Shubhangi Belgaonkar

Children Stories

4.3  

Shubhangi Belgaonkar

Children Stories

झिंगाट चिकु

झिंगाट चिकु

2 mins
291


एक चिकु नावाचा छोटा गोंडस गोजिरा मुलगा होता. त्याचे आई-वडील खूप शिकलेले मोठे अधिकारी होते. आई सकाळीच उठून कामावर जाई तर वडील सारखे फिरतीवर बाहेर गावीच असायचे. आजी आजोबा दुसऱ्या लांबच्या गावाला त्यामुळे आई-बाबा कामावर गेल्यावर चिकुला सांभाळायला यायच्या त्या त्याच्या “मंदाबाई”.

मंदाबाई नावाप्रमाणेच थोड्या मंदाच होत्या. त्या चिकु उठला कि त्याला त्याचे आवरायला सांगायच्या. चिकु म्हणायचा मी दात नाही घासणार, मी नाही तोंड धुणार, मी नाही दुध पिणार असे म्हणून खूप हट्टीपणा करायचा. मंदाबाईंना तो काही ऐकायचा नाही. चिकुच्या आई बाबांनी चिकुची चौकशी करण्यासाठी मंदाबाईंजवळ एक भ्रमणध्वनी (मोबाईल फोन) दिला होता.

चिकुच्या हट्टीपणामुळे मंदाबाई अगदी वैतागून जायच्या. मग त्यांनी एक युक्ती केली. चिकुचे आई बाबा, चिकु जेव्हा जेव्हा हट्टीपणा करायचा तेव्हा त्याला ‘सैराट’ सिनेमातील ‘झिंग झिंग झिंगाट’ गाणे लावून द्यायचे हे मंदाबाईंनी पहिले होते. मग त्यांनीही तेच करायला सुरुवात केली. चिकु दात घासणार नाही म्हणाला कि झाले ‘झिंग झिंग झिंगाट’ सुरु. चिकु दुध नाही पिणार म्हणाला कि ‘झिंग झिंग झिंगाट’ सुरु. चिकु अंघोळ नाही करणार म्हणाला कि झाले ‘झिंग झिंग झिंगाट’ सुरु. असे करता करता चिकुची प्रत्येक गोष्टच ‘सैराट’च्या गाण्यावर बिनबोभाट सुरु झाली.

मग चिकुला शाळेत प्रवेश घ्यायची वेळ आली. चिकुला आई बाबा शाळेत प्रवेश घेण्यासाठी म्हणून घेऊन गेले. बाईंनी विचारले, ‘बाळा, नाव सांगतोस का तुझे?’ चिकु म्हणाला ‘नाही सांगणार, झिंगाट लावा पहिल्यांदा’.

चिकुच्या बाईंनी त्याला चॉकलेट दिले व म्हणाल्या ‘सांगतर बाळा समोरच्या तक्त्यावर कोणती फळ आहे ती?’ चिकु म्हणाला, ‘पहिले झिंगाट लावा’ ‘अन त्या तिथे समोर तर फक्त तक्ता आहे, कुठे फळ नाही काही नाही, फक्त झिंग झिंग झिंगाट’.

आता चिकुच्या आई वडिलांना कळेना कि चिकुला तक्त्यावरचे काही दिसत नाही कि काय? चिकुच्या बाई म्हणाल्या, ‘बाळा, आता तुला मी एक गाण सांगते तु माझ्या मागुन म्हण’. बाई म्हणाल्या, “सदैव सैनिका पुढे जायचे”, चिकुच्या चेहेऱ्यावर काहीच प्रतिक्रिया नाही. चिकु म्हणाला, ‘झिंग झिंग झिंगाट'. चिकुच्या आई वडिलांची अवस्था तर आता फारच विचित्र झाली.त्यांना कळेना काय झाले आपल्या मुलाला नीट दिसत नाही कि ऐकायला नाही.

आपली झालेली चूक त्यांच्या लक्षात आली. सारखा मोबाईल पाहून चिकुच्या डोळ्यावर तर सारख झिंगाट ऐकून त्याच्या कानावरही थोडा परिणाम झाला होता. त्याला एकही चांगली सवय राहिली नव्हती.

मग चिकुच्या आई-बाबांनी स्वतः श्लोक म्हणायला सुरुवात केली. स्वतः चिकुला चांगल्या चांगल्या गोष्टी सांगायला सुरुवात केली. मोबाईलचे वेड कमी करण्यासाठी त्याला चित्रकला, हस्तकला याची सवय लावली आणि मग चिकुचे ‘झिंगाटचे वेड’ कायमचे गेले. चिकुचे सारे घर आनंदले. प्रगतीचे दर खुले झाले.


तात्पर्य: मोबाईलचा अतिवापर टाळा, बाळांची ज्ञानेंद्रिये सांभाळा.



Rate this content
Log in