Prajakta Patil

Children Stories Comedy

3.5  

Prajakta Patil

Children Stories Comedy

आठवणींची पेटी

आठवणींची पेटी

5 mins
57


रिया आणि राघव गोड भावंड. वडिलांना नोकरी असल्यामुळे त्यांची सतत बदली व्हायची. त्यामुळे रिया आणि राघव ज्या गावात जायचे तिथे त्यांना नवीन मित्रमैत्रिणी भेटायचे. बोलक्या मुलांना लगेचच मित्रमैत्रिणी होतात. असेच एक गाव होते, जिथे त्यांच्या वडिलांची ट्रान्सफर झाली. तेच गाव त्यांना अजूनही आपलेच गाव वाटते. गावात अतिशय सुस्वभावी माणसं, सर्व जाती-धर्माचे लोक गावात असूनही कधी भांडणाचा सूरही ऐकायला येत नव्हता. पण काही क्षुल्लक गोष्टीचे अप्रूप असणारेही काही लोक गावात भेटतातच ना. तसेच एक कुटुंब रियाच्या बाबांनी जिथे भाड्याचे घर घेतले होते तिथे राहायचे. अगदी श्रीमंत होते ते कुटुंब. काका गावातील एका खाजगी संस्थेत प्राध्यापक म्हणून नोकरी करत होते त्यामुळे बदलीचा प्रश्नच नव्हता शिवाय पगारही भरपूर होता म्हणूनच काकांचे घर भौतिक सोयीसुविधांनी सुसज्ज होते. त्यातच भर पडली ती म्हणजे काकूंकडे नवीन टी.व्ही येण्याची. अगदी अख्ख्या गल्लीत फक्त त्यांच्याकडेच टीव्ही येणार होता म्हणून सर्व मुलेमुली टीव्हीच्या वाटेकडे डोळे लावून बसले होते.


त्यांच्या अंगणात भलतीच गर्दी जमली होती जसा काही एखादा सोहळाच विवाह मंडपात थाटला होता. काकूंचा चेहरा रागाने लाल झाला होता कारण त्यांना जराही कल्पना न देता त्यांच्या लहान मुलाने आपल्या घरी आज टीव्ही येणार आहे हे आख्ख्या गल्लीतील मुलामुलींना सांगितले होते.


"आई कधी येणार आहे गं टीव्ही?" काकूंचा मुलगा म्हणाला.


"का ?अजून कोणी राहिले का सांगायला जायचे ? आमच्याकडे टीव्ही घेतलाय ते." काकूंचा तो आवाज ऐकून मुलगा पुन्हा एक शब्दही आईशी बोलायला गेला नाही.


प्रत्येक वाहन रस्त्यावरून चालले की उठून उभे राहून पाहणारी मुले अक्षरशः देवाकडे प्रार्थना करत होते "येऊ दे बाबा यांचा टीव्ही लवकर नाहीतर परत तीन वाजता गेलेली लाईट रात्री आठ वाजताच येईल." 


"मग कुठला आज पाहता येतोय टीव्ही?" जमलेल्या मुलांपैकी एकजण म्हणाला.


"अरे जरा शुभ बोल की, तुझे आपले नेहमीचेच उचलली जीभ की लावली टाळेला असे असतेय." चिडून एकजण म्हणाला. हे वयाने मोठ्या असलेल्या मुलांचे संभाषण सुरू होते. रिया मोठी असल्याने राघव तिच्याकडे आला आणि म्हणाला, "दिदी आपण देवाकडे प्रार्थना करूया की यांचा टीव्ही लवकर येऊ दे म्हणून." 


"का?" रिया म्हणाली.


राघवने मोठ्या मुलांची चर्चा रियाला सांगितली ते ऐकून छोटा बालचमू जरा चेहरे पाडून बसला होता. तेवढ्यात एक छोटी गाडी काकूंच्या घरासमोर थांबली आणि त्यातून दोन माणसे मोठाला बॉक्स काढताना दिसली. तशी सगळ्यांची कळी खुलली. हाच नवीन टीव्ही असणार म्हणून टीव्ही पाहण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली. 


बॉक्स घरात गेला तसा सगळेच घरात जायला निघाले तेवढ्यात काकू रागाने म्हणाल्या," सगळे एकदम आत कुठे निघालात? थांबा जरा. टीव्ही जोडल्यावर मी तुम्हाला सांगते. तोपर्यंत इथे अंगणातच बसा." 


पुन्हा सगळे नाराज होऊन अंगणात जाऊन बसले पण एकजणाचाही इगो हर्ट झाला नाही आणि कोणीही घरी गेले नाही. अगदी तासाभरात टीव्ही जोडला. पूजा वगैरे केली. बाहेरची मुलं मात्र अद्याप बाहेरच होती. काकांनी थोड्या वेळानंतर मुलांना टीव्ही बघायला आत बोलावले. मुले काकूंकडे पाहत भीतभीतच आत गेली. थोड्या वेळानंतर काकूंनी टीव्ही बंद करायला सांगितला. गरम झाल्यावर टीव्हीचा स्पोट होईल असं फसवं कारण सांगितलं आणि सर्वांना घरी पाठवलं.


राघव आणि रियासोबत इतरांनाही अजून थोडावेळ टीव्ही पहायची इच्छा होती पण मुले नाईलाजाने घरी आली. 


"बाबा आपल्याही घरी घ्या ना हो नवा टीव्ही." राघव म्हणाला.


"अरे मी नोकरी करतो मग माझी सतत बदली होते.कधी या गावी तर कधी त्या गावी म्हणजे "विंचवाचे बिऱ्हाड पाठीवरी.." अशी काहीशी स्थिती असते नोकरी असणाऱ्यांची. म्हणून नको वाटतात रे नवीन वस्तू खरेदी करायला." बाबांनी आपल्या मुलांना प्रेमाने समजावले.


मुलेही 


"बरं बाबा, तुम्ही म्हणाल तसे." असे म्हणून मुले गप्प बसली. 


आजकालच्या मुलांसारखा "नाही. आम्हाला टीव्ही पाहिजे म्हणजे पाहिजे." असा हट्ट बाबांकडे मुलांनी मुळीच केला नाही. शिस्तबद्ध वातावरणातील ही दोन्ही मुले वडिलांचा आदर करायची. ते दोघे बहीणभाऊ अगदी मिळून मिसळून खेळायचे.भांडण तर खूप लांबची गोष्ट होती. आपल्याला भाऊ झाला ही गोष्ट रियासाठी खूप स्पेशल होती आणि कायम राहणार होती.


एकदम शहाणा होता तिचा लहान भाऊ. कधी कोणाशी भांडण नाही की उलट उत्तर नाही. ती ही मोठी बहीण ही जबाबदारी अगदी मनापासून पार पाडत होती. तिने आपल्या लाडक्या भावाला कधीच कडेवरून खाली ठेवले नव्हते.कारण त्याच्या जन्मावेळी रियाच्या आईला खूप त्रास झालेला तिला तो नेहमी आठवायचा.म्हणूनच ती राघवला जीवापाड जपत होती. काकूंकडे टीव्ही पाहायला आई रोज नाही पाठवायची. रविवारी हा सुट्टीचा दिवस असल्याने रिया आणि राघवला टीव्ही पाहायला जाण्याची परवानगी द्यायची.


पण आपल्यामुळे दुसऱ्यांना त्रास होणार नाही असंच रिया व राघवच्या आईचही वर्तन असायचं. ती मुलांना काकूंच्या घरी दंगा करायचा नाही. त्या सांगतील तसं ऐकायचं अशा सूचना द्यायची.मुलेही त्या सूचनांचे तंतोतंत पालन करायची.


एके रविवारी सुट्टीच्या दिवशी लहान मुलांच्या अतिशय फेवरेट असलेल्या 'शक्तिमान..' 'शाकालका बुम बुम..' या मालिका पाहायला मुले काकूंकडे गेली. मुलांनी "काकू -काकू" म्हणून दरवाजा वाजवला. इच्छा नसतानाही काकूंना दरवाजा उघडावा लागला. काकूंच्या कपाळावरील आठ्या स्पष्ट सांगत होत्या की काकूंना रिया आणि राघव टीव्ही पाहायला गेलेले बिलकूल आवडलेले नाही.


मुले आत जाणार तितक्यात काकूंनी मुलांना पाय धुवायला सांगितले.मग पाय स्वच्छ पुसायला सांगितले.


स्वच्छतेची सवय ही चांगली असते पण मुले घरून पाय धुऊन गेलेली होती आणि त्यांनी हे काकूंना सांगितले होते तरी त्यांनी परत पाय धुवायला सांगितले. मुले अगदी शेजारीच राहायला असल्याने थोड्याशा अंतरावर किती पाय घाण होणार ? 


पण काकू ऐकतील तर खर न ! मुलांना राग वगैरे यायचा नाही उलट पटापट काकूंनी सांगितलेल्या सुचना ऐकून कधी एकदा टी.व्ही.पाहतोय अस व्हायच त्यांना .म्हणूनच कदाचित प्रत्येकाच बालपण आनंद देत असेल.'काही मनावर नाही घ्यायचं, बी कुल..!' हे तेव्हा इतरांनी सांगण्यापेक्षा स्वतःलाच कळायचं !


पण एके दिवशी काकूंनी जरा कहरच केला. लाईट गेली म्हणून मध्येच टिव्ही बंद केला. घरी परत गेलो तर आई परत येऊ देणार नाही म्हणून मुलांनी शेजारच्या दुसऱ्या काकूंना विचारलं, " लाईट आहे का ?"


त्या म्हणाल्या, " हो आहे लाईट." मुद्दाम काकूंनी टी.व्ही.बंद केला तरीही मुले परत गेली टीव्ही पाहायला. मग शेजारची राणी नावाची मुलगी ती मोठी होती. तिनं रिया व राघवच्या आईला जाऊन सांगितलं की, "त्या काकू सारखा टीव्ही बंद करत आहेत, तरी तुमची मुलं टीव्ही पाहायला जातात. त्या काकू मुलांना टीव्ही पाहताना एक शब्दही बोलू देत नाहीत बोलला तर घरी पाठवतात.ऍण्टीनॅवर कावळा बसला का बघ म्हणून तुमच्याच मुलांना सतत उन्हात वर पाठवतात. तरीही मुलं टीव्ही पाहण्यासाठी काकूंचं सगळं ऐकतात. "


आईने मुलांना बोलावून घेतले आणि खरे काय ते विचारले. "हो आई खर आहे हे." हे मुलांनी सांगितले. 


काय आश्चर्य ! आई मुलांना रागवलीच नाही, उलट तिच्याच डोळ्यात पाणी आले. रात्री बाबा घरी आल्यावर आईने मात्र त्यांच्याकडे घरी टी. व्ही. आणायचा हट्टच धरला. आई असे काही सांगत होती की, काही नको बाबा, आम्हाला टीव्ही तेवढा हवा. बाबांनाही सगळं ऐकल्यावर टीव्ही आणावाच लागला.काकूंकडे "ब्लॅक अँड व्हाईट" असला तरी रिया आणि राघवच्या बाबांनी मात्र रंगीत टीव्ही आणला. सर्वांना बोलावून पूजा केली. शेजारच्या काकूही आल्या. राघव त्यांना म्हणाला, "काकू पाय नाही धुतले तरी चालतील.या माझ्या आईला चालतं पाय नाही धुतले तरी." ते निरागस बोल केवळ काकूंना त्रास होऊ नये म्हणून होते. काकू मात्र मुद्दाम तश्या वागत असल्यामुळे थोड्याशा चपापल्या.टीव्ही म्हणजे अप्रूप गोष्ट होती त्याकाळी कारण घरी बसलेल्या स्त्रियांचं, लहान मुलांचं छान मनोरंजन टीव्हीमुळे व्हायचं. टीव्ही चे गमतीदार किस्से अँटेनावरचा कावळा उडवणे किंवा एखाद्या आजीला रामायणातील रामाच्या पाया पडताना पाहणे असे प्रसंग आजही डोळ्यासमोर तरळतात आणि आपोआप चेहऱ्यावर हास्य खुलवतात.


Rate this content
Log in