Prajakta Patil

Children Stories Comedy

3.5  

Prajakta Patil

Children Stories Comedy

आजोळच्या गमतीजमती

आजोळच्या गमतीजमती

5 mins
75


माझ्या आजोळी माझे आजी-आजोबा निसर्गाच्या सानिध्यात आणि प्राण्यांच्या सहवासात अगदी आनंदाने रहायचे.दोघेच असल्याने आजोबा शेतावर गेले म्हणजे आजी स्वयंपाक झाला की पूजा-पाठ करण्यात मग्न असायची. रोजच्या रोज काही ना काही वाचन करणे हा तिचा छंद होता. दरवर्षीप्रमाणे दिवाळीच्या सुट्टीत आम्ही आजोळी गेलो होतो. आजीने मोठ्या प्रेमाने दिवाळीचे फराळाचे पदार्थ बनवले होते.आजोबांनी नवे कपडे, फटाके आणले होते.आता आले ते तुळशीचे लग्न. आम्हाला प्रश्नच पडला तुळशीचे लग्न लावायचे ? का लावायचे. ? माझी मोठी ताई आजीला म्हणाली, "आजी का लावायचे तुळशीचे लग्न ? तुळस ही तर एक वनस्पती आहे मग इतर वनस्पतींचेही लावतात का लग्न?"


आजी हसून म्हणाली, " थांबा तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळण्यासाठी मी तुम्हाला एक गोष्ट सांगते ती ऐका."


म्हणून आजीने गोष्ट सांगायला सुरुवात केली. 


आजी म्हणाली,"जालंधर नावाचा एक राक्षस होता. जालंधर महापराक्रमी होता. आपल्या शक्तीमुळे तो उन्मत्त झाला होता आणि म्हणूनच तो देवानाही त्रास देऊ लागला होता. त्याची शक्ती त्याच्या पत्नीच्या पवित्र्यामुळे दिवसेंदिवस वाढत होती. म्हणून विष्णूनी एक युक्ती करण्याचे ठरवले. जालंधराच्या पत्नीला रणांगणावर देवाशी युद्ध करताना जालंधर मेला. असे सांगून त्याचे वेगळे झालेले खोटे डोके आणि शरीर दाखवायला आणायचे असे ठरवले. त्याप्रमाणे त्यांनी तसे केलेही. जालंधराच्या पत्नीला अतिशय दुःख झाले.पतीच्या काळजीने तिने विष्णूला यावर काही उपाय आहे का ते विचारले.


जालंधराच्या पत्नीने विष्णुला विनवणी केली.मग विष्णूने खोट्या जालंधराला जिवंत केले. अतिशय आनंदाने वृंदेने विष्णुला मिठी मारली आणि तिचे पावित्र्य भंग पावले. आणि रणांगणावर देवाशी युद्ध करताना जालंधर खरोखरच मारला गेला. खरी गोष्ट कळाल्यावर वृंदेने आत्मदहन केले.विष्णूला मात्र फार दुःख झाले. एका पतिव्रतेला आपल्यामुळे आत्मदहन करावे लागले म्हणून विष्णू सतत दुःख करत होते हे पाहून पार्वतीने जिथे वृंदेने आत्मदहन केले होते तेथे आवळा ,बोर आणि तुळस यांची झाडे लावली आणि तुळस ही विष्णूप्रिया म्हणून ओळखली जाऊ लागली. विष्णूबरोबर तुळशी मातेचा विवाह लावला जातो." त्यावेळी या सर्व गोष्टीचा काहीच अर्थ कळत नव्हता. पण आनंद म्हणून आम्ही तुळशीचे लग्न लावले. त्यासाठी ऊस हा तुळशीचा मामा म्हणून तिच्या मागे उभा केला. तुळशीची ओटी भरली. बांगड्या, मंगळसूत्र ,आरसा, कंगवा, जोडवी हे सगळं सौभाग्यालंकार तिच्या जवळ ठेवले आणि परत खेळायलाही घेतले. 


"पावित्र्याचे स्थान म्हणजे अंगणातील तुळस


…चे नाव घ्यायला मला नाही येत आळस." नेहमीप्रमाणे सुरूवातीला स्वतः हा उखाणा माझ्या आजोबांचे नाव घेत आजीने घेतला आणि परत प्रत्येकाला एक-एक करून घ्यायला लावला. चुकून कोणी उखाणा घेताना चुकले तर सर्वजण मोठ्याने हसायचे.


त्यावेळी आजी सांगायची तुळस खूप पवित्र असते. पण आज शास्त्रीयदृष्ट्या ही तुळशीचे महत्त्व कळते. खरोखरीच दिवस-रात्र ऑक्सिजन देणारी. सर्दी, खोकला फक्त तिचा काढा घेऊन बरा होतो. सर्व आजारांवरील बहुगुणी अशी ही तुळस शास्त्रीय दृष्ट्या ही पवित्र आहे. म्हणूनच प्रत्येकाच्या दारात तुळस ही असतेच. आणि घरावर येणारे आजाराचे संकट दूर करण्यासाठी ठाम उभी असते. आजही रोज सकाळ -संध्याकाळी तुळशीसमोर दिवा लावून मुलांना "शुभं करोती" म्हणायला सांगतले जाते ते केवळ मुलांच्या उत्तम आरोग्यासाठी.


आम्ही आजीसोबत तुळशीचे लग्न लावले. दोन दिवसांनी भावा बहिणीच्या अतुट प्रेमाचा भाऊबीजेचा सण होता. आजीला साजशृंगार करायलाही फार आवडायचा. तिने आम्हाला तयार होऊन बसा आपण उद्या शहरात जाऊ असे सांगितले. 


"आजी कशाला जायचे आहे गं शहरात?" माझी मामेबहीण म्हणाली.


"अगं आहे थोडी खरेदी आणि शिवाय मेहंदी घेऊन यायची आहे शहरातून." आजी म्हणाली.


"कशाला हवीय मेहंदी?" माझी मामेबहीण पुन्हा म्हणाली.


"अगं हातावर लावायची असते. सणसमारंभात शोभा वाढवते मेहंदी." आजी म्हणाली.


"नाही हा. माझे हात खराब होतात मेहंदीने." माझी मामेबहीण म्हणाली.


आजी म्हणाली, अगं


"मेहंदी म्हणजे सौभाग्यवतींच्या शृंगाराचा साज....


मेहंदी म्हणजे नववधूच्या प्रेमाचा रंग..


मेहंदी म्हणजे स्त्रियांच्या सौंदर्यात पडलेली भर....


सनवाराला काढलेली मेहंदी म्हणजे संस्कृतीक परंपरेचा केलेला आदर...." 


- सौ. प्राजक्ता पाटील


मेहंदी जेवढी रंगेल तेवढा तुमचा नवरा तुमच्यावर प्रेम करेल." 


"पण माझी मेहंदी म्हणजे सगळ्यांसाठी हसू ठरते. " माझी मामेबहीण म्हणाली.


"तुझी मेहंदी म्हणजे हसू कसे असेल सगळ्यांसाठी?" आजी पुन्हा म्हणाली.


"अगं आजी, आईला विचार ना. मी लहानपणापासून जेंव्हा केंव्हा मेहंदी काढते तेंव्हा मेहंदी कमी आणि माझा चेहराच जास्त रंगतो." माझी मामेबहीण म्हणाली.


"यावेळेस असं काही होणार नाही. मी आहे ना.तू नको काळजी करूस." आजी दिव्याला धीर देत म्हणाली.


माझ्या मामाचे गाव अगदीच खेडेगाव होते. तिथे काहीच मिळायचे नाही म्हणून मग कोणत्याही सणाला आम्ही गेलो की मग आजीसोबत खरेदीला शहरात जायचो. दिव्या लहान असल्याने अजूनतरी ती आमच्यासोबत खरेदीला यापुर्वी कधी आलेली नव्हती. यावेळेस दिव्याची मेहंदी हसू कशी ठरते ते पाहायचे होते. बसने आम्हा मुलींना घेऊन आजी शहरात आली तिने मेहंदीचे पॉकेट (तेव्हा मेहंदीचे कोन उपलब्ध नव्हते) त्यामुळे पॉकेट घेतले. टिकली, बांगडी, लिपस्टिक आणि जे काही आवडले ते घेऊन आजी आमच्यासोबत गावी आली. खरेदी केलेल्या वस्तू घरी आल्यावर पाहताना खूप आनंद व्हायचा. तो पसारा बघून आजी म्हणायची, "ते सर्व ठेवा बरं आता. भाऊबीजेच्या दिवशी तुम्हालाच ते घालायचं."


"हो आजी.लगेच ठेवतो." म्हणून आम्ही सर्व वस्तू आपापल्या बॅगेत ठेवायचो.'पण उद्या आपण हे सगळं घालणार आहोत.' या मनातल्या विचारानेही फार आनंद व्हायचा.


आजीने सायंकाळी मेहंदी एका भांड्यात घेऊन भिजवायला ठेवली. रात्र झाली मेहंदी भिजली होती. मेहंदी रंगण्यासाठी त्यात कितीतरी साहित्य आजीने घातले होते. प्रत्येक जण आपापल्या आईसमोर जाऊन बसले होते. "आई माझ्या हातावर मेहंदी काढ." म्हणून हट्ट करू लागले. मामे बहीण मात्र घाबरुन उभी होती. कारण मामींकडे तिच्या मेहंदीच्या भरपूर आठवणी होत्या म्हणून तिला मेहंदी नको काढायला असे मामीला वाटले. पण आजी म्हणाली, "ये इकडे मी काढते तुझ्या हातावर मेहंदी."


मामीकडे पाहात दिव्या भीतभीतच हात पुढे करून आजीजवळ मेहंदी काढायला बसली.


सगळ्यांचा मेहंदी काढताना काही वेगळाच मुड होता. पण दिव्याला मात्र मेहंदी काढताना झोप येत होती. ती सतत डुकल्या घेत होती.आजी तिला उठवत होती. मेहंदी काढत होती.आजीचा हात अवघडला होता. दिव्याचा हात सतत ताठ ठेवून अखेर आजी दमली. मग आजीने ढोली ढोली मेहंदी दिव्याच्या हातावर उमटवली. ती ही काडीने. मेहंदीचा दरवळणारा सुगंध सण आला आहे आणि तो साजरा करताना मन प्रसन्न होत आहे हेच सांगतोय की काय असे वाटत होते. मेहंदी काढण्यापेक्षा मेहंदीचा वासच भारी वाटत होता.दिव्या मात्र झोपी गेली होती. 


घरातील मुले आजीकडे त्यांना मेहंदी काढ म्हणत होती पण 


"तुम्ही काय मुली आहात का मेहंदी काढायला?" म्हणून आजीने त्यांना गप्प केले.इच्छा असूनही मग मुलांना मेहंदी काढता आली नाही. त्यांची ही मेहंदी काढण्याची इच्छा केवळ त्यांच्या लग्नातच पूर्ण होताना दिसते. आम्ही मेहंदी काढून झाल्यावर थोडा वेळ पंख्यासमोर हात धरून बसलो. मेहंदी सुकल्यावर झोपायला गेलो. दिव्याची अर्धी झोप झाली होती.रात्र संपून सकाळ झाली. सगळे जण एकमेकांना आपली रंगलेली मेहंदी दाखवत होते. दिव्या झोपेतून उठून बाहेर आली. दिव्याकडे बघून सगळेजण मोठ्याने हसायला लागले. गोरापान असलेला दिव्याचा चेहरा मात्र वेगवेगळ्या नक्षीने सजलेला होता. हातावर मेहंदी नव्हतीच चेहरा मात्र लालबुंद झाला होता. आजीलाही हसू आले होते पण तिने दिव्याची समजूत काढली आणि आम्हांला मात्र रागे भरली. अजूनही कधी सणाला मेहंदी काढायची म्हटलं की दिव्याची आठवण हमखास होते आणि चेहऱ्यावर स्मित हास्याची लकेर उमटते.


Rate this content
Log in