Prajakta Patil

Children Stories

3.5  

Prajakta Patil

Children Stories

श्रींची इच्छा

श्रींची इच्छा

5 mins
64


जामदार परिवार म्हणजे छोटेसे कापडाचे व्यापारी. त्यांचे दारातच कपड्याचे छोटसे दुकान होते. परंपरागत चालत आलेला कपडे विक्रीचा व्यवसाय सांभाळण्यातच या घरातील पुरूष धन्यता मानत होते. श्रीकांतराव हे त्यांच्या आईचे एकुलते एक अपत्य होते. घरातील गजाननावर श्रीकांतरावाच्या आईची अपार श्रद्धा होती. आणि म्हणूनच की काय ? त्यांना गणेश जयंती दिवशी मुलगा झाला. मुलाचं थाटात बारसं झालं. श्रीकांतरावाच्या आई अगदी कडकडीत संकष्टी करायच्या. देवाकडे श्रीकांतरावाच्या सुखासाठीच प्रार्थना करायच्या. 


श्रीकांतरावाना कधीकधी आईचा फार राग यायचा. देवपूजा करताना आई अजिबात बोलू देत नसे आणि नेमके त्याचवेळेस श्रीकांतरावाना काहीतरी सांगायचे असायचे. एके दिवशी चिडून श्रीकांतराव आपल्या आईला म्हणाले, "आई देव खात नसताना त्याच्यासाठी खमंग आणि गरमागरम मोदक बनवतेस आणि मी मात्र इथे मला दे म्हणून मागे लागतोय तर मला मात्र नैवेद्य दाखवल्यावर दुसऱ्या दिवशी शिळे मोदक देतेस."


"हो नारायणी, श्रीकांत बरोबर बोलतोय. अगं लहान मुलांमध्येच देव असतो. दे बरे त्याला एक मोदक." महादेवराव म्हणाले.


महादेवरावाच्या आग्रहाखातर श्रीकांतरावाच्या आईने त्यांच्या हातावर एक मोदक ठेवला खरा. पण महादेवराव बाहेर गेल्यावर श्रीकांतरावाना चांगली अद्दल घडवली. आणि परत कधीही श्रीकांतरावानी देवाच्या नैवेद्याला हातही लावला नाही. पण आईचे मुर्तीत देव शोधणे श्रीकांतरावाना नास्तिक बनवत गेले. पुढे त्यांना देवापेक्षाही माणसात देव शोधण्याची सवय लागली. लग्नानंतरही श्रीकांतरावानी पूर्ण वेळ दुकानांमध्ये थांबून कापड विक्री चालूच ठेवली. शिक्षणामध्ये रूची असूनही मास्तरने माझ्या मुलाला स्पर्श करण्याची हिंमत कशी केली ? म्हणून मास्तरांशी भांड भांडूण आईने श्रीकांतरावाची शाळा कायमची बंद केली. 


लहान असताना शाळेचे गांभीर्य लक्षात आले नाही, पण मोठे झाल्यावर शिक्षण नसल्यामुळे आलेले मागासलेपण आणि आर्थिक चडचण नेहमी श्रीकांतरावाना आईच्या चुकीच्या निर्णयाची जाणीव करून द्यायची. पण त्यांनी आईला दोष न देता नशीबाचे भोग म्हणत मुलांना दर्जेदार शिक्षण देण्याचा चंग मनाशी बांधला.


मध्यमवर्गीय परिस्थिती असलेलं हे जामदार कुटुंब एका छोट्याशा घरात गुण्यागोविंदाने राहत होतं. पुढे वृद्धापकाळाने श्रीकांतरावाचे आईवडील देवाघरी गेले. आणि थोडयाच दिवसांत घरात दोन चिमुकले जीव जन्माला आले. गौरी आणि गणेश अशी श्रीकांतरावानी त्यांची नावे ठेवली. दोघे बहिण-भाऊ अगदी मिळून मिसळून राहायचे. अवघ्या दोन वर्षांचं अंतर दोन्ही भावंडांमध्ये होतं. आपण चौथी नापास असलो तरी, मुलांना उच्चशिक्षित करायचं म्हणून श्रीकांतराव कापड विक्री करत असतानाच दोन्ही मुलांना आपल्यासमोर अभ्यासाला घेऊन बसायचे. मुलंही मन लावून अभ्यास करायची. जिल्हा परिषदेच्या शाळेत असणारी ही दोन्ही मुलं वर्गात पहिल्या नंबरवर असायची. त्यामुळे श्रीकांतराव मुलांच्या प्रगतीवर जाम खुश असायचे. दोन्ही मुलं सुसंस्कारी होती. दोघांनाही एकमेकांबद्दल फार प्रेम होते. लहान पासूनच 'भांडण' हा शब्द त्या दोघांच्या डिक्शनरीमध्ये नव्हताच, त्यामुळे आईचा ओरडा त्यांना कधीही पडला नव्हता . बाबाही दोन्ही मुलांवर फार खूष असायचे. कारण प्रत्येक काम वेळेवर आणि टापटीप करणं हे दोन्ही मुलांना फार आवडायचं. आता दोन्ही बहिण-भाऊ मोठे झाले होते. कोरोनामुळे बाहेर जाता येत नव्हते . तेव्हा दोघेच बहिण-भाऊ आणि दोघेच मित्र हा असा त्यांचा दहावी-बारावीच्या सुट्ट्यामधला दिनक्रम सुरू होता. गौरी ही नुकतीच दहावी पास झाली होती. तर गणेश हा बारावी पास झाला होता. नव्वद ते पंच्याण्णवच्या दरम्यान त्या दोघांना मार्क होते त्यामुळे घरचे सगळेजण खूप खूश होते. पण ज्यावेळी ऍडमिशन घ्यायचं ठरलं आणि कॉलेजमध्ये चौकशी केल्यावर फीसची माहिती मिळाली. मग नेमकं त्यावेळी आता काय करायचं ? कुठून आणायचे इतके पैसे?" या विचाराने श्रीकांतराव आणि त्यांच्या पत्नीची झोप उडाली. 


'गणेशने लहानपणापासूनच पाहिलेलं डॉक्टर व्हायचं स्वप्न त्याच्या बाबाकडे फीस भरायला पैसे नाहीत म्हणून विसरावं लागेल. हे कोणत्या तोंडाने सांगावे?' हा विचार श्रीकांतरावाना सतत पडत होता. पण मुलांना आणि पत्नीला मात्र याची किंचितही जाणीव नव्हती. घरातल्या सगळ्यांसमोर हिंमत न हारता श्रीकांतराव गणेशला म्हणायचे, "अरे माझा मित्र देणार आहे पैसे. तू फॉर्म तर भर." 


बाबांनी सांगितल्यावर गणेशनेही फॉर्म भरला आणि पहिल्याच फेरीत त्याला प्रवेश मिळाला. चार दिवसांत पैशाची जुळवाजुळव करण्यासाठी म्हणून श्रीकांतराव मित्राकडे जायला निघाले.


आईही दिवसरात्र देवाचा धावा करायची तिला तेवढेच शक्य होते.


गणेश आईला म्हणाला, "आई, किती करते तू गणपती बाप्पासाठी! उठल्यापासून रात्री दिवा तेवत ठेवेपर्यंत. पण आपल्याला गणपती बाप्पा कधी पावणार ग ? सगळं व्यवस्थित कधी होणार गं ? मला फीस भरण्यासाठी पैसे नसल्यामुळे बाबांना मित्राकडून उसणे पैसे घ्यावे लागतायेत. कधीच कुणापुढे हात न पसरणारे माझे बाबा आज माझ्यामुळे…." गणेशला रडू कोसळले.


आई म्हणाली, "देव परीक्षा घेतो, पण निराश कधीच करत नाही बरं. आणि आता तर गणेशोत्सव आहे, तो गणपती बाप्पा नक्कीच आपल्याला मदत करेल. बाबाही पूर्ण प्रयत्न करतायेत तुझी फीस भरण्याचा. होईल सगळे व्यवस्थित. तू नको काळजी करू."


बाबा जर दुकानात नसतील, तर त्या दिवशी मात्र गणेश आणि गौरी दोघे दुकानात बसून कपड्यांची विक्री करायचे. तेवढाच बाबांनाही फायदा व्हायचा. दुकान बंद न राहता मुलं दुकान छान सांभाळायची. पण बाबा नसले तरी बाबांच्या सूचना मात्र अगदी मोठ्या रजिस्टरच पान भरून असायच्या. आलेल्या गिऱ्हाईकामध्ये सोशल डिस्टंसिंग ठेवा, दुकानात बसल्यावर गिऱ्हाईक आले असेल तर मास्क काढू नका . गिर्‍हाईकाला कपडे विक्री केल्यावर तुमचे हात सॅनिटाईझ करा . कारण जरी बाबा जवळ नसले तरी , त्यांचा जीव मात्र त्यांच्या दोन्ही मुलांमध्ये गुंतलेला असायचा .


मुलेही बाबांचा आदर करत होती , त्यामुळे सांगितलेल्या सूचनांचे ती व्यवस्थित पालन करत असत . बाबा गेले आणि आज चार दिवस झाले. ते आज परत येणार आणि येताना पैसे घेऊन येणार आणि गणेश ऍडमिशन फिक्स होणार म्हणून घरातले सर्वजण आनंदी होते. त्यादिवशी एक गृहस्थ कपडे खरेदीला त्यांच्या दुकानात आले. कपडे वगैरे खरेदी करून ते गृहस्थ गेले. पण तिथे गेल्यानंतर ते ज्या जागेवर बसलेले तिथे त्यांची बॅग विसरून गेले . सायंकाळची वेळ होती . मुलांनी ती बॅग पाहिली तर बॅगमध्ये भरपूर पैसे दिसले . क्षणाचाही विलंब न करता , गणेश बॅग घेऊन त्या काकांना देऊन येतो, म्हणून गेला. 


"तू पटकन जा. त्यांच्या घरचे सगळेजण काळजीत असतील." आई म्हणाली.


"हो आई, मी आलोच." म्हणून गणेश गेला.


ते काका गणेशने त्यांच्या बाजूच्या गल्लीमध्ये पाहिलेले होते. त्यामुळे त्यांचे घर गणेशला चांगलेच ठाऊक होते . गणेश बॅग घेऊन काकांच्या घरी पोहोचला. काकांकडे गणपतीची आरती चालू होती. काकांच्या मुलीचे नुकतेच लग्न ठरले होते आणि काकांच्या मुलीचा दोन दिवसांनी हुंडा द्यायचा होता, म्हणूनच त्यांनी ती रक्कम बँकेतून काढून आणली होती. पण उद्या मुलीच्या नणंद येणार आहेत म्हणून अचानक त्यांचा फोन आला. आणि काकूंनी काकांना घाईघाईने फोन केला. आणि त्यावेळी काका नेमके गणेशच्या दुकानाच्या जवळ होते. बॅग घेऊन काका गाडीवरून उतरले. घाईघाईत खरेदी करून तसेच निघून गेले. गणेशनी काकांना बोलवून पैशाची बॅग दिली. काकांना गणेशच्या प्रामाणिकपणाबद्दल फारच कौतुक वाटले. 


" एवढी मोठी रक्कम हरवली असती तर कसं करणार होतो मी माझ्या मुलीचं लग्न ?" काका काकूंचे डोळे पाणावले होते.


घरात बोलवून त्यांनी गणेशला नाष्टा खायला दिला . बोलता-बोलता काकांच्या लक्षात आलं की, गणेशची परिस्थितीही बेताची आहे.


योगायोगाने काका एका मेडिकल कॉलेजमध्ये प्राध्यापक होते. दुसऱ्या दिवशी गणेशच्या वडिलांची त्यांनी भेट घेतली आणि गणेश ची पूर्ण फीस आपण स्वतः भरणार असल्याचे सांगून गणेशला आश्चर्याचा धक्का दिला. वडिलांनी जेव्हा मदत घेण्यास नकार दर्शवला तेव्हा काका मोठ्या अभिमानाने म्हणाले." आता हेच बघा ना, गणेशोत्सवात माझी बॅग हरवणं, ती गणेशने घरी आणून देणं आणि मी त्याची फीस भरणं. ही तर ह्या श्रींची इच्छा आहे. असं मला वाटतं. देवाच्या इच्छेपेक्षा आपली इच्छा मोठी असते का? नाही ना!" गणेशच्या घरातील गणपतीला वंदन करत काका म्हणाले.


"आणि गणेश आत्ता मी तुला जी मदत करणार आहे त्याची परतफेड म्हणून तुला मेडिकलला चांगले मार्क्‍स घेऊन एक उत्तम डॉक्टर बनून माझ्या मदतीची परतफेड करायची आहे बर का!" काका पुढे म्हणाले.


गणेश ने होकारार्थी मान हलवली. 


आज अगदी मनोभावे गणेशच्या बाबांनी "गणपती बाप्पा मोरया!" म्हणत बाप्पापुढे मनोभावे हात जोडले.


Rate this content
Log in