Shubhangi Belgaonkar

Children Stories Tragedy

4.0  

Shubhangi Belgaonkar

Children Stories Tragedy

आव्हान

आव्हान

2 mins
274


निखळ आनंद म्हणजे काय हे मुलांना सहलीला घेवून गेले की तिला प्रत्येक वेळी जाणवायचे. अगदी बस मध्ये बसताना मुले मुली मोजण्या पासून तर प्रत्येक वेळी मुलांना बस मधून खाली उतरवून परत बस मध्ये बसवताना आणि परत संख्या मोजताना शिक्षकांची होणारी दमछाक हा अनुभव तर खरंच अविस्मरणीय असायचा.

आज मात्र मुलांना सहलीला घेवून जावे की ना जावे या वरच सर्व स्टाफचे एक मत होत नव्हते आणि त्याला कारणही तसेच होते.

शैक्षणिक सहलीसाठी मुलांना गड किल्ले दाखवायचे म्हणून प्रत्यक्ष त्या किल्ल्यावर मुलांना नेले गेले. जाताना बस मधेच इतिहास शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सर्व माहिती दिली. काय बघायचे, किती अंतरावरून बघायचे, त्याठिकाणचे वैशिष्ठ काय, कोणते राजे तिथे वास्तव्यास होते, किती कालावधीसाठी अशी सर्व माहिती मुलांना देण्यात आली. त्याच बरोबर ऐतिहासिक वास्तूत जावून काय करावे, काय करू नये याची सुद्धा पुरेशी माहिती मुलांना देण्यात आली.

सहल छान सुरु होती. मुले सर्व माहिती घेत होती. काही मुले लिहून घेत होती तर काही मोबाईलमधे टिपून घेत होती. या बरोबरच प्रश्न उत्तरे सुरु होती. जिज्ञासू मुले त्या वेळेचा इतिहास आणि तो काळ यांचा मागोवा घेत होती, तर काही मुले टंगळ- मंगळ करत इकडून वाकून बघ, तिकडे उडी मार, कोणाच्या तरी पाण्याच्या बाटलीतील पाणी ओतून दे, कोणाची टोपी हवेत उडव, कोणाच्या पाठीवरच्या दप्तरात शेपटी लाव आणि हसत बस असे एक ना अनेक वेगवेगळे प्रकार सुरु होते.

सर्वांनी एका मोकळ्या जागेत गोलाकार बसून डब्बे काढले आणि परत विद्यार्थी संख्या मोजायला सुरुवात झाली. आठ विद्यार्थ्यांचा हिशोब लागत नव्हता. सर्वांनी आपआपले मित्र-मैत्रिणी आहेत का बघितले तर पूर्ण एक ग्रुपच जागेवर नव्हता.

सर्व शिक्षक आता काळजीने मुलांना शोधु लागले. गडावरील जागा वर-खाली, मोठे दगड, माती यातून पटपट जाता येणे पण अवघड होते. काळजीचे संकटाचे मोठे सावट सर्वांच्या चेहेऱ्यावर स्पष्ट दिसत होते.

तेवढ्यात दोन रखवालदार आणि गर्दी गडावर येताना दिसले. दोघेही रागावले होते. शिक्षकांना दूषणे देत होते. उलटे-पालटे बोलत होते. सगळे खाली मान घालुन ऐकत होते. त्यातील काही विद्यार्थ्यांनी फटाके वाजवण्याचा प्रयत्न केला तर काही जणांनी शेकोटी पेटविण्याचा तर दोन मुलांनी सिगारेट ओढण्याचा प्रयत्न केला होता.

खूपदा मुलांना हे करा, हे करू नका असे आवाहन केले जाते. त्याचे नक्की काय परिणाम होतात हा एक मोठा अभ्यासाचा विषय आहे. मात्र या मोबाईल आणि माध्यमांचा मुलांवर दिवसागणिक होणारा परिणाम पहिला की जाणवते कुठे ती आधीची निरागस मुले हरवली की काय?

असे म्हणतात, शाळा आणि शाळेची सहल मुलांना आनंद देतात आणि घडवतात, मोठे करतात. मुलांच्या बरोबर शिक्षकही अधिक परिपक्व होतात, संवाद होतो. माझ्याच विचारात आणि भूतकाळात मी किती वेळ झाला विसरून गेले होते. कोणी तरी आले आणि म्हणले “मॅडम येताय ना मीटिंगसाठी?” माझी विचार श्रृंखला तुटली आणि मी म्हणाले आलेच.

आज पुन्हा एका नव्या आव्हानाला सामोरे जायचे होते. सहलीला विद्यार्थ्यांना न्यावे की नाही या बाबत निर्णय घ्यायचा होता. मुलांची निरागसता जपणे हे या काळातील फार मोठे आव्हान होते आणि ते पुर्ण करण्यासाठी शिक्षकांची सुद्धा मानसिकता लक्षात घेणे माझे प्रथम कर्तव्य होते.


Rate this content
Log in