प्राजक्ता रामराजे पाटील

Romance

2  

प्राजक्ता रामराजे पाटील

Romance

रंग प्रेमाचा - भाग 2

रंग प्रेमाचा - भाग 2

6 mins
31


"अगं झालं का श्वेता तुझं ? आवर पटपट." अंथरुणावर पडून असलेली आजी आपल्याला जेवण भरवत असलेल्या आपल्या नातीला श्वेताला म्हणाली.


"दोन घास राहिलेत, एवढे खाऊन घे बरं आजी तू. मी पटकन आवरुन कॉलेजला जायला निघते." श्वेता आजीला म्हणाली.


"आज तुझा सत्कार होणार आहे ना शाळेमध्ये. आईबाबांना पण नेमके लग्नसमारंभासाठी कालच गावी जावे लागले. मी ही अशी तोंडाने नुसती बोलू शकते पण शरीर आणि पाय हलवू शकत नाही. माझ्यामुळे सायलीची इच्छा असूनही तिला तुझा सत्कार सोहळा पाहायला येता येत नाहीये." आजी हताश होऊन म्हणाली.


"अगं आजी, सत्कार तर दरवर्षीच होतो माझा. रियाच लग्न यावर्षी आहे ना ते थोडीच दरवर्षी होणार आहे? महत्त्वाचं काय होतं लग्न अटेंड करणं. हो की नाही?" श्वेता आजीला खूश करण्यासाठी म्हणाली. पण मनातून ती ही आईबाबांना मीस करत होती.


"समजूतदार आहे गं माझी पोर." म्हणून आजीने नातीच्या गालावरून आपला थरथरणारा हात फिरवला.


तोच हात प्रेमाने हातात घेऊन श्वेता म्हणाली, "आजी, आता तू आराम कर. तुला काहीही लागलं तर सायली आहेच तुझ्या मदतीला. " आजीच्या दुपारच्या गोळ्या सायलीकडे देत श्वेता म्हणाली.


"तायडे, बाय. पण लवकर ये गं!" सायली म्हणाली.


"हो. हो." म्हणत श्वेता सायकलवर बसून शाळेकडे निघाली.


शाळेचं प्रशस्त ग्राऊंड विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने सजलं होतं. स्टेजही मान्यवरांची वाट बघत होतं. सगळीकडे प्रसन्न वातावरण होतं. ज्यांचा सत्कार करायचा होता, त्यांना स्टेजच्या उजव्या बाजूला बसण्याची सोय केली होती. 


श्वेताला पाहून तृतीय पारितोषिक मिळविणारी नमिता श्वेताजवळ आली आणि तिला म्हणाली, "मला तर ना, तू आज येतेस की नाही ? याचीच चिंता वाटत होती." 


"पण असं का वाटलं तुला ? की मी येणार नाही म्हणून." श्वेता आश्चर्याने म्हणाली.


"अगं नेहमी तूच पहिला क्रमांक मिळवतेस ना, राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत. पण यावेळी दुसरा क्रमांक आल्यामुळे नाराज झालीस की काय ? असे मला वाटले." नमिता म्हणाली.


"नाही हं, मी जरी तिसरा क्रमांक मिळवला असता तरी आलेच असते सत्कारसमारंभाला. माझं पारितोषिक घेण्याबरोबरच जिंकणाऱ्या प्रतिस्पर्ध्याचं कौतुक करायला. जिंकणाऱ्या प्रतिस्पर्ध्याचं, मोठ्या मनाने कौतुक करणारा खरा स्पर्धक असतो. असं माझे बाबा नेहमी म्हणतात." श्वेता म्हणाली.


"पण तो विराट याचवर्षी शाळेत आला काय आणि त्याने पहिला नंबर मिळवला काय किती उद्धट मुलगा आहे तो. त्याने निबंध स्पर्धेत असे काय लिहीले असेल ? की त्याचा प्रथम क्रमांक आलाय देव जाणे." नमिता पुन्हा म्हणाली.


"अगं, असं आपल्याला एखाद्या व्यक्तीविषयी पूर्ण माहिती नसेल तर त्याच्याबद्दल काहीही बोलणं चुकीचं असतं." श्वेता म्हणाली.


"खरंच धन्य आहेस तू . अगं सगळेजण तुझ्यासारखे चांगले नसतात. चल बसूया, आपण आपल्या नेमून दिलेल्या जागेवर." नमिता म्हणाली.


" विराट, अरे नको वाईट वाटून घेऊ. होईल सगळं ठीक." विराटचा मित्र जो कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी विराटसोबत बसला होता. तो डोळ्याला रूमाल लावून बसलेल्या विराटला म्हणाला. 


कोणाचेही दुःख पाहून हळवी होणारी श्वेता विराटजवळ गेली व त्याला म्हणाली, "काय झालेय विराट ? का रडतोस तू ? अरे मला वाटलं, खूप खुश असशील तू. पहिला नंबर पटकावला आहेस म्हणून. हे घे पाणी पी." पाण्याची बॉटल विराट समोर धरून श्वेता म्हणाली.


विराट पाणी पिऊन आपल्या ठरलेल्या प्लॅनप्रमाणे "आलोच." म्हणून तिथून निघून गेला.


(कागद हातात घेऊन) "अगं, हा कागद म्हणजे विराटचं आत्तापर्यंतच संपूर्ण आयुष्य आहे. जे तो जगलाय. तेच निबंध स्पर्धेत त्यानं कागदावर उतरवलं आणि नंबर मिळवला पण आयुष्याच्या स्पर्धेचं काय? तिथे तो दररोज हरतोय." 


आवर्जून विराटच्या निबंधाची झेरॉक्स कॉपी, श्वेताने वाचावी अशी ठेवून मित्रही निघून गेला. अजून कार्यक्रमाला वेळ असल्यामुळे श्वेताने हळूच तो कागद उघडला. आणि तिने निबंध वाचायला सुरुवात केली. श्वेताने निबंधाची पहिली ओळ वाचली, तिच्या डोळ्यात पाणीच आलं. 


निबंध स्पर्धेचा विषय- घटस्फोट: एक अभिशाप.


अनाथ म्हणावे तर आईवडील जिवंत आहेत माझे आणि सनाथ तरी कसं म्हणावं मला? खरंच, कसा बरं असेल मी इतका दुर्दैवी ? ज्या बाबांनी जन्म दिल्यावर मी त्यांचा नाहीच म्हणून माझ्या आईच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले आणि रोज- रोजच्या भांडणाला कंटाळून तिने रागाच्या भरात त्यांना डिव्होर्स दिला. पण दोघांनीही एक क्षणभरही माझा विचार नाही केला . आणि थोडयाच दिवसांत आईने नोकरीचे कारण पुढे करत मला कायमचे माझ्या आजी-आजोबांकडे भारतात आणून सोडले.


लहान असताना कोणी मायेने हात फिरवला तर काहीच वाटतं नव्हतं, पण जसजसा मोठा होत गेलो तसतसं लक्षात आलं की, ते हात मायेने नव्हते तर आई-वडील असून अनाथ असलेल्या माझी, त्यांना कीव येत होती. म्हणूनच फिरवले जायचे. पण परत कोणाची कीवही नकोशी वाटू लागली….कित्येक असे क्षण मी अनुभवले जिथे मला फक्त माझ्या आईच्या मांडीवर डोकं ठेवावं वाटलं, मायेने बाबांच्या कुशीत शिरावं वाटलं पण मी नाही ना करू शकलो! कारण ते सुख माझ्या नशिबात नव्हतं…" श्वेताचे एवढेच वाचून झाले होते. पण श्वेताच्या अश्रूंचा बांध फुटला होता. 


"प्रमुख पाहुण्यांच आगमन झालेले आहे आपण टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करावं अशी मी तुम्हा सर्वांना विनंती करतो. " या सरांच्या आवाजाने श्वेता खडबडून जागी झाली होती. आणि पेपर बाजूला ठेवून टाळ्या वाजवू लागली.


"काय वाचत होतीस मघासपासून ? मी माझ्या आईला वॉशरूमला घेऊन गेले होते. तेव्हा पाहिले मी, तू या पेपरमधील काहीतरी मन लावून वाचत होतीस ते. बघू तो पेपर इकडे." नमिता श्वेताला म्हणाली.


"नाही अगं, तो पेपर माझा नाही या विराटचा आहे." श्वेता म्हणाली.


विराटने तो पेपर घेतला. व तो किती दुःखी आहे असं नाटक करू लागला. श्वेताला अजूनच वाईट वाटत होतं. तिचा चेहरा हिरमुसला होता.


प्रमुख पाहुण्यांच्या सत्कार समारंभानंतर ज्याची सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते तो बक्षीस वितरणाचा कार्यक्रम सुरू झाला. सर्वप्रथम तृतीय क्रमांक मिळविल्याबद्दल नमिताचा, द्वितीय क्रमांक मिळविल्याबद्दल श्वेताचा आणि शेवटी प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या विराटचा सत्कार झाला. विराट रोख रक्कम, सन्मानपत्र आणि गळ्यातील पुष्पहार हातात घेऊन श्वेताजवळ आला. आणि आपसूकच "अभिनंदन विराट." श्वेता मनापासून विराटचे अभिनंदन करत म्हणाली.


प्रत्येक वेळी राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत, आपलाच प्रथम क्रमांकाचा शिक्कामोर्तब करणारी श्वेता आज मात्र द्वितीय क्रमांकावर होती. अर्थातच विराटने प्रथम क्रमांक पटकावला होता. पण आपण यावेळेस प्रथम क्रमांक मिळवू शकलो नाही, याची खंत न करता जो जिंकलाय त्याचं मोठ्या मनानं कौतुक करत श्वेता, आपल्या चांगल्या स्वभावाची आणि खिलाडू वृत्तीची जणू साक्ष देत होती. राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल विराटचे अभिनंदन करत होती. पण विराट मात्र हे सर्व श्वेताशी मैत्री व्हावी म्हणून मुद्दाम करत होता. विराटने लिहिलेल्या निबंधाचा जरी प्रथम क्रमांक आला असला तरी, ते निबंध लिहिण्याचे श्रेय वर्गातील दुसऱ्याच मुलाचे होते. त्या मुलाने विराटच्या बालपणापासूनचा काल्पनिक प्रवास ऐकून घेऊन निबंध लिहिला होता. विराटचं काल्पनिक बालपण त्या मुलाने स्वतःच्या भावनांना मूर्त रूप देत उतरवल्यामुळे तो निबंध अगदी वास्तविक आणि भावस्पर्शी झाला होता. आणि थेट पर्यवेक्षकांच्या हृदयाला जाऊन भिडला होता. म्हणूनच विराट पहिल्या क्रमांकावर होता.


"थँक्यू श्वेता. खरंच तुझं मन किती मोठंय! आणि अशा व्यक्ती मला खूप आवडतात. मोठ्या मनाच्या. पण तुला खरं सांगू तो निबंध म्हणजे माझी वास्तविक कथा आहे." खोटेच अश्रू ढाळत विराट म्हणाला.


"रडू नकोस अरे, पण तुला एक सांगू?" श्वेता म्हणाली.


"हं." होकारार्थी मान हलवत विराट म्हणाला.


"तू खूप छान व्यक्त होतोस आणि असाच लिहीत रहा. आणि खूप मोठा लेखक हो. पण आम्हांला विसरू नकोस हं." श्वेता हसून म्हणाली.


"नाही गं, कधीच नाही विसरणार." विराट म्हणाला.


"चल निघते मी. तुझ्या चेहऱ्यावर हास्य झळकावं एवढीच इच्छा होती." असं म्हणून श्वेता आपली सायकलवर बसणार तोच विराट म्हणाला, "श्वेता दोन मिनिट थांबशील का? मला तुझ्याशी थोडं बोलायचं होतं."


श्वेता आज विराटचा निबंध वाचून खूपच भावूक झाली होती. तिला विराटसारख्या मुलांविषयी सहानुभूती वाटत होती. आणि त्यामुळेच ती लगेच थांबली.


"मी उद्या शाळेच्या कॅन्टीनमध्ये एक छोटीशी पार्टी आयोजित केलीय. मला माझं म्हणावं, असं लहानपणापासून कुणीच नाही. आजोबा मागच्या वर्षीच मला आणि आजीला सोडून गेलेत. तेव्हापासून आजीही सारखी आजारी असते. स्वयंपाकातही मीच तिला मदत करतो. आणि माझी अशी इच्छा आहे या स्पर्धेमुळे आपली ओळख झालीच आहे , तर ती या पार्टीच्या निमित्ताने मैत्रीत रूपांतरीत करूया का?" विराट म्हणाला.


क्षणाचाही विलंब न करता श्वेता म्हणाली, "अरे, काळजी नको करू. नक्की येईन मी. हो पण माझी एक अट आहे."


"कसली अट?" विराट म्हणाला.


"मला ती तुझ्या निबंधाची एक प्रत हवीय. देशील मला वाचायला?" श्वेता म्हणाली.


अट काय असेल ? या विचाराने विराटला घाम फुटला होता. पण ही अट ऐकून विराटच्या जीवात जीव आला आणि खुश होऊन त्याने "ही घे." म्हणून निबंधाची झेरॉक्स प्रत श्वेताच्या हातात दिली.


"फ्रेंड्स." म्हणून विराटने हात पुढे केला.


"हो फ्रेंड्स." म्हणून श्वेतानेही विराटच्या हातात हात दिला.


(क्रमशः)


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance