Shubhangi Belgaonkar

Inspirational

4.6  

Shubhangi Belgaonkar

Inspirational

नतमस्तक

नतमस्तक

3 mins
223


   ही कहाणी आहे दक्षिण राजस्थानच्या डुंगेरपूर जिल्ह्यातील रास्तापाल येथे घडलेली. आपल्याला स्वातंत्र्य मिळण्याच्या आधी फक्त 2 महिने राहिले असताना घडलेली. इंग्रज अत्याचाराने सर्वत्र कहर केलेला होता. लोकांना काही समजू नये, त्यांना शिक्षण मिळू नये, त्यांनी कोणत्याही इंग्रजांविरुद्ध अडथळा निर्माण करू नये यासाठी इंग्रज सरकार मोठा जुलूम करत होते. सरकारी शाळा तर नव्हत्याच. प्रजामंडळचे काम करणारे स्वातंत्र्य सेनानी नानाभाई हे रास्तापाल येथे स्वतः शाळा चालवीत असतं आणि सेंगभाई त्या शाळेत बालकांना शिकवीत असत. त्या शाळेत आदिवासी बालक आणि बालिकाही शिक्षणासाठी येत असत.

याच शाळेत शिक्षण घेणाऱ्या “कालिबाई” ची ही कहाणी.

  कालिबाईचा जन्म रास्तापाल चा. तिच्या वडिलांचे नाव सोमाभाई तर आईचे नाव नवलीबाई. 13 वर्षीय परकर- पोलखे घालणारी आणि डोक्यावर घुंघट घेणारी ही बालिका मोठी चतुर चुणचुणीत आणि स्वातंत्र्याच्या वेडाने झपाटलेली. शाळेत शिक्षक जेंव्हा कोणत्याही जुलूम अत्याचाराबाबत कथा सांगायचे हीचे रक्त सळसळायाचे. मोठा जोश उरात निर्माण व्हायचा. काहीतरी विशेष करायची प्रत्येक कथांमधून प्रेरणा मिळायची.

  तिचे आई वडील शेतात काम करायचे. त्यात त्यांचा उदरनिर्वाह चालवत असत. कालिबाई पण शाळेचा वेळ सोडुन आई वडिलांना शेतात मदत करीत असे.

  लोकांना कोणतेही ज्ञान मिळू नये म्हणून इंग्रज सरकार लोकांनी चालविलेल्या शाळा बंद करा म्हणून सांगत असत, तसेच कोणी नाही म्हणायची तर मुभाच नसायची. कोणी नाही महणाले तर वाटेल तसे अत्याचार करायचे.

  या शाळेबाबतही असेच झाले. दर थोड्या दिवसांनी येथील राज्याचे अधिकारी येवून नानाभाईंना सांगून जात कि शाळा बंद करा म्हणून परंतु नानाभाई शाळा बंद करत नसत. ते म्हणायचे शिकुद्या मुलांना, बहारुद्या मुलांना. हे ऐकून तिथल्या प्रशासन अधिकारी यांना राग यायचा. 2 वेळा सांगूनही शाळा बंद होत नाही म्हटल्यावर तेथील न्यायाधीश आणि अधिकारी पोलिस सर्व जण शाळेत आले आणि त्यांनी आज आता ताबडतोब शाळा बंद झाली पाहिजे असे फर्मान काढले. नानाभाई म्हणाले की ही शाळा तर आम्ही चालवतो आहे, तुमच्याकडून काही मागत नाही. असे म्हटल्यावर अधिकाऱ्यांचा राग अनावर झाला आणि त्यांनी हातात असलेल्या बंदुकीच्या दांड्याने नानाभाईंना मारायला सुरुवात केली. नानाभाई तसे वयस्क असल्याने तो अति रागाने केलेले प्रहार सहन करू शकले नाही आणि गंभीर जखमी झाले. ते हालचाल करत नाहीत हे पाहून अधिकाऱ्यांनी आपला मोर्चा सैगाभाईंनकडे वळवला. ज्या ट्रक मधून सर्व पोलिस अधिकारी आले होते त्या ट्रकला मोठ्या दोरखंडाने बांधण्यात आले आणि ट्रक बरोबर सैगाभाईंना फरफटत ओढुन न्यायला सुरुवात झाली.

  शाळेजवळच्या आपल्या शेतात छोटी कालिबाई आपल्या आई वडिलांबरोबर चारा कापायचे काम करीत होती. शाळेत झालेल्या ह्या सर्व प्रकाराने मोठा आवाज झाला आणि आजू-बाजूला शेतात काम करणारी आणि रस्त्यावरून जाणारी गावातील मंडळी शाळेजवळ जमा झाली. कालिबाई सुद्धा धावत पळत शेतातले काम सोडून शाळेजवळ आली. धावताना तिच्या हातात घास कापण्याचा कोयता तसाच होता. ती शाळेजवळ पोहोचली. पहाते तर काय तिच्या शिक्षकांना दोरीला बांधून फरफटत नेत आहेत. कालिबाईने माझ्या शिक्षकांना असे बांधून नेवु नका, सोडा त्यांना असे जोरात म्हटले पण काही उपयोग झाला नाही. ट्रक पुढे सरकू लागला कालिबाई चवताळून जोरात पळत गेली आणि हातात असलेल्या कोयत्याने सैगाभाईंना बांधलेला दोर छाटून टाकला आणि त्यांची मृत्यूच्या दाढेतून सुटका केली. मात्र गावासमोर झालेल्या ह्या प्रकाराने प्रशासन अधिकारी संतापले आणि हातात असलेल्या बंदुकीतून त्यांनी गोळ्यांची बरसात छोट्या कालिबाईवर केली. आता गावातले सर्व जण एवढा वेळ पाहत असलेले आणि जमा झालेल्या सगळ्या लोकांनी अधिकाऱ्यांना घेराव घातला आणि त्यांच्यावर हल्ला चढवला. कसाबसा अधिकाऱ्यांनी त्यातून पळ काढला.

  मात्र, 13 वर्षीय कालिबाई ह्या हल्ल्यात गंभीर जखमी झाली. तिला उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले गेले पण घडल्या प्रकारानंतर दोन दिवसांनी कालिबाईने या जगाचा निरोप घेतला.

  शिक्षकांप्रती आणि शिक्षणाप्रती असलेल्या कालिबाईच्या भक्तीची गाथा म्हणजे आजच्या एकविसाव्या शतकातील शिक्षकांची चेष्टा करणाऱ्या, त्यांना नावे ठेवणाऱ्या पिढीसाठी डोळ्यात अंजन घालणारी आहे.

महान क्रांतिकारक तर अनेक आहेत पण ही छोटी क्रांतिकारक बालिका आपल्या सर्वांसाठी अनमोल आहे.

राजस्थानच्या डुंगेरपूरमधे अनेक योजना कालिबाईच्या नावाने चालतात.

खरोखरच कालिबाईची प्रेरणादायी आहे गाथा | जीच्यासमोर आदराने नतमस्तक होतो आमचा माथा ||


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational