Shubhangi Belgaonkar

Tragedy

4.3  

Shubhangi Belgaonkar

Tragedy

चटका

चटका

5 mins
723


वैशाखीचा प्रखर उन्हाळा | आला दिन तो माध्यान्हीला ||

      हे गाणे रेडिओवर सुरु होत, आयोजकांनी प्रसंगानुसारच एप्रिल महिन्यातील ऐन उन्हाळ्याच्या दुपारी हे गाणे लावले होत. गाणे ऐकता ऐकता माझी खिन्न नजर नकळत माझ्या मनाला सोबत घेऊन खिडकी बाहेर रस्त्यावर गेली होती. ऐन उन्हाची दुपारची वेळ रस्त्यावरची रहदारी वर्दळ सुद्धा एकदम कमी झाली होती. नजरेला सुद्धा ऊन सहन होत नव्हत. नजर सारखी सारखी समोरच्या झाडाच्या सवतील जाऊन तिथेच रेंगाळण्याचा प्रयत्न करत होती. अंगाची नुसती काहिली झाली होती. मनही अस्वस्थपणे भरकटत होत आणि राहून राहून विचार येत होते परवा होणाऱ्या ऑपरेशनचे.

      ऑपरेशन? हो ऑपरेशन. आपण कितीही विज्ञान युगात जगत असलो, अद्ययावत विज्ञान आणि तंत्रज्ञान यांनी वैद्यकीय जगतात केलेली प्रगती माहिती असली तरी ऑपरेशन म्हटलं कि मनात भीती उभी राहतेच. नको ते विचार मनात येतात. भूतकाळ आठवतो. भविष्यकाळाबद्दल मनात प्रश्नाचिन्ह निर्माण होते आणि ऑपरेशन या प्रकारची भीती वाटायला लागते.

      मी तर शास्त्राची पदवीधर होते, शिक्षण शास्त्राची पदवीधर आणि डोळसपणे शास्त्र शिकवणारी एक शिक्षिकाही होते, तरीही नुसत्या ऑपरेशनच्या कल्पनेने थिजून जात होते. अंगावर काटा उभा राहत होता. डोळ्याच्या कडा पाणावत होत्या. कारण हे ऑपरेशन नव्हत शरीराच्या केवळ एखाद्या भागाच, तर त्याच सरळ सरळ नात होत माझ्या भाव विश्वाशी, माझ्या स्त्रीत्वाशी, माझ्या पत्नीत्वाशी, माझ्या मातृत्वाशी, म्हणूनच मनोमन पूर्णपणे हेलावून गेले होते. उलट सुलट विचार मनात येऊ नये म्हणून स्वतःला जास्तीत जास्त कामात, शाळेच्या कामात अडकवून ठेवण्याचा प्रयत्न केला होता. पण तरी निश्चित केलेली ती वेळ थोडीच चुकणार होती.

      आदल्या दिवशी हॉस्पिटलमध्ये अँडमिट होण्यासाठी जाण्याची वेळ आली. तयारी झाली. मी देवघरासमोर बसले, डोळे मिटले, हात जोडले. डोळे उघडले तेव्हा दोन्ही मुले, माझे पती बाजूला उभे होते. सासूबाई सासरे बाहेरच्या खोलीत उभे होते. सासूबाई हातात कुयरी घेऊन कुंकू लावण्याच्या तयारीत तर सासरे आशिर्वाद द्यायच्या. सार कसं शांत आणि गंभीर. दोन्ही मुलांचेही डोळे डबडबलेले, मुलगा मला बिलगत म्हणाला, “आई, घाबरू नकोस, खरच काही होणार नाही”, तर छोटीला काय बोलाव ते सुचतच नव्हत. ह्यांनी पाटीवर नुसत थोपटल्यासारख केल आणि पटकन जीना उतरून स्कूटर काढायला खाली गेले. स्कूटरवरूनच हॉस्पिटलमध्ये पोहोचलो. हॉस्पिटल म्हणजे तसे अगदी छोटेसे, एक जनरल वॉर्ड, ऑपरेशन रूम व फक्त दोनच स्पेशल रूम. मात्र डॉक्टरीण बाई खूपच हुशार त्यामुळे त्यांच्यावर प्रचंड विश्वास होता. डॉक्टरीण बाईनी गेल्यावर लगेचच तपासले आणि अॅडमिट व्हायला सांगितले. त्या छोट्याशा हॉस्पिटलमधली स्पेशल रूम आम्हाला हवी होती अशी कल्पना डॉक्टरांना देऊन ठेवली होती. त्याप्रमाणे बॅग उचलून स्पेशल रूमकडे गेलो. पहातोतर त्या रूममध्ये अगोदरच एक बाळंतीण पेशंट आपल्या छोट्या दोन लहानग्यांसह शांत झोपली होती. तिथे असलेल्या नर्सकडे चौकशी केली तेव्हा ती म्हणाली, “आम्ही त्यांना जरा वेळाने दुसरीकडे शिफ्ट करणार आहोत. तो पर्यंत तुम्ही रिकाम्या रूममध्ये बसा”. थोड्यावेळाने ती दोन चिमुकली रडू लागली व त्यांची माताही जागी झाली. तिला दुसऱ्या रूममध्ये शिफ्ट केले गेले आणि आतापर्यंत तरी सगळ मनासारखा झाला म्हणून आम्ही निश्चिंत झालो.

      मला सोडायला आलेले सगळेजण रात्री हॉस्पिटलमध्ये थांबायची गरज नाही म्हणून मुक्कामाला घरी गेले. माझा काहीवेळ माझ्या खोलीतून शेजारी शिफ्ट केलेल्या त्या बाळंतीणीशी, तिच्या आईशी व हॉस्पीटलमधील इतर बायकांशी गप्पा मारण्यात गेला. आपल्या आईसच्या कुशीत ती जुळी बाळ शांत झोपली होती. जुळ्या मुलांच्या प्रसववेदनांनी त्यांची आई म्लान झाली होती, थकली होती परंतु तरीही दोन बाळांची आई झाल्याचे मातृत्वाचे समाधान तिच्या चेहेऱ्यावर स्पष्ट दिसत होते. बाळांची आई दिसायला खूपच सुंदर होती व तिचे नाव सगुणा होते.

      सगळ्यांशी गप्पा मारून मी माझ्या खोलीत आले. कॉटवर मांडी घालून बसले तेव्हा मला एकटेपणा जाणवायला लागला. म्हणतात ना “Empty mind is Devils Home”, त्याप्रमाणे माझ्या रिकाम्या डोक्यात पुन्हा अनेक विचार येऊ लागले. समोरच भिंतीवर लटकत असलेल्या कॅलेंडरकडे लक्ष गेले. ते एक सुंदर गणपतीचे चित्र असलेले कॅलेंडर होते. माझे हात नकळत जोडले गेले आणि “वक्रतुंड महाकायं सुर्यकोटी समप्रभ: निर्विघ्नमं कुरुमे देव, सर्वकार्येषु सर्वदा” अस ओठ पुटपुटले. जोडलेले हात गणपतीच्या चित्राकडे पाहत कपाळाला लावले, छातीला लावले, एक खोल श्वास घेऊन निश्वास टाकल आणि बिछान्यावर लवंडले. हळू हळू झोप लागायला लागली आणि शांतपणे झोपेत असतांना एकदम जग आली.

      खोलीबाहेर चांगलीच धावपळ सुरु झाली होती. मी खोलीत लाईट लावला व खोलीबाहेर काय झाले पाहण्यासाठी गेले तर त्या शेजारील खोलीतील बाळंतीनीची आई नर्सला हक मारत होती. ताबडतोब डॉक्टरीण बाईंना बोलवा अस म्हणत होती. नर्सने धावपळ करून सलाईन लावले. एकीने बाईंना फोन केला. डॉक्टरीण बाईंनी, “मी येतेच आहे”, तो पर्यंत काही औषधे देण्यास नर्सला सुचविले. त्याप्रमाणे त्या नर्सने सगुणाला ती औषधेही दिली. परंतु दोन तास अगोदर माझ्याशी छान गप्पा मारणारी बाळांची आई खूपच अस्वस्थ झाली होती. तिला भरपूर धापही लागली होती, रक्तस्त्रावही वाढला होता. तिच्याकडे बघून तिची आई व मी खूपच बेचैन झालो होतो. तिची आई तिच्या डोक्यावरून हात फिरवत होती. प्रत्येक मिनिट सुद्धा खूप मोठा वाटत होता. डॉक्टरीण बाई कधी एकदा पोहोचतील असे वाटत होते. या परिस्थितीत आपण तिला काहीच मदत करू शकत नाही याचे वाईटही वाटत होते. इतक्यात डॉक्टरीण बाई आल्या, त्यांच्याबरोबर आणखी एक तज्ञ डॉक्टरही आले.

      एव्हाना माझ्या लक्षात आले कि मृत्यूने आपल जाळ टाकलंय व हळू हळू तो ते आवळायला लागलंय. डॉक्टरांचे प्रयत्न सुरु झाले. मी अस्वस्थ होऊन माझ्या खोलीत आले. मागच्याच भितीवरील गणपती समोर हात जोडले, डोळे मिटले तरी तो गणपती डोळ्यासमोर स्पष्ट दिसत होता. कळवळून प्रार्थना केली, “देवा, दोन बाळांच्या या आईला तू आज आयुष्य दे, तिला वाचव, तुला बाळांच्याच आईला न्यायचं असेल तर मला ने, कारण माझी बाळ मोठी आहेत, समजूतदार आहेत, पण या चिमुकल्यांच्या आईला काहीही करून वाचव, एवढी माझी हाक ऐक”. पुढील पाच मिनिटे कशी गेली काहीच कळाल नाही आणि माझ्या कानावर आला त्या आईच्या आईचा आर्त आक्रोश! मी खोली बाहेर गेले तर सगळ काही संपल होत. अखेर त्या पाषाण हृदयी मृत्यूने आपले पाश आवळले होते. गणपतीनेही एका आईने दुसऱ्या आईसाठी केलेली प्रार्थना अव्हेरली होती. डॉक्टरीण बाई, डॉक्टर सॉरी म्हणून निघून गेले. माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले.

      त्या चिमुकल्यांना मात्र गाढ झोपेत उद्याच्या जगात आपण आईविना आहोत याची काहीच कल्पना नव्हती. मनात एकदा अस आल माझ्या रूममधून शेजारच्या रूममध्ये तिला शिफ्ट करून मी माझा मृत्यू तर शिफ्ट केला नव्हता? हे सर्व प्रत्यक्ष पाहणारी मीही एक पेशंट होते.

दुसऱ्याच दिवशी माझाही मोठ ऑपरेशन होते. या प्रसंगाचा माझ्यावर अधिक ताण येऊ नये म्हणून डॉ. बाईंनी मला झोपेच इंजेक्शनदिल व मला गाढ झोप लागली.

दुसऱ्याच दिवशी सकाळी माझं ठरलेलं ऑपरेशन यशस्वी झालं म्हणूनच तर मी हा मनाचा चटका आपल्याला सांगू शकले.

मातृत्व हरतांना, आणि नियती जिंकताना मी त्या दिवशी डोळ्याने पाहिलं होत. डॉ. बाईंनि केलेलं ऑपरेशन यशस्वी झालं होत मात्र भगवंताने केलेलं ऑपरेशन मात्र फेल गेल होत.


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy