Anuja Dhariya-Sheth

Inspirational

4.5  

Anuja Dhariya-Sheth

Inspirational

सुख म्हणजे नक्की काय असते??

सुख म्हणजे नक्की काय असते??

5 mins
208


सुधीर ऑफिस वरून घरी येताना रस्त्यात त्याला साने बाई दिसल्या...धावत पुढे जाऊन त्याने नमस्कार केला... विचारपूस केली... त्यांना आनंद झाला... माझा स्वतःचा मुलगा ओळख विसरला रे पण तुम्ही मुले अजून बाईंना तेवढेच मानता... बरे वाटले.. बाई असे का बोलताय? आणि तुम्ही इकडे कुणीकडे? बाईंना भरून आले... अरे अविनाशने मला इथे जवळच असलेल्या वृदधाश्रमात ठेवले आहे... सुधीर आणि अवि एकाच वयाचे... खूप छान मैत्री होती त्यांच्यात... पण अवि परदेशी गेला आणि सर्वांना विसरून गेला अगदी आपल्या जन्मदात्या आईला सुद्धा...!! हे समजल्यावर सुधीरला धक्का बसला...

बाईंचा हात धरून त्याने त्यांना आश्रमात नेले... तिथे अजून बरेच लोकं होते... ते बघून त्याला वाईट वाटले... खरच आई- बाबा नको होतात ह्या मुलांना... ज्यांनी आपल्याला वाढवले,घडवले त्यांच्याशी असे कसे वागू शकतात? त्याच डोक सून्न झाले विचार करूनच... काळजी घ्या बाई... हा माझा नंबर घ्या कधी काही वाटलं तर हक्काने फोन करा... बाहेर दिवाळीची तयारी सुरू होती आणि आश्रम मात्र कधी आपल्याला कोण न्यायला येईल? या विचारात असलेल्या सर्व वॄद्धांच्या दुखात होता...

आपण काहीतरी करायला हवे याच विचारात घरी पोहचला... घरात पूर्ण काळोख... त्याने सुजाताला हाक मारली...पण काहीच आवाज नाही... त्याच्या जवळ असलेल्या चावीने त्याने घर उघडले... लाईट लावले... सुजाता एकटीच बसली होती... सुधीरला आलेले बघून ती भानावर आली... अगं काय अशी काळोखात बसली आहेस...?? चल आवार बघू... बाहेर बघ... मस्त वाटत आहे... दिवाळी आली आता... नाही आवरायचे, नाही साजरी करायची मला दिवाळी.... सुधीरच्या गळ्यात पडून रडू लागली... कोणासाठी करू? कशासाठी करू? सुधीरचे डोळे सुद्धा पाणावले... अगं दोन वर्षे होतील आता... आपण ठरवलं आहे ना नव्याने सुरुवात करायची...

दोन वर्षापूर्वीची सुजाता हवे मला, दिवाळी आली की किती तयारी करायचीस.. साफसफाई, फराळ, रांगोळी, सजावट... आणि आता?? जे झाले तें वाईट झाले मला पण त्रास होतो ग... दोन वर्षापूर्वी तें दोघे आणि दोन मुले असे हसते- खेळते कुटुंब होते त्यांचे. मोठा मुलगा आणि त्यापेक्षा दोन वर्षांनी लहान मुलगी प्रत्येक दिवाळी खूप छान साजरी करायचे... मुलगी तशी मोठी होती त्यामुळे फराळ बनवायला मदत करणे, रांगोळी काढणं, घर कामात हातभार लावणे, लहान-सहान कामे करत असे... तर मुलगा आकाश कंदिल बनवणे, घर सजवणे यात मदत करत असे... सुधीर आणि सुजाता या दोघांचेही आई-वडील लहान वयात गेले त्यामुळे आपल्याला जे मिळाले नाही तें सर्व आपल्या मुलांना आपण द्यायचे असे त्यांनी ठरवलं... सर्व हौस करत होते तें मुलांची आणि त्यांच्या सोबतच त्याचं स्वतःच बालपण जगत होते... नियतीच्या मनात काही वेगळेच होते... हि दिवाळी त्यांना न पचणारं दूःख देऊन गेली... साधा फटाका पाऊस... तो लावता लावता त्याचा स्फोट झाला आणि दोन्ही मुले त्यात भाजली गेली... दवाखान्यात नेण्यात आले पण काही उपयोग झाला नाही... दिवाळीची हि कडू आठवण त्यांच्या आयुष्यात एक अंधकार पसरवून गेली... त्यामुळे अजूनही दिवाळी आली की त्यांना या सर्वाचा खूप त्रास होतोच....

दोघांनी एकमेकांचे सांत्वन केले... आणि आता हे आयुष्य आपण एकमेकांसाठी हसत घालवयाचे असे नेहमी प्रमाणे एकमेकांना वचन दिले... रात्री थोडे आवरल्यावर सुधीरने तिला साने बाईं बद्दल सांगितलं... आणि त्याच्या मनात आलेला विचार बोलुन दाखवला... तो म्हणाला, सुजाता आपली मुले या जगात नाहीत तरी आपण त्यांची आठवण काढतो...त्यांच्या आठवणीत रडतो... पण तिथे असे किती तरी लोकं आहेत ग ज्यांची मुले असून नसल्यासारखी आहेत त्यांची अवस्था काय होत असेल विचार कर... आपण दोन्ही दूःख अनुभवले आहेत... आपल्या मुलांचा विरह आणि लवकर हरवलेले आई-वडीलांचे छायाछत्र सुद्धा... सुजाताला काही कळेना... ती त्याच्या कडे प्रश्नार्थक नजरेने बघत बसली... तो म्हणाला सांगतो सर्व.... आज साने बाईंसारखे किती तरी वॄद्ध आई- वडील आशेने वाट बघत आहेत की दिवाळी सारखा सण तरी आपण आपल्या मुला-बाळांसोबत घालवावा यासाठी दोन दोन डोळ्यांनी...

मग् काय विचार आहे तुमचा?? सुजाता म्हणाली... सांगतो सर्व सांगतो... सुधीर म्हणाला, ऐक... अजून दिवाळीला दोन दिवस आहेत... आपण आपले दुःख कुरवाळत बसण्यापेक्षा ह्या वर्षी दुसऱ्यांचे मनोदिप वाढवून साजरी करूया... तुझी साथ असेल तर मी तूला सांगतो काय करायचे आहे तें...?

सुजाताने नजरेनेच उत्तर दिले... तसा तो बोलू लागला... "ईश्वर कॄपेने आपल्याकडे सर्व आहे... जे नाही तें आता मिळू शकत नाही..." त्यामुळे ज्यांना हा आनंद मिळत नाही त्यांच्या साठी आता यापुढे येणारी प्रत्येक दिवाळी साजरी करायचा माझा विचार आहे... तू काय करायचे तर, आपल्या कडे कामाला येतात त्यांना हाताशी घेऊन तूला जमेल तेवढा फराळ कर... दिवाळीच्या दिवशी आपण तो घेऊन त्या वॄद्धाश्रमात आणि इथे जवळ असणार्या अनाथ आश्रमात जाऊ... ज्यांना मुलांचे प्रेम मिळत नाही त्यांच्या साठी मुले होऊ... ज्यांना आई-बाबांचे प्रेम मिळत नाही त्यांच्या साठी आई-बाबा होऊ...

सुजाताला आनंद झाला... आणि तिने देखील सहमती दिली... दोघांनी मिळून तयारी केली... ठरल्याप्रमाणे दोन्ही कडे जाऊन फराळ दिला... त्या सर्व अबालवॄद्धांच्या चेहऱ्यावर आलेला आनंदाने, हास्याने दोघांना एक वेगळेच समाधान दिले... ह्या कार्यात ते एवढे गुंतून गेले की रोज त्या सर्वांना भेटल्याशिवाय त्यांचा दिवस पूर्ण होत नसे...अार्थिक परिस्थिती चांगली होती त्यामुळे त्यांनी घराजवळ असणारे दोन्ही आश्रम चालवायला घेतले... त्यांना हरवलेले सुख मिळाले... आणि दरवर्षी एक आगळीवेगळी दिवाळी साजरी होऊ लागली... आनंदाचा, सुखाचा, समाधानाचा एक वेगळाच मनोदिप असणार्या दिवाळीची तें दोघे आतुरतेने वाट बघत असत... कारण प्रत्येक दिवाळीत त्यांचे घर हे आश्रमातील मुलांनी आणि वॄद्ध व्यक्तींनी भरून जाई...

अनाथ मुलांना आई- बाबा, आजी- आजोबा यांचे प्रेम आणि योग्य संस्कार मिळू लागले... कालांतराने दोन्ही आश्रम एक करून त्याला '' मायेची सावली " असे नाव देण्यात आले... सर्व खूप आनंदाने आणि प्रेमाने रहात होते... त्यांच्या आयुष्यात असलेली पोकळी त्यांनी भरून काढली आणि दुसऱ्यांच्या आयुष्यातही सुखाचा मनोदिप लावला...

आज या गोष्टीला ७ वर्षे झाली... परत दिवाळी आली... सर्व आनंदाने साजरी करत होते... तेव्हा सुजाता आणि सुधीर एकमेकांचा हात हातात घेऊन म्हणाले खरच सुख म्हणजे अजून काय असते नाही का....?


कशी वाटली कथा? आवडली असेल तर खाली ❤️ असा आकार आहे तो नक्की प्रेस करा.

आणि अभिप्राय द्या.. अर्थात तुमच्या कंमेंटमधून..

अजून लेख वाचत राहण्यासाठी मला फॉलो करायला विसरू नका....

साहित्य चोरी हा गुन्हा आहे.

सदर कथेच्या प्रकाशनाचे,वितरणाचे आणि कुठल्याही प्रकारच्या सादरीकरणाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव आहेत. कथेत अथवा लेखिकेच्या नावात कुठलाही बदल हा कॉपीराईट कायद्याअंतर्गत गुन्हा आहे ह्याची नोंद घ्यावी. कथा जशी आहे तशी नावासकट शेअर करण्यास हरकत नाही


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational