Priya Jawane

Drama Romance Inspirational

3  

Priya Jawane

Drama Romance Inspirational

तो आणि ती - पालवी

तो आणि ती - पालवी

4 mins
258


'प्रॉब्लेम्स नसतात कोणाला? ते शेवटपर्यंत असतात. पण प्रत्येक प्रॉब्लेमला उत्तर हे असतंच. ते सोडवायला कधी वेळ हवा असतो, कधी पैसा तर कधी माणसं या तिन्ही गोष्टीपलिकडचा प्रॉब्लेम अस्तित्वात नसतो.'


'एकाकीपण वेगळं, एकांत वेगळा. परीसराचं मौन म्हणजे एकांत .आणि परिवारात असतानाही पोरकं वाटणं हे एकाकीपण. एकाकी वाटलं तर मनसोक्त रडावं.'


'अश्रु म्हणजे दुबळेपणा नाही. पावसाळी ढग जसे बरसल्यावर हलके होतात. आणि दिसेनासे होतात, तसा माणुसही हलका होतो. आकाशाजवळ पोहोचतो. असंच कोणतं तरी दुःख पार केल्यावर तुकाराम "तुका आकाशायेवढा" असं लिहून गेला असेल.'


'आकाशात जेव्हा उपग्रह सोडतात तेव्हा गुरुत्वाकर्षणाच्या बाहेर पिटाळून लावेपर्यंत संघर्ष असतो, त्याने गती घेतली की उरलेला प्रवास आपोआपच होतो. असंच माणसाचं आहे....... समाजात एक विशिष्ट उंची गाठेपर्यंत सगळा संघर्ष असतो. पण एकदा अपेक्षित उंचीवर पोहोचलात की आयुष्यातल्या अनेक समस्या ती उंचीच सोडवते.'

 

तो आज असंच काही ऐकवत होता. एका निळ्या सुंदर पुस्तकातून वाचून. मध्येच कोणतंस पान उघडायचा आणि मनाला भिडणारं त्याच्या आवाजातलं काही तरी सुंदर ऐकवायचा. ते पुस्तक मी मागितलं तर सरळ उठून वर ठेऊन दिलं त्याने, त्याच वरच्या कप्प्यात. मी हिरमुसले. 


(ते पुस्तक म्हणजे नक्की काही खजिनाच होता त्याच्यासाठी. अनेकदा त्याला ते वाचताना पाहिलंय. हा एकदाच वाचून पूर्ण का करत नाही. पण असो त्याला सांगणार कोण. मला ऐकवायचे म्हणून अनेक समास त्याने हायलाईट केले होते. मला मात्र हाताळायची परवानगी नव्हती.)


मला रागात पाहून तो नेहमीप्रमाणे गोड हसला. थोड्या वेळात दोन कप चहा घेऊन आला. वातावरण गार होतं त्यात चहा, पर्वणीच.


'अर्जुन, तुला चांगलंच माहीत आहे, माझा राग कसा घालवायचा ते.'

मी कप उचलत त्याला म्हणाले.


'काय करणार चहाप्रेमींना बर्गर पिझ्झा खाऊ घालून उपयोग नाही.'

त्याने हसत उत्तर दिलं.


आमच्यात हल्ली बर्‍यापैकी मोकळीक वाढली होती. पूर्वीची गुढ शांतता आता नसायची. मी आधीपासूनच बोलायचे मात्र तो आता खुलत होता. 


मी स्मित करत त्याच्याकडे पाहत विचार करत होते. त्याने डोळ्यासमोर चुटकी वाजवून हाताने काय म्हणून विचारले. मी नकारार्थी मान हलवली.


एव्हाना चहा संपला होता. मी दोन्ही कप आत नेऊन ठेवले. डायनिंग टेबलवर दोन लाल गुलाब फुलदानीमध्ये सजवून ठेवले होते. मी त्या फुलांना हातात घेऊन पाहिलं. तो किचनच्या दरवाज्यात हाताची घडी घालून, बाजुच्या मार्बलवर रेलून उभा होता.


'कुठून आणली. आपल्याकडे झाड नाहीये या गुलाबाचं' 

मी फुलांचा वास घेत विचारलं.


'कोणी दिलीत असं नाही विचारलं तू?' 

तो एक भुवई वर करुन स्मित करत बोलला.


'बरं कोणी दिलीत',

मी ही थोड वैतागून विचारलं.


'हम्म... अस. विचार, कोणी दिलीत!' 

तो खरंतर मला त्रास देण्याच्या विचारात होता.


'जाऊ दे नको सांगूस, मला नाही माहीत करुन घ्यायचं.'

मी फुलं जागेवर ठेऊन त्याला अोलांडून परत सोफ्यावर आले.  


तो काही वेळ डोळे मोठे करुन हसत मला पाहत होता, नंतर मान खाली घालून पुन्हा हसला.


'मग नवीन गोष्ट???'

तो माझ्याकडे बघत म्हणाला.


मी ही सावरुन बसले.


'आधी एक सांगतो, जास्त विचार करायचा नाही आणि काही विचारायचंही नाही.'

तो गंभीर होत म्हणाला.


माझे डोळे अचानक भेदरले. खरंतर तो कधीच कोणत्या कथेआधी अशी कोणती प्रस्तावना देत नाही. आजपर्यंत त्याने अनेक व्यक्ती सांगितल्या, मनाला लागतील अशा पण असं कधी काही बोलला नाही.

 

मिरा.

 

कॉलेजची सगळ्यात बिन्धास्त मुलगी. सुंदर पण मर्यादा जपणारी. आरे ला कारे करता यायचं तिला. घरच्यांची लाडकी. अशातच तिच्याच वर्गातल्या एका मुलाचा जीव जडला तिच्यावर. रोज चोरुन पाहायचा. मित्रांनी हिम्मत दिली आणि सर्वासमोर त्याने प्रेमाची कबुली दिली. अल्लड वय, समजुदारपणाचा अभाव त्यामुळे त्याने कसलाच विचार न करता मिराला मनातले भाव सांगितले. सोप्या भाषेत सांगायचं तर फिल्मी स्टाईलने प्रपोज केलं. 


मिराने मागचा पुढचा विचार न करता सगळ्यासमोर त्याच्या कानामागे दिली. त्याचा सगळ्यासमोर अपमान झाला. पुढच्या काही दिवसात त्याचं प्रेम धगधगत्या रागात रुपांतरीत झालं. 


मिराला रस्त्यात गाठून त्याने तिच्या अंगावर ज्वलंत द्रव फेकलं. ती अोरडली आजुबाजुचे लोक धावत आले पण तिला त्रास सुरु झाला होता. त्याला पकडण्यात अालं. मिराला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. मात्र प्रेमाच्या बीभत्स रुपाने तिला हरवलं होतं. ती आरशात पाहू शकत नव्हती. 


मी अर्जुनचा हात घट्ट पकडला होता. माझे डोळे अतोनात दुःखाने वाहत होते. तो मात्र शांत होता. त्याने स्मित करत हाताच्या मागच्या बाजूने माझे डोळे पुसले. मी आतून हादरले होते. तो अजूनही संयम ठेऊन होता. त्याने मला पाणी दिलं.


'मिरा. ती कुठेय? कशी आहे?'

मी थरथरत त्याला विचारलं.


'इथेच, ते सुंदर गुलाब तिनेच तर दिलेत.'

तो हसत बोलला.


'मिरा. जे झालं ते तिने स्विकारलं. नियतीच्या मनात जे काही होतं ते झालंय, अाता तिला पुन्हा ते सगळं आठवून त्रागा नाही करुन घ्यावा वाटत. ती जगतीये आनंदाने, त्या गुलाबासारखंच सुंदर मन घेऊन. तिच्या परिवाराची साथ आहे तिला. तिच्यासारख्या पिडीत मुलींसाठी काम करते ती आता. तरुणपिढीला प्रेम आणि आकर्षण यातला फरक समजवण्यात वेळ घालवतेय ती. जगतीये आनंदाने एक सुंदर आयुष्य.!' 


हे बोलताना त्याच्या चेहर्‍यावर समाधानाचं हसू होतं. तो ही मिराला या सगळ्यात मदत करत असणार हे नक्की.


मी खूपच हादरले होते. पण मिराने जो मार्ग निवडला होता तो कौतुकास्पदच होता. अशा वेळी तिला सहानुभूती देऊन मला तिला हिणवायचं नव्हतं. तो अजुनही मिराच्याच विचारात होता. त्याच्या चेहर्‍यावरचं तेज हे समजून द्यायला पुरेसं होतं.


'तुला माहीतीये पिऊ. तुझ्यात आणि मिरात एक साम्य आहे.'

तो रोखून बघत बोलला.


मी प्रश्नार्थक नजरेने त्याला पाहिलं.


'दृष्टिकोन. . .' 

तो दिर्घ श्वास घेत बोलला.


मी अजूनही प्रश्नात होते.


'तडा गेलेल्या काचेच्या भांड्यात भलेही पाणी भरुन ठेवता येत नसेल पण फुलं नक्कीच सजवता येतात.' 

तो लाघवी स्मित करत म्हणाला.


'नवपालवीचं सुख भोगायचं असेल तर पानगळीचे दुःख सोसावेच लागते.' तो पुन्हा बोलला पण यावेळी समाधानाने.


हो, मी करत होते प्रयत्न त्याच्या उजाड आयुष्यात फुलं सजवण्याचा. सगळ्यासमोर हसरा मुखवटा घालणारा अर्जुन आतून किती एकटा आहे ठाऊक होतं मला. अनेक अपमान, दुःख त्यानेही सोसले होते. मात्र दुसर्‍यांचे दुःख जाणून घेऊन ते कमी करायला त्याला आवडायचं. पण आता तो एकटा नव्हता. त्याला त्याच्या नव्या पालवीची सोबत होती. जी कितीही वादळात त्याला सोडणार नव्हती. यांचच समाधान मला दिसायचं कायम.!!!


ये रास्ते साथ चलने के लिये है,

मंजिल तो बस बहाणा है।

एक कदम तो साथ बढाओ मेरे दोस्त, 

अभी सफर बहुत लंबा है।


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama