Venu Kurjekar

Inspirational Others

3  

Venu Kurjekar

Inspirational Others

चतुर मुस्तफा

चतुर मुस्तफा

2 mins
212


रंग रगींलो राजस्थान च्या आमच्या प्रवासातील जैसलमेर हे शेवटचे ठिकाण होते. शहरातील प्रेक्षणीय स्थळे पाहून वाळवंटातील सफर करण्यास निघालो.उंटावरून वाळवंटात

फिरून सनसेट पॉईंट पाहून तीथेच जवळच्या च हाँटेलवर जाणार होतो. आमच्या ड्रायव्हरने उंटाचे व हाँटेल चे बुकिंग करून दिले व तो पुढे निघून गेला. मोठाल्या मन्यांच्या माळांनी, घंट्यांनी,गोंड्यानी उंटाना छान सजवले होते. उंटावर बसन्यासाठी जरा आम्हाला कसरतच करावी लागली. आपापल्या उंटावर सर्व स्वार झालो अन सफर सुरू झाली.

आम्हा दोघां सोबत एक मोठा माणूस व एक आठ नऊ वर्षांचा मुलगा होता.मुलाचे नाव होते मुस्तफा. थोड्याच वेळात आम्हा दोघांना मुस्तफा च्या ताब्यात देऊन तो मोठा माणूस निघून गेला. हा छोटासा मुलगा दोन उंट कसे सांभाळणार व आम्हाला कसे पोहोचवणार याची काळजी वाटली; पण गोरटेला,मोठाल्या डोळ्यांचा मुस्तफा फारच चुनचुनीत होता.

खीशात बोरं आणि हातात फुटाण्याची पुडी घेऊन एक एक फुटाना खात तर मधेच बोरं खात कधी माझ्या उंटापुढे तर कधी ह्यांच्या उंटापुढे चालत होता. आमच्या सोबत गप्पा मारत होता.

"येथे खूप पर्यटक येतात.फीरंगी लोक खूप येतात.ते खूप बक्षीसी देतात वैगेरे वैगेरे."

त्याने उंटाना मायकल व सलमान अशी नावे ठेवली होती. आम्हाला गंमत वाटावी म्हणून तो मधेच उंट जोरात पळवत होता.

" तू शाळेत जात नाहीस का? " त्याला विचारले असता तो म्हणाला.

" आमच्या वस्तीत एकही शाळा नाही.

आम्ही सर्व भावंडे, काका , मामा आमचे वडील हेच काम करतो. दूर शेजारच्या गावात शाळा आहे, पण शाळा असते तेव्हा कामाचा सीझन असतो. सीझन नसतो तेव्हा शाळेला सुट्टी लागली असते." त्याच्या सारखी ,त्याच्या पेक्षा थोडी मोठी मुलं सवारी नेतांना दिसत होती. काही लोकांना पाँइंट पर्यंत सोडून परतत होती.ऊन्हातान्हात कष्टत होती. उन्हात करपणारी 'ती कोवळी हिरवळ' पाहून वाईट वाटले. सभोवताल लांबवर पसरलेली सोनेरी वाळू, रांगेत चालणारे उंट, काही उंटगाड्या,  छोट्या छोट्या वाळूच्या टेकड्या, वाळवंटात ही एका बाजूला दूर दूर असलेली दाट हिरवी झाडी असे मनोहारी दृश्य डोळ्यात साठवत सफर सुरू होती. अन् मुस्तफा ने उंट थांबवले. येथे च उतरा ; पुढे उंट जाणार नाही " 

म्हणाला. सनसेट पॉइंट अजून दूर होते.उन्हात चालणे शक्य नव्हते.

" पाचशे रुपये द्या, मगच तुम्हाला पुढे घेऊन जाईन. हवं तर माझी बक्षीसी समजा"

असं म्हणत मुस्तफा अडून बसला. आम्ही शेवटी त्याला बक्षीसी देणार होतोच. पोचल्यावर देऊ म्हणालो . तर म्हणतो कसा

"लोक फक्त शंभर, दोनशे रुपये च देतात. सेठ ( उंटमालक ) फारच कमी पैसे देतो. उंटाला खानं ही द्यावं लागतं.रोज उन्हात चालावं लागतं." जास्त बक्षीसी मिळवण्यासाठी त्याने

मधेच थांबण्याची नामी युक्ती केली होती. आमची गरज व त्याचे वय पाहता दुसरा पर्याय नव्हता.त्याला पाचशे रुपये दिले. तो खूश झाला.हसत हसत त्याने त्या सनसेट पॉइंट पर्यंत पोचवले. पुन्हा म्हणाला " पुढे झाडी दिसते ना तीथे सलमान खान शिकारीला आला होता.तीकडे अजून मोठे वाळवंट आहे.तिकडे येणार का हजार रुपये लागतील.वेळ ही लागेल"

वेळे अभावी आम्ही नाही म्हणालो व त्याला निरोप दिला. चतूर मुस्तफा उंटावर बसून सोबत दुसरा उंट घेऊन निघून गेला.त्याच्या पाठमोऱ्या आकृती कडे आम्ही पाहत राहिलो.

त्याची चतुर बालमुर्ती अजून ही मनात ठसली आहे.



Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational