणि त्याला समजावून सांगायला लावले . 

   अनिश एवढे सगळं होवूनही सुधारला नव्हता .त्याचे काहीना काही कारणाने त्रास देणे चालूच होते . माझे बाबा पुन्हा त्याला समजावून सांगायला त्याच्या घरी गेले होते तेव्हा त्याने त्याची हाताची नस कापून घेत बाबांनाच धमकावले की त्याला काजल सोबत लग्न करायचे आहे आणि जो कोणी मध्ये येईल त्याला मी माझ्या आत्महत्येला जबाबदार धरून पोलिसात देईन . माझे बाबा आणि त्याच्या घराचे त्याच्या ह्या प्रकाराने अचंबित झाले . 

  आमच्या सगळ्यांची अवस्था खुप अवघड झाली होती .पण शांत बसून चालणार नव्हते म्हणून मग बाबांनी त्यांच्या ओळखीच्या psi ऑफिसर कडे जाऊन हे सगळे प्रकरण सांगितले . त्यांनी अनिशच्या आई वडिलांची भेट घेवून त्याला बाल सुधार गृहात पाठवायला लावले आणि त्याच्यावर पूर्ण लक्ष ठेवून , योग्य समुपदेशन देवून त्याला सुधरवण्यास मदत केली . 

  सुरवातीला त्याने खुप त्रास दिला तिथे पण नंतर तो जरा ठीक झाल्यासारखा वाटला . 

  त्याच्या भीतीने मला मावशीकडे नाशिकला पाठवून माझे पुढचे शिक्षण तिथेच पूर्ण केले आणि लग्न सुध्दा तिथेच जमवले ."

   या तीन वर्षात अनिशने काहीच त्रास दिला नव्हता बहुतेक तो सुधारला असावा . लग्न झाल्यावर पण मी पुण्याला जात नव्हते त्याला कारण तेच होते . पण आता तो काही करणार नाही याची खात्री पटली म्हणून मग मी परत पुण्याला जायला लागले होते आणि आज त्याला तुमच्या सोबत बोलताना बघून माझ्या मनातली भीती अजुनच दाट झाली . तुम्ही त्याच्या बोलण्याकडे काही लक्ष देवू नका . माझा त्याच्याशी कधी काहीही संबंध नव्हता . माझ्यावर विश्वास ठेवा . आणि अजून एक इथून पुढे आपण पुन्हा कधीही आईकडे जायचे नाही ." ती बोलता बोलता थांबली आणि राहुलचे चेहऱ्यावरचे भाव निरखत त्याला म्हणाली , " अहो . तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना ? ही गोष्ट लग्नाआधी सांगितली नाही म्हणून तुम्ही रागावला नाही ना माझ्यावर ?? "

 राहुल तिला म्हणाला , " तुला माहित नसेल कदाचित पण तुझ्या बाबांनी मला हो गोष्ट लग्नाआधीच कानावर घातली होती . कारण अनिशवर भरोसा नव्हता कोणाचाही . तो काहीतरी कुरापत करेल ही शक्यता होतीच .पण सुदैवाने आपले लग्न निर्विघ्नपणे पार पडले होते .आज अनिश मला भेटला आणि त्याच्या बोलण्यावरून मला जाणवले की त्याचा इरादा तुझ्याबद्दल माझ्या मनात विष कालवायचा होता पण मी त्याला त्याच्याच भाषेत नीट समजावून सांगितले आहे . इथून पुढे तो पुन्हा आपल्या मार्गात येणार नाही एवढी समज त्याला नक्कीच दिली आहे .त्याची आता काळजी नको करू ."

काजल राहुलच्या बोलण्याने जरा शांत झाली . राहुल तिला म्हणाला ," प्रत्येकाचा काहीना काही चांगला वाईट भूतकाळ असतोच , पण तो मनात ठेवून माणूस जर आपला भविष्यकाळ बिघडणार 

 असेल तर अश्या घटना विसरून पुढे चालणेच योग्य आहे . नाहीतर अख्ख्या आयुष्याची वाट लागल्याशिवाय रहात नाही . "

 " आपले लग्न झाले आहे . आपण देवा ब्राम्हणाच्या साक्षीने प्रत्येक सुख दुःखात एकमेकांना शेवटपर्यंत सोबत करण्याचे वचन दिले आहे . ते फक्त एक विधी म्हणून केले नाही तर ती सात वचने आपल्या आयुष्यात आपल्याला प्रत्येक क्षणी जगायची आहेत . "

  " मला हे सगळं आधीच माहीत होतं पण आज तू ज्या विश्वासाने सांगितले आणि हे मला सांगितल्यावर आपल्या नव्यानेच जुळलेल्या नात्यावर याचा काय परिणाम होईल याचा विचार न करता तू हे सगळं सांगितलंस त्यामुळे माझा तुझ्यावर असणारा विश्वास अजूनच वाढला आहे . तुझा भूतकाळ आपल्या भविष्यावर कधीही हावी होणार नाही . इथून पुढे अनिश आपल्या आयुष्यात काहीही गैरसमज करू शकणार नाही . तु निश्चिंत रहा . "

  काजल राहुलच्या या विश्वासाने अगदी भारावून गेली . मनोमन देवाचे आभार मानत तिने राहुल भोवतीची तिची आश्वासक मिठी अजूनच घट्ट केली .


समाप्त .


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational