Shubhangi Belgaonkar

Others

4.3  

Shubhangi Belgaonkar

Others

वाण

वाण

3 mins
342


   प्रत्येक अधिक महिना आला की तिचे स्वतः साठीचे नियम ती स्वतःच लावून घ्यायची आणि तसेच वागायची. अगदी लहानपणापासून गोपाळ कृष्ण मंदिरात जायची. जन्माष्टमीच्या वेळी तर मंदिरातील कीर्तने, गवळण, टिपरी नृत्य ह्यात तल्लीन होवून जायची. लहानपणा पासून ती छानशी मूर्ती तीचे गोंडस गोजिरे रूप तिला फार आवडायचे. कृष्णलीला, गोप-गोपिका ह्यांचे वर्णन ऐकून तर त्या काळाचा आभास व्हायचा. तिला “शांताकारं भुजगशयानं” हा श्लोक तर फार आवडायचा. तिला दिवसातून कितीदा तरी याद्वारे हरीचे चिंतन करायची ती.

श्रावणातील जन्माष्टमी निमित्त त्या श्रीकृष्ण मूर्तीला विविध रूपात सजवायचे जसे की पाळण्यातील कृष्ण, चंद्रावरील कृष्ण भगवान, शेषनागावरील कृष्ण, गरुडावरील कृष्ण, राधारूपी कृष्ण अशी एक ना अनेक. त्या बाळकृष्णाची रूपे पाहून ती हरखून जायची.

व्रत-वैकल्ये यावर तिची विशेष श्रध्दा होती. अगदी मनापासून ती हे सार काही करायची. एकविसाव्या शतकात अगदी शिकली सावरलेली असून सुद्धा ती हे सारे काही करते. असे पाहून नातेवाईक, आजू-बाजूचे, तिची मुले सुद्धा म्हणायची की “काय आई हे? या जमान्यात कोणी ही व्रत वैकल्ये करते का?” मग ती म्हणायची आरे माझे माझ्यापाशी, मी कोणाला काही सांगते का की तुम्ही पण असे करा. मला आवडते मी करते. अनेक कुटुंबातील व्यक्ती ज्यावेळा टीव्ही बघत असायच्या त्यावेळी हि नामस्मरणात दंग असायची. म्हणायची हेच येणार आहे माझ्यासोबत आणि माझे भगवान येणार माझ्याकडे.

त्रिपुरी पौर्णिमेला तिच्या मैत्रिणीने तिला सांगितले की घरी श्री शंकर महादेव आणि विष्णूची एकमेकांजवळ ठेवून पूजा करायची म्हणजे दोन्ही देव घरी येतात. असे ऐकल्यावर हिने त्रिपुरी पौर्णिमेला दोन्ही देवांची मनोभावे पूजा केली आणि देव घरी येणार म्हणून वाट बघत राहिली.

आपल्याला सगळे वेड्यात काढतील, आपली मज्जा घेतील, फालतु अंधश्रद्धा आहे असे म्हणून सगळे हसतील, म्हणून हि गोष्ट तिने कोणालाच सांगितली नाही. तिच्या आणि तिच्या नवऱ्या मध्ये वयाचे जास्त अंतर होते म्हणून की काय कोण जाणे नवऱ्याने कधीच तिला समजून घेतले नाही. साध्या साध्या गोष्टीत सुद्धा तुला काय कळते. तुला काय समजते असे म्हणून तिच्यात सतत काहीतरी कमी आहे असेच दाखवायचा प्रयत्न केला.

त्यामुळे तिने हि तिच्या मनातली गोष्ट कोणालाच सांगितली नाही. रोज तिला वाटायचे देव कोणत्या रुपात येईल दारावरच्या भिक्षेकार्याच्या रुपात येईल की प्राणी पक्षाच्या रुपात येईल. देव जर सर्वत्र आहे तर तो मला कसा दिसेल? तो आलेला मला समजेल का? मी कसे ओळखणार देवा तुला? असे एक ना दोन अनेक प्रश्न तिला पडायचे. कधी कधी रात्री सुद्धा तिला झोप यायची नाही तिला या विचाराने.

रोज विचार करून करून तिला थकवा यायला लागला. सतत एकच विचार करून डोके भणभणून गेले. एक दिवस देवासमोर पूजा करताना ती देवाला म्हणाली “देवा, आता खूप वाट बघायला लावलीत, आता लवकर या. मी माझ्या मुलांना सांगितले आहे “God Is Coming”. याना आता नका अंत बघू”. आणि तो दिवस आला. पहाटे-पहाटे तिच्या कानात कोणीतरी गुणगुणले. वेडी की खुळी आहेस तू. मी तर तुझ्या घरातच आहे. तुझ्या नातवंडांच्या रूपात आणि कानातले बोलणे थांबले.

तिच्या मुलीच्या बाळंतपणात तिची मुलगी जास्त आजारी झाली. डॉक्टरांनी प्रयत्नांची शिकस्त केली आणि जसा देवकी-वासुदेवाचा बाळकृष्ण अतिशय कठीण अशा कसोटीत जन्माला आला आणि यमुना पार करून गोकुळात पोहोचला तसाच तिचा नातु अतिशय संकटांचा सामना करून अष्टमीला आला आणि अधिक श्रावणाचे देवाने दिलेले वाण म्हणून पुन्हा तितक्याच कठीण प्रसंगांना सामोरे जावून श्रावण एकादशीला तिची नात सोनपावलांनी आली.

तिला आठवलं अष्टमीला आलेला तिचा कान्हा आणि अधिक श्रावण महिन्यात एकादशीला आलेली तिची राधा. तिची दोन्ही नातवंडं तर तिच्या व्रत वैकल्यांची परिपूर्णता होती. आता नव्या जोमाने ती पुन्हा त्या कृष्ण राधेच्या बाललीलांमध्ये आणि हरी हराच्या नामस्मरणात दंग झाली.

अधिक महिन्यात जावयाला देव समजून त्याची पूजा करतात आणि त्याला सच्छिद्र पदार्थाचे जसे की अनारसे, मैसूरपाक, बत्तासे याचे वाण देतात तसे अधिक महिन्यात देवाने दिलेल्या ह्या बाळ रूपातील वाणाने ती तृप्त झाली होती.



Rate this content
Log in