Savita Tupe

Inspirational

3  

Savita Tupe

Inspirational

स्वकर्तृत्व !

स्वकर्तृत्व !

4 mins
228


    डिग्री पूर्ण झाली आणि काकांनी जान्हवीसाठी स्थळ पाहायला सुरवात केली. आई बापाविना पोरकी जान्हवी काका काकूंकडे लहानाची मोठी झाली. त्या दोघांना दोन मुले आणि हि तिसरी मुलगी आपलीच आहे असे समजून त्यांनी जान्हवीचा खुप मायेने सांभाळ केला. 

  जान्हवी स्वतःच्या पायावर उभे राहून मग लग्नाचे बघू म्हणत होती पण काकांना तिच्या लग्नाची काळजी होती . 

  काकांना वाटायचे की तिने जर नोकरी केली तर लोकं म्हणतील आईबापाविन मुलगी , काकाने वाढवली पण आता तिच्या जिवावर बसून खातो . म्हणून काका तिच्या लग्नाचे बघत होता . लग्न झाल्यावर मुलाकडचे लोक म्हणाले तर कर नोकरी पण आत्ता नको असे काका तिला समजावून सांगायचे . तिलाही हे पटत होते म्हणून ती लग्नाला तयार झाली होती .

    अश्यातच शेजारच्या गावचे सरपंच दामोदर नवले त्यांच्या मुलासाठी जान्हवीला बघायला एका मध्यस्थी मार्फत नवले परिवार सहकुटुंब आले होते .  

   त्यांचा मुलगा नकुल जास्त शिकलेला नव्हता कि त्याला नोकरी पण नव्हती . त्यांचे घरचे एक किराणामालाचे दुकान होते , गावाकडे थोडी शेती होती आणि शहरात एक पार्टनरशीप मध्ये एक हॉटेल होते . 

   सगळी चौकशी केली तेव्हा काकांना कळले की मुलगा निर्व्यसनी आणि एकुलता एक आहे , घरचे चांगले आहे म्हणून मग काकांनी जान्हवीचे लग्न करून दिले . 

   जान्हवीला वाटले नवरा तिला पुढच्या शिक्षणासाठी किंवा नोकरी साठी परवानगी देईल , पण हळू हळू तिच्या लक्षात यायला लागले कि नवले घराची गृहस्थी पार कोलमडून गेली आहे ,  

   हॉटेल आणि दुकान फक्त नावाला आहे , गावात सासऱ्याला मान आहे पण घरात फक्त त्यांचा दराराच आहे . सासू तर स्वतःचे अस्तित्व नसलेल्या निःशब्द पुतळ्यासारखी आहे . तिला स्वतःचे असे काही जगच नाही . 

   त्यांना सुनेकडूनही त्याच अपेक्षा होत्या , तिला स्वयंपाक घराचा उंबरा ओलांडायची सुध्दा परवानगी नव्हती . 

  तिचा नवरा तर हॉटेलच्या नावाखाली आठ आठ दिवस शहरात जाऊन रहायचा , पण त्याबद्दल कोणीही आक्षेप घेत नसायचे .  

   जान्हवी आणि तिची सासू दिवसभर येणाऱ्या जाणाऱ्या पाहुण्यांच्या सरबराईमध्ये गुंतून रहायच्या , या सगळ्यात जान्हवी आणि तिच्या सासूचे चांगले सूर जुळले होते .  

  सासूच्या रूपात जान्हवीला आई आणि त्यांना मुलगी मिळाली होती .  

  जान्हवी मात्र दिवसेंदिवस कुढत होती . नवऱ्याचे प्रेम फक्त शारीरिक होते आणि ते पण जेव्हा त्याचा मूड होईल तेव्हाच . नाहीतर महिना महिना त्याचे नख सुद्धा दृष्टीस पडत नसायचे . 

    गावात सध्या निवडणुकीचे वारे वाहू लागले होते . या वेळी महिलांना संधी देण्यात आली होती. जान्हवीच्या सासऱ्याने आपले स्थान जाऊ नये म्हणून जान्हवीला निवडणुकीला उभे करायचे ठरवले . 

  तिचे शिक्षण पण चांगले होते , तिच्या मदतीने गावात अजून काही सुधारणा करता येतील आणि गावाचा विकास होईल अशी इतर मान्यवरांची अपेक्षा होती. 

  जान्हवीच्या सासऱ्यांना वाटले जान्हवीला पुढे करून आपल्याला आपले कार्य साधता येईल .  

  लग्न झाल्यापासून जान्हवीने कधी कुठल्याच बाबतीत काही आवाज केला नव्हता , घरात सासूसारखीच गरीब गाय होऊन राबत होती , तिला अगदी सहजपणे आपल्या काबूत ठेवून आपल्या इशाऱ्यावर नाचवता येईल . असा विचार करून ते या गोष्टीला तयार झाले .

  मनोमन खुश होऊन त्यांनी नको म्हणणाऱ्या मुलालाही आपला मानस समजावून सांगत आपल्या कटात सामील करून घेतले. 

    जान्हवीने शांततेने सगळ्या परिस्थितीला सासरे म्हणतील तसे सामोरे जात ती निवडणूक लढवली .  

   नवीन सुशिक्षित आणि तरुण उमेदवार म्हणून गावातून तिला चांगली मते मिळाली आणि जान्हवी गावाच्या सरपंच पदी निवडून आली . 

    सरपंच पदाचा कारभार हातात आल्यावर सासरा आणि नवरा त्यांची खेळी खेळू लागला , त्याचा डाव लक्षात आल्यावर जान्हवी सावध झाली . 

  सुरवातीला शांतपणे प्रत्येक गोष्ट समजावून घेत असताना तिला तिच्या अधिकाराची जाणीव व्हायला लागली . 

  हळू हळू ती काही चुकीच्या कामांना स्पष्टपणे नकार देऊ लागली . 

  गावाच्या विकासासाठी प्रामाणिकपणे काम करण्याचे ध्येय तिला तिच्या संसारी जबाबदाऱ्यांमधून पार पाडताना सासरा आणि नवरा अडथळे आणू लागले .  

   सासू बोलत नव्हती पण तिला सुनेची आता या बंधनातून सुटका होतं आहे हे बघून तिला मनातून खूप आनंद होत होता. 

  जान्हवी आता तिच्या मतावर ठामपणे उभी रहात आपले निर्णय स्वतःच घेत होती .   

  सासरा आणि नवरा तिला प्रत्येक वेळी रोखण्याचा प्रयत्न करत होते पण ती त्यांना त्यांच्या वाईट कृत्यांना भीक घालत नव्हती .  त्यांची अरेरावी वाढू लागली तसे तिने सासूला घेऊन दुसरीकडे राहायला जाण्याचा निर्णय घेतला . 

    अनेक वर्ष नवऱ्याच्या गुलामगिरीत खितपत पडलेल्या सासूला जान्हवीने स्वतःच्या हिमतीवर तिथून बाहेर काढले .  

   गावाचा विकास करण्यासाठी गावातीलच काही होतकरू तरुणांना हाताशी घेत तिने त्यांची एक टीम बनवली आणि गावासाठी जे जे शक्य होते ते सर्व करून घेतले .  

    जान्हवी त्या गावासाठी एक आदर्श सरपंच म्हणून नावारूपाला तर आलीच पण अतिशय सुंदर व्यक्तिमत्व असणारी सगळ्या गावाची लाडकी जानूताई झाली . 

    एखादी स्त्री स्वतःवर कठीण परिस्थिती आली कि अबला म्हणून जगते , सगळं सहन करते पण जेव्हा एखादा कायदा अनाहूतपणे तिच्या हातात येतो आणि तिला तिची स्वतःची खरी ओळख नक्की काय आहे याची जाणीव होते तेव्हा मात्र ती स्त्री खऱ्या अर्थाने सबला होऊन जगायला सुरवात होते .


(समाप्त)


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational