Savita Tupe

Inspirational

4.5  

Savita Tupe

Inspirational

सुखाचा मार्ग !

सुखाचा मार्ग !

17 mins
744


शेजारच्या वाड्याजवळ टांगा येवून थांबला , टांग्यात अण्णा आणि त्यांच्या सोबत एक ३० -३५ वर्षाची तरुणी आणि ६ वर्षाचा मुलगा आला होता .अण्णांनी खाली उतरून झोपलेल्या मुलाला उचलून घेतले आणि वाड्यात गेले , मागोमाग ती तरुणी पण एक बॅग घेवून , बाकीचे सामान गंगारामला आणायला सांगून आत गेली .

सरस्वती काकू हे त्यांच्या दारात उभ्या राहून हे सगळं बघत होत्या, अण्णांना आत गेलेलं बघून त्या लगबगीने टांग्याजवळ आल्या . गंगारामला म्हणाल्या , " काय रे बाबा ,अण्णा कोणाला घेवून आले ? शारदेला सवत घेवून आले की काय ?? अशीही मेली फारच वाचाळ आहे , हं ! म्हणून घेत नाही कोणास ! अण्णा तरी बिचारा काय करेल रे मग. आणली असेल तिच्या वरचढ . बस म्हणावं आता हिच्यासोबत भांडत ". 

गंगाराम चिडून म्हणाला ," अग म्हातारे तूझ्या जिभेला काही हाड ? अण्णांबद्दल असे बोलते ? जरा तूझ्या वयाचा विचार कर, कधीपासून ओळखते ग अण्णांना ? " तेवढ्यात अण्णांचा आवाज ऐकून गंगाराम बाकीचे समान घेवून आत पळाला. जाताना म्हातारीला म्हणाला , " मला म्हणालीस पण परत कोणाला बोलू नकोस अण्णांबद्दल असले अभद्र, तुझी जीभ आवर नाहीतर उपटून टाकीन , तुला काही माहित नाही म्हणून खपवून घेतले तुझे बोलणे , नाहीतर चपलेने सडकले असते. उगाच काहीही बकायच नाही , समजलं !! " गंगारामने तिला चांगलाच दम दिला . तिच्याकडे रागाने बघत तो आत निघून गेला .

  आत गेल्यावर गांगारामला वरच्या माडीवर सगळं सामान लावायला सांगून अण्णांनी बायकोला आवाज दिला . काहीश्या रागातच शारदा बाहेर आली . अण्णा सौम्य आवाजात पण जरबेने म्हणाले ," आज पासून साधना आणि गौरव इथेच वरच्या खोलीमध्ये राहतील ,त्यांची सगळी व्यवस्था मी केली आहे, तुम्हाला त्या दोघांचा काही त्रास होणार नाही .पण तुमचा सुध्दा त्यांना काही त्रास होता कामा नये . आजचा दिवस दोघांच्या जेवणाचे बघा ,उद्या पासून साधना तिचे ती करेन . काकूंना उद्यापासून गौरवला सांभाळायला सांगितले आहे , साधना कामावर गेल्यावर त्या दिवसभर गौरवला बघतील. त्यांच्या मधे तुम्ही काहीही लुडबुड केलेली मला चालणार नाही , हे कायम लक्षात राहू द्या ! " आता जा आणि स्वयंपाकाचं बघा ." शारदा नाक मुरडून , तणतणत आत निघून गेली .

  अण्णा मग साधनेला म्हणाले ," तुम्ही वर जावून आवरून घ्या , तोवर स्वयंपाक होईल ," साधना म्हणाली , " अण्णा मी वहिनीला मदत करते , तेवढेच त्यांच्यासोबत बोलणे पण होईल ." 

" नको बाळे , ती तुला नाही समजून घेणार , जी मला आज पर्यंत समजू शकली नाही ती तुझ्यासारख्या निष्पाप जीवाला काय समजून घेणार ? तू नको जास्त विचार करुस तिचा . तू आवरून घे आणि मग दुपारी आपण बँकेत जावू . तुला तिथली ओळख करून देतो म्हणजे उद्यापासून तुला लगेच कामावर जाता येईल . जा वर ,गौरव उठला का बघ ,त्याला वर झोपवले आहे ,उठला तर घाबरेन पोर जा ! "

   साधना अण्णांची लहान बहीण . वयाने सज्ञान होताच गावातल्या मुलासोबत पळून जावून लग्न केलेली . मुलगा पण चांगला होता .बँकेत चांगल्या पोस्टवर कामाला होता .घरी फक्त आई . सगळं चांगलं होतं पण फक्त जात वेगळी म्हणून साधनाच्या घरी मान्य होणार नव्हतं  , लग्नाला होकार मिळणार नाही म्हणून मग त्या दोघांनी पळून जावून लग्न केले .

     लग्नाच्या आधीच राघवने शहरात स्वतःचे घर घेतले होते , व्यवस्थित स्थिर झाला होता . आईला आधीच सांगितले होते साधना बद्दल . आईला काही अडचण नव्हती . लग्नानंतर साधनाला पण शिक्षण पूर्ण करायला लावून बँकेत नोकरीला लावून घेतले . अण्णा आणि साधना दोघेच बहीण भाऊ . अण्णांनंतर १० वर्षाने साधना झालेली . सगळ्यांची लाडकी पण असे काही करेल असे कोणाला वाटलेच नाही . वडिलांनी हाय खाल्ली आणि सहा महिन्यात गेले . आई खंबीर होती . तिने सगळं सावरून घेतलं ,आणि अण्णाला पण सावरलं .गावात त्यांचं बऱ्यापैकी नाव होतं . त्यामुळे साधनाच्या अश्या वागण्याने खुप दिवस गावात हीच चर्चा चालू होती .

 हळू हळू सारं विसरलं आणि अण्णांच्या जीवनाला पुन्हा नवे वळण लागले . लग्न झालं , दोन मुली झाल्या . शेती आणि पंचायतीची कामे यात ते व्यस्त झाले .२-३ वर्षांनी आईने मुलीची आठवण काढली म्हणून. मग न राहवून अण्णा शहरात साधनाचे हालहवाल बघायला गेले . बँकेत ओळख होतीच , तिथूनच मग साधनाची माहिती मिळाली . सगळे व्यवस्थित चालू आहे ,मुलगा आहे २ वर्षाचा ,नवरा पण छान सांभाळतो दोघांना . अशी दिलासा देणारी माहिती अण्णांना बँकेतल्या एका ओळखीच्या माणसाकडून मिळाली . अण्णा मनोमन सुखावले आणि माघारी आले . आईला सांगितले तीही बापडी सुखावली मुलीचे सुख ऐकून .

 दिवस भराभर निघून जात होते रोजच्या कामात सगळे व्यस्त होते .४-५ वर्ष अशीच निघून गेली . आईचे निधन झाले . साधनाला कळवले , येवून भेटून गेली .अण्णांची बायको शारदा . तिने काही साधनाला बरे बघितले नाही . घराण्याचं नाव धुळीला मिळवलं म्हणून ,एवढ्या दुखःद प्रसंगात सुध्दा ती साधनाला घालून पाडून बोलत होती . साधना मग आल्या पावली अण्णांचा निरोप घेवून निघून गेली . ती परत आलीच नाही . पण नंतर मात्र अण्णा शहरात गेले की बहिणीला आणि भाच्याला भेटायला नक्की जात असतं . साधनाचा नवरा राघव सुध्दा त्यांची जमेल तेवढी उठबस करत असे .

    एका सकाळी साधनाचा नवरा ह्रदय विकाराचा झटका येवून गेल्याचे अण्णांना कळले . अण्णांच्या पायाखालची जमीन हादरली . तिची सासू जावून ६ महिनेच झाले होते आणि आता हा दुसरा झटका . त्यांच्या डोळ्यासमोर साधना आणि गौरवचा चेहरा उभा राहिला . त्या दोघांचं भवितव्य त्यांच्या नजरेसमोर उभे राहिले . 

   साधना कमावती होती , रहाते घर स्वतःच्या नावावर होतं , राघवने दोघांच्या नावावर तसं बऱ्यापैकी कमवून ठेवलं होतं . तशी आर्थिक काळजी नव्हती , पण साधना अजून तरुण होती आणि एका सुस्वरूप निराधार विधवेला हे जग सामान्यपणे जीवन नाही जगू देतं . अण्णा त्या दोघांच्या काळजीने व्याकूळ झाले .

    मनाशी ठामपणे विचार करून अण्णानी शहरात जावून राघवचे सगळे क्रियाकर्म पार पाडले . अण्णा स्वतः मग १५ दिवस तिथेच राहिले . 

   एका निवांत क्षणी साधनाला जरा सावरलेलं बघून म्हणाले , 

" बाळा , पुढे काय ठरवले आहेस ? "

" काय बोलू अण्णा ? वाटलंच नाही हो असे काही घडेल ? राघव शिवाय जगणे खरंतर मी सहनच नाही करू शकत ! आईंना जावून सहा महिने पण नाही झाले आणि आता हा दुसरा आघात सहन नाही करू शकत मी , पण गौरवकडे बघितलं की जीव तुटतो माझा ! "

" खरं आहे पोरी , आता तोच तुझा आधार ! माझं ऐकशील ? " 

" अण्णा असं काय विचारता ? तुमच्याशिवाय दुसरं कोण आहे का मोठं ज्याचं मी ऐकणार नाही . तुम्ही सांगा अण्णा काय असेल ते मन मोकळे पणाने ".

" पोरी मला असं वाटतं की , तू माझ्यासोबत आपल्या घरी चलावं , तूझ्या बँकेची दुसरी शाखा आपल्या गावात आहे , तू तिथे बदली करून घे .गौरवला तिथल्या शाळेत घालू . तुला पण आधार होईल !"

" पण अण्णा , इथे घर आहे माझे हक्काचे ,माझ्या राघवच्या आठवणी आहेत इथे , हे सोडून कसे येवू ? "

"तूझ्या भावना मी समजू शकतो , पण फक्त आठवणींवर आयुष्य नाही कटत बेटा , "

   " हे जग एकट्याला आठवणींमध्ये राहू देत नाही आणि आठवणी माणसाला एकटं जगू देत नाही ."

म्हणून म्हणतो , आपण सोबत राहिलो की तुला आधार होईल , माझ्या दोन मुलींसोबत तुझा बाळ पण वाढेल ."

" पण अण्णा वहिनीला हे आवडणार नाही . "

" हं !! मी तो पण विचार केला आहे . मला 

शारदेचा पूर्ण अंदाज आहे . ती एवढ्या सहजासहजी तुला खपवून नाही घेणार .म्हणून मग मी त्यावर पण उपाय शोधला आहे . मी आपल्या वडिलोपार्जित संपत्तीची वाटणी करणार आहे . तूझ्या वाटेला आपल्या वाड्याचा पूर्व भाग येईल , तिथे सगळी नीट सोय करून घेवू , म्हणजे तुझी पण सोय होईल आणि 

शारदेला पण काही संधी नाही मिळणार तुला काही बोलायची ! "

" अण्णा , काय बोलताय हे ? मला काही हिस्सा नको आहे , राघवने आमच्या दोघांसाठी खुप कमावून ठेवलं आहे . राघव नेहमी म्हणायचा , 

" तुमच्या साठी सारं काही कमावून ठेवणार आहे , म्हणजे मग माझ्या मागे तुम्हाला कुणापुढे लाचार नाही व्हावं लागणार , खुप स्वप्न होती त्याची , त्यातली बरीचशी पूर्ण पण केली त्याने , पण अचानक असे काही होईल असे वाटलेच नाही , "

" हो मला आहे माहीत सगळं , मी यायचो तेव्हा खुप बोलायचो आम्ही तासनतास ! त्याला पाहिलं की वाटायचं साधनाने आयुष्याचा जोडीदार निवडताना कोणती चूक नाही केली . अगदी योग्य निवड होती तुझी . कदाचित असा योग्य सोबती आम्हाला पण शोधता नसता आला . असो....   

    " नशिबापुढे कोणाचे काही चालते का ? "

 " बरं ! मी उद्या जावून घरी सगळी व्यवस्था करतो आणि तुम्हाला न्यायला येतो ३_४ दिवसांनी , तोवर सीता काकू येईल आज तूझ्या सोबतीला , घरी आल्यावर पण त्या तुमच्या सोबत राहतील कायम ! "

  साधनाला तर काय बोलावं तेच कळेना ! गरज तर आहेच कोणाच्या तरी आधाराची , पण परत गावात जावून रहाणं म्हणजे नको त्या गोष्टींना रोज तोंड द्यावे लागणार . जरी ती शहरात होती ,तरी अजूनही गावात तिच्याबद्दल लोकं बोलायचे ते तिला कुठून ना कुठून कळतच असायचं . पळून जावून लग्न केलेली ,घराण्याचे नाव घालवणारी असंस्कारी मुलगी म्हणूनच जुने लोक तिला समजत होते . आजवर तिने हे मनावर नव्हते घेतले कारण तिचा त्यांच्याशी काही संबंध येत नव्हता . तीने घेतलेल्या निर्णयावर ती खुश होती .पण आता मात्र तिला त्या नजरांचा रोज सामना करावा लागणार होता . पण अण्णा बरोबर बोलत होते . आजवर ती राघवच्या कोशात सुरक्षित होती , आता तिला तो आधार राहिला नव्हता . रात्री अपरात्री गरज पडली कोणाची तर जवळचे कोणी नव्हते पटकन धावून येणारे . रोज कामावर गेल्यावर गौरवच काय ?? त्याच्या विचारासरशी तिला शहारून आलं . त्याच्या सुरक्षित भवितव्यासाठी तिला अण्णांसोबत गावी जाणं गरजेचं होतं .

अण्णा तिच्याकडे बघत होते . तिचे अवलोकन करत होते . ती नकार देणार नाही याची त्यांना खात्री होती पण होकार तिच्या मनानेच मिळावा अशी त्यांची इच्छा होती . कारण तरच ती मोकळेपणानं राहू शकणार होती आणि अण्णांना तेच अपेक्षित होतं ! 

  अण्णांच्या इच्छे प्रमाणे झाले , साधना तयार झाली आणि अण्णा मनातून सुखावले . 

  ४ वाजता सीता काकू आल्या , त्यांना दोघांची काळजी घ्यायला सांगून अण्णा संध्याकाळी गावी परतले . 

 दुसऱ्या दिवशी ते वाड्याच्या डागडुजीचे काम करायला माणसे घेवून आले .

   दोन दिवसात सगळ्या कामांची पाहणी करून त्यांनी सगळं नव्याने तयार करून घ्यायचे ठरवले .

 शारदा अचंबित झाली होती , तिला काही कळेना नवऱ्याचे काय चाललय ? बरं विचारायची सोय नव्हती . ती जरी अडमुठ होती तरी अण्णांना घाबरून असायची . त्यांच्या मागे आदळ आपट करायची पण समोर मात्र तीच काही चालत नसायचं . पण जे चाललंय ते नक्की काय चाललय याची उत्सुकता तिला स्वस्थ बसू देईना . मग तिने मोठ्या मुलीला स्वराला अण्णांना विचारायला सांगितले . स्वरा आणि तिच्या पाठची सई . मुलींवर अण्णांचा खुप जीव होता. शारदेला ते फक्त त्यांच्या मुलींची आई म्हणूनच बघत होते , बाकी त्यांना तिच्या बद्दल काही प्रेम उरले नव्हते .तिने केलेल्या वाईट कृत्यांना ते फक्त मुलींकडे बघून नजरेआड करत आले होते .पण त्यांनी तिला मनातुन कधीच माफ केलं नव्हतं .

 स्वराने जेव्हा अण्णांना विचारलं तेव्हा अण्णांच्या लक्षात आले की हे ती का विचारत आहे पण त्यांना वाटलं , ते जे काही करत आहेत ते शारदाला कळायला हवं , म्हणून मग त्यांनी स्वराला , आईला बोलाव म्हणून सांगितले , तोच दाराआड लपलेली शारदा पुढे येवून उभी राहिली .अण्णांना अंदाज होताच आणि आपला अंदाज चुकला नाही , हे पाहून पुसटसे हसू त्यांच्या चेहऱ्यावर पसरले .

 " वाड्यात आता थोड्याच दिवसात पाहुणे राहायला येणार आहेत .पण त्यांचा तुम्हाला काही त्रास होणार नाही .फक्त वाड्याच्या ह्या भागातला तुमचा वावर आता तुम्हाला करता येणार नाही ."

" का बरं ?? असे कोण पुढारी येणार आहे ? ज्यांच्यामुळे आमच्या वाड्यात वावरायला आम्हाला बंदी घालत आहात ? " 

अण्णांनी रागाने बघताच शारदा गप झाली . मग अण्णांनी पुढे सांगायचे टाळले , त्यांना कळून चुकले की आत्ताच जर सांगितले तर ही बाकीची कामे होवू देणार नाही आणि साधनाला पण येवू देणार नाही .ते शांत बसले .शारदा परत म्हणाली , " कोण येणार आहे ते कळेल का ? "

" त्याची मला गरज नाही वाटत , जावू शकतेस तू ! " 

 शारदा चरफडत तिथून निघून गेली .

 अण्णांच्या काळजीत अजून भर पडली , ती म्हणजे उद्या साधना आल्यावर ही बाई तिला इथे नीट राहू देणार नाही . काहीतरी उपाय आत्ताच करायला हवाय . त्यांनी मग वकीलाशी बोलुन , वारसा हक्काने वाड्याचे दोन हिस्से करून , एक हिस्सा साधनाच्या नावावर करून दिला . वाटणी झालेली शारदाला कळाव म्हणून मग मधे भिंत बांधून घ्यायचे ठरवले . बाहेरून दिसताना वाड्याचा दरवाजा एकच पण आत आल्यावर मात्र वाड्याचे दोन भाग करायचा त्यांचा विचार पक्का झाला .असेही त्यांची सारी वहिवाट वाड्याच्या एका बाजूला जास्त होती .दुसरी बाजू आई वडील होते तोवर त्यांची उठबस त्या भागात जास्त असायची .ते दोघे गेल्यापासून मग एक भाग जवळपास रिकामा असायचा . तो भाग साधनाला देवू असे अण्णांच्या मनात आले .

   अण्णांनी मग तसेच करायचे ठरवले .तो भाग साधनाच्या नावावर करून दिला .कामाला उरक घ्यायला सांगून ते स्वतः साधनाची बदली गावातल्या बँकेत करून घ्यायला तिथल्या मॅनेजरला भेटले . तो ओळखीचाच होता आणि अण्णा तर गावातले एक प्रतिष्ठित असामी होते . मॅनेजरला सगळी कल्पना दिल्यावर तो तयार झाला साधनाला इकडे घ्यायला .एक काम मार्गी लागले .तसा निरोप साधनाला पाठवला .ती पण जरा स्थिरावली . मग गौरवच्या शाळेचे दुसरे काम पण अण्णांनी मार्गी लावले .घरापासून शाळा जवळच होती .अण्णांच्या दोन्ही मुली मराठी मिडीयम मधे शिकत होत्या , पण गौरवला साधनाने इंग्लिश स्कूल मध्ये घातलं होतं .त्यासाठी मग अण्णा तिथल्या चांगल्यातली चांगली स्कूल बघून आले आणि तिथे गौरवच नाव घातलं .

   ८- १५ दिवसात वाड्याचे काम पण बरेच आवरले होते . आता साधना आणि गौरवला घेवून यायला काही हरकत नव्हती .

  अण्णा साधनाकडे मध्ये तिचे हालहवाल बघायला पुन्हा २_३ वेळा जावून आले होते .सीता काकू सोबतीला होत्या त्यामुळे अण्णा पण निश्चिंत होते . तिथे बँकेत जावून , साधनाचा बदलीचा अर्ज देवून तिथून पण संमती मिळवली होती अण्णांनी . गौरवचे स्कूल का बदलायचे आहे हे सांगून त्याचा दाखला त्या शाळेतून दुसऱ्या शाळेत मागवून घेतला . सारी कामे झाली आता फक्त साधनाला गावी घेवून जायचे एवढेच राहिले होते . वाड्याचे काम पूर्ण झाले आणि आज साधना वाड्यावर राहायला आली .

  शारदाला अजून पर्यंत कोण येणार हे माहीत नव्हतं .मुलींना त्यांना आत्या आहे हे पण नव्हते माहीत ! अण्णांनी मागे एकदा सांगितले होते , पण त्या आजच साधनाला प्रत्यक्ष बघत होत्या. 

   सीता काकू स्वयंपाक घरात गेल्या .त्यांना शारदाचा स्वभाव माहीत होता .ती स्वयंपाक करणार नाही हे त्यांनी ओळखले होते . राधा होतीच घरात , मग तिला मदतीला घेवून त्या स्वयंपाकाला लागल्या .अण्णांनी डोकावले , त्यांना स्वयंपाक घरात शारदा कुठे दिसलीच नाही .त्यांना राग आला तिचा . ते तसेच रागाने त्यांच्या खोलीकडे निघाले पण सीता काकूंनी त्यांना डोळ्याने खुणावून शांत राहायला सांगितले . अण्णा पण साधनासमोर आल्या आल्या वाद नको म्हणून आपल्या खोलीत निघून गेले .

    साधनाला वाड्यात केलेले बदल पाहून जरा अवघडल्या सारखे झाले .कारण येताना तिला असे वाटले होते की सगळे एकत्रच राहू , पण इथे तिची वेगळी सोय बघून ती थोडी आश्चर्य चकित झाली होती . एका अर्थाने हे योग्यच झाले असे तिला वाटले , कारण वहिनीचा स्वभाव कसा आहे याची तिला थोडी कल्पना होती आणि ह्या महिनाभरात सीता काकूंनी तिला बरीच माहिती पुरवली होती .खरतर सीता काकू वहिनीच्या लांबच्या नात्यातली होती , ती ह्याच गावात राहत होती . तिला काही मूलबाळ झाले नाही .नवरा आणि ती लोकांच्या शेतात काम करून पोट भरत होती . तिचा नवरा एका रात्री शेतात पाणी धरायला गेला असता त्यांना विषारी साप चावला आणि तो जागीच गतप्राण झाला ,

   सकाळी नवरा घरी न आल्याने , त्याला शेतावर बघायला गेल्यावर कळले , एकटी बाई माणूस नंतर काय करणार म्हणून अण्णांच्या आईने त्यांना त्यांच्या सोबत ठेवून घेतले . त्या आजतागायत त्यांच्या परिवारात मिसळून रहात होत्या .जरी शारदाची नातेवाईक होती तरी तिला कधी शारदाचे वागणे आवडले नाही, त्यामुळे दोघींचे कधी पटलेच नाही , कोणी नसले की शारदा सीता काकूला घालून पाडून बोलायची एकही संधी सोडत नसे पण अण्णा आणि सासू पुढे तिने कधी आवाज नाही केला .

  अण्णांना आता साधनाच्या मदतीसाठी सीता काकुंशिवाय दुसर कोणी योग्य वाटत नव्हतं. एकतर त्या शारदाला वेळप्रसंगी फटकारायला मागेपुढे बघत नव्हत्या . आणि दुसरं म्हणजे जोवर सीता काकू घरात आहेत तोवर आजूबाजूचे कोणी घरात येवून नसत्या चौकश्या करायला धजावणार नाही याची अण्णांना पक्की खात्री होती .

  साधना घरी आल्यावर अण्णा जरा निश्चिंत झाले .मागचा एक दिड महिना त्यांची पण जरा धावपळ झाली होती .स्वयंपाक होई तोवर ते थोडावेळ पलंगावर आडवे झाले .

 साधनाला इथे आल्यावर आई आणि वडिलांची खुप आठवण येऊ लागली .तिला तिचे बालपण आठवले . अप्पा तिचा किती लाड करायचे ते आठवून ती अजूनच भावूक झाली आणि तशीच रडत राहिली .दुसऱ्या खोलीत गेली , जी कधी तिची होती . तिथे मात्र सगळच जागच्या जागी होत .तिच्या वस्तूंना कोणी जागचे हलवले नव्हते .साफसफाई मात्र नियमित होत असावी असे दिसत होते . 

   साधनाने तिचे कपाट उघडले , त्यात तिचे कपडे ,तिची खेळणी , तिची पुस्तके सारं काही व्यवस्थित लावून ठेवलेलं होत . तिला खुप उचंबळून आले .आलेला हुंदका दाबत ती तशीच बसून राहिली . 

   तिला तिने पळून जावून लग्न केल्याने , अपराधीपणाचं वाटू लागले . " किती जीव होता सगळ्यांचा माझ्यावर , पण प्रेमात आंधळी झालेली मी , ह्या सर्वांना दुखावलं , स्वतःचं सुख शोधलं आणि ह्या सगळ्यांना दुःखाच्या खाईत ढकलून मी मात्र सुख उपभोगत राहिले . हया पापाचीच शिक्षा आज मला अश्या प्रकारे मिळत आहे ! " मी एवढा मोठा गुन्हा करूनही अण्णा आज त्यांचे कर्तव्य निभावत आहे . 

    आई वडील आणि वडीलांसमान भावाला दुःख देणारी मी अभागी , की माझ्या सुखाचा विचार करून त्यांना यातना देणारी करंटी ? " माझ्या पापाची शिक्षा हीच आहे , की ज्या सुखासाठी मी आई वडिलांचे प्रेमळ पाश सोडून गेले , आज त्याच सुखाला मी वंचित झाले .आज माझ्यापेक्षा अभागी दुसरे कोणी नसेल . आज मी एकाकी झाले आहे , ना आईवडिलांचे छत्र ना सात जन्म सोबत निभावणाऱ्या आयुष्याच्या जोडीदाराची साथ !  

 एवढं सगळं उध्वस्त झालेलं असतानाही खंबीरपणे साथ देवून आपले कर्तव्य पार पाडणारे अण्णा !

    " दैव देतं अन् कर्म नेतं ! "

   आपल्या आयुष्यात नशिबाने सगळं काही सुरळीत असताना असे काही घडून जाते की कळत नाही आपण काय पाप केलं आहे म्हणून माझ्या सोबत असं घडलं ??

 पण सारं काही संपलं आता अशी मानसिकता तयार होत असताना आयुष्याला अशी काही कलाटणी मिळते की पुन्हा नव्याने जगण्याची उमेद निर्माण होते. आज माझा एक आधार काढून घेतला आणि अण्णांच्या रूपाने दुसरा आधार समोर उभा केलाय नशिबाने .

 साधना विचारात गढून गेली होती .किती वेळ गेला तिला कळलच नाही .सीता काकू आल्या होत्या तिला बोलवायला .त्यांच्या आवाजाने ती भानावर आली . काकू आईच्या मायेनं जवळ येवून डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या , " कसला विचार करता ताई ? "

साधनाला भरून आलं , ती तशीच त्यांच्या कुशीत शिरून रडायला लागली ," काकू , आई अप्पा आज असते तर काय वाटलं असत त्यांना ? त्यांना सोडून जाताना मी क्षणभर सुध्दा विचार नव्हता केला की माझ्या निर्णयाने त्यांची काय अवस्था होईल ? किती जीव होता त्यांचा माझ्यावर ., आज इथ आल्यावर मला ही जाणीव होतेय काकू , मी किती स्वार्थी होते ? जन्मदात्या आई वडिलांना सोडून , त्यांना दुःख देवून मी सुखी होण्याचा प्रयत्न केला .पण मला ते सुख कुठ लाभलं ? नाही ना ? कसं लाभणार होत ? देव माणसांना वेदना देवून स्वतःला खुश करण्याचा प्रयत्न केला.आणि आज बघा सगळ्यांना गमावून बसले ."

काकू तिला शांत करत म्हणाल्या , " जे झालं ते गंगेला मिळालं , त्याचा विचार करून , दुःखी होवून काही बदल होणार नाही , सारं स्वीकारायचं आणि पुढे मार्ग काढत रहायचं ! अण्णा आहेत ना पाठीशी .कोणी नाही असं का म्हणताय ? नशिबात अजूनही एखादा सुखाचा मार्ग असणार आहे म्हणून तर सगळ्या वाटा धूसर झाल्या असे वाटत असताना अण्णांच्या रूपाने एक नवीन मार्ग तुम्हाला दाखवलाय देवानं , आता मात्र तो मार्ग सोडू नका ,त्याच्याच आधाराने चालत रहा ....

तो नक्कीच सुखाचा मार्ग असेन.....

  नशिबाला दोष का म्हणून द्यावा ? जे काही घडतं ते विधिलिखित असतच पण ते चांगल का वाईट आपण आपल्या कुवतीनुसार ठरवत असतो .

तुम्ही आज दुःखी आहात , पण जेव्हा तुम्ही मागे भूतकाळात वळून बघाल तर जाणवेल तुम्हाला , तुम्ही तर कायम सुखाच्या मार्गावरच चालत होता ! पण हा माझा बघण्याचा दृष्टीकोन आहे .कारण मी सकारात्मक नजरेने बघते आणि आज तुम्ही दुःखी आहात त्यामुळे तुमचं मन चांगल बघू नाही शकत , जे काही तुमच्या समोर घडतंय ते सगळ चुकीचं आहे अश्याच पद्धतीनं समोर येतंय . जेव्हा सगळ नीट होईल तेव्हा कळेल तुम्हाला , सगळं काही सुरळीत असतं पण अस्थिर मनाला हे समजत नसत ! "

" काकू बोला तुम्ही ,खुप छान बोलता आहात , माझ मन शांत होते आहे , सांगा ना अजून 

काही ! " .....

 काकू हसल्या ," मी काही शिकलेली नाही ,अनुभवाने आणि परिस्थितीने जे समोर आणलं त्यातून शिकत गेले , लग्न झालं आईवडील असून नसल्यासारखे , सगळा कारभार भाऊ आणि भावजयीच्या हातात , नवरा जपत होता पण जगायला फक्त काळजी घेणारं असून चालत नाही , पोटासाठी कष्ट करत होतो लोकाकडे , जेमतेम भागातच होतं तर तो आधार पण तुटून गेला .पोटाला मूलबाळ नाही त्यामुळे कुणासाठी अडकनं नाही , माहेरचा आधार नाही पण देवाने अण्णा आणि तुमची आई मदतीला धाडले . जगण्याची सोय केलीच की , हि माझ्या सुखाची वाट . खुप जीव लावला तुमच्या आईने मला .त्या माऊलीला जाणवणारी तुमची कमतरता देवाने माझ्या रूपाने भरून पूर्ण केली . सगळ्यांच्या प्रेमाला पारखी मी पण तुमच्या घराने माझ्यावर प्रेमाची पाखर घातली . शेवटच्या क्षणाला त्या अगदी आनंदाने सामोरं गेल्या. तुमची खुशाली कळत होती. निश्चिंत मनाने साऱ्यांना मनभरून आशीर्वाद देवून गेल्या. तुमची वहिवाट परत या घरात चालू व्हावी अशी त्यांना आशा होती, अण्णांना नेहमी म्हणायच्या , " पोर सुखात आहे चांगलच आहे, पण एका रात्रीचा का असेना, प्रत्येक मुलीला माहेरवासाची ओढ असतेच. तिला वाटतच असणार इथे यावं म्हणून, अण्णा तिला आमच्या मागे अंतर देवू नको, सांभाळा एकमेकांना ".

 " बघा आज त्यांची इच्छा अश्या प्रकारे पूर्ण झाली . यात दोष का आणि कुणाला द्यायचा ? तुम्हाला कायम सुखाच्या मार्गावर ठेवले देवाने "

" कसे काय काकू ? "

" बघा ना ! आई वडील, लाडाकोडात वाढलेलं बालपण, जिवापेक्षा जास्त जपणारा नवरा, आईची माया लावणारी सासू , त्यांनी त्यांचा प्रवास अर्ध्यावर सोडला पण तुमचा सुखाचा मार्ग पण पुढे वाहताच ठेवला , अण्णांना  पुन्हा तुमच्या सुखाच्या मार्गाचा प्रवासी म्हणून सोबत दिले, आता त्यांच्या आधाराने पुन्हा सुखाची मार्गक्रमणा सुरूच , एका मुलाला पदरात टाकून अण्णांच्या नंतरही सुखाचा मार्ग सुखकर करून ठेवलाच आहे की ! "

" काकू खरंच आहे तुमचं म्हणणं ", माणूस परिस्थितीने हतबल झाला की त्याचा बघण्याचा दृष्टीकोन पार बदलून जातो , नाही..."

 "तुम्ही अडाणी असून सुध्दा जगण्याचे खुप मोठे तत्वज्ञान सांगितले काकू . मी कायम लक्षात ठेवेन हा सुखाचा मार्ग ".

गौरव उठला होता तोवर , साधना पटकन एका वेगळ्याच तडफेने उठली , मगाशी आलेली हतबलता आता तिला जाणवत नव्हती , दोघांचे आवरून घेवून मग तिघेही खाली गेले , जेवण करून मग गौरवला काकुंजवळ सोडून अण्णा आणि ती बँकेत जावून आले . 

   दुसऱ्या दिवसापासून दोघांचे रूटीन सूरू झाले .

  अण्णांची शारदाच्या प्रती असणारी नाराजी साधनाला आताशी जाणवू लागली होती .  

    सगळ्यांना दुःखातून बाहेर काढणारा स्वतः मात्र आतून सुखी नव्हता .काकूंच्या मदतीने तिने अण्णांना यातून बाहेर काढायचे ठरवले .

  गौरव आणि स्वरा , सई एकमेकांसोबत चांगले रुळले होते , मुलींना पण आत्याचा लळा लागला होता , सुट्टीच्या दिवशी सगळे मिळून अगदी धिंगाणा घालत असत .शारदा सोडली तर सगळेच यात सहभागी असतं . साधनाने हळूहळू वहिनी सोबत बोलणे वाढवले होते . तिला प्रत्येक वेळी चर्चेत सहभागी करणे , गरज पडेल तिथे तिचा सल्ला विचारणे , तिच्या बोलण्याला मान देणे .ह्या गोष्टींनी शारदा पण जरा मोकळी होत होती त्यांच्या सोबत .सुरवातीला ती टाळत असायची पण आता जरा ती ह्यांच्यात मिसळायला लागली होती .एकंदर साधनाच्या येण्याने घरात नवचैतन्य संचारले होते . अण्णांना पण शारदा मधला बदल जाणवत होता ,ते पण शारदा सोबत थोडी थोडी चेष्टा मस्करी करत असत .त्यांच्या नात्याला नवा रंग भरायचे काम काकू आणि साधना करत होते.

   प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या सुखाचा मार्ग सापडू लागला होता आणि ह्या सुखाच्या प्रवासातले प्रवासी प्रत्येक वळणावर नवनवीन अनुभव घेत त्या प्रवासाचा आनंद घेत सुखाने मार्गक्रमणा करत होते ......


समाप्त .....


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational